scorecardresearch

कलास्वाद : षांतारामायण

षांताराम पवार! पवार सर! माझे त्यांच्याशी नाते जुळले ते १९६२ पासून. जे. जे. इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाईड आर्टमध्ये कलाशिक्षण घेण्यासाठी मी प्रवेश घेतला, अन् काही दिवसांतच पवार सरांशी संबंध आला.

|| प्रा. मं. गो. राजाध्यक्ष

मं. गो. राजाध्यक्ष… ज. जी. उपयोजित कलामहाविद्यालयाचे माजी अधिष्ठाता. अनेक कलासंस्थांचे सल्लागार म्हणून कार्यरत. विविध कलांचे जाणकार विश्लेषक. त्यांचे कलाक्षेत्राची मुशाफिरी करणारे पाक्षिक सदर…

चित्र-शिल्प-जाहिरात आदी कलाक्षेत्रांतील मुक्त मुशाफिरी, दिग्गज कलावंतांशी आलेला निकटचा सांध, त्यांचे काम जवळून पाहण्याच्या मिळाले”या संधीने विकसित झालेली मर्मग्राही वृत्ती या साऱ्याचे कॅलिडोस्कोपिक दर्शन घडविणारे  पाक्षिक सदर…

१७ ऑगस्ट २०२०. सकाळीच जे. जे. स्कूल ऑफ अप्लाईड आर्टमधील आमचे गुरुवर्य प्रा. षांताराम पवार गेल्याची बातमी कळली. अर्थात ते अपेक्षितच होते. कित्येक दिवस आजारी होते ते. पण शेवटपर्यंत बोलणे कधी थांबले नाही.

षांताराम पवार! पवार सर! माझे त्यांच्याशी नाते जुळले ते १९६२ पासून. जे. जे. इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाईड आर्टमध्ये कलाशिक्षण घेण्यासाठी मी प्रवेश घेतला, अन् काही दिवसांतच पवार सरांशी संबंध आला. आमची ५० विद्यार्थ्यांची ती बॅच पवार सरांसोबत, त्यांच्या रागलोभासहित हळूहळू सरकत अंतिम वर्षापर्यंत पोचली. मी पुढे त्याच संस्थेमध्ये अध्यापक म्हणून काम करू लागलो, तेव्हा त्याला मैत्रीची किनार लाभली. मात्र, काही अंतर राखूनच आम्ही ती निभावली. कारण गुरू-शिष्य नाते अधिक घट्ट होते. विद्यार्थीदशेपर्यंत पवार सरांना मी पाहत होतो ते एक सर्जनशील शिक्षक म्हणून, अन् त्याच ताकदीचा व्यावसायिक कलाकार म्हणून! एखादे चित्र वा संकल्पना ठरावीक दर्जा दाखवणारी नसेल तर ती विद्यार्थ्यांकडून वारंवार घासून घेणे, आणि तरीही जमली नाही तर स्वत: हाती ब्रश घेऊन करून दाखविणे… याउप्परही क्षमता दिसली नाही तर ते फाडून टाकणे- ही पवार सरांची शिकवण्याची पद्धत. त्यामुळे आपल्या कामाचा दर्जा वाढवण्यासाठी विद्यार्थी आपोआप झटत. मी जेव्हा त्यांचा साहाय्यक म्हणून काम करू लागलो तेव्हा कळले, की हा नियम त्यांनी स्वत:लाही लावून घेतला होता. आपले चित्र मनाजोगते झाले नाही तर तेही पवार सर टरकावून टाकीत. त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर ना खेद असे, ना खंत! 

जे. जे.च्या त्या काळात मला जाणवली ती पवारांची विविध रूपे. उपयोजित कला ही अन्य कलांशी निगडित आहे, याचे उत्तम उदाहरण म्हणजे पवार सरांची इतर क्षेत्रांतील मुशाफिरी. काय नव्हते त्यांच्यात? ते उत्तम दिग्दर्शक होते. नेपथ्यकार होते. साहित्यिक होते. कवी व बोधचित्रकार होते. लेखाचित्रकारही (‘लेखाचित्रकार’ हा कॅलिग्राफीसाठी पवारांचा शब्द!) होते. आणि या सर्वांना बांधणारे एक समान सूत्र होते, ते म्हणजे त्यांचे प्रभावी व्हिज्युलायझेशन- कल्पनाशक्ती. त्यातूनच पवार सरांची अनेक व्हिज्युअल्स जन्माला आली. कल्पनाही त्यांना तत्क्षणी सुचत. त्यासाठी त्यांची निरीक्षणशक्ती कामी येत असे. एकदा आम्ही काही कामासाठी शासकीय मुद्रणालयात गेलो होतो. तेथे संचालक सप्रे यांनी पवारांना त्यांच्या सोव्हिनिरसाठी एक मुखपृष्ठ करून देण्याची विनंती केली. पवारांनी क्षणभर आजूबाजूला पाहिले अन् ते थेट शिरले ते मुद्रण विभागात. अनेक यंत्रांची धडधड चालू होती. मशीनवर रंगीत छपाई सुरू होती. प्रिंटर प्लेटवरील रंग कापडी बोळ्याने साफ करून बाजूला फेकत होता. पवारांनी तिथल्याच एका टेबलावर ठाण मांडले. एक आर्ट कार्ड मागवले. प्रिरंटगची जाड शाई बोटानेच घेऊन त्यावर डोळ्याचा आकार ठळकपणे रेखाटला व मध्यभागी प्रिंटरने टाकलेल्या रंगीत कॉटनच्या बोळ्यापैकी एक छानसा लाल रंगाचा बोळा घेऊन डोळ्याच्या मध्यभागी चिकटवला. क्षणार्धात तेथे दृक्कला व मुद्रणकला यांचा सुरेख मिलाफ घडवणारे बोधचिन्ह तयार झाले. ते मुखपृष्ठ संचालक सप्रे यांना इतके भावले, की हा किस्सा कौतुकाने ते अनेकांना ऐकवीत.

पवार सरांची व्यावसायिक कामे सुरू असत, त्याचसोबत खास अशी शासकीय कामेही- जी गुणवत्तादर्शक असत- ती जे. जे.मध्ये येत व ही कामे संस्थाप्रमुखांकडून पवारांकडे येत. पुढे ही कामे पवारांकडे थेट येऊ लागली. पर्यटन विभागासाठी पवारांनी भरपूर काम केले आणि या विभागाला प्रसिद्धीच्या झोतात आणले. पवारांनी चित्रे काढली, बोधचित्रे काढली, लेखनात त्यांनी विहार केला. काव्यात मनसोक्त डुंबून तो आनंद स्वत: घेतला, इतरांना दिला. चित्रकाराच्या भूमिकेत असताना कुंचला शब्द बोलू लागे, तर लेखणी हातात घेतली की त्याच शब्दांचे रंगीबेरंगी फुलपाखरू होऊन स्वच्छंदपणे विहरत असे. अशावेळी आम्हाला त्यांच्यातील चित्रकारासोबत जाणवत असे तो त्यांच्यातील तत्त्वज्ञ, विचारवंत, समीक्षक, रसिक, कवी असा सर्वगुणसंपन्न अवलिया!

पवारांच्या कामातून काव्य उमटत असे. त्यांच्या चित्रांतून खास असा पवार टच् नेहमी जाणवे. त्यांच्या विद्यार्थ्यांच्या कामातूनही ही झलक दिसून येत असे. एखाद्या विद्यार्थ्याची कल्पना त्यांना आवडली तर ते केवळ छोट्याशा बदलाने तिला संपूर्ण बदलून टाकीत… अर्थपूर्ण करीत. एकदा एका विद्यार्थिनीने पर्यटन विभागाच्या पोस्टरसाठी दिवाळीची पणती दाखवली होती. पवारांनी त्यावरून नजर फिरवली. त्यातलं नेमकं वर्म ओळखलं. पेन्सिल हातात घेतली आणि ज्योतीची जागा हात जोडलेल्या दोन विनम्र हातांनी घेतली. जे अनेक शब्दांत वर्णन करून सांगावं लागलं असतं ते केवळ त्या पणतीमधल्या नमस्कार करणाऱ्या ज्योतीने क्षणार्धात सांगून टाकलं! शेवटच्या वर्षी प्रोजेक्टला एका विद्यार्थ्याने ‘मीरा’ या चित्रपटाच्या प्रसिद्धीचा विषय घेतला होता. पोस्टर हे त्यातील महत्त्वाचे माध्यम. त्या पोस्टरवर त्या विद्यार्थ्याने डोक्यावर केशरी पदर आणि हातात एकतारी घेऊन उभी असलेली मीरा दाखवली होती. चित्र अर्थातच सुंदर होतं. पवारांनी त्यात किंचित बदल केला. हातातील एकतारीला मोरपीस बनवलं. पिसाचा भाग एकतारीच्या भोपळ्याप्रमाणे दाखवला अन् त्या चित्राचं संपूर्ण रूपच पालटलं. आता ती केवळ गाणारी मीरा राहिली नाही, तर कृष्णभक्तीने ओथंबलेली मीरा त्यातून उभी राहिली. ‘चित्रे डोक्याने काढा’ हा त्यांचा परवलीचा शब्द होता. म्हणजे नुसतीच चित्रे काढू नका, तर त्याला कल्पनाशक्तीची जोड द्या. 

