दिग्दर्शक म्हणून हे नाटक बघून मी एक गोष्ट शिकलो. ती म्हणजे बॅलन्स (समतोल). विनोदी नाटकातसुद्धा संवाद किती असावेत, व्हिज्युअल्स किती असावीत, याचा समतोल बिघडला तर नाटक हुकतं. कालरे गोल्दोनी या नाटककाराने ‘सव्र्हन्ट ऑफ टू मास्टर्स’ या मूळ नाटकाची संरचना करताना फॉर्म आणि कन्टेन्ट यांचं उत्तम भान ठेवलं होतं. पण रिचर्ड बीनच्या रंगावृत्तीत आणि निकोलास हायटनरच्या प्रयोगात हे भान सुटलं असं मला वाटलं. म्हणून मला हे नाटक आवडलं नसावं. पण सबंध नाटय़गृहात असं मत असणारा कदाचित मी एकटाच होतो, हे मात्र नाकारता येणार नाही. त्यामुळेच हे नाटक करून बघावं असा विचार मनात सारखा सारखा येतो आहे.
‘कॉमेडिया दे लार्त’ हा नाटय़प्रकार इटलीमध्ये चौदाव्या शतकात सुरू झाला. ‘कॉमेडिया दे लार्त’ या नाटय़प्रकाराला ‘कॉमेडी ऑफ आर्ट’ किंवा ‘कॉमेडी ऑफ दी प्रोफेशन’सुद्धा म्हणतात. १४ ते १८ वे शतक अशी चार शतकं हा नाटय़प्रकार इटलीमध्ये मोठय़ा प्रमाणावर केला जात होता. या नाटय़प्रकारामध्ये लिखित संहिता असतेच असं नाही. उत्स्फूर्तपणे जे आणि जसं सुचेल तसं प्रयोगात सादर केलं जातं. त्यामुळे नाटकाच्या विषयापेक्षा त्याच्या सादरीकरणावर भर असतो. इटलीमध्ये हा नाटय़प्रकार १६ व्या शतकात अधिक फुलला आणि लोकप्रिय झाला. काही वर्षांपूर्वी पृथ्वी थिएटरच्या नाटय़महोत्सवात इटलीहून एक ग्रुप आला होता. त्यांनी सादर केलेलं ‘कॉमेडिया दे लार्त’ मी पाहिलं होतं आणि त्या प्रयोगाचं परीक्षणही लिहिलं होतं. मला आठवतं त्याप्रमाणे इटालियन कलाकारांसोबत काही भारतीय कलाकारांनीही त्यात कामं केली होती. या नाटय़प्रकारात लिखित संहिता नसली तरी विषय, व्यक्तिरेखा, प्रवेशांची मांडणी, अंकांची रचना हे सगळं पक्कं ठरलेलं असतं. प्रत्येक नाटकाला पूर्वरंग असतो. प्रत्येक प्रवेशात काय घडणार, ते आधीच ठरवलेलं असतं. अभिनेत्यांना हे सर्व सांगितलं जातं. त्यांच्याबरोबर चर्चा केली जाते. अभिनेत्यांना बरोबर घेऊन संहिता बांधली जाते आणि त्यानंतर तालमींमध्ये संवाद ठरवले जातात. धमाल प्रकार असतो. १६ व्या शतकात इटलीत जी राजकीय आणि सामाजिक परिस्थिती होती त्यावर भाष्य करणे, हा कॉमेडिया हे लार्तचा प्रमुख उद्देश असायचा. हा नाटय़प्रकार खूप लोकप्रिय झाला आणि त्यातूनच पुढे व्यावसायिक नाटकांची निर्मिती होऊ लागली. त्यामुळे इटालियन रंगभूमीच्या इतिहासात ‘कॉमेडिया दे लार्त’ला अनन्यसाधारण महत्त्व आहे.
कॉमेडिया दे लार्तचे प्रयोग कार्निव्हल्समध्ये होत असत आणि मोठमोठे सेट्स लावले जायचे. ज्या शहराच्या बाहेरच्या भागात नाटकाचे प्रयोग व्हायचे, त्या शहरातून प्रयोग सादर करायला पैसे मिळायचे. नाटकाचा प्रयोग प्रेक्षकांसाठी विनामूल्य असायचा. प्रयोग संपल्यावर हॅट कलेक्शन केलं जायचं. राजे-महाराजांसमोरही नाटकांचे प्रयोग व्हायचे. त्यातून पैसे उभे केले जायचे. कॉमेडिया दे लार्तमध्ये ‘स्टॉक’ व्यक्तिरेखा असायच्या आणि आजही असतात. नाटकांचे विषयही ठरलेले असतात. परंपरेने जे विषय चालत आले आहेत त्यामध्ये प्रेम, म्हातारपण, असूया आणि विवाहबाह्य़ संबंध हे प्रामुख्यानं असतात. संगीत आणि नाच हा कॉमेडिया दे लार्तच्या प्रयोगाचा महत्त्वाचा भाग असतो. तसेच विनोदनिर्मितीसाठी निर्माण केलेले अडथळे- ज्याला ‘लाझी’ असं म्हणतात- म्हणजे नाटक सुरू असताना मध्ये येऊन विनोद सांगणे, एखादा छोटा जगलरीसारखा आयटम करणे किंवा पॅन्टोमाइम करणे; कधी कधी सर्कसमध्ये असतात तसे अॅक्रोबॅटिक्स करणे.. या मधल्या अडथळ्यांचा मूळ नाटकाशी संबंध असतोच असं नाही. पोर्तुगालमध्ये प्रसिद्ध असलेल्या ‘तियात्र’ या नाटय़प्रकारातसुद्धा अशा प्रकारचे कॉमिक रीलिफ्स असतात. भारतात गोव्यामध्ये मोठय़ा प्रमाणात कोकणी भाषेत तियात्रे केली जातात. या तियात्रांमध्ये सादर होणाऱ्या लाझीला ‘साइड शो’ म्हणतात. गोव्यात तियात्र बघायला जाणारा प्रेक्षकवर्ग साइड शो बघायलाच गर्दी करतो. कॉमेडिया दे लार्तमध्ये वापरली जाणारी आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे मास्क (मुखवटे). विविध पात्रांप्रमाणे हे मुखवटे वापरले जातात. हे मुखवटे चार किंवा पाच प्रकारचे असतात. पॅन्टालोन आणि डॉक्टर (दोन्ही म्हातारी माणसं), कॅप्टन, एक धाडसी तरुण, विदूषक, कुबड असलेला माणूस आणि दुसरा एक म्हातारा माणूस. हे मुखवटे घातले की प्रेक्षकांच्या लक्षात येतं की, कुठली कुठली पात्रं नाटकात वापरली जाणार आहेत. कॉमेडिया दे लार्त या नाटय़प्रकारात काही लिखित संहिताही आहेत. त्यातली महत्त्वाची, अत्यंत गाजलेली संहिता म्हणजे कालरे गोल्दोनी लिखित ‘सव्र्हन्ट ऑफ टू मास्टर्स.’ हे नाटक खूप गाजलं. त्याचे जगभर प्रयोग झाले आणि यापुढेही होत राहतील.
नॅशनल थिएटरला ‘वन मॅन टू गव्हर्नर्स’ या ‘सव्र्हन्ट ऑफ टू मास्टर्स’चं रिचर्ड बीन या नाटककाराने केलेल्या नव्या रंगावृत्तीचे प्रयोग सुरू होते. मला मूळ नाटक माहीत होतं. त्याचं हिंदी रूपांतर ‘दो गश्तीयों का सवार’ आणि प्रवीण भोळे यांनी केलेले त्याचं मराठी रूपांतर ‘मी एक आणि माझे दोन’ ही दोन्ही मी वाचली होती. शिवाय कॉमेडिया दे लार्त या फॉर्मविषयीचं मला आकर्षण होतंच. त्यामुळे मी नॅशनल थिएटरला जाऊन ‘वन मॅन टू गव्हर्नर्स’ बघायचं ठरवलं. नॅशनल थिएटरच्या लिटिलटन या कमानी मंच असलेल्या नाटय़गृहात प्रयोग होता. मी तिकीट काढायला गेलो. मला एका आठवडय़ानंतरचं तिकीट मिळालं. म्हणजे नाटक लोकप्रिय झालेलं होतं, हे वेगळं सांगायला नको. नॅशनल थिएटरमध्ये नाटक बघायला मला आवडतं. तिथलं वातावरणही नाटकाला पोषक असतं, हे मी वारंवार नमूद केलं आहे. ‘सव्र्हन्ट ऑफ टू मास्टर्स’ हे कालरे गोल्दोनीने १७४३ साली लिहिलेलं नाटक. रिचर्ड बीनने त्यात बदल करून ‘वन मॅन टू गव्हर्नर्स’ या नावाने त्याचं पुनर्लेखन केलं. नॅशनल थिएटरने त्याचा प्रयोग केला. समीक्षकांनी या प्रयोगाची खूप स्तुती केली असावी. कारण मी विकत घेतलेल्या ब्रोशरमध्ये नाटय़परीक्षणांच्या हेडलाइन्स छापल्या होत्या; ज्या वाचून समीक्षक नाटय़प्रयोगावर खूश असावेत, हे सूचित होत होतं. मी माझ्या सीटवर जाऊन बसलो आणि नाच, गाणी, विनोद यांनी भरलेला प्रयोग पाहायला सज्ज झालो.
नॅशनल थिएटर वेगवेगळ्या प्रकारची नाटकं सादर करण्यासाठी प्रसिद्ध आहे. तिथे जुनी क्लासिकल बघायला मिळतात, त्याचबरोबर ‘वॉर हॉर्स’ किंवा ‘हॅबिट ऑफ आर्ट’सारखी उत्तम नवीन नाटकंही बघायला मिळतात. हा विचार डोक्यात घोळत असतानाच जोरात म्युझिक सुरू झालं आणि त्याच्यासोबत गाणं. ‘वन मॅन टू गव्हर्नर्स’चा प्रयोग सुरू झाला होता. गमतीशीर पूर्वरंग झाला आणि नाटक पुढे सरकायला लागलं.
रिचर्ड बीन या नाटककाराने नाटकातला काळ बदलून १९६० केला होता. आणि जागा होती- ब्रायटन. दोन गुंडांची कुटुंबं लग्नाच्या बंधनात अडकणार असतात. मूळ नाटकात जी दोन कुटुंबं आहेत ती गुंडांची नाहीत. पण रॉस्को हा जुळ्या भावांपैकी एक भाऊ मारला जातो. म्हणून पाओलिन ही चार्ली या गुंडाची मुलगी अॅलनशी लग्न करायचं असं ठरवते- जो चार्लीच्या वकिलाचा मुलगा असतो. त्याला अॅक्टर व्हायचं असतं. हे सगळं होत असताना फ्रान्सिस हा रॉस्कोचा नोकर येतो. त्याच्या आगमनामुळे गोंधळ निर्माण व्हायला सुरुवात होते. रॉस्को मेला नसल्याचं कळतं. त्यामुळे रॉस्को आणि पाओलिनचं लग्न होऊ शकतं. पण अॅलन आणि पाओलिनला आता ते मान्य नाही होत. फ्रान्सिस एका पबमध्ये जातो- जिथे त्याला दुसरी नोकरी मिळते. त्यामुळे आता त्याचे दोन मालक आहेत. त्याला दोन्ही मालकांची चाकरी करायची आहे; पण एकमेकांना कळू न देता. इथून पुढे फ्रान्सिसची दोन्ही मालकांना खूश करण्याची जी धडपड चालते त्यावर नाटकाचा पुढचा डोलारा उभा राहतो.
नाटकाच्या अगदी सुरुवातीला ‘दि क्रेझ’ नावाचा बॅण्ड वाजायला सुरुवात होते. काही विनोदी गाणी गायली जात होती. नाटकात मधे मधे हा बॅण्ड वाजत होता. नाटकातील पात्रं वेगवेगळी वाद्यं वाजवून गात होती. नाटकाच्या कथानकात मधे मधे ही गाणी म्हटली जात होती- ज्यातून विनोदनिर्मिती करण्याचा प्रयत्न होत होता. प्रेक्षक नाटक तुफान एन्जॉय करीत होते. भरपूर हशे आणि टाळ्या. नाटकातला प्रत्येक विनोद ते उचलून धरत होते. नाटकाच्या दुसऱ्या भागात खूप चढउतार होते. फ्रान्सिस हा नोकर सर्व समस्यांना तोंड देत, मार्ग काढत होता. शेवटी सगळं सुरळीत होतं आणि फ्रान्सिसला तो दोन मालकांकडे काम करीत असल्याची कबुली द्यावी लागते.
