scorecardresearch

Premium

‘माझे पुस्तक छद्मविज्ञान नाही’

या विज्ञानविरोधी भूमिका मांडणाऱ्या पुस्तकाला सरकारने पुरस्कार कसा दिला, अशी चर्चा सुरू  झाली आहे.

book of evolution a scientific superstition,
उत्क्रांती- एक वैज्ञानिक अंधश्रद्धा?

डॉ. अरुण गद्रे

पुस्तकाच्या अनुवादाला मिळालेला राज्य पुरस्कार नाकारण्याचा एक वाद गाजत असतानाच, सरकारने गौरवलेल्या दुसऱ्या एका ग्रंथावरही आक्षेप घेणे सुरू झाले होते. समाजमाध्यमांतून आधी कुजबुज स्वरूपात असलेली त्याची व्याप्ती भाजपचे माजी खासदार प्रदीप रावत यांनी केलेल्या टीकेमुळे वाढली. अरुण गद्रे यांच्या ‘उत्क्रांती- एक वैज्ञानिक अंधश्रद्धा?’ या विज्ञानविरोधी भूमिका मांडणाऱ्या पुस्तकाला सरकारने पुरस्कार कसा दिला, अशी चर्चा सुरू  झाली आहे. या पुस्तकातील युक्तिवाद खोडून काढणाऱ्या लेखासह स्वत: लेखकाने मांडलेली बाजू..

Fire at Wedding Hall in Iraq
लग्नाच्या हॉलमध्ये भीषण आग, वधू-वरासह १०० जणांचा होरपळून मृत्यू, १५० हून अधिक जखमी
elders saved the child slife Varanasi Viral Video
VIDEO: पावसाच्या पाण्यात विजेचा धक्का बसल्याने तडफडत होता चिमुकला, देवदूत बनून आलेल्या वृद्धांनी वाचवले प्राण
Anil Parab Supreme Court Rahul Narwekar
“सर्वोच्च न्यायालयाच्या खालचं विधानसभा अध्यक्षांचं न्यायालय प्रत्येक आमदाराची…”, अनिल परबांचं मोठं विधान
Parineeti troll
“ही तर हद्द झाली…,” लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी परिणीती चोप्रा ट्रोल, अभिनेत्रीबद्दल नाराजी व्यक्त करत नेटकरी म्हणाले…

‘उत्क्रांती – एक वैज्ञानिक अंधश्रद्धा?’ या ‘सुनिधी पब्लिशर्स’ने प्रकाशित केलेल्या माझ्या पुस्तकाला राज्य पुरस्कार मिळाला आणि प्रदीप रावत यांनी त्यांच्या ‘लोकसत्ता’मधील सदरामध्ये तीव्र आक्षेप नोंदवला. त्यांचा पहिला मुद्दा हा आहे की, या पुस्तकात जे काही विज्ञान म्हणून सादर केले गेले आहे ते – छद्मविज्ञान आहे. मला प्रदीप रावत यांच्या प्रतिक्रियेबद्दल नवल वाटत नाही, कारण दहा वर्षांपूर्वी मी जेव्हा मायकेल बेहे या विख्यात मायक्रोबायॉलॉजिस्टचे – ‘द एज ऑफ इव्होल्युशन’ हे पुस्तक वाचायला सुरुवात केली तेव्हा माझीसुद्धा प्रतिक्रिया ‘हा काय खुळचटपणा?’ अशीच होती. मी विवेकवादी, वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगणारा आहे आणि हो, मी कट्टर नास्तिकसुद्धा होतो. पाठोपाठ हातात आले पुस्तक डॉ. पॉल डेव्हिस यांचे ‘द फिफ्थ मिरॅकल’. माझ्या या शोधात गेल्या तीस-चाळीस वर्षांत मायक्रोबायॉलॉजी आणि जेनेटिक्समध्ये जे भन्नाट शोध लागले आहेत ते पाहताना मी चक्रावलो. धरण फुटावे तसे सर्व दिशांनी पुरावे अंगावर कोसळायला लागले. हे पुरावे याकडे बोट दाखवत होते की, उत्क्रांती होणे अशक्य आहे आणि इंटेलिजंट डिझाईन – बुद्धिमान अभिकल्प सिद्धांत हा उत्क्रांतीला पर्याय म्हणून पुढे येत आहे. डिझाईन म्हटलं की डिझायनर (निर्मिक) दार ठोठावणार हे मला दिसू लागले. त्यामुळे दचकून मी काही काळ थांबलोही; पण मी मग असे ठरवले की, जर मी खराखुरा विवेकवादी आणि वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगणारा असेन तर कार्ल सेगन या वैज्ञानिक तत्त्ववेत्त्याने दिलेल्या विज्ञानाच्या कसोटय़ांवर चालणे मला भाग आहे. उत्क्रांतीच्या सिद्धांताला प्रश्न कसा विचारायचा? असा भाबडेपणा विज्ञानात नसतो. प्रश्न विचारणे, पुरावे गोळा करणे आणि पुरावे ज्या वाटेकडे बोट दाखवतात त्या वाटेवर चालणे ही विज्ञानाची पद्धत असते. हे करणे मलासुद्धा सोपे नव्हते. असे म्हणतात की, ‘अनलर्न’ करणे, शिकलेले खोडणे हे शिकण्यापेक्षा अवघड असते. त्याचीच प्रचीती मला पावलापावलाला येत होती.

