यंदाच्या साहित्य संमेलनातील पुस्तकविक्रीचा आकडा दोन कोटी ८९ लाख म्हणजे बातम्यांमधून ऐटीत तीन कोटी मिरवण्याइतका. ऐकायला आणि संमेलनाच्या आयोजकांना सांगण्यासाठी भूषणावह. तरी ग्रंथविक्रीची हक्काची संधी मानणाऱ्या प्रकाशक-विक्रेत्यांना अपेक्षाभंगांचा महा-अनुभव देणारा. यवतमाळ, उदगीर आणि नाशिकमधील संमेलनांहून वर्धा येथे अधिक निराशा पदरी येण्याची कारणे ग्रंथोपजीवींची संख्या हळूहळू आक्रसण्यात आहे. प्रकाशक-विक्रेत्यांशी संवादातून समोर आलेल्या बाबींसह हा त्याचा पडताळा..

करोनापूर्वीच्या जानेवारी २०२० मध्ये उस्मानाबादमध्ये भरलेल्या साहित्य संमेलनामध्ये ग्रंथविक्री दोन कोटी रुपयांपर्यंत गेली. त्यानंतर पुस्तकांसाठी वर्षभराच्या मोठय़ा ग्राहकविरामानंतर, नाशिकमध्ये झालेल्या संमेलनात दोन दिवसांत पन्नास लाखांहून अधिक ग्रंथांची उचल झाली. गर्दीभय आणि अवकाळी पावसाच्या चक्रातही तेथे संमेलनाच्या शेवटच्या दिवसापर्यंत कोटीच्या जवळपास विक्री शक्य होऊ शकली. त्यानंतरच्या उदगीरच्या संमेलनात ग्रंथव्यवहाराचा पल्ला दीड कोटीपर्यंत गेला. गेल्या आठवडय़ात झालेल्या वर्धा येथील संमेलनातील पुस्तकखरेदीचे गणित चक्रावणारे दिसले. तीन दिवसांत सुमारे दोन कोटींची ग्रंथविक्री झाली आणि शेवटच्या चौथ्या दिवशी ८९ लाखांची भरघोस पुस्तकखरेदी झाल्याची आकडेवारी सांगते.

Anti-Rape Wears To Avoid Rape Cases:
Anti Rape Underwear काय काम करतात बघा; श्रीमंतीच्या वेडात उत्पादकांनी महिलांच्या ‘या’ प्रश्नांची उडवली खिल्ली
readers reaction on loksatta articles
लोकमानस : आणि म्हणे विश्वगुरू, महाशक्ती!
Kolhapur, Kolhapur lok sabha,
उद्योजक ते कलाकार… कोल्हापुरात सारेच प्रचारात
peter higgs
अन्वयार्थ: ‘देव कणा’मागचा द्रष्टा!

हिंदी भाषकांचे अंमळ प्राबल्य असलेल्या या भागात वाचकांनी मराठी पुस्तकांसाठी झुंबड न उडवतादेखील इतकी मोठी खरेदी झाली हे कौतुकास्पद. तरी राज्यातील साडेआठ कोटी मराठी भाषकांच्या बळावर ‘अखिल भारतीय’ हे नाव मिरवणाऱ्या संमेलनात पुस्तकाच्या असोशीचा मुद्दा संमेलन आयोजकांना महत्त्वाचा वाटत नसल्याने आपसूक ग्राहकांची आणि ग्रंथविक्रीच्या आकडय़ांची संख्या नेहमीच्या परिघात कोंडलेली पाहायला मिळाली, असा बहुतांश प्रकाशक-विक्रेत्यांचा दावा आहे. ही सांस्कृतिक बोंब वर्षांगणिक वाढत आहे, कारण ग्रंथखरेदीचा आधीच असलेला अल्प प्रमाणातील दरडोई हातभार गेल्या दहा-पंधरा वर्षांत हळूहळू ओसरत चालला आहे. त्यात साहित्य संमेलने घडत असलेल्या वेगवेगळय़ा नगरांत संमेलनाध्यक्ष निवडीतले राजकारण, राजकीय नेत्यांची उपस्थिती या बाबींना अलीकडे इतके महत्त्व आले आहे, की पुस्तके, ग्रंथचर्चा, लेखकगप्पा आणि भेटी हा या संमेलनांचा आकर्षणिबदू असू शकतो हे सामान्य वाचकांवर बिंबविण्यात त्या त्या नगरांतील आयोजक कमी पडू लागले आहेत. परिणामी वर्धा येथे ग्रंथखरेदीसाठी आवश्यक असा माहोल तयार होण्यात पहिल्या दिवसापासून अडचणी दिसत होत्या.

