|| अरुणा ढेरे

घरात पाहुणे. सगळ्यांचा नाश्ता होत आलेला असतो सकाळी. एवढय़ात फोन वाजतो. बहिणीचा फोन. आपण आनंदानं तिला म्हणतो, ‘‘वेळेवर फोन केलास.. ये आता तूसुद्धा इकडे.’’ ती म्हणते, ‘‘ऐक, लताबाई गेल्या. आत्ताच. पंधरा मिनिटांपूर्वी!’’ दोन दिवसांपूर्वी त्यांना हॉस्पिटलमध्ये हलवल्याचं कळल्यावर आपण त्यांच्या वयाचा आणि क्षणभर त्यांच्या अखेरीचाही विचार केलेला असतो; पण ती त्यांच्या पूर्णविरामाची बातमी ऐकायची मनाची तयारी असतेही आणि नसतेही. आपण क्षणभर शांत राहतो. बहीण म्हणते, ‘‘ऐकतेयस ना? आणि लगेच भाच्याला फोन करू नकोस. त्यानं त्याचा इन्स्टाग्राम, फेसबुक वगैरे सगळं बंद केलंय. आणि आता फोनही स्विच ऑफ करतोय. जाऊ  दे आजचा दिवस. मग येईल हळूहळू नॉर्मल वळणावर.’’

आपण हतबुद्ध होतो. तिचा जर्मनीत शिकणारा मुलगा लताबाई गेल्याचं अपरात्री ऐकतो. त्यांच्यावरची त्याची नितांत भक्ती माहीत असणारे त्याला सगळीकडून तीच बातमी कळवत राहतात. त्याला सहन होत नाही ते. फोन बंद करण्यापूर्वी तो आईला एवढंच कळवतो, ‘‘लताआजी गेली गं!’’ त्यानं कधी पाहिलेलंही नसतं लताबाईंना प्रत्यक्ष. पण अगदी लहानपणापासून तो त्यांची गाणी वेडावून ऐकत असतो. तो शास्त्रीय संगीत शिकतो. पण लताबाईंचा सर्व सप्तकांमधून फिरणारा अद्भुत स्वर त्याचा ठाव घेत राहिलेला असतो. तो त्यांना त्याच्यापुरतं ‘लताआज्जी’च म्हणतो. इतक्या सर्वसामान्य मुलाचं या स्वराशी असं नातं असू शकतं? आपल्या मनात येतं.

आपण फिरून घरात येतो. बातमी सांगतो. खाणाऱ्यांचे हात थांबतात. एकच कल्लोळ उठतो. प्रत्येक जण काहीतरी बोलत राहतो त्यांच्याविषयी. प्रत्येकालाच काही म्हणायचं असतं. जणू लताबाई प्रत्येकाच्या आत्मीय कोणी असल्यासारखी माणसं बोलत राहतात. साधी सामान्य माणसं.. मान्यवर नव्हेत. संगीताच्या क्षेत्रातली नव्हेत. पण त्यांचा उमाळा अनावर असतो. कारण चाकोरीत जगणाऱ्या आणि मरणाऱ्या सगळ्या राव-रंकांची दैनंदिनी स्वरांनी दरवळून टाकलेली असते लताबाईंनी. एरवी मर्ढेकरांच्या कवितेमधल्या ‘पिपात मेलेल्या ओल्या उंदरां’चीच कळा आली असती ना आयुष्याला!

घराघरांमधले दूरचित्रवाणीचे पडदे दिवसभर लताबाईंच्या मुद्रा प्रक्षेपित करत राहतात. शेकडो-हजारो माणसं मनानं अंत्ययात्रेत सामील होतात. मनानंच शिवाजी पार्कवरच्या गर्दीत जाऊन उभी राहतात. संध्याकाळी लाकडं धडधडून पेटतात. ज्वाळा उंच जात राहतात. भाऊ  काहीतरी खात बाहेर हॉलमध्ये येतो. भावजय नाराज होते. ‘‘आत्ता असं खाता खाता नका येऊ  इथे. शेवटचे विधी संपतायत.’’ ती म्हणते. तिच्या डोळ्यांत पाणी असतं.

