धनाआधी आरोग्यसंपदा महत्त्वाची मानणाऱ्या आपल्या संस्कृतीत आपण ती आजच्या धावपळीत जपू आणि कमावू शकतो का, हा कोणालाही पडू शकणारा प्रश्न. आजच्या इंटरनेटच्या काळात याविषयी प्रचंड माहिती आपल्या हाताशी असते. पण त्यातील  नेमकेपणा, अधिकृतता आणि विश्वासार्हता यांविषयी मनात संदिग्धता असते.
आंतरजालावर पर्यायी माहिती मुबलक असते, पण त्यातून योग्य पर्याय कसा निवडावा, याची माहिती किंवा मार्गदर्शन नसते. उणिवेचा नेमका हाच धागा पकडून डॉ. स्वाती आणि डॉ. अविनाश सुपे या डॉक्टर दाम्पत्याने ‘आरोग्यसंपदा’  हे छोटेखानी पुस्तक लिहिले आहे. यात नेहमीचे साधारण आजार आणि बदलत्या जीवनशैलीमुळे येऊ घातलेले आजार, त्यांची ओळख आणि त्यासाठी प्राथमिक आवश्यक उपचार यांची पूरक माहिती देण्याचा प्रयत्न आहे. विषय वैद्यकीय असला तरी पुस्तकातील भाषा सामान्यांना कळेल अशी साधी, सोपी आणि संवादी आहे.
एकंदर दहा विभागांत मांडणी केलेले हे पुस्तक विषयाची प्राथमिक सर्वसमावेशकता दाखवून जाते. आरोग्य म्हणजे काय? लहान मुलांचे आजार, किशोरवयीन समस्या, असंसर्गजन्य आणि संसर्गजन्य आजार, पोटाचे विकार, स्त्रियांचे आजार, उतारवयातील आजार हे काही वानगीदाखल महत्त्वाचे विभाग. या विभागांतर्गत ५६ विषयांतून प्राथमिक आरोग्य स्वास्थ्याचा वेध घेतला आहे. याशिवाय अखेरच्या विभागात बदलता समाज-बदलते आजार, ध्यानधारणा, वर्षांऋतूतील आहारविहार, मुलांची बौद्धिक वाढ, संगणक वापरताना घ्यावयाची काळजी, रक्तदाब, दहशतवादाचे मानसिक परिणाम, डॉक्टर-रुग्ण सुसंवाद, आयुर्वेद आणि शल्यशास्त्र यांवर चिंतनवजा भाष्य केले आहे,  ते मननीय आहे.
कोणत्याही व्यक्तीला किमान वैद्यकीय साक्षरता साधता येईल आणि गैरसमजुती दूर होतील अशी एकंदरीत या पुस्तकाची रचना आहे. आजारांची आणि औषधांची माहिती देताना औषधे डॉक्टरी सल्ल्याने घ्यावीत, ही विवेकी सूचना सुरुवातीलाच अधोरेखित केली आहे. पुस्तकातील माहितीच्या मांडणीवर संपादकीय नजर आवश्यक होती. त्यामुळे पुस्तकाला छोटय़ा कोशाचे स्वरूप मिळून संदर्भमूल्य अधिक वाढले असते असे वाटते. असे पुस्तक संग्रहात असणे हे घरातील शब्दकोशाइतकेच महत्त्वाचे आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘आरोग्यसंपदा’ – डॉ. स्वाती आणि डॉ. अविनाश सुपे, सिद्धीशक्ती पब्लिकेशन, मुंबई, पृष्ठे -१९४, मूल्य – १०० रुपये

मराठीतील सर्व दखल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Books for health
First published on: 02-11-2014 at 04:50 IST