एक कळलं की, डार्विन जरी प्रामाणिकपणे सांगत होता की, माझ्याकडे आज पुरावा नाही आणि जरी त्याच्याच तोलामोलाचा समकालीन शास्त्रज्ञ लुई पाश्चर प्रयोगाने हे सिद्ध करत होता की, मॅटरपासून लाइफ –  मातीतून जीवन अशक्य आहे; तरी अनाकलनीय कारणांनी तत्कालीन विज्ञानाने डार्विनचे उबदार तळे स्वीकारले. पहिली पेशी ही टाईम, मॅटर आणि चान्स याद्वारे मॅटरपासून तयार झाली हे स्वीकारले. आज दीडशे वर्षांनीसुद्धा या सिद्धांताला डार्विनला अपेक्षित पुरावा मिळालेला नाही. उलट सिंथेटिक ऑर्गनिक केमिस्ट्री, नॅनो टेक्नॉलॉजीने पुढे आणलेले पुरावे, डीएनएमधली माहिती, रेग्युलेटरी जीन यांसारखे असंख्य पुरावे निर्विवादपणे सिद्ध करत आहेत की, मॅटरपासून पहिली जिवंत पेशी निर्माणच होऊ शकत नाही.

डार्विनचा दुसरा सिद्धांत असा आहे की, पेशीमध्ये जगण्याच्या लढाईत बदल होत जातात आणि चांगले बदल पुढच्या पिढीत संक्रमत होत हळूहळू लक्षावधी वर्षांत जीव उत्क्रांत होत जातो. दीडशे वर्षांनी परिस्थिती काय आहे? डार्विनला अपेक्षित असे दोन जीवांमधले जीवाश्म – सापडलेले नाहीत. जगप्रसिद्ध पॅलीऑन्टॉलॉजिस्ट डॉ. गुल्ड लिहितात – ‘‘असे फॉसिल्स नाहीत हे आम्हा पॅलीऑन्टॉलॉजिस्टचे आमच्या आमच्यात ठेवलेले एक ट्रेड सिक्रेट आहे.’’ बरं असे जीवाश्म तर नाहीतच, पण ‘जावा-मॅन’सारखे अनेक फ्रॉड विज्ञानाच्या पुस्तकात पुरावे म्हणून झळकले आहेत. हो. विज्ञानात बुवाबाजी!