माझ्यासमोर जे नाटक म्हणून चाललं होतं त्याला प्रेक्षक दाद देत होते, पण मी मात्र अलिप्त होतो. काही केल्या ते नाटक माझ्यापर्यंत पोहोचेना. मी अगदी निकराचा प्रयत्न करीत होतो नाटक एन्जॉय करायचा; पण नाही.. मला आस्वादच घेता येत नव्हता- समोर जे काही चाललंय त्याचा. मध्यंतरात मला वाटलं की दुसऱ्या अंकात तरी मजा येईल. पण नाही. उलट, दुसरा अंक खूपच लांब आणि कंटाळवाणा वाटायला लागला. वास्तविक मला विनोद नाटक बघायला खूप आवडतं. अगदी साध्या साध्या विनोदांवरही मला हसू येतं. पण इथे मला सगळा आचरटपणा चाललाय असं वाटत होतं. इतकं नावाजलेलं प्रॉडक्शन! मीही मला आवडेलच, अशा भ्रमात. पण घडलं होतं ते भलतंच. मनात असाही विचार येऊन गेला की, इतके सगळे चांगलं म्हणताहेत या नाटकाला, प्रयोगाला.. प्रेक्षकही उत्स्फूर्त दाद देताहेत, तर ते परत एकदा पाहावं. पण मला धाडस नाही झालं.
माझं असं का झालं असेल, याचं कारण मी शोधायला लागलो. कदाचित मी कॉमेडिया दे लार्त शोधत होतो त्या प्रयोगात. मला तो फॉर्म हाताळायला हवा होता असं वाटत राहिलं. आणि माझं माझ्यापुरतं मला ते पूर्णपणे पटलेलं होतं. रिचर्ड बीनने मूळ नाटकाची पुनर्रचना करताना कॉमेडिया दे लार्त या नाटय़प्रकाराला बगल देऊन एक फार्स त्यातल्या कथानकाच्या आणि व्यक्तिरेखांमधील वैचित्र्याचा आधार घेऊन मांडायचा असं ठरवलं असावं. खरं म्हणजे असे प्रयोग करून बघणं मला स्वत:ला मान्यच आहे, पण इथे मात्र बीन यशस्वी झाला आहे असं मला वाटलं नाही. एकापुढे एक शाब्दिक विनोदांची भेंडोळी माझ्यासमोर फेकली जात होती. तीही या नाटकाची गरज नसताना. निकोलास हायटनर या प्रसिद्ध दिग्दर्शकानेही प्रयोग असा बांधला होता, की आपलं लक्ष सतत जेम्स कॉर्डन या नोकराचं काम करणाऱ्या अभिनेत्याकडे जावं. जेम्स कॉर्डनने काम छान केलं होतं; परंतु तो ज्या पद्धतीचा अभिनय करीत होता- आणि एखाद् दुसरा अपवाद वगळता इतर जे करीत होते त्यात खूप तफावत होती. रिचर्ड बीनने आणि निकोलास हायटनरने मिळून एक गोष्ट सांगायचं ठरवलं आणि सांगताना ती पसरट होऊ नये याकडे दुर्लक्ष केलं. दुसऱ्या अंकात कंटाळा आला. नाटक आता लवकर संपेल तर बरं, असं वाटत राहिलं. नाटकाची गोष्ट गंमतीशीर असली तरी इतकी वेगळी नव्हती, की त्यात मी गुंतून ती एन्जॉय करीन. अर्थात मला गोष्ट माहीत असल्यामुळेही तसं झालं असेल. नाटक तांत्रिकदृष्टय़ा नेहमीप्रमाणे चांगलंच होतं. नाटकाचं नेपथ्य इन्टरेस्टिंग होतं. लोकेशन्सचे मोठमोठे कटआऊटस् सरकून रंगमंचावर येत होते. पण ते सगळे थोडे थोडे खोटे वाटावेत, हा नाटकाचा सेट आहे बरं का, याची जाणीव व्हावी असे होते. मला हे खूपच आवडलं. कारण प्रयोगात अभिनेते प्रेक्षकांशी बोलत होते, नोकराचं काम करणारा जेम्स कॉर्डन तर नाटय़गृहात उतरून प्रेक्षकांशी संवाद साधत होता. थोडक्यात काय, तर चौथी भिंत पाडून हे नाटक सुरू आहे बरं का, याची जाणीव दिग्दर्शकाला करून द्यायची होती. प्रकाशयोजना अतिशय साधी. काळ-वेळाचं सूचन करणारी. आणि मुख्य म्हणजे ब्राइट. रंगमंचावरचं सगळं लख्ख दिसेल अशी व्यवस्था करणारी. विनोदी नाटक लख्ख प्रकाशात खेळलं जावं, यावर दिग्दर्शक आणि प्रकाशयोजनाकाराचा विश्वास असावा. वेशभूषेतील रंगसंगतीसुद्धा जरा भडक. पात्रं एखाद्या चित्रातल्यासारखी दिसत होती. थोडी खरी, थोडी खोटी. ‘क्रेझ’ हा बॅण्डही चांगला होता. गाणारी मंडळी छान गात होती. नाटकाच्या सुरुवातीला आणि शेवटी गाणं होतं. अगदी आपल्या नांदी- भरतवाक्याची आठवण व्हावी असं.