या वेळी लोकांना त्रास न होता पुस्तके चाळता यावीत हा उद्देश डोळय़ासमोर ठेवून प्रशस्त जागेत वर्तुळाकार ग्रंथोत्सवाची रचना करण्यात आली. पुस्तकांचे तब्बल २९० गाळे या रचनेत होते. मात्र वर्तुळाच्या आरंभापासून ते मध्यापर्यंत पुस्तके चाळणारे वाचक उन्हाच्या तलखीने दमून जात होते. परिणामी मध्यापर्यंतच्या स्टॉल्समध्ये अधिक विक्री होत होती. ग्रंथखरेदीसाठी वर्तुळ पूर्ण करणारे ‘वाचकाभिमन्यू’ फार थोडय़ा दालन- मालकांना पाहायला मिळाले. सकाळी साडेनऊ ते ५ वाजेपर्यंत असह्य उकाडय़ात एकमेकांच्या स्टॉल्सवरचे तुरळक ग्राहक अनुभवत विक्रेते संध्याकाळच्या गर्दीची वाट पाहत होते. यंदा विक्रीत एक नवीच अडचण अनुभवायला मिळाल्याचे सर्वच प्रकाशकांनी नमूद केले.

मुख्य मंडपात राजकीय नेते येणार म्हणून पोलिसांनी दोन्ही बाजूंनी तटबंदी उभारली. या मुख्य मंडपाच्या अगदी समोरच ग्रंथदालन होते; परंतु पोलिसांच्या तटबंदीमुळे कित्येक तास पुस्तकांची खरेदी होऊ शकली नाही. या संमेलनात आम्हाला मिळालेले स्टॉल प्रवेशाच्या अगदी जवळ असल्यामुळे आमच्या पुस्तकांची खरेदी चांगली झाली; पण गेल्या तीन संमेलनांचा अनुभव पाहता वर्धा येथे आणखी विक्री होऊ शकली असती, असे ‘शब्द’ पब्लिकेशनचे येशू पाटील यांनी सांगितले. सलग काही वर्षे साहित्य अकादमी मिळविणाऱ्या शब्द प्रकाशनाच्या ‘उजव्या सोंडेच्या बाहुल्या’, ‘बाळूच्या अवस्थांतरणाची डायरी’ या पुस्तकांची उचल त्यांच्या दालनातून सर्वाधिक झाली. ‘वाचकांना आकर्षित करण्यासाठी अधिकाधिक लोकप्रिय लेखक, त्यांचे परिसंवाद घडवून आणण्याची गरज होती. शहरभर साहित्य संमेलनाची पुरेशी जाहिरात व्हायला हवी होती; परंतु तसे काही झाल्याचे दिसले नाही. नागराज मंजुळे, किशोर कदम आणि अभिनेते सयाजी शिंदे अशी फार तुरळक सेलिब्रेटी इथल्या वाचकांना पुस्तके विकत घेण्यासाठी आवाहन करीत होती.’ अशी माहिती पाटील यांनी दिली. कवी किशोर कदम यांनी संध्याकाळी पुस्तक दालनांच्या बाहेर खुर्च्या आणून   पोटतिडिकीने अभिवाचन करीत पुस्तकखरेदीचे महत्त्व समजावून सांगितले. त्यानंतर कवितांची पुस्तकेही खरेदी झाली. दीड ते पावणेदोन लाख रुपयांची पुस्तके विकली गेल्याचे येशू पाटील यांनी सांगितले.

लोकवाङय़गृह प्रकाशनाचे प्रदीप कोकरे यांनी अपेक्षेपेक्षा ३० ते ४० टक्के इतकीच विक्री झाल्याचे नमूद केले. ‘फ्रॅक्चर फ्रीडम’ या कोबाड गांधींच्या पुस्तकाचा अनुवाद आणि ‘भुरