आनंद हर्डीकर

गांधीजींची दीडशेवी जयंती नुकतीच देशविदेशांत विविध प्रकारे साजरी केली गेली. तथापि, त्यांच्याबद्दलची जिज्ञासा त्या तेवढय़ा दिवसासाठी वा समारंभापुरती मर्यादित नाही. पूर्वीपासूनच त्यांच्याबद्दल वेळोवेळी वेगवेगळ्या अंगांनी लिहिले गेले आहे आणि यापुढेही लिहिले जात राहील. अशाच अलिकडे प्रसिद्ध झालेल्या दोन लक्षवेधी पुस्तकांचा हा अल्पसा परिचय.

पहिले पुस्तक आहे- ‘बापूंच्या सहवासात’ हे ‘ग्रंथाली’ने प्रकाशित केलेले आणि अरुण शेवते यांनी संपादित केले आहे. त्यांच्याच अंकामधून पूर्वी प्रसिद्ध झालेल्या एकूण सात लेखांचे संकलन म्हणजे हे पुस्तक. गांधीजींबाबत विपुल लेखन आणि त्यांच्या ‘हिंद स्वराज’ या जगप्रसिद्ध ग्रंथाचा अनुवाद करणाऱ्या रामदास भटकळांचे दोन व ‘लोकमान्य ते महात्मा’ या द्विखंडात्मक महाग्रंथाचे बहुव्यासंगी लेखक डॉ. सदानंद मोरे यांचा एक अशा तीन स्वतंत्र लेखांबरोबरच रवींद्र पिंगे, सविता दामले, टी. एन परदेशी व अंबरीश मिश्र यांनी अनुवादित केलेले चार लेख पुस्तकात वाचायला मिळतात.

‘गांधी शाळेत होते तेव्हा’ हा रामदास भटकळ यांचा लेख म्हणजे राजकोटचे रहिवासी असणाऱ्या जे. एम. उपाध्याय नामक लेखकांनी परिश्रमपूर्वक माहिती मिळवून १९६५ सालीच प्रसिद्ध केलेल्या एका दुर्लक्षित पुस्तकाचा संक्षिप्त परिचय आहे. मोहनदासची शाळा कोणती होती, त्याचे वर्गमित्र कोणकोणते होते, त्याचे यशापयश कसे नोंदवले गेले होते, शेख मेहताब नावाच्या मित्रामुळे तो कसा बिघडला होता आणि तरीही तिसरीतून चौथीत उडी मारण्याची हुशारी त्याने कशी दाखवली होती, श्रावणबाळाची कथा ऐकून पितृभक्त बनलेला तो लहानपणी स्वभावातच कसा भित्रा भागूबाई होता.. या प्रश्नांच्या निमित्ताने अनेक रंजक बाबी या  लेखामुळे आपल्याला समजतात.

‘बुलबुल आणि मिकी माऊस’ या आकर्षक शीर्षकाच्या दुसऱ्या लेखात भटकळांनी गांधीजी आणि सरोजिनी नायडू यांच्यातील भावनिक संबंध अत्यंत ललितरम्य शैलीत उलगडून दाखवले आहेत. त्या दोघांनी परस्परांना लिहिलेली ‘प्रेमपत्रे’- त्यांनीच आपल्या पत्रव्यवहारासाठी कधी कधी वापरलेला शब्द अभ्यासून आणि सरोजिनीबाईंनी गांधीजींना लिहिलेली काही पत्रे अनुवादित करून खूप नवी माहिती भटकळांनी पुरवली आहे. गांधीजी त्यांना ‘बुलबुल’ म्हणत, तर त्यांनी गांधीजींचे वर्णन करताना लंडनमधील एका सभेत चक्क त्यांना ‘मिकी माऊस’ म्हटले होते. हा एक निव्वळ नमुना! हा संपूर्ण लेखच मुळातून वाचावा, इतका प्रवाही आणि प्रभावी आहे.

‘गांधीजींचा तो हार’ हा रवींद्र पिंगे यांनी अनुवादित केलेला लेख म्हणजे गुरुवायूर मंदिरात सत्याग्रह सुरू असताना, महात्माजींच्या दर्शनासाठी बालामणी अम्मा नावाच्या कवयित्रीने केलेल्या प्रवासाची आणि दर्शन होताना त्या महापुरुषाकडून मिळालेल्या हाराची विस्तृत कहाणी आहे.

या संग्रहालाही ज्या लेखाचे शीर्षक दिले गेले आहे, तो ‘बापूंच्या सहवासात’ हा प्रदीर्घ लेख आभा गांधींच्या मूळ हिंदी पुस्तकातील काही वेचक-वेधक भागांचा सविता दामले यांनी केलेला चांगला भावानुवाद आहे. अवघ्या बारा वर्षांची एक मुलगी वडिलांच्या सांगण्यावरून गांधीजींच्या सेवाग्राम आश्रमात केवळ वर्षभर राहायचे म्हणून दाखल झाली; पण पुढे त्या मातृहृदयाच्या कनवाळू व्यक्तीच्या अखेपर्यंत बरोबरच राहिली, अगदी कनू गांधींशी लग्न झाल्यावरही. तिच्या बापूंबद्दलच्या अत्यंत हृद्य आठवणी आपल्याला गांधीजींच्या स्वभावाचे अनेक ज्ञात-अज्ञात पैलू उलगडून दाखवणाऱ्या ठरल्या आहेत.

‘दोन स्त्रिया’ हा सुधीर कक्कड यांचा टी. एन. परदेशी यांनी अनुवादित केलेला लेख या संग्रहातला भाषेच्या दृष्टीने खूपच कच्चा असा आहे. प्रेमा कंटक आणि मीराबेन या दोघींच्या गांधीजींबरोबरच्या संबंधाचे, त्यातल्या आसक्तीचे आणि दैहिकतेचेही मनोविश्लेषण करणारा हा लेख एक अल्पचर्चित विषयांवरचे महत्त्वाचा तपशील पुरवणारा आहे. परंतु त्याच्यावर संपादकीय संस्कार केले जाणे आवश्यक होते, असे अनेक ठिकाणी जाणवते. मूळ लेख या संग्रहात घेताना तरी ती प्रक्रिया पार पाडायला हवी होती, पण ती त्रुटी तशीच राहून गेली आहे.

शांतीकुमार मोरारजी या उद्योगपतींच्या स्वामी आनंदनी शब्दांकित केलेल्या गांधीजींबद्दलच्या आठवणी ‘गुरुजी जहाँ, बैठूं वहाँ’ या शीर्षकाखाली अंबरीश मिश्र यांनी अनुवादित केलेल्या आहेत. शैलीदार लेखनासाठी प्रसिद्ध असणाऱ्या अंबरीशजींनी या अनुवादात मात्र अनेक इंग्रजी शब्द जसेच्या तसे का ठेवले आहेत, हे काही केल्या समजत नाही. ‘बिझनेस लॉबीने गांधींना अ‍ॅप्रोप्रिएट केलंय, अशा वाक्यापासून रेजिमेंटेशन, इंटरवू, ऑटोग्राफ डायरी, फिल्म, कॉमेंट्री, डेमॉन्स्ट्रेशन, पोझिशन’ अशा शब्दांपर्यंत अनेक खडे या अनुवादात आश्चर्यकारकपणे सापडतात आणि काहीसा विरस होतो.

या संग्रहातला शेवटचा लेख ‘महात्मा गांधी आणि महाराष्ट्र’. डॉ. सदानंद मोरे यांचा हा छोटेखानी लेख म्हणजे ‘लोकमान्य ते महात्मा’ या त्यांच्याच गाजलेल्या ग्रंथातील विवेचनाची अंशत: उजळणी आहे. टिळकांचा महाराष्ट्र हळूहळू गांधीजींच्या प्रभावाखाली कसा गेला, याचे त्यांनी केलेले विश्लेषण त्यांच्या सखोल व्यासंगाचे दर्शन घडवते, परंतु तसे करताना गोखले-टिळक-सावरकर या ब्राह्मण त्रिमूर्तीबद्दल त्यांनी मारलेले काही जातिवाचक शेरे पूर्वग्रहदूषित असावेत, अशी शंका येते. अर्थातच, हा लेख म्हणजे महाभारताचा एका श्लोकाचे संक्षेप करण्याचा खटाटोप असल्यामुळे त्या शेऱ्यांची विशेष दखल घ्यायची गरजही नाही.

