अरुंधती देवस्थळे

आंतरराष्ट्रीय पातळीवर वैशिष्टय़पूर्ण घरांसंबंधी चर्चा होते तेव्हा भव्य, प्रशस्त इमारतींसमोर एक छोटंसं घर निसर्गदत्त आत्मविश्वासाने उभं असलेलं दिसतं : ‘फॉलिंगवॉटर’! फॉलिंगवॉटर हे पेनसिल्वानियातील लॉरेल हायलँड्समध्ये बेअर रनमधल्या धबधब्याच्या भल्याथोरल्या कातळावर बांधलेलं कमालीचं निसर्गरम्य घर जगातल्या बहुचर्चित ऑरगॅनिक आर्किटेक्चरच्या उदाहरणांपैकी एक मानलं जातं. १९३५-३७ मध्ये एडगर आणि लिलीअन कौफमन या दाम्पत्यासाठी वीकेंड होम म्हणून ख्यातनाम आर्किटेक्ट फ्रॅंक लॉईड राइट यांनी बांधलेलं हे घर आज युनेस्कोच्या हेरिटेज वास्तूंपैकी एक आहे. कदाचित हा सन्मान मिळालेली जगातली ही सर्वात छोटी इमारत. हे घर अमेरिकन सरकारने ‘नॅशनल हिस्टोरिक लँडमार्क’ म्हणून घोषित केले आहे आणि ‘नॅशनल रजिस्टर ऑफ हिस्टोरिक प्लेसेस’मध्येही नोंदलेले आहे. कौफमन कुटुंब १९३७-६३ च्या दरम्यान इथे येत राहिलं आणि त्यांच्या माघारी घराच्या उदारपणाला शोभणाऱ्या ‘इदं न मम्’ वृत्तीने त्यांच्या मुलाने ही वास्तू १५०० एकर जमिनीसकट राज्य सरकारला देऊन टाकली. ‘फॉलिंगवॉटर’ हा सुप्रसिद्ध आर्किटेक्ट राईट यांचा एक मास्टरपीस मानला जातो यात आश्चर्य नाही. राईटना लाभलेल्या दीर्घायुष्यात (१८६७-१९५९) त्यांनी ८०० च्या वर इमारती म्हणजे संस्था, कलासंग्रहालये, हॉटेल्स, चर्चेस, स्मृतिस्थळे आणि नामवंत व्यक्तींची आगळीवेगळी घरे डिझाइन केली. त्यापैकी आठ इमारती युनेस्कोच्या हेरिटेज साइट्स ठरल्या आहेत. ‘I believe in God, only I spell it Nature’ म्हणणाऱ्या राईटचा हा आवडता प्रकल्प.. स्वत: पूर्णपणे प्लॅन केलेला! (आर्किटेक्चरमध्ये रस असलेल्यांनी ‘फ्रॅंक लॉईड राइट- अ‍ॅन ऑटोबायोग्राफी’ हे त्यांचं आत्मकथन मिळवून वाचावं असं आहे. संवेदनशीलता आणि तर्कशुद्धता- जी त्यांच्या प्रत्येक कामांत दिसत असे, ती त्यांच्या लेखनशैलीतही दिसते.) 

Watch waiter’s priceless reaction to sketch artist's sweet surprise
न मिळालेल्या कौतुकाची पोचपावती! कलाकारानं हॉटेलच्या बिलवर रेखाटलं वेटरचं सुरेख चित्र; चेहऱ्यावर उमटलं सुंदर हास्य, Video Viral
curiosity about indians performance in paris olympic
अन्वयार्थ : असले ‘अव्वल स्थान’ काय कामाचे?
ie think our cities
IE THINC Second Edition: “लवकरच असमानता आणि हवामान बदल ही आपल्या शहरांसमोरची सर्वात मोठी आव्हानं ठरतील!”
Rejuvenation of water bodies Uran
वन्यजीवांची तहान भागवण्यासाठी पाणवठे पुनर्जीवित

हेही वाचा >>> अभिजात : सावळ्या रुखावळीत धूर मात्र कापरा..

