मागच्या आठवडय़ात मी मंत्रालयात चाललो होतो.. रोज कुठले कुठले बाबा, माँ टीव्हीवर सारखे ‘जगबुडी होईल, जगबुडी होईल’ असे सांगत असतात. ‘पृथ्वीची एक्स्पायरी डेट संपली आहे, त्यामुळे कधीही जगबुडी होऊ शकते,’ अशी शक्यता एका दाढीवाल्या अँकरनेही वर्तवली आहे. तो इतक्या घाबरवून टाकणाऱ्या आवाजात बोलतो, की जगबुडी होणार नसेल तरी त्याला बुडवून टाकले पाहिजे असेच मला वाटते. माझा तसा जगबुडीवर विश्वास नाहीये; पण उगाच रिस्क नको म्हणून स्विमिंग कॉस्च्यूम घालूनच झोपावे असे मला कधी कधी वाटते. आपण झोपेत असताना जगबुडी झाली तर त्या धावपळीत कुठे स्विमिंग कॉस्च्यूम शोधणार? मी जगबुडीबद्दल विचार करतो तेव्हा माझ्यासारख्या पट्टीच्या पोहणाऱ्यांचे जगबुडी काय बिघडवणार, असेही वाटत राहते. त्यामुळे भ्यायचे काही कारण नाही असेही मी मनाला समजावतो. पण कधी क धी जगबुडीच्या कल्पनेने फारच उदासी दाटून येते आणि मग मात्र पॉझिटिव्ह एनर्जी मिळवायला मंत्रालयात गेल्याशिवाय मला दुसरा काहीच इलाज राहत नाही. एखाद्याला धाप लागायला लागली आणि अशक्तपणा वाटू लागला की तो जसा ग्लुकोज घेतो आणि ताजातवाना होतो, तसे मी हताश वाटायला लागले किंवा एकटेपणा आला की ताजातवाना व्हायला मंत्रालयात जातो.

हे पार्था, हे जग शाश्वत आहे. ते कायम चालत राहणार आहे. तू उगाच धावपळ करू नकोस. माणूस जितका जुना आहे, तितकेच त्याचे प्रश्नही जुने आहेत. त्यामुळे याच पंचवार्षिकला त्याचे प्रश्न सुटले पाहिजेत असा वृथा आग्रह धरू नकोस. सरकारं येतील-जातील.. अधिकारी येतील, बदलून जातील.. पण या जगात दोनच चिरंतन गोष्टी आहेत- प्रश्न आणि फाइल! हा भाव कायम मंत्रालयातल्या वातावरणात भरून राहिलेला असतो. फायलींची चळत हे मला नेहमीच फार शुभंकर दृश्य वाटत आलेले आहे. ही चळत तिथे युगानुयुगे आहे. पटापट फायली मोकळ्या करून ही चळत रिकामी करावी असे तिथे कधीच कोणाला ज्या अर्थी वाटत नाही, त्या अर्थी जगबुडी कधीच होणार नाही, यावर दृढ विश्वास असणारे लोक तिथे असतात. जगबुडीवर जर त्यांचा विश्वास असता तर त्यांनी धावपळ केली असती, जेवढा वेळ हातात आहे तेवढय़ा वेळात त्या फायलींचा निपटारा करण्याचा प्रयत्न त्यांनी केला असता. पण ‘आपल्याकडे भरपूर वेळ आहे’ या त्यांच्या श्रद्धेला कधीच तडा जात नाही. त्यामुळे फाइलींचा हा ढीग पाहिला की माझीही जगबुडीची भीती निघून जाते. आयुष्य लहान आहे, या कमी कालावधीत जेवढे शक्य आहे तितके जगून घेतले पाहिजे; शिवाय जगबुडीचे भाकीतही आहेच. तर मग हे भय मंत्रालयात कोणालाच का वाटत नसावे, हा प्रश्न जेव्हा मी स्वत:लाच विचारतो तेव्हा मला बजेटरी प्रोव्हिजनमध्ये त्याचे उत्तर सापडते. बजेटरी प्रोव्हिजन नसेल तर मंत्रालयात काहीच होऊ शकत नाही. मागे एकदा एका खात्यात टेबलासाठी बजेटरी प्रोव्हिजन होती, पण खुर्चीसाठी नव्हती. तर वर्षभर टेबलासमोर उभे राहून सगळ्यांना काम करावे लागले होते. नियम म्हणजे नियम! बजेटरी प्रोव्हिजनचा अंदाज घेत घेतच जो काही विकास व्हायचा तो होत असतो. विकासाचा प्राधान्यक्रम ठरवण्यात बजेटरी प्रोव्हिजनचा महत्त्वाचा वाटा आहे. मागे एकदा एसटीने बजेटरी प्रोव्हिजन होती म्हणून लाखो टायर घेऊन ठेवले होते. त्यावेळेला बजेटमध्ये मोटारीसाठी प्रोव्हिजन नव्हती, तर शासनाने निराश न होता ‘नसेल मोटारी घेणे परवडत, तर काय झाले? आपण टायर तर घेऊ शकतो ना!’ म्हणून टायर घेऊन ठेवले होते. प्रोव्हिजन होती तर तीनशे लोकवस्तीच्या एका गावात असू द्यावीत अडीअडचणीला- म्हणून पाच स्मशाने गावात बांधली गेली होती. जगबुडीसाठी बजेटरी प्रोव्हिजन नसल्याने कोणताच कॉन्ट्रॅक्टर ती करण्यात उत्साह दाखवणार नाही. आणि मुळात कॉन्ट्रॅक्टरलाच जर रस नसेल तर जगात काहीच होऊ शकत नाही, यावर सगळ्या मंत्रालयाचा दृढ विश्वास आहे.