असा संग्रह प्रसिद्ध करणाऱ्या ‘ग्रंथाली’चे आणि आपल्या दिवाळी विशेषांकामधील निवडक साहित्य पुस्तकरूपाने प्रसिद्ध करीत राहिलेल्या ‘ऋतुरंग’च्या अरुण शेवते यांचे अभिनंदन करताना छोटीशी सूचना मात्र करावीशी वाटते. नुकतीच गांधीजींची जयंती साजरी झाली, ती १५० वी जयंती होती. १५० वी जन्मशताब्दी नव्हती. तथापि शेवते यांच्या संपादकीय मनोगतात नजरचुकीने तसा उल्लेख झाला आहे. अशा किरकोळ चुका व भरपूर मुद्रण दोष पुढील आवृत्तीत टाळावेत, ही माफक अपेक्षा!

दुसरे पुस्तक आहे – ‘गांधीजी आणि त्यांचे टीकाकार’. ज्येष्ठ पत्रकार आणि कादंबरी, व्यक्तिचित्रे, ललित गद्य, राजकीय भाष्य वगैरे विविध साहित्य प्रकारांत लीलया संचार करणारे विचारवंत साहित्यिक सुरेश द्वादशीवार यांनी लिहिलेले हे पुस्तक म्हणजे ‘साधना’ साप्ताहिकातून सुमारे सहासात महिने क्रमाने प्रसिद्ध होत आलेल्या अठरा लेखांचे संकलन आहे. अलिकडे सातत्याने गांधीजींचा वेगवेगळ्या अंगानी परिचय करून देणाऱ्या अनेक पुस्तकांचे प्रकाशन करणाऱ्या ‘साधना प्रकाशन’नेच ते प्रसिद्ध केले असून, अल्पावधीतच आवृत्त्यांवर आवृत्त्या निघाव्यात, अशा भाग्याचे ते धनी ठरले आहेत.

द्वादशीवार यांची लेखनशैली अत्यंत प्रभावी आहे. वाचकांना गुंतवून ठेवणारी आहे. एकदा लेख वाचायला सुरुवात केल्यावर तो पूर्ण केल्याशिवाय थांबावेसे वाटत नाही आणि हाच अनुभव संपूर्ण पुस्तकाबाबतही येतो. त्यांचे वाचन आणि व्यासंगही अफाट आहे. हे या पुस्तकाच्या अखेरीस जी एक पानी संदर्भसूची दिली आहे. तिच्यावरून साधी नजर टाकली तरीही लक्षात येते. अर्थात, निवेदनाच्या ओघात येणाऱ्या वेगवेगळ्या तपशिलांबाबत नेमके आधार देत पुढे जाण्याची संशोधकी सवय त्यांनी लावून घेतली नाही. त्यामुळे मजकुराला बोजडपणा येतो असे त्यांना वाटत असावे. शिवाय हे लेखांक लिहिताना संदर्भग्रंथाची संगत बरोबरच घेऊन पुढे जाण्याऐवजी जे वाचले आहे, मनन-चिंतनाने मुरवले आहे, तेच गोष्टीवेल्हाळपणे सांगत जाणेच त्यांनी पसंत केलेले दिसते. त्यामुळे हे एक टाकी लेखन प्रभावी तर झाले आहे, परंतु का कुणास ठाऊ क, ते अपुरे आहे, असे सतत जाणवत राहते.

मोहनदास करमचंद गांधी या व्यक्तीच्या नेतृत्वाबाबत प्रचंड साहित्यनिर्मिती झाली असूनही त्यांच्या विभूतिमत्वाभोवतीचे गूढ कायम राहिले आहे. ते गूढ उकलण्याचा द्वादशीवारांचा प्रयत्न आहे आणि त्यासाठी त्यांनी गांधीजींच्या आयुष्यात आलेल्या काही महत्त्वाच्या व्यक्तींशी त्यांचे संबंध कसे होते, याबद्दलचे विवेचन करीत आपली मते वाचकांपर्यंत पोचवायचा मार्ग अनुसरला आहे. तथापि, हे सारे विवेचन त्या त्या व्यक्तींपेक्षा गांधीजींकडेच कललेले आणि त्यामुळेच खरी चिकित्सा टाळणारे झाले आहे, त्यामुळे एखाद्या गिर्यारोहकाने एव्हरेस्ट सर करण्याच्या मोहिमेवर निघावे आणि कळसूबाईचे शिखर गाठावे, तसा प्रकार झाला आहे. याबाबत थोडेसे स्पष्टीकरण आवश्यक आहे.

एकतर या पुस्तकामध्ये लेखनहेतू सांगणाऱ्या ‘गांधीजी आणि त्यांचे गूढ’ या पहिल्याच लेखाशिवाय ‘गांधाजी आणि त्यांच्या वाटय़ाला आलेले स्वातंत्र्य’ व ‘गांधीजी आणि त्यांचा धर्म’ हे दोन लेख काहीसे इतर लेखांपेक्षा वेगळ्या पठडीतले आहेत. ‘गांधीजी आणि टॉलस्टॉय’ हा लेख या लेखमालेत कसा काय समाविष्ट झाला, हा प्रश्नच आहे. कारण त्या दोन मान्यवरांमधले नाते टीकाकाराचे वा समीक्षकाचे देखील नव्हते, असे खुद्द सुरेश द्वादशीवारांनीच लेखाच्या सुरुवातीलाच म्हटले आहे. हे जसे समाविष्ट झालेल्या लेखांबद्दल, तसेच समाविष्ट न झालेल्यांबद्दलही म्हणता येते. आर्थर कोस्लर यांनी गांधीजींच्या जन्म शताब्दीच्या वेळी ‘महात्मा गांधी : द योगी अँड द कोमिसार’ अशा शीर्षकाचे जे पुस्तक प्रसिद्ध केले होते, त्यात त्यांनी ‘व्हॉट द महात्मा सेड अँड व्हॉट गांधी डिड?’ या उपशीर्षकाखालच्या विवेचनात गांधीजींची उक्ती आणि कृती यांतील विसंगतीवर नेमके बोट ठेवले होते. तथापि, तो परदेशी टीकाकार द्वादशीवारांनी विचारातच घेतलेला नाही. रोमाँ रोलाँ सारख्या फ्रेंच साहित्यिकांनी गांधीजींच्या प्रेरक नेतृत्वाचा जो गौरव केला होता, तो द्वादशीवारांनी उल्लेखला आहे. ‘गांधीजी आंदोलन सुरू करतात, ते जरा गती पकडू लागते न लागते तोच ते आपणहून त्या आंदोलनाला ब्रेक लावतात. त्यामुळे सुरू केलेली मोटार ब्रेक लावून जागच्या जागीच उभी ठेवली तर जसे गाडीच्या चाकांचे नुकसान हाईल, तसे स्वातंत्र्य आंदोलनाचे होते,’ ही त्यांनीच केलेली गांधींच्या नेतृत्वशैलीची चिकित्सा मात्र द्वादशीवार विचारातही घेत नाहीत. तेव्हा साहजिकच ‘सत्याच्या जास्तीत जास्त जवळ जाण्याचा मी प्रयत्न केला आहे,’ हा त्यांचा दावा पटत नाही.