अशा या पवार सरांच्या गळ्यात एकदा डीन हणमंते सरांनी ‘स्टुडंट्स मजलीस’च्या चेअरमनपदाची माळ घातली. हे ऐकल्यावर आम्ही उडालोच! पवार सरांनी अशी प्रशासकीय कामे कधीच केली नव्हती. पण एकदा का काम हाती घेतले की ते मनापासून करून त्याला योग्य न्याय द्यायचा, ही त्यांची वृत्ती. आम्हा काही मंडळींना बोलावून त्यांनी वर्षभर कोणते खास उपक्रम करायचे यावर चर्चा केली. त्यात आजवर संस्थेत घडली नव्हती अशी ‘आर्ट जत्रा’ ही संकल्पना त्यांनी विद्यार्थ्यांच्या बैठकीत मांडली व सर्वांनीच ती उचलून धरली. विद्यार्थ्यांना वर्गामध्ये जे २ डी, ३ डी शिकवले जात असे, त्याआधारे अगदी क्षुल्लक अशा वस्तूंपासून कलात्मक नित्योपयोगी वस्तू बनवणे व जत्रा भरवून त्या विकणे, अशी ती संकल्पना. सर्वच या अनोख्या कल्पनेने भारावून गेले. विद्यार्थ्यांना जे जे साहित्य मिळेल ते ते गोळा करण्यास सांगितले. कोणी वेगवेगळ्या आकाराच्या बाटल्या आणल्या, कोणी बांबूची नळकांडी, कोणी धाग्याची लाकडी रिळे, तर कोणी बटणे, शिंपले, रंगीत गोफ. अशा विविध वस्तूंनी वर्ग भरून गेले. पवार सर सर्वांशी चर्चा करून त्यात सुधारणा सुचवत. अनेक वस्तू आकार घेऊ लागल्या. त्यामध्ये बाटलीचा झाला सुंदरसा फ्लॉवरपॉट. कोणी रिळे, शिंपले वापरून लँपशेड केल्या. कोणी बांबूचे मग बनवले. कोणी लॉकेट्स बनवली. कोणी पेन स्टँड, कोणी खांद्यावरच्या पिशव्या. अन् बघता बघता शेकडो वस्तू बनल्या. त्यांची भव्य अशी जत्रा संस्थेत भरवली. ही घटना ‘टॉक ऑफ द टाऊन’ झाली. बरीच विक्री झाली. विद्यार्थ्यांचे खिसे खुळखुळू लागले. उरलेले सर्व साहित्य महाराष्ट्र लघुउद्योगाचे अध्यक्ष भाऊसाहेब नेवाळकर यांनी त्यांच्या महामंडळासाठी विकत घेतले. शहरभर गाजलेल्या या घटनेने पवारांना प्रचंड मानसिक समाधान लाभले. एक ‘न भूतो न भविष्यती’ अशी घटना संस्थेच्या इतिहासात घडली होती. याचा फायदा पुढे अनेक विद्यार्थ्यांना झाला व स्वतंत्रपणे ते हा व्यवसाय  करू लागले. उपयोजित कलेच्या विद्यार्थ्यांसाठी एक नवीन दालन उघडले गेले होते.

पवार सर चित्रकार होतेच, शिवाय ते कवीही होते. साहित्य-नाट्य या विषयाचे अधिकारी होते. नेपथ्यामधील त्यांचे कार्य लक्षणीय होते. प्रदर्शन मांडणीमध्ये त्यांची ताकद जबरदस्त होती. या गोष्टींना मी केवळ साक्षीदार न राहता त्यांच्या कामातील एक घटक बनलो. त्यांच्याकडे विविध क्षेत्रांतील नावाजलेली मंडळी येत असत. ती काही केवळ गप्पा मारण्यासाठी नव्हे, तर त्यांच्या लिखाणावर, काव्यावर, कलाकृतीवर त्यांना पवारांचे अभ्यासपूर्ण व परखड मत हवे असे. या व्यक्ती तरी कोण होत्या? तर चिं. त्र्यं. खानोलकर ऊर्फ आरती प्रभू, गोपाळ मयेकर, कमलाकर सोनटक्के, मनोहर काटदरे, अशोकजी परांजपे अशा. त्यांच्या गप्पा ऐकणे, अधूनमधून त्यात भाग घेणे आमच्या अंगवळणी पडू लागले.

