इंद्रायणी सावकारलिखित ‘संयुक्त महाराष्ट्राचा संग्राम’ हे पुस्तक डिंपल पब्लिकेशनतर्फे प्रकाशित होत आहे. त्यानिमित्ताने लेखिकेच्या मनोगतातील संपादित अंश..

महाराष्ट्राचे स्वतंत्र राज्य असावे व मुंबई महाराष्ट्रातच राहावी यासाठी १९५५ ते १९६० या काळात महाराष्ट्रीयांनी प्राणपणाने सतत संग्राम केला. कोणाशी? तर प्रत्यक्ष पंतप्रधानांशी.. पंडित जवाहरलाल नेहरूंशी. या संग्रामाच्या आठवणी महाराष्ट्रीयांच्या मनात सतत ज्वलंत राहिल्या पाहिजेत आणि महाराष्ट्रीयेतरांनाही हा उज्ज्वल इतिहास माहिती पाहिजे. महाराष्ट्रीयांच्या लेखी या संग्रामाचे महत्त्व हे आहे की हा संग्राम सर्व मराठी माणसांनी एकजुटीने, एकदिलाने केला. या लढय़ाला आता ६२ वर्षे उलटून गेली. या संग्रामात अनेकांचे बळी गेले. या संग्रामाचा एक वेगळा पैलू प्रबोधनकार ठाकरेंच्या लक्षात आला होता. प्रबोधनकारांनी यावेळच्या सार्वत्रिक जागृतीला ‘महाराष्ट्रधर्म’ असे समर्पक नाव दिले. महाराष्ट्रधर्म छत्रपती शिवाजी महाराजांनी जागृत केला. महाराष्ट्रधर्माचा प्रसार करून त्यांनी हिंदवी स्वराज्य स्थापले. जातिभेद विसरायचे, कोणतीही उच्च-नीचता राखायची नाही. महाराष्ट्रावर अतूट प्रेम हा एकच धर्म पाळायचा, हा छत्रपतींचा आदर्श प्रबोधनकारांनी पुन: पुन्हा लोकांच्या कानावर घातला. 

not a single word about Sharad Pawar in pm narendra modis speech in wardha
मोदींच्या भाषणात शरद पवारांबाबत चकार शब्द नाही, काय असावे कारण…
Actor Makrand Anaspure
महाराष्ट्रातल्या राजकीय परिस्थितीवर मकरंद अनासपुरेंचं परखड भाष्य, “आम्हा मतदारांची फसवणूक…”
Sharad Pawar insulted daughters-in-law of Maharashtra strong reaction from Ajit Pawar group on that statement
“शरद पवारांनी महाराष्ट्रातील सुनांचा अपमान केला”, ‘त्या’ वक्तव्यावरून अजित पवार गटाची तीव्र प्रतिक्रिया
sanjay raut on yogi adityanath
योगी आदित्यनाथ यांच्या महाराष्ट्र दौऱ्यावरून संजय राऊतांचे टीकास्र; म्हणाले, “योगींनी यूपीतच थांबावं, तिथे…”

संयुक्त महाराष्ट्र म्हणजे मुंबईसह महाराष्ट्र. आजची पिढी कदाचित हसेल व म्हणेल की, हे काय बोलणे तरी? ब्रिटिशकाळापासून मुंबई महाराष्ट्रात होती व तशीत ती राहणार. ते पुन्हा पुन्हा बोलून दाखवायचे कशाला? पण दिल्लीतील सत्ताधीश मुंबई महाराष्ट्रापासून अलग करण्यास उद्युक्त झाले. म्हणून मुंबई महाराष्ट्रापासून अभेद्य आहे हे वास्तव दिल्लीकरांच्या डोक्यात घुसवावे लागले. ते वास्तव त्यांच्या ध्यानी आणून देण्यासाठी जंगच पुकारावे लागले.

मुंबईची दुभती गाय केंद्र सरकारच्या- म्हणजे काँग्रेस पक्षाच्या सत्तेच्या गोठय़ात नेऊन बांधायची हे कुटिल कारस्थान त्या पक्षात स्वातंत्र्य मिळण्याच्या आधीपासूनच खदखदत होते. मुंबई हिंदूस्थानची आर्थिक राजधानी आहे. कॉस्मोपॉलिटन आहे. बहुभाषिक आहे. मुंबई मराठी नाही. मुंबई सर्वाची आहे, म्हणजेच केंद्र सरकारची आहे. ती तेवढी आम्ही नेतो. उर्वरित महाराष्ट्र मराठी माणसांना लखलाभ असू द्या. अशी कावेबाज भूमिका घेऊन ते आले आणि देशातील आघाडीच्या भांडवलदारांनी त्यांना साथ दिली. ‘जेथे सत्ता, तेथे भांडवलदार’ हा एक अभेद्य वैश्विक नियम आहे, त्यानुसार हे घडले. आम्ही मुंबईत पाण्यासारखा पैसा ओतला, आम्ही मुंबईच्या विकासाचे पाईक आहोत, म्हणून मुंबई आमची आहे. ती केंद्रशासित असलीच पाहिजे असा दावा हे भांडवलदारही करू लागले. आता हा दावा राहिलेला नाही. त्या लढय़ात मराठी सेनानींनी हा दावा हाणून पाडला. त्यावेळी सर्व महाराष्ट्रीयांनी लक्षणीय मेहनत घेतली व या दांभिकांना गुडघे टेकायला लावले खरे, तरीही संयुक्त महाराष्ट्राचे स्वतंत्र राज्य निर्माण झाल्यानंतरही हा भ्रामक दावा चालूच राहिला. आम्ही मुंबईत गुंतवणूक केली म्हणून मुंबईची भरभराट झाली. म्हणून मुंबई मराठी राहिली नाही, कॉस्मोपॉलिटन झाली, असे उद्गार हिंदूस्थानातले सर्व उद्योगपती काढू लागले. या तुणतुण्याचा अभिप्रेत अर्थ असा की, समृद्धीमध्ये पैशांच्या गुंतवणुकीला ऊर्फ भांडवलाला फार मोठे महत्त्व आहे. वातावरण, सुविधा, भौगोलिक स्थान वगैरे बाबींना खूपच खालचे स्थान आहे असे नाही, महाराजा! भांडवलाच्याही वरचे स्थान वर्क फोर्सला आहे.. म्हणजे कामगार वर्ग. हा वर्ग महाराष्ट्रात आयता तयार आहे. प्रत्येक मराठी माणसाची मानसिकता उद्योगांना अनुकूल आहे. निरलस श्रमशीलता, वक्तशीरपणा, सोशीकता, नवनवीन तंत्रे आत्मसात करण्याची हौस व क्षमता, साहसीपणा असे अनेक गुण मराठी माणसांत उपजत आहेत. हे गुण आपण ताडलेत, भांडवलदारांनो! या गुणांचा लाभ घेण्यासाठी तुम्ही महाराष्ट्रात उतरलात. आणि आव आणता की महाराष्ट्रावर उपकार करण्यासाठी आणि महाराष्ट्राला समृद्ध करण्यासाठी आम्ही आलो! 

मराठी माणसांनो, थंड मनाने क्षणभर विचार करा की, हे भांडवलदार मुळात महाराष्ट्रात आलेच का? यांच्याकडचा आभाळाएवढा पैसा यांनी मायदेशात का नाही गुंतवला? मायदेशाचेच कल्याण का नाही केले? या प्रश्नाचे उत्तर सोपे आहे. कारण यांच्या मायदेशातील जनतेमध्ये औद्योगिकीकरणासाठी आवश्यक असलेली मानसिकता नव्हती. याउलट, मराठी मनात उपजत एक ‘वर्क एथिक’ असते. तो गुण इतर प्रांतीयांत नाही, किंवा पुरेशा प्रमाणात नाही. परंतु मराठी माणूस निरलस, कामसू, प्रयत्नशील व खटाटोपी आहे म्हणूनच त्याच्यावर लक्ष्मीदेवी प्रसन्न होते.  मात्र महत्त्वाचे हे की, हे परप्रांतीय महाराष्ट्रामध्ये आले की त्यांची मानसिकता हुबेहूब मराठी माणसांसारखीच होते. 

मराठी माणसा! या तथाकथित उपकारकर्त्यांना तू एकच मार्मिक प्रश्न विचारायचा आहेस. ‘तुमचा प्रकल्प जर एवढा फायदेशीर आहे, तर तुमच्या प्रांतातच तो का नाही उभारलात? तिथले दारिद्रय़ का नाही पुसून टाकलेत? तिथली माणसे का नाही पोटापाण्याला लावलीत?’ या प्रश्नाचे उत्तर खासगीमध्ये मिळते ते असे : ‘स्थानिक माणसांना वक्तशीरपणा कशाशी खातात माहीत नाही. त्यांना मशिनरी वापरण्याचे प्रशिक्षण देण्याआधी अनुकूल मानसिकतेचे ट्रेिनग द्यावे लागते. गरज पडली तर आम्ही हे करतो. पण महाराष्ट्रात ही मानसिकता ‘रेडी’ आहे. त्यामुळे तिथे आमचा वेळ वाया जात नाही. कारखाना उभारणे व चालवणे हे दोनही टप्पे कमी वेळात साध्य होतात. हा एक फार मोठा फायदा आहे. कारण त्यामुळे आमची गुंतवणूक फार दिवस प्रकल्पात अडकून राहत नाही. महाराष्ट्रात ज्या वेगाने पैसा पैशाला खेचतो, तो ढाचा अन्यत्र कुठेही नाही.

थोडक्यात हे की, समृद्धीमध्ये भांडवलापेक्षाही वर्क फोर्सला अनुकूल अशी मानसिकता, सवयी व हुशारी असलेला कामगारवर्ग याला जास्त महत्त्व आहे. हा फायदा मराठी माणसाला उपजत आहे. मग भांडवलदारांनी आपल्यावर उपकारांचे डोंगर रचले, हा दावा आपण मान्य करायचा का? आपणच त्यांच्यावर उपकार केले असे आपण म्हणावे की नाही? सुदैवाने हा मुद्दा बाहेरच्या गुंतवणूकदारांनी आता मान्य केला आहे.  परप्रांतीयांचे लोंढेच्या लोंढे महाराष्ट्रात येतात. फुटपाथावर झोपून मोलमजुरीची कामे करणारे येतात, तद्वत् मोठाल्या टॉवर्समध्ये राहून करोडोंचे उद्योग आरंभणारे लक्ष्मीपतीही येतात. सर्वासाठी महाराष्ट्राची दारे खुली आहेत. सर्वासाठी सुवर्णसंधी येथे आहेत. मात्र हे लक्षात घ्या की, बाहेरच्यांचे लोंढे इथे आल्याने मुंबईचे व महाराष्ट्राचे आंतरराष्ट्रीयीकरण होत नाही, तर मुंबई व महाराष्ट्र मराठी माणसांचाच राहतो. बाहेरचे हे जे लोंढे येतात, त्यांचेच मराठीकरण होते. मायदेशी आळशी व बेकार म्हणून कुप्रसिद्धीस पात्र झालेला मजूर मुंबईत येताच मुंबईकरांची शिस्त आनंदाने पाळू लागतो.

या लढय़ाचे महत्त्व म्हणजे या संग्रामाच्या वर्णनासाठी ‘चळवळ’ हा शब्द थिटा पडतो असे मी मानते. ही नुसती चळवळ नव्हती, तर महायुद्ध होते. १९५५ पासून पाच वर्षे ते चालले आणि शेवटी १ मे १९६० साली त्या युद्धाची सांगता झाली. शस्त्रे वापरली, फौजफाटा गोळा केला आणि रणभूमीवर थैमान घातले म्हणजेच युद्ध होते असे नाही. युद्धात वापरलेल्या सामग्रीवर व सैनिकी हालचालींच्या स्वरूपावरून युद्धाचा लेखाजोखा बांधायचा नसतो, तर युद्धात भाग घेणाऱ्या माणसांच्या पॅशनच्या भावनेच्या उत्कटतेच्या मोजदादीवरून हा मुद्दा निश्चित करायचा असतो.

या दृष्टिकोनातून हा लढा अभ्यासला तर लक्षात येते की, मराठी माणसांची व त्याला साथ देणाऱ्या स्नेह्यंची भावना कमालीची उत्कट होती. महाराष्ट्रातील सर्वाच्या मनात ती प्रखर भावना होती. आबालवृद्ध स्त्री-पुरुष सर्व. हे असे प्रथमच घडले. आणि सतत पाच वर्षे ही प्रखरता व एकजूट कायम राहिली. नेहरू सरकारने मराठी माणसाला वाकवण्यासाठी जंग जंग पछाडले. अनेक समित्या नेमल्या. अनेक कारणांची, मुद्दय़ांची भेंडोळी मराठी माणसाच्या तोंडावर फेकली. तरीही मराठी माणसाची चीड रेघभरही सौम्य झाली नाही. एवढी एकजूट, एवढी अतुट प्रखरता आणि पाच वर्षांचे सातत्य हे तीन गुण या घटनेचे ‘लढा’ हे नाव सार्थ करतात. या लढय़ाद्वारे मराठी माणसाने सर्व जगाला एक महत्त्वाचा संदेश दिला- आतिथ्य, सहिष्णुता, वात्सल्य, औदार्य असे अनेक गुण आमच्या पिंडात आहेत; परंतु वारा येईल तशी पाठ द्यायची आणि ‘हो ला हो म्हणायचे, सत्तेसमोर अकारण झुकायचे हा कमकुवतपणा आमच्या रक्तात नाही. आमच्या मार्दवाखाली एक अभेद्य खडक आहे. आमचा आत्माभिमान म्हणजे महाराष्ट्राविषयीचा अभिमान. या खडकावर जर कोणी प्रहार केला तर काय होईल आणि काय नाही हे सांगता येत नाही. प्रहार कोणी केला आणि मग काय रामायण घडले ते इतिहासाच्या पानांत सुवर्णाक्षरांनी आणि हुतात्म्यांच्या रक्ताने लिहून ठेवलेलेच आहे.