इतक्या साऱ्या वैशिष्टय़पूर्ण लोकांनी नटलेला आपला महाराष्ट्र! या पुरोगामी महाराष्ट्राला जशी नरश्रेष्ठांची परंपरा आहे, तशीच नतद्रष्टांचीही थोर थोर परंपरा आहे. महाराष्ट्रातला प्रत्येक जण स्वतला एक स्वतंत्र राष्ट्र समजतो. ‘विविधतेत एकता’ वगैरे भाषणात बोलायला ठीक आहे; पण आजकाल सख्खा भाऊ दुसऱ्याला विचारीत नाही. प्रत्येक जण एकमेकांना दुरावत चालला आहे. अशा सगळ्या वातावरणात जिथे प्रेमाचे धागे माणसांना एकमेकांशी बांधून ठेवू शकत नाहीत तिथे असे काय आहे- जे इथल्या सगळ्या थोर नरश्रेष्ठांना आणि नतद्रष्टांना शासनाशी बांधून ठेवते? याचे उत्तर आपल्याला ‘फाइल’ नावाच्या गावाला आणून सोडते. ‘फाइल’ नावाचा घट्ट धागा आपल्या सगळ्यांना शासनाशी बांधून ठेवतो. हा धागा जर नसता तर कटलेल्या पतंगासारखा प्रत्येक जण वाटेल तिथे आणि वाटेल तसा उडत राहिला असता.. या कल्पनेनेही मला घाबरून जायला होते.

कल्पना करा, की महाराष्ट्रातले सगळे प्रश्न संपले आहेत.. शासनाने तुम्हाला काय करायचे ते करा, तुमचा मूड असेल तर तुमची जमीन ग्रीन झोनमध्ये ठेवा, नसेल तर यलो करा असे घोषित केले.. स्वर्गातले दोन-चार देव अडखळून पडले तरी हरकत नाही, पण जोपर्यंत मन भरत नाही तोपर्यंत इमारतीवर मजले चढवायला परवानगी दिली.. प्रत्येक शिक्षक अनुदानितच आहे हे मान्य केले.. कर्जवाटप व्हायच्या आधी कर्ज माफ केले.. इथे जन्मलेल्या प्रत्येकाला डिफॉल्ट सेटिंगने सरकारी नोकरी मिळेल, आणि जर त्याची इच्छा नसेल तर तो बेरोजगार राहू शकतो असा पर्याय दिला.. कॅबिनेट सेक्रेटरींचा पगार हा बेरोजगार भत्त्याचा पाया मानून वेगवेगळ्या वेतन आयोगांनुसार तो जितका असेल तितका बेरोजगार भत्ता प्रत्येकाला मिळेल अशी व्यवस्था केली.. असे झाले तर कल्पना करा.. किती अराजक माजेल! प्रत्येकाची कोणती ना कोणती फाइल शासनाकडे पेंडिंग आहे म्हणून प्रत्येक जण शासनाशी बांधलेला आहे. जर त्याची कोणतीच फाइल पेंडिंग नसेल तर तो शासनाला- पर्यायाने राज्यालाही बांधील राहणार नाही. रिकामे मन हे सतानाचे घर असते. इथला प्रत्येक जण सतत आपल्या पेंडिंग फाइलचा विचार करीत असतो. आपले काम कधी होईल? कसे होईल? कोणाकडून होईल? काय केले तर फाइल पुढे सरकेल? आपल्याला सोयीचे जीआर कोणते, गैरसोयीचे कोणते? अशा विविध विचारांत तो गुंतलेला असतो. त्यामुळे त्याचे मन अजिबात रिकामे राहत नाही. म्हणून सतानाला त्याच्या घराचा पत्ताच सापडत नाही!

