‘तरुण वयात विज्ञान शिक्षण घेत असताना संपूर्ण आयुष्य फक्त खगोलशास्त्रातील संशोधनासाठी वाहून घ्यायचं असं माझ्या मनात आलं होतं. मी फक्त संशोधनच करत राहिलो असतो, तर हस्तिदंती मनोऱ्यात अडकलो असतो.’ हे विधान प्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांनी भारतीय विज्ञान इतिहासावर आधारलेल्या ‘दी सायंटिफिक एज’ या पुस्तकाच्या मनोगतात केलं आहे. सुदैवाने नारळीकरांनी आयुष्यभर महत्त्वपूर्ण संशोधन केलं, पण स्वत:ला हस्तिदंती मनोऱ्यात कधीही अडकू दिलं नाही. ते सर्वसामान्य लोकांमध्ये मिसळले, शाळकरी मुलांच्या प्रश्नांना उत्तरं देत राहिले, त्यांनी ज्ञानसमृद्ध, पण रंजक पुस्तकं लिहिली. विज्ञानकथा लिहिल्या. ‘आयुका’सारखं महत्त्वपूर्ण संशोधन केंद्र उभं केलं. अंधश्रद्धेच्या, छद्माविज्ञानाच्या विरोधात संयत, परंतु ठाम भूमिका घेतली. डॉ. नारळीकर यांच्या मृत्यूच्या बातमीनंतर सामाजिक माध्यमांवर सर्वसामान्य लोक ज्या तऱ्हेने भरभरून आणि आपुलकीने व्यक्त झाले, त्यातून नारळीकरांचं जनमानसातील स्थान महत्त्वाचं होतं हेच दिसून येतं. डॉ. नारळीकरांनी समाजावर जितकं प्रेम केलं, तितक्याच जिव्हाळ्याने समाजानेही त्यांना स्वीकारलं होतं.

डॉ. जयंत नारळीकरांचा जन्म अत्यंत विद्वान कुटुंबात झाला. त्यांचे वडील विष्णू वासुदेव नारळीकर हे नामवंत गणितज्ञ होते. त्यांचं आइन्स्टाइन यांनी मांडलेल्या सापेक्षतावादाच्या सिद्धांतावर प्रभुत्व होतं. त्यांच्या आई सुमती नारळीकर या संस्कृतपंडिता होत्या. त्यामुळे जयंत यांना लहानपणी गणित, विज्ञान यांसोबत संस्कृत साहित्य वारसादेखील मिळाला. त्यांनी ‘बनारस हिंदू विद्यापीठा’तून पदवी घेतली. ते टाटा शिष्यवृत्ती मिळवून पुढील शिक्षणासाठी केंब्रिजला गेले. तिथे असताना त्यांची भेट जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ फ्रेड हॉएल यांच्याशी झाली. फ्रेड हॉएल संशोधनाबरोबर विज्ञान प्रसाराचंही काम करायचे. ते विज्ञानकथासुद्धा लिहायचे. सर्वसामान्य लोकांपर्यंत विज्ञान पोचवण्याचं मोल नारळीकरांच्या लक्षात आलं, ते हॉएल यांच्या सहवासामुळे. आपण ‘हस्तिदंती मनोऱ्यात’ न अडकल्याचं श्रेय नारळीकर फ्रेड हॉएल यांना देतात.

फ्रेड हॉएल यांची साथ नारळीकर यांना संशोधनाच्या क्षेत्रात वेगळ्या वाटेवर घेऊन गेली. विसाव्या शतकात लागलेल्या नव्या शोधांमुळे विश्वाबद्दलच्या संकल्पनांमध्ये झपाट्याने बदल घडला. त्याचबरोबर ‘विश्वाचं नेमकं स्वरूप काय आहे?’ हा प्रश्नही सामोरा आला. या प्रश्नाच्या बाबतीत विज्ञानजगत दोन बाजूंमध्ये विभागलं गेलं. एक बाजू ‘विश्वाची उत्पत्ती महास्फोटातून झाली आणि विश्वाचा विस्तार सुरू आहे.’ अशी मांडणी करत होती. फ्रेड हॉएल मात्र दुसऱ्या बाजूचे होते. ते ‘विश्व स्थिर असून महास्फोट घडला नाही’ अशी मांडणी करत होते. सुरुवातीला या दोन्ही बाजू तुल्यबळ होत्या. पण १९६० च्या दशकातील नव्या निरीक्षणानुसार महास्फोटाच्या सिद्धांताचं पारडं जड झालं. विज्ञानाच्या क्षेत्रात प्रचलित सिद्धांताच्या विरोधात दुसरी बाजू मांडणं सोपं नसतं. तरीही नारळीकरांनी धैर्यानं दुसरी बाजू मांडली. फ्रेड हॉएल, जेफ्री बर्बिज आणि जयंत नारळीकर यांनी १९९०च्या दशकात ‘स्थिरवत स्थिती’ या नावाचा नवा सुधारित सिद्धांत मांडला. त्या सिद्धांताची मांडणी अशी की विश्वात प्रसरण, आकुंचन अशी दोलनात्मक आंदोलने होत राहतात. पण यात महास्फोटाची घटना होत नाही. हा सिद्धांत मुख्य प्रवाहापेक्षा वेगळा आहे आणि त्याला कमी पाठबळ आहे. पण विज्ञानाच्या इतिहासात असे आव्हानात्मक पर्यायी मार्ग महत्त्वपूर्ण ठरतात. या सिद्धांताशिवाय त्यांनी कृष्णविवरं, क्वांटम गुरुत्वाकर्षण या विषयांवर संशोधन केलं. वातावरणात ४० किलोमीटर्स उंचीच्या अंतरावर फुगे सोडून तिथल्या सूक्ष्मजीवांचं निरीक्षण करणं, भारतातील प्राचीन ग्रंथ आणि हस्तलिखितांमध्ये तारास्फोटासारख्या खगोलीय घटनांच्या नोंदी धुंडाळणं यासारखे आगळेवेगळे शोधप्रकल्प राबवले.