खालच्या जीवातून उत्क्रांत जीवात रूपांतर व्हायचे तर ते कसे होणार? विज्ञान सांगते, फक्त आणि फक्त जीन्समध्ये म्युटेशन – उत्परिवर्तन होऊन कशी होतात ही म्युटेशन? आज पुराव्याने सिद्ध होते आहे की, एकाच वेळी चारपेक्षा जास्त म्युटेशन एखाद्या पेशीत होऊच शकत नाहीत. विलक्षण गुंतागुंतीच्या शरीरातल्या रचना आणि कार्यपद्धती आता निर्विवादपणे हे दाखवून देत आहेत की, समजा सरपटणाऱ्या जीवापासून सस्तन प्राणी उत्क्रांत व्हायचे तर एकाच वेळी पेशीमध्ये चार नव्हे तर हजारो म्युटेशन आवश्यक आहेत. अडीचशे पानांच्या पुस्तकात ८४ संदर्भ देत, नोबेल प्राइजविजेत्यासह अनेक शास्त्रज्ञांना वाट पुसत हा मुद्दा विस्ताराने सप्रमाण सिद्ध केला गेला आहे की-  नाही – डार्विनला अपेक्षित अशी एक पेशीपासून माणूस अशी उत्क्रांती शक्य नाही!

मला खात्री आहे की, डार्विन आज असता तर त्याने हाच निष्कर्ष काढला असता. या पुस्तकातले तिसरे प्रकरण आहे – ‘डार्विनचा विजय’ आणि चौथे आहे – ‘विजयात पराभव’. मग प्रश्न असा उद्भवतो की डार्विनवादी या मांडणीला छद्मविज्ञान का म्हणतात? तर त्याचे उत्तर विज्ञानाच्या तत्त्वज्ञानाच्या इतिहासात आहे. न्यूटन, पाश्चर यांसारख्या उत्तुंग वैज्ञानिकांना विश्व निर्माण करणारा निर्मिक मान्य होता, तो त्यांच्या वैज्ञानिक दृष्टिकोनाआड येत नव्हता; पण जसा उत्क्रांतीचा उपयोग – विज्ञान म्हणजे काय? या तात्त्विक प्रश्नाचा उलगडा करण्यासाठी केला गेला तसं – विज्ञान म्हणजे फक्त तेच जे मटेरिअल युनिव्हर्स (विश्वामधले वस्तुमान – ऊर्जा) मध्येच खेळेल – अशी एक घट्ट चौकट आखली गेली. चुकून ही चौकट मोडून पुरावे निर्मिकाकडे बोट दाखवू लागले तर ते विज्ञान नाही, ते छद्मविज्ञान अशी विज्ञानाची गळचेपी करणारी व्याख्या झाली! विज्ञानाची जोड नास्तिक विचारव्यूहाशी अकारण घातली गेली. आज उत्क्रांतीला पर्यायी असा इंटेलिजंट डिझाईनचा सिद्धांत झपाटय़ाने पुढे येत आहे. थॉमस कुन्ह हा विज्ञानाचा इतिहासकार. त्याने दाखवून दिले आहे की, बहुतेक वेळा जेव्हा वैज्ञानिक सिद्धांत मूलत: बदलतात तेव्हा पॅराडाईम शिफ्ट – रूपबंधात्मक बदल होत असतो. असे बदल होताना पहिल्या टप्प्यावर असते रूढ सिद्धांताविरुद्ध येणाऱ्या पुराव्यांना आणि निष्कर्षांला तीव्र विरोध आणि हेटाळणी. दुसऱ्या टप्प्यावर असतो एक कालखंड, जेव्हा अशा विरुद्ध पुराव्यांच्या लाटा आदळतच राहतात अन् तिसऱ्या टप्प्यात एक दिवस असा येतो की, संपूर्ण नवा असा सिद्धांत जुन्याला पदच्युत करतो. पहिल्या टप्प्याच्या हेटाळणीचे अतिशय हृदयद्रावक उदाहरण आहे. १८५० मधल्या व्हिएन्नामधल्या जगविख्यात स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. सेमेलवीस यांचे. त्यांनी सप्रमाण सिद्ध केले की, फक्त हात पाण्याने धुऊन प्रसूती केली तर गर्भवती स्त्रियांमधला मृत्युदर हा तिपटीने कमी होतो; पण अजून जंतुसंसर्गाने इंफेक्शन होते हे माहीत व्हायचे होते. त्यांची हेटाळणी झाली. सर्व डॉक्टरांनी हा इतका प्रयोगाने सिद्ध झालेला निष्कर्ष धुत्कारला. डॉ. सेमेलवीस यांचे मन:स्वास्थ्य इतके ढासळले की, हॉस्पिटलबाहेर उभे राहून प्रत्येक गर्भवती स्त्रीला ते विनवत राहिले; की तिने तिच्या डॉक्टरना सांगावे की, कृपा करून हात धुऊन प्रसूती करा. ते मनोरुग्णालयात मरण पावले. आज ‘हात धुणे’ हा पॅराडाईम इतका रूढ आहे की, असा ‘हात न धुण्याचा’ पॅराडाईम कधीकाळी होता हेच माहीत नाही!