मंत्रालय आणि फायली यांच्या पाठीमागची आध्यात्मिक बैठक आपण समजून घेतली पाहिजे. या विश्वाच्या पसाऱ्यात जसे आपले स्थान काय, आपण नक्की कुठे आहोत, याचा पत्ता लागत नाही तसेच भरपूर साधना केल्याशिवाय आपण अ‍ॅनेक्समध्ये आहोत की मेन बिल्डिंगमध्ये, याचा भल्याभल्यांना एकदा आत शिरल्यावर पत्ता लागत नाही. मी मंत्रालयात जातो आणि माझी फाइल शोधून एकदाच काय तो सोक्षमोक्ष लावून टाकतो, अशा आंधळ्या आत्मविश्वासाने प्रत्येकजण इथे पहिल्यांदा आलाय आणि फाइल सापडणे तर दूरच, सुरुवातीचे काही महिने मुख्य प्रवेशद्वाराने आत शिरल्यावर आपण दर वेळेला गार्डन गेटला कसे काय बाहेर पडलो, हेदेखील त्याला कळलेले नाहीये. आपण चढलो की दर वेळीच लिफ्ट ओव्हरलोड का होते? आणि नाही झाली, तर आपला नंबर आल्यावरच नेमके वरिष्ठ अधिकारी येतात आणि त्यांना प्राधान्य द्यायचा नियम आहे म्हणून दर वेळेला आपल्यालाच का उतरवून देतात, याचाही उलगडा झालेला नाहीये. ‘सह’ आणि ‘उप’ यांत डावे-उजवे काय आहे? ‘खालून पुटअप करा’ म्हणजे किती खालून करायचे? आणि ‘वरून येऊ द्या’ म्हणजे किती वरून आणायचे? या साध्या गोष्टी माहीत नसलेले लोक मी जेव्हा मंत्रालयात सरावैरा धावताना पाहतो तेव्हा अजून किती जन्म जातील या लोकांना शहाणे होण्यात, या विचाराने माझ्या मनात विराट करुणा जागृत होते. ‘उपर्निर्दिष्ट अधिकाऱ्याचे कार्यालयातून प्राप्त करावे..’ असे पत्र हातात घेऊन श्री. उपर्निर्दिष्ट साहेबांची केबिन कुठे आहे, हे शोधत फिरणाऱ्या एका खुळ्याला तर मीच हाताला धरून समुद्रावर सोडून आलो होतो.

शासनाच्या लोगोत बोधवाक्य म्हणून मोठा संस्कृत विचार लिहिलाय. तिथे ‘श्रद्धा आणि सबुरी’ हा विचार लिहावा असे मला वाटते. शासकीय धोरणाच्या अंगाने जाणाराच हा विचार आहे. पूर्वार्ध तुम्हाला सांगतो की- मुळात तुम्ही फळाची अपेक्षाच ठेवू नका, म्हणजे गोष्टी फार सोप्या होतात. तुम्ही आधी श्रद्धा ठेवा आणि प्रामाणिक फॉलोअप ठेवा. दालना-दालनातून आणि डेस्क-डेस्कवरून फिरल्यानंतर कधीतरी जेव्हा हताश व्हायला होईल आणि हे सारे कधीपर्यंत चालणार, असे चीड येणारे विचार मनात येतील तेव्हा उत्तरार्ध आठवायचा आणि सबुरी ठेवायची. फाइल कधी इनवर्ड केली हे महत्त्वाचे नाही; ती आता कुठवर पोहोचली हेही महत्त्वाचे नाही; तिच्यावर काय शेरा आहे हेही महत्त्वाचे नाही, तो पॉझिटिव्ह असेल तर मातायचे नाही अन् निगेटिव्ह असेल तर रुसायचे नाही; पोहोचण्यात आनंद नाही, प्रवासात आनंद आहे, हे ज्याच्या लक्षात आले त्याच्यासाठी गोष्टी फार सोप्या होतात.