अशा वेगवेगळ्या लेखांमध्ये त्या त्या लेखात चर्चेसाठी घेतलेल्या टीकाकाराच्या संदर्भात द्वादशीवारांनी जे विवेचन केले आहे, ते गांधीजींची बाजूच उचलून धरण्यासाठी केलेले जाणवते आणि त्यांचे अनेक पूर्वग्रहसुद्धा डोकावतात. व्हाइसरॉय लॉर्ड इर्विन यांच्याबरोबरच्या वाटाघाटींमध्ये गांधीजींनी भगतसिंग-राजगुरू-सुखदेव या क्रांतिकारकांची फाशीची शिक्षा कमी व्हावी असे मनापासून प्रयत्न केले, असे सांगून ते मोकळे होतात. ए. जी. नूराणींनी भगतसिंगावरील खटल्याच्या संदर्भातील सर्व कागदपत्रांचा धांडोळा घेऊ न लिहिलेल्या पुस्तकातील ‘गांधीज ट्रथ’ हे प्रकरण द्वादशीवार अनुल्लेखितच ठेवतात. सुभाषबाबूंवरच्या लेखात त्यांच्या आझाद हिंद सेनेच्या संदर्भात अनावश्यक विस्ताराने लिहितात. परंतु त्यांच्या गांधीजींबरोबरच्या वैचारिक संघर्षांत महत्त्वाचा टप्पा ठरलेला विठ्ठलभाई पटेल – सुभाष बोस यांचा जाहीरनामा मात्र विचारातच घेत नाहीत. सुभाषबाबूंच्या संबंधात अलिकडच्या काळात जर कुठला चौकशी आयोग नेमला गेला असेल, तर तो फैजाबादच्या भगवानजी ऊर्फ गुमनामीबाबांचा नेताजींशी काही संबंध पोचतो का, हे तपासून पाहण्यासाठी नेमण्यात आला. २०१३ साली अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने दिलेल्या आदेशानुसार, अखिलेश यादव सरकारने न्या. सहाय आयोग नेमला, ही वस्तुस्थिती जगजाहीर असताना द्वादशीवार सरळ लिहून मोकळे होतात, की ‘नेहरूंवर राग असणाऱ्यांनी सुभाषबाबूंविषयीचा संशय जिवंत राहील, याचाच अखेपर्यंत प्रयत्न केला. सध्या देशात सत्तेवर असलेल्या सरकारने त्यांच्या मृत्यूची चौकशी करायला एक आयोग आता नेमायला कमी केले नाही.’ गांधीजींचे गूढ उकलू पाहणाऱ्या सत्यान्वेषी लेखकाने सत्याचा असा धडधडीत अपलाप करावा, ही बाब इतर अनेक बाबतींत प्रभावी ठरणाऱ्या लेखनाच्या विश्वासार्हतेला बाधा आणते, हे निश्चित!

द्वादशीवारांच्या या पुस्तकात आणखी एक महत्त्वाची उणीव जाणवते, ती म्हणजे खान अब्दुल गफारखान ऊर्फ सरहद्द गांधी, चक्रवर्ती राजगोपालाचारी आणि लॉर्ड माउंटबॅटन यांचे ओझरते उल्लेख करण्याव्यतिरिक्त फाळणीच्या संदर्भात महत्त्वाच्या असणाऱ्या या तीन मान्यवरांना त्यांनी दुर्लक्षितच ठेवले असावे. त्या तिघांबद्दलही विस्ताराने लिहायचे जर ठरवले, तर ‘खुदाई खिदमतगार’ संघटनेला ‘पाकिस्तानी लांडग्यांसमोर’ (गफारखानांचे शब्द) फेकले जात असताना गांधीजींचे सारे नेतृत्व हतबल झाले होते, हे अल्पांशाने तरी मान्य करावे लागेल. १९४२ सालापासूनच राजाजी लीगला पाकिस्तान देऊन टाकण्याचा आग्रह धरीत होते आणि त्यांनी गांधीजींशी त्याबाबत चर्चा केली असल्यामुळे फाळणी होऊ शकेल, अशी त्यांना पूर्वीपासूनच कल्पना होती, एकदम १९४७ साली तशी अटळ स्थिती उद्भवली नव्हती, हेसुद्धा उल्लेखावे लागेल आणि माउंटबॅटननी ‘फाळणीची योजना माझी नसून तुमचीच तर आहे,’ असे गांधीजींच्या तोंडावर सांगितल्यावरही त्यांनी त्याचा प्रतिवाद केला नव्हता, याचासुद्धा ओझरता तरी उल्लेख करावा लागेल.. असे बहुधा द्वादशीवार यांना वाटले असावे. गांधीजींच्या संदर्भात विवेचनाच्या त्यांच्या व्यूहरचनेत तशी तिहेरी मान्यता देणे त्यांना रुचले नसावे. तथापि, त्यामुळे गांधींभोवतीचे गूढ उकलण्याचा त्यांचा प्रयत्न पुरेशी उंची गाठू शकत नाही, असे नाइलाजाने म्हणावे लागेल.

‘बापूंच्या सहवासात’,

संपादक – अरुण शेवते, ग्रंथाली,

पृष्ठे- १३८, किंमत- १५० रुपये.

‘गांधीजी आणि त्यांचे टीकाकार’

– सुरेश द्वादशीवार, साधना प्रकाशन

पृष्ठे-२६२  किंमत- ३०० रुपये.