हात धुण्याच्या पॅराडाईमप्रमाणेच उत्क्रांतीला रद्दबातल करणारा इंटेलिजंट डिझाईनचा विकल्प आज पहिल्या टप्प्यात उभा आहे. इंटेलिजंट डिझाईनला अमेरिकेत तर इतका विरोध आहे की, काही वैज्ञानिकांना उत्क्रांतीविरुद्ध पुरावे; पेपर म्हणून प्रकाशित केल्यावर नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत! (आधुनिक गॅलिलिओ!)

प्रदीप रावतांनी ख्रिस्ती धर्म या वैज्ञानिक चर्चेत ओढून मात्र गडबड केली आहे. विज्ञान हे अधार्मिक आणि ननैतिक असते. डॉ. अ‍ॅन्थनी फ्लू हे आधुनिक नास्तिकतेचे पितामह. पन्नास वर्षे ते नास्तिकतेचा प्रसार करत राहिले. या सर्व पुराव्यांना अभ्यासून आपले मत त्यांनी बदलले आणि ‘देव आहे’ शीर्षकाचे पुस्तक लिहिले. रिचर्ड डॉकिन्स हे कट्टर नास्तिक उत्क्रांतीवादी. ते कबूल करतात की, ‘हो, इंटेलिजंट डिझाईन

आढळते आणि बायॉलॉजी त्याचा उलगडा करू शकत नाही!’

आपण अशा कालखंडात आहोत की, या पॅराडाईम शिफ्टचे साक्षीदार होऊ शकतो. हवी फक्त खुली दृष्टी. या पुस्तकाचा निष्कर्ष मान्य/ अमान्य करणे, हा वाचकाचा अधिकार; पण एक नक्की- जर कुणाला निर्मिकाने केलेल्या भन्नाट निर्मितीची सफर करून अचंबित, रोमांचित व्हायचे असेल, या निर्मितीपुढे नतमस्तक व्हायचे असेल तर हे पुस्तक त्याची, तिची वाट बघत आहे.

बाजारात दाखल

डहाण : अनिल साबळे : लोकवाङ्मय गृह  

तिरकस चौकस :  सॅबी पेरारा : ग्रंथाली

माझ्या पुरुषत्वाचा प्रवास :  संपादन- डॉ. गीताली वि. मं. :   अमित प्रकाशन

साके दीन महोमेत :  मुकुंद वझे :   कृष्णा पब्लिकेशन्स

drarun.gadre@gmail.com

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व लोकरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 08-01-2023 at 01:01 IST

संबंधित बातम्या

गणेश उत्सव २०२३ ×