रोज हजारो फायली मंत्रालयात येत असतात. त्यांच्या फॉलोअपला हजारो लोकही येत असतात. यानिमित्ताने शासकीय कर्मचारी आणि सामान्य जनता यांच्यात मत्रीचा एक बांध निर्माण होतो. जाणकार सांगतात, की वारकरी जसा पहिली वारी पांडुरंगाच्या ओढीने करतो आणि मग तो परत परत वारीला जात राहतो ते वारकऱ्यांच्या सहवासाच्या ओढीने. तसे सामान्य माणूस फायलीचा सोक्षमोक्ष लावायला पहिल्यांदा मंत्रालयाची पायरी चढतो आणि मग मात्र तो इथले वातावरण आवडले म्हणून परत परत येत राहतो. फाइलच्या फॉलोअपला आल्यावर पहिल्या खेपेला हॉटेलात, नंतर जवळच्या नातलगांकडे, त्यानंतर लांबच्या नातलगांकडे, नंतर मित्राकडे, नंतर मित्राच्या नातलगांकडे पथारी टाकणारा शेवटी जेव्हा आमदार निवासातच पथारी टाकतो तेव्हा तो या सगळ्या वातावरणाला आपला वाटायला लागतो. भलत्याच आमदाराच्या कक्षात राहणाऱ्या एका सराईताने तर आमदारालाच सुनावले होते की, ‘साहेब, तुम्हाला माहीत नाही. तुमची पहिलीच टर्म आहे. मी इथे १९८४ पासून येतोय!’

पंढरीच्या वारीमध्ये आणि मंत्रालयाच्या वारीमध्ये विलक्षण साम्य आहे. ज्याच्याकडे काम आहे तो मस्त कटीवर हात ठेवून उभा आहे. आणि ज्याचे काम आहे तो तिकडेही पायपीट करतो, इकडेही पायपीट करतो. तिकडे हातात भगवी पताका घेऊन जातात, इकडे हातात फायली घेऊन जातात. तिकडे िरगण पाहून मन रमवायचे, इकडे हेलपाटय़ांनी मन रमवायचे. तिकडे युगे सरली तरी परिस्थिती तीच राहते, इकडे सरकारे बदलली तरी परिस्थिती तीच राहते. आणि इतकी सगळी उठाठेव करून शेवटी पंढरपूरला पोहोचल्यावर काही मोजकेच जण गाभाऱ्यात जाऊ शकतात, बाकी सगळ्यांनी कळसालाच नमस्कार करायचा आणि समाधानाने माघारी फिरायचे.. पुढच्या वारीला परत यायचा निश्चय करून आणि तेव्हा तरी नक्की कृपादृष्टी आपल्याकडे वळेल- या विश्वासाने.

कटीवर हात ठेवून जो उभा आहे तोच काम करू शकतो, हा पायपीट करणाऱ्याचा विश्वास तुटला तर ना पंढरीचे महत्त्व राहील, ना मंत्रालयाचे. मग ना पताका राहतील, ना फायली.

फायली हे नागरिकांच्या चिरंतन आशेचे आणि सभ्यतेचे प्रतीक आहे. फायलींची चळत विश्वास देते, की इतके सारे लोक- जे बंदूकही उचलून आपले मागणे मागू शकले असते, ते कागदावर खरडून आपल्या मागण्या मागताहेत. पण गाऱ्हाणे घेऊन येणाऱ्यासमोर युगानुयुगे कटीवर हात ठेवून उभे राहायची ‘लक्झरी’ पंढरीच्या पांडुरंगाला परवडली, तशी लोकशाहीतल्या पांडुरंगांनाही युगानुयुगे परवडेल असे मला नाही वाटत.

मंदार भारदे  mandarbharde@gmail.com