‘‘तुम्ही भेटलाय ना त्यांना?’’ ती विचारते. शांताबाईंचा आणि माझा स्नेह तिला माहीत असतो. आपण फक्त नकारार्थी मान हलवतो. ‘‘मी पालंय एक-दोनदा जवळून. भेटले नाही.’’ आपण सांगतो. ताडदेवच्या स्टुडिओत अनिल मोहिलेंसाठी शांताबाईंनी लिहिलेलं गाणं रेकॉर्ड करायला आलेल्या लताबाईंना अगदी जवळून पाहिलेलं असतं आपण. त्यांचं हसणं आणि प्रत्यक्ष समोरून ऐकलेलं त्यांचं गाणं यांची आठवण स्वच्छ असते आपल्या मनात. कलावंत आपल्या निर्मितीत मग्न असतो तेव्हा किती सुंदर दिसतो ना! म्हणजे तो जेव्हा सादरीकरण विसरतो, आणि जे सादर करायचंय त्यात संपूर्ण उतरलेला असतो, तेव्हाचं देखणेपण विसरता येत नसतं आपल्याला.

पहिली सोबत करणारी आणखी एक आठवणही शनिवारवाडा महोत्सवाच्या मंचावरची. आपण प्रास्ताविक करणार असतो आणि मंचावर हृदयनाथ, लताबाई आणि शांताबाई! त्या दोन मैत्रिणींचं एकत्र खळखळ हसणंही गाण्याइतकंच वाजत राहिलेलं असतं आपल्या मनात.

आणि हो, एक आठवण आणखीही! त्यांच्या मोकळ्या केसांच्या संभाराची. खांद्यावरून घेतलेल्या पदराच्याही खालून त्यांच्या वेण्या दिसायच्या नेहमी. पण शांताबाईंबरोबर गेलेल्या यशोदा भागवतांनी आपल्या बोलक्या कॅमेऱ्यानं काढलेले त्यांच्या मोकळ्या केसांचे फोटो त्यांच्या सार्वजनिक प्रतिमेपलीकडचे! लांब, दाट, मोकळ्या केसांच्या एका आनंदी, तरुण मुलीचे! लताबाईंचं ‘बाईपण’ टिपणारे..

खरं तर एक आठवण त्यांच्या गाण्याचीही. अगदी आपल्यापुरतीच असलेली, पण मर्मात रुतलेली. लेह-लडाखच्या प्रवासात. लेहमधल्या वीर जवानांच्या स्मारकातली. आपल्या पुढय़ात चारही बाजूंना युद्धात लढलेल्या किंवा लढताना धारातीर्थी पडलेल्या जवानांची छायाचित्रं आणि जोडीला युद्धाच्या भीषणतेचे नोंदवलेले तपशील! ते पाहत असताना कानावर पडत राहतं ते लताबाईंचं गाणं.. ‘ऐ मेरे वतन के लोगो..’ आपल्या सुखवस्तू जगण्याला मागे सारत सैनिकांविषयीच्या आदरानं, प्रेमानं उचंबळून आलेली एक उष्ण, धगधगीत जाणीव डोळ्यांमधून पाझरत जाते. पुन्हा पुन्हा डोळे भरून घळघळा वाहतात. आता भावजयीच्या प्रश्नानं ते पुन्हा एकदा भरून येतात.

आपण आपल्यालाच पुन्हा पुन्हा पाहत राहतो. अगदी खरं तर सर्वसामान्यांमधल्याच आपण एक. आपण ना त्यांच्याशी दूरान्वयानंही संबंधित, ना आपण गाण्याच्या क्षेत्राशी दुरूनही निगडित. मग आपलं काय संपलेलं असतं? काय कमी झालेलं असतं आयुष्यातून? आपण काय गमावून बसलेलो असतो? मृत्यू हा कशाकशाचा शेवट असतो हे कळण्याचं वय असतं आपलं. तरीही आपल्या समजुतीची पावलं शहाणपणाच्या काठावर डगमगतात. लताबाईंच्या गाण्याने भिजल्यावाचून असलेला वयाचा एकही कोरडा तुकडा आठवत नाही आपल्याला. आपलं खेळवय, आपले बहरायचे दिवस, आपला उत्कट उधळणीचा काळ, आपलं खोल झुळझुळतं एकटेपण आणि आताचा ऊनउतरणीचा काळही त्यांच्या गाण्यांसोबत, त्या गाण्यांना जिवाशी धरून ठेवतच आलेला असतो.