कॉमेडिया दे लार्तचा मास्क, जगलरी, रंगीबेरंगी कॉस्च्यूम्स यांचा वापर करून प्रयोग केला असता तर अधिक मजा आली असती असं वाटलं. म्हणजे मग रिचर्ड बीनची रंगावृत्ती आणि फॉर्म मात्र ओरिजिनल! अशानं नाटकाचं दृश्यस्वरूप भन्नाट झालं असतं. गोष्ट त्यातल्या चढउतारांसकट पोहोचवायची; पण त्याबरोबर दृश्यस्वरूपही ‘लार्जर दॅन लाइफ’ करून पोहोचवायला हवं होतं. हे म्हणणं कदाचित पारंपरिक वाटेल, पण माझं असं ठाम मत झालं की, नुसती गोष्ट सांगण्याच्या, शाब्दिक कोटय़ा आणि अंगविक्षेप करण्याच्या नादात एका उत्तम नाटकाची वाट लागली. कुठेतरी ते अर्धकच्चं राहिलं. मी खूपच अस्वस्थ झालो. फ्रान्सिसचं काम करणारा जेम्स कॉर्डन, पाओलिनचं काम करणारी जेमिमा रूपर आणि ख्रिसचं काम करणारा डॅनियल रिग्बी हे तिन्ही कलावंत खूप छान होते; पण इतर कामं करणारी नटमंडळी तितकीशी चांगली नव्हती. त्यामुळे बोट कलंडली होती. तमाशाच्या बतावणीमध्ये विनोदाची जुगलबंदी असते, पण बतावणी हा तमाशाचा एक भाग असतो. पुढे धमाल वगनाटय़ येणार असतं. वगनाटय़ामध्ये छानशी गोष्ट सांगितलेली असते. पण आपण वगनाटय़ामध्येही जर खूप वेळ बतावणीच करीत राहिलो तर त्या वगनाटय़ाची गंमत कमी नाही का होणार? तसंच काहीसं मी बघितलेल्या नॅशनल थिएटरच्या ‘वन मॅन टू गव्हर्नर्स’ या नाटकाचं झालं होतं. त्यातली बतावणी संपेचना. त्यामुळे वगनाटय़ाचा आस्वाद- ते चांगलं असूनही घेता आला नाही.
दिग्दर्शक म्हणून हे नाटक बघून मी एक गोष्ट शिकलो. ती म्हणजे बॅलन्स (समतोल). विनोदी नाटकातसुद्धा संवाद किती असावेत, व्हिज्युअल्स किती असावीत, याचा समतोल बिघडला तर नाटक हुकतं. कालरे गोल्दोनी या नाटककाराने ‘सव्र्हन्ट ऑफ टू मास्टर्स’ या मूळ नाटकाची संरचना करताना फॉर्म आणि कन्टेन्ट यांचं उत्तम भान ठेवलं होतं. पण रिचर्ड बीनच्या रंगावृत्तीत आणि निकोलास हायटनरच्या प्रयोगात हे भान सुटलं असं मला वाटलं. म्हणून मला हे नाटक आवडलं नसावं. पण सबंध नाटय़गृहात असं मत असणारा कदाचित मी एकटाच होतो, हे मात्र नाकारता येणार नाही. त्यामुळेच हे नाटक करून बघावं असा विचार मनात सारखा सारखा येतो आहे.
संग्रहित लेख, दिनांक 11th Nov 2012 रोजी प्रकाशित
‘वन मॅन टू गव्हर्नर्स’
दिग्दर्शक म्हणून हे नाटक बघून मी एक गोष्ट शिकलो. ती म्हणजे बॅलन्स (समतोल). विनोदी नाटकातसुद्धा संवाद किती असावेत, व्हिज्युअल्स किती असावीत, याचा समतोल बिघडला तर नाटक हुकतं. कालरे गोल्दोनी या नाटककाराने ‘सव्र्हन्ट ऑफ टू मास्टर्स’ या मूळ नाटकाची संरचना करताना फॉर्म आणि कन्टेन्ट यांचं उत्तम भान ठेवलं होतं.

First published on: 11-11-2012 at 12:00 IST
मराठीतील सर्व रंगसंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Balance in drama as a director i have learnt it