पवार जसे चित्रांत रमत, तसेच काव्यातही डुंबत असत. काव्य मनात स्फुरलं की कधी ते त्यांच्या वहीत उतरे ते कळत नसे. वहीत अतिशय सुंदर व बारीक अक्षरांत जणू कॅलिग्राफी केली आहे अशा तऱ्हेने ते कविता लिहीत असत. त्यांची ही वही त्यांच्या टेबलच्या ड्रॉवरमध्ये निवांत पडलेली असे. आणि जेव्हा काव्याचे दर्दी त्यांच्याकडे येत, तेव्हा ती वही आनंदाने उजळून निघत असे. एकदा पवार सर वर्गावर असताना आरती प्रभू आले. केबिनमध्ये बसले असताना त्यांनी सहज ड्रॉवर उघडला. ती कवितेची वही त्यांनी उचलली आणि ते थेट गेले ‘सत्यकथे’च्या राम पटवर्धनांकडे. त्यांना ती वही दिली. काही दिवसांनी पटवर्धनांनी पवारांकडे तिची प्रूफे तपासण्यासाठी पाठवली, तेव्हा पवारांना कळले व त्यांनी त्या छापण्यास नकार दिला. पण पटवर्धन म्हणाले, ‘तुमचीच निर्मिती आहे. रसिकांपुढे येऊ द्या. आपण कलावंत आहात. छापू द्या!’ आणि या कविता प्रसिद्ध झाल्या.

भोईवाडा- परळ भागात १७ ऑगस्ट १९३६ रोजी जन्मलेल्या पवार सरांचे जे. जे.मधील व्यक्तिमत्त्व वादग्रस्त होते. ते रगेल तसेच रंगेल होते. त्यांचा वर्गाबद्दलचा आग्रही स्वभाव, निवडकच काम प्रदर्शनांत लावणे, चित्रे मनाप्रमाणे न झाल्यास ती फाडून टाकणे, बैठकीला सर्वात शेवटी येऊन हजेरी लावणे यावर त्यांच्यामागे चर्चा होत असे. पण तेच शिक्षक त्यांच्या तोंडावर मात्र अगदी जिवणी रुंदावून हास्य करीत. त्यांचे गोडवे गात.

अनेक अनेक पत्रकार, संपादक, लेखक, कवी त्यांचे मित्र होते. त्यातले बरेचसे त्यांच्या सहवासात आले ते त्यांच्या भविष्यकथनामुळे. ही भविष्याची देणगी त्यांना कशी मिळाली हे त्यांनी एकदा मला सांगितले. निसर्गात अनेक मूलभूत आकार आहेत- जसे त्रिकोणी डोंगर, नागमोड्या वेली, सरळ असलेले वृक्ष आणि गोलाकारातील सूर्य-चंद्र. हे आकार त्यांना खुणावू लागले. त्यावरून त्यांनी निर्माण केली भविष्य सांगण्याची आपली पद्धत. एखाद्याला ते कागदावर त्रिकोण, चौकोन, लहान त्रिकोण, वर्तुळ असे आकार मनाला येईल तसे पटापट काढायला लावीत. नंतर त्याच्याकडे नीट लक्षपूर्वक पाहून त्याद्वारे ते भविष्य सांगण्यास सुरुवात करीत. या भविष्यवाणीने ते इतके प्रसिद्ध झाले की मोठमोठे लोक त्यांच्याकडे भविष्य विचारण्यासाठी येत. पण पुढे त्यातून काहींची बिंगे बाहेर पडू लागली. लोक दुखावू लागले. तेव्हा मग त्यांच्या पत्नीने  दुसऱ्यांचे भविष्य पाहण्यास त्यांना मनाई केली.

त्यांच्या चरित्राचे लिखाण मी पूर्ण केले तेव्हा पवार सर, त्यांची पत्नी लीना, कन्या गीताली व आमचे मित्र विनय नेवाळकर यांच्यासमवेत मी त्याचे वाचन केले. त्यातील काही घटनांनी पवार सर भावनाशील झाले होते. शेवटी पवार सरांनी माझी वही हातात घेतली, पेन उचलले आणि काही ओळी कागदावर उतरवल्या- ‘तो गेला तेव्हा मला कळले, तो माझ्याबरोबर होता.’

rajapost@gmail. com  

मराठीतील सर्व लोकरंग ( Lokrang ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Author prof m g rajadhyaksha kalasavad article knowledgeable analyst of various arts akp