मानसी मोहन जोशी

चांगदेव काळे यांचा ‘ढगाखाली’ हा कथासंग्रह हाती आला आणि एक एक कथा वाचत असताना त्या कथेतील सौंदर्यस्थळे, भाषासौंदर्य, नात्यातील गुंफण, बारकावे टिपून अचूक शब्दांत मांडण्याची हातोटी लेखकाने अतिशय कुशलतेने सांभाळली आहे, हे अगदी पहिल्या कथेपासून लक्षात येते. कथा, कथेतील पात्रं, परिसर आणि त्यांच्या जीवनातील प्रसंग वाचताना एकीकडे नजरेसमोर तो प्रसंग उभा राहतो, तर दुसरीकडे त्या प्रसंगातून घडत जाणारे नाटय चेहऱ्यावर स्मितरेषा उमटवून जाते. कधी कधी नायकाच्या वा नायिकेच्या सुखदु:खाशी आपण समरसून जातो. मनाला एक प्रकारची हुरहूर लागून जाते.

lucky number by date of birth
पैसा, पद, प्रतिष्ठा तुम्हाला कधी मिळणार? भाग्यांकावरून पाहा तुमचे लकी वर्ष
Husband Appreciation Day
Husband Appreciation Day : महिलांनो, नवऱ्याला गृहीत धरता का? त्यांच्या पाठीवर कधी देणार कौतुकाची थाप?
Womens health It is need to understand mentality of pregnant women
स्त्री आरोग्य : काय असतं गर्भवतीच्या मनात?
kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !

चांगदेव काळे यांची प्रत्येक कथा वेगळी, जीवनाचं मर्म सांगणारी आहे. ग्रामीण भाषेतून जरी कथा असल्या तरी त्या वाचकाला ओढ लावतात. नेहमीच घडणारे, पण सुख, आनंद, निराशा, वैताग, दु:ख, माधुर्य, नात्याची वीण, माणुसकीचं नातं, गरिबीचे पेचप्रसंग, मनाचा हळुवारपणा, मायेचे बंधन, कुचंबणा अशा अनेक भावभावनांची सरमिसळ अत्यंत प्रभावीपणे लेखकाने व्यक्त केली आहे. लेखकाची निरीक्षण शक्ती अफाट आणि प्रसंगानुरूप आहे.

हेही वाचा : वाचनश्रीमंत सदरांचे नवे वर्ष; ‘लोकसत्ता’च्या संपादकीय पानांमध्ये वाचनीय स्तंभ

लग्नाच्या वरातीला घोडं हवं म्हणणारा भाचा, भावाची आर्थिक परिस्थिती माहिती असूनही मुलाच्या लग्नात हुंडयासाठी अडून बसणारी बहीण आणि त्यातून निर्माण होणारं नाटय मन हेलावून टाकतं. ‘झाकलेल्या मुठीत’ या कथेत राजकारण आणि नेत्यांच्या गोड भूलथापांना बळी पडणारे सरळमार्गी पितापुत्रांची परवड वाचताना चिडही येते. मोह माणसाला भुरळ घालतो आणि सुखीसमाधानी घर कोलमडून पडणारी ही कथा वास्तवाकडे पाहायला शिकवते. ‘ताई, तू हाक मार’ ही कथा वाचताना मानवी मनोव्यापाराचा लेखकाने सखोल अभ्यास केला असावा असं वाटत राहतं. बहिणीच्या सुखासाठी वाट्टेल ते करून पैसा उभा करणारा भाऊ आणि त्याच वेळी नवऱ्याच्या लोभीपणाला सांभाळत भावाच्या कुचंबणेला स्वत:च आत्मसमर्पण करणारी बहीण.. मनाचे गुंते अधिकच गहिरे करून जाणारी कथा मन हेलावून टाकते. ‘गजाची बायको’ या कथेत दारू पिऊन मारहाण करणाऱ्या गजाची आणि सरलाची कथा. तिच्या कानात गोम जाणं, ती विहिरीत पडणं, दवाखाना, पोलीस आणि पोलिसांची सामोपचाराची भूमिका गजाचे परोपकारी शेजारी गावकरी या सगळय़ांना एका सूत्रात बांधण्याची अप्रतिम कला या कथांमधून दिसून येते. ‘ऋणानुबंध’ कथा मानवी जीवनातील अत्युच्च मूल्य सादर करणारी आहे असं वाटतं.

हेही वाचा : खुदा की आवाज!

राधा आपल्या पाच गायी आणि एक खोंड मोत्या यांच्यावर निरातिशय माया करते. दुष्काळात उपाशी मरू नयेत म्हणून ती त्यांना सोडून देते तेव्हा तळमळत राहते आणि काही कालावधीने जनावरं गोठयात परततात तेव्हा त्यांच्या गळयात पडून रडते.. हा प्रसंग मनाला स्पर्शून जातो. प्राणीही माणसाला कसा लळा लावतात याचं अतिशय सुरेख, समर्पक वर्णन आपल्याला या कथेत वाचायला मिळते, तर ‘नखल्या’ ही कथा गूढतेकडे झुकणारी वाटते. लहान भावाला आई-वडिलांमाघारी शिकवून मोठं करणाऱ्या दादाचा त्याला आपल्या संसारात भार होतो. शेती न पडणाऱ्या पावसामुळे पिकत नाही हा दोष दादाचा नसला तरी त्याला घरातून मिळणारी वागणूक, त्याची मन:स्थिती आणि त्याच्या शेतातले नखल्याचे अचानक उगवलेले झाड.. ही कथा त्या झाडाभोवती एक भयवलय निर्माण करते आणि लेखक त्या गूढ वलयांकित झाडाचं रहस्य उलगडत जात असताना आपणही त्यामध्ये आपसूकच सामील होतो. पण शेवट मात्र चटका लावून जातो. मानवी मनोवृत्तीचे विविध पैलू लेखकाने या सर्व कथांमधून अगदी सहजपणे मांडले आहेत. राग, द्वेष, भाऊबंदकी, प्रेम, माया, लोभ, ईर्षां, स्पर्धा या भावभावनांसह नवरसाचाही साक्षात्कार आपल्याला या कथासंग्रहात पाहायला मिळतो.

हेही वाचा : आदले । आत्ताचे: एकांताचा निर्भय एल्गार

अतिशय सुंदर कथाबीज, उत्कृष्ट सखोल, अभ्यासपूर्ण मांडणी, ग्रामीण भाषेच्या जाणिवा, खुणा जागी होणारी लेखनशैली, वाचकाला गुंतवून ठेवण्याचं कसब हे लेखकाच्या लेखनशैलीचे वैशिष्टय आहे.
‘ढगाखाली’, – चांगदेव काळे, ग्रंथाली, पाने-२२५, किंमत- ३५० रुपये.