हे घर म्हणजे एक मानवनिर्मित विसावा. न माणसाळलेल्या निसर्गात इतका बेमालूम मिसळून गेलेला, की उदाहरण म्हणून जगभरातून लोक ते पाहायला येत असतात. स्थानिक सँडस्टोन, लाकूड आणि काचेचा भरपूर वापर असलेलं हे घर आणि आसपासची १५०० एकर जमीन म्हणजे हिरवंकंच रान आहे. त्यामुळे श्रीमंती या मानवनिर्मित हिऱ्याची की निसर्गाच्या गर्भरेशमी कोंदणाची, हा प्रश्न पडावा. झालं असं की, राईटना माणूस, निसर्ग आणि पर्यावरण यांचा सहज समतोल साधणाऱ्या जपानी स्थापत्याचं फार आकर्षण होतं, म्हणून त्यांना कौफमन कुटुंबाचा लाडका, साधारण ३० फूट रुंदीचा प्रपात फक्त त्यांच्या नजरेसमोर ठेवायचा नव्हता, तर तो त्यांच्या कुटुंबात सामावून घ्यायचा होता. आणि तो त्यांनी वादविवादांती घेतलाही! अशा तऱ्हेने, की घराच्या प्रत्येक भागातून तो कोणत्या ना कोणत्या कोनातून दिसतो आणि त्याचं खळाळतं चैतन्य कानावर पडत राहतं. प्रत्येक खोलीला तिच्याहून मोठी चौकोनी गच्ची. तिच्या पलीकडे फक्त हिरव्या छटांचं राज्य. कौफमन दाम्पत्याच्या कलादृष्टीचं आणि माणसाला अलगद निसर्गाच्या मांडीवर नेऊन बसवणाऱ्या राईटच्या स्थापत्यकौशल्याचं कौतुक करावं तेवढं कमीच. हे घर आणि त्याच्या आतल्या जगभरातून हौसेने गोळा केलेल्या, अतिशय सुरुचीपूर्ण मांडणी केलेल्या सुंदर कलाकृती, संगीत आणि पुस्तकं.. सगळं कसं शांत, एकसंध आहे. इथे येऊन हे सगळं पाहणाऱ्या माणसाचं भिरभिरं होतं. वास्तू आणि तिचा परिसर बघत राहावा की एका कलासक्त कुटुंबानं शहरी गजबजाटापासून दूर, असा आपल्यासाठी निर्माण केलेला सर्वागसुंदर निवारा, हे कळत नाही. कोणा एका चिंतकाचं वाक्य आठवलं की, ‘सौंदर्याची परिसीमा म्हणजे अध्यात्माची सुरुवात’ असं काहीसं.. जागेच्या स्वाभाविक शांतीत झेन तत्त्वज्ञानातलं कालातीतपण कुठेतरी जाणवत राहतं.

मुख्य रस्त्यावरून प्रथम लागणाऱ्या फॉलिंगवॉटरच्या केंद्रानंतर इथे पोहोचायला खडकाळ वाट आहे. तासाभराची टूर आयोजक देऊ करतात. तिचा भर प्रामुख्याने स्थापत्यावर असतो. छत अगदी बेताच्या उंचीचं हे आत शिरल्याक्षणी जाणवतं. ५३०० चौ. फुटाच्या घरात कुठल्याही कक्षात जा- खूप मोकळ्या जागेचा फील येतो. यासाठी राईटबरोबरच श्रीमंत कौफमन साहेबांनाही दंडवत घालायला हवा. अनेक नामवंत माणसं इथे येत, पण तरी कमीत कमी सजावट ठेवलीय. हे घर एका अतिश्रीमंत माणसाचं आहे असा दिखाऊपणा कुठेही नाही. परिसराच्या नैसर्गिक सौंदर्यासमोर आपलं लहानपण माणसाने विनम्रतेने स्वीकारल्यासारखं! मुख्य घर पूर्ण झाल्यावर ते पाहायला येणाऱ्या पाहुण्यांसाठी त्याला एक वेगळी छोटेखानी इमारत जोडावी लागली. बहुतेकांना एखादी रात्र राहून दुसऱ्या दिवशी जावं असंच वाटायचं, असं त्यांच्या मुलाने- एडगर ज्युनिअर कौफमनने त्याच्या आठवणींत सांगितलं आहे. या वास्तूबद्दल जगभरात असलेलं कुतूहल लक्षात घेऊन ‘Fallingwater: A Frank Lloyd Wright Country House’ (१९८६) हे घराभोवतीच्या व्यक्तिगत आठवणींचं पुस्तकही त्याने लिहिलं आहे. मूळ घरात खाली बैठकीची खोली आणि स्वयंपाकघर होतं. दुसऱ्या मजल्यावर तीन बेडरूम्स आणि तिसऱ्या मजल्यावर त्यांच्या मुलाची- एडगर ज्युनिअर कौफमनची अभ्यासाची खोली आणि बेडरूम होती. बैठकीच्या खोलीतून पायऱ्यांनी खाली धबधब्यात जाता येई. दगडी घर. सर्वत्र अक्रोडाच्या लाकडाचं फर्निचर आणि दगडी फरशी. मोठ्ठी ‘फायर प्लेस’ खडकातून कोरलेली. आतलं बैठं फर्निचरही राईटनीच डिझाइन केलेलं.. रूढ कल्पनांपासून वेगळं. घरातील सजावटीसाठीही भोवतालच्या जंगलातल्या रोडोडेंड्रॉन वृक्षांनी सुचवल्यानुसार निसर्गातलेच रंग वापरले आहेत. म्हणजे नारंगी  पिवळा (यलो ऑकर) आणि काळसर लाल. घराचा विस्तार फार नाही. कल मिनीमलिझमकडे असावा. आपण निसर्गाचा फक्त एक भाग आहोत, या भावनेतून केलेली बांधणी. विशेष म्हणजे प्रपाताकडे पाठ फिरवणारी एकही भिंत या घरात नाही. मध्येच आधीपासून अस्तित्वात असलेला एक वृक्षसुद्धा न कापता त्याभोवती घर बांधले गेले आहे. प्रत्येक खोलीतल्या खिडक्या मोठमोठय़ा आणि सरळ उघडय़ावाघडय़ा निसर्गात उघडणाऱ्या. (शयनकक्षातून सरळ सूर्योदय होताना दिसतो म्हणे.) घरात भरपूर नैसर्गिक प्रकाश आणि वायुविजन आहेच; पण आपण एका काचेच्या घरात राहतोय असा आभास निर्माण करणाऱ्या खिडक्यांच्या लांबी-रुंदींमुळे आपण चोहीकडून वेढलेल्या निसर्गातच कुठेतरी आहोत असंच वाटत राहतं. दर्शकांसाठी एका छोटय़ाशा गॅलरीत कलावस्तू मांडलेल्या. पहिल्या मजल्यावरच्या जंगलासमोर उघडणाऱ्या चौकोनी गच्चीचं सौंदर्य आणि तिथे असणाऱ्याला मिळणारा सुकून फक्त अनुभवण्यासारखा.. शब्दातीत!

हेही वाचा >>> अभिजात : क्षण एक पुरे सौंदर्याचा..

राईटना सिमेंट काँक्रीट फारसे आवडत नसे. पण या घराच्या डिझाइनला जो लवचीकपणा अभिप्रेत होता, तो साकार करण्यासाठी त्याच्या वापराची परवानगी त्यांना द्यावी लागली. मजबुतीसाठी किती स्टील वापरावं यावरही बराच खल  झाला. राईटना कमीत कमी स्टील वापरायचं असे. पण यामुळे एकदा घराची एक गच्ची खचली आणि ती भरीचं स्टील घालून नव्याने बांधावी तशी दुरुस्त करावी लागली. ‘फॉलिंगवॉटर’ उत्कृष्ट  स्थापत्याचा एक नमुना  किंवा अमेरिकन स्थापत्यातलं एक आश्चर्य हे सगळं खरं असलं तरी त्याला दरवर्षी देखभाल आणि डागडुजीची गरज भासते, हेही खरंच. हिवाळ्यात बर्फ पडतं आणि धबधबाही गोठून एका जागी खिळल्यासारखा वाटतो, तेव्हाची काही छायाचित्रं सेन्टरमध्ये दाखवतात. घर उभं राहतानाच्या वेगवेगळ्या टप्प्यांच्या छायाचित्रांचं प्रदर्शन केंद्रात आहे. घराचं बजेट होतं दीड लाख डॉलर्स. आणि हा जगप्रसिद्ध मास्टरपीस निर्माण करणाऱ्या राईटची फी होती फक्त आठ हजार डॉलर्स. अर्थात मानधनापेक्षा त्यांना जे निर्माण करता आलं, ते त्यांना कीर्तीच्या शिखरावर नेणारं ठरलं. हे घर बघायला आजही दरवर्षी लाखोंनी लोक येतात.

जन्मल्यापासून जगभरात सगळ्याच माध्यमांत चर्चेचा विषय बनलेले हे एकमेव साधेसे घर असावे. यात राईट यांनी व्यक्तिश: बनवून घेतलेले १७० च्या आसपास फर्निचरचे नमुने आहेत. यातला एकही जगात दुसरीकडे कुठेच अस्तित्वात नाही. राईट यांनी डिझाइन केलेले इतके नमुनेही फक्त इथेच एकत्र आहेत. त्यामुळेही हे एक म्युझिअमच. हे घर आणि त्याचा आर्किटेक्ट ‘टाइम’ मासिकाच्या मुखपृष्ठावर झळकले होते. न्यू यॉर्कच्या म्युझिअम ऑफ मॉडर्न आर्टने ‘फॉलिंगवॉटर’वर एक खास प्रदर्शन भरवले होते.. फ्रॅंक लॉईड राईट यांच्या नव्या निर्मितीचं कौतुक करणारं!  

हेही वाचा >>> अभिजात : तो राजहंस एक : अमेडेव मोडीलियानी

न आवडण्यासारखं एकच आहे की, या निसर्गसुंदर कलाकृतीचं पर्यटनस्थळ झाल्यानं टिपिकल अमेरिकन व्यापारीकरण इथेही आल्यासारखं वाटतं. कितीही सुंदर, कलात्मक वस्तूंनी भरलेलं असलं तरी इथे दुकान असणं आवश्यक होतं का? तीच गोष्ट महागडय़ा कॅफेची. नजरेला खुपणारं असं इथे काहीही नाही. पण हे निसर्गाच्या आदराबद्दल ठाम मतं असणाऱ्या, इथे येणाऱ्या रस्त्यांवर विजेच्या दिव्यांसाठी खांबांच्या उभारणीची परवानगी नाकारणाऱ्या फ्रॅंक लॉईड राईटना आणि खुद्द कौफमन दाम्पत्याला कितपत पटलं असतं, कोणास ठाऊक.

arundhati.deosthale@gmail.com