नारळीकर वैयक्तिक आयुष्यातही वेगळ्या मार्गावरून चालत राहिले. परदेशात उच्च शिक्षण घेतल्यानंतर त्यांना तिथे स्थायिक होणं सहज शक्य होतं. त्यांना तिथे भारतापेक्षा अधिक चांगल्या संधी नक्कीच मिळाल्या असत्या. पण, नारळीकरांनी भारतात माघारी येण्याचा निर्णय घेतला. भारतात परतल्यानंतर ते ‘टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च’मध्ये रुजू झाले. पुढे १९८८ मध्ये पुण्यात आयुकाची (इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर अॅस्ट्रॉनॉमी अँड अॅस्ट्रोफिजिक्स) स्थापना करण्याचं ठरलं. तेव्हा डॉ. यशपाल यांनी नारळीकरांना त्या संस्थेच्या प्रमुखपदी काम करण्याचं आमंत्रण दिलं. त्यांनी ते स्वीकारलं. त्यांच्या मार्गदर्शनाखाली ‘आयुका’ नामरूपास आली. तिथे दर्जेदार मूलभूत संशोधन सुरू झालं. त्याचबरोबर इथे सर्वसामान्य माणसांना आणि शाळेतील विद्यार्थ्यांना विविध कार्यक्रमांद्वारे येण्यास प्रोत्साहन दिलं गेलं. आजही प्रत्येक वर्षी ‘राष्ट्रीय विज्ञान दिना’ला शेकडो शाळकरी मुलं ‘आयुका’त येऊन तेथील विविध उपक्रमांमध्ये सहभागी होतात. त्यातून त्यांना विज्ञानाची गोडी लागते.

जयंत नारळीकर यांना पद्माभूषण, पद्माविभूषण, डॉ. शांतीस्वरूप भटनागर पुरस्कार, राष्ट्रभूषण फाऊंडेशन पुरस्कार, युनेस्कोचा कलिंगा पुरस्कार, महाराष्ट्रभूषण आणि इतरही अनेक महत्त्वाचे पुरस्कार मिळाले. त्यांची पुस्तकंदेखील खूप गाजली. त्यांना राज्य शासन, साहित्य अकादमी यांसारखे पुरस्कार जाहीर झाले. शास्त्रज्ञ आणि लेखक म्हणून प्रसिद्धी मिळत असतानाही त्यांनी ते वलय स्वत:च्या साध्यासोप्या वागण्यापासून दूरच ठेवलं. त्यांना मुलांनी विज्ञानावर विचारलेले प्रश्न आवडायचे. त्यांना अवघड संकल्पना सरळसोप्या भाषेत मांडण्याची किमया साध्य होती. चुकीच्या धारणांच्या विरोधात त्यांची भूमिका नेहमीच ठाम राहिली. ते त्याबद्दल सविस्तर स्पष्टीकरणही द्यायचे. त्यांनी भारतीय इतिहासाचा अभ्यास करून भारतात कोणते शोध लागले होते याची माहिती लोकांपुढे मांडली. ‘अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्रा’ने घेतलेल्या मुलाखतीत त्यांना ‘तुम्ही स्वत:चं काय वर्णन कराल?’ असा प्रश्न विचारण्यात आला होता. तेव्हा त्यांनी ‘मी स्वत:चा उल्लेख ‘मानवतावादी वैज्ञानिक’ असा करेन’ असं उत्तर दिलं होतं. त्यांची कारकीर्द पाहता ते उत्तर त्यांच्यासाठी समर्पक ठरतं. भारत अजूनही मूलभूत संशोधनाच्या क्षेत्रात खूप मागे आहे. १९३० मध्ये सी. व्ही. रमन यांना विज्ञानात नोबेल पदक मिळालं होत. त्यानंतर भारतीय वंशाच्या काही शास्त्रज्ञांनी हे मानाचं पदक मिळवलं असलं तरी भारत देशाच्या नावावर विज्ञानातलं एकही नोबेल नाही. भारतीय समाजात आजही मोठ्या प्रमाणात अंधश्रद्धा आहेत. वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अभाव आहे. या परिस्थितीला सामोरं जाण्याचा मार्ग नारळीकरांनी आयुष्यभर त्यांच्या प्रत्येक कृतीतून दाखवला. त्यांच्या प्रेरणेतून हस्तिदंती मनोऱ्यात न रमता, जमिनीवर, लोकांमध्ये मिसळून विधायक कामं करणाऱ्या शास्त्रज्ञांची, तंत्रज्ञांची आज खूप निकड आहे.

लेखक समाज आणि अवकाश विज्ञानाचे अभ्यासक आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

writetosukalp@gmail.com