लताबाईंच्या अपार्थिव स्वरानं आपल्याला कलेचं देणं काय असतं हे समजावलं. कितीतरी कलावंत, चित्रकार, नर्तक, संगीतकार, गायक, शिल्पकार, वादक यांनी आपलं लहानसं जगणं केवढं तरी समृद्ध केलं. या माणसांविना, यांनी जे निर्माण केलं त्या साऱ्याविना जगणं शक्य तरी होतं का आपल्याला! उमर खय्यामची अपेक्षा फार थोडी होती. एक सुरई आणि एक भाकरी. आपला लोभ सुटत नाही. भाकरी हवी; पण भाकरीचीही शुद्ध उरणार नाही असं डोळ्यांना, कानाला, मनाला भिडणारं सगळं काही हवं. माणसं हवीत, गाणी हवीत, पुस्तकं तर हवीच हवी! या हवेपणाचे सगळे सूक्ष्म-तरल संदर्भ लताबाईंच्या स्वरांनी जागवून जिवंत ठेवले आजपर्यंत. कवींना कविता आणि गीतकारांना गीत लिहिण्याचं सार्थक वाटावं असे शब्दांचे उच्चार! त्या शब्दांमधून ओघळणारा सगळा अर्थ पिऊन टपोरा होत जाणारा स्वर! ‘तिन्ही सांजा सखे मिळाल्या..’ ‘मोगरा फुलला..’ ‘नाम गुम जायेगा..’ ऐंद्रिय संवेदनांची हळुवार उघडझाप करत स्वरांचा शब्दांमधून होणारा तो आल्हादक वावर केवढा स्तिमित करणारा!

मराठी भाषा आणि कविता या स्वराची कायमची ऋणी राहील. रामदास आणि तांबे असोत, की सुरेश भट, सावरकर आणि कुसुमाग्रज असोत की ग्रेस- यांना अभिप्रेत अर्थालाही पालाणून जात वर दशांगुळे उरणारा स्वर! ‘आनंदवनभुवनी..’, ‘मावळत्या दिनकरा..’, ‘मालवून टाक दीप..’, ‘सागरा प्राण तळमळला..’, ‘सरणार कधी रण..’, ‘भय इथले संपत नाही..’ दोन शब्दांमधल्या अंधारातून आत उतरत कवितेमागच्या कवितेला भिडणारा स्वर! कवितेचा अर्थ माखलेल्या या स्वरानं आपल्या हृदयाशी सलगी केली आणि तीही अशी- की एरवी आपल्या सामान्य जगण्याला सहजी न होणारा अलौकिकाचा स्पर्शही त्या सलगीतून सहज होत गेला आपल्याला.

तशा अलौकिक पातळीवर वावरणाऱ्या दोघांच्या रचना जर लताबाईंनी गायल्या नसत्या, तर त्या माणसांचं लौकिकावेगळं अद्भुत अस्तित्व आपल्यासारख्या सामान्यांना बहुधा इतक्या मर्मस्पर्शी रीतीनं जाणवलंच नसतं. एक ज्ञानदेव आणि दुसरी मीरा! कशाला वळलो असतो तुम्ही-आम्ही ज्ञानदेवांच्या विराण्यांकडे? आणि मग कशाला त्या रचनांमधलं परमतत्त्वाचं झगमगतं रूप आपल्याला दिसलं असतं? तो मधुर, साधा, पण अतिउत्कट स्वर उंच जात थेट अर्थाच्या विराटपणात कसा पोहोचतो आणि आभाळ-मातीतलं अंतर कसा मिटवतो, हे कसं उलगडलं असतं? कासाविशी, समजूत, तृप्ती आणि शांती यांचा अनुभव देत देत या स्वरानं आपल्याला त्या बापरखुमादेवीवराच्या गाभाऱ्यातच नेऊन उभं केलं.

मीरा तर लताबाईंनीच गावी! तिचा स्वाभाविक वेल्हाळ आत्मनाश जणू फक्त त्यांनाच समजला असेल! तिचं आंतरचरित्र जाणणारा, गिरिधर गोपालाशी एकरूप होण्याच्या तिच्या कमालीच्या आर्त इच्छेतून उंच उफाळत वर येणारा आणि सर्वभर होणाऱ्या व्याकुळतेत तुडुंब होणारा त्यांचा स्वर झणझणत्या वेदनेच्या अतीव दुखऱ्या आनंदानं आपल्या श्रुती भरून टाकतो. एकेकदा वाटतं, की आपलं सगळं स्वरज्ञान ओंजळीत घेऊन पाच शतकं वाट पाहणाऱ्या मीरेनं त्यांच्या हृदयात ती ओंजळ रिती केली असेल.

तसे कोणीच नसतो आपण. या जगातल्या लक्षावधी, कोटय़वधी जिवांपैकी एक! पण आपल्यासाठीच गातं कोणीतरी, पसायदान मागतं, कोणीतरी आपलंच हृदय उसवतं, त्यातलं हीण उपसून लखलखतं दैवी विश्वभान उघडं करतं.. आणि आपण आपल्याच उजेडात येतो. हा उजेड दाखवणाऱ्या माणसांची मांदियाळी हळूहळू अज्ञाताच्या अंधारात निघून चालली आहे. आपलं जग तसं फार हलणार नाही, पण आतल्या सुखाचा श्वास मात्र कमी होतो आहे.

aruna.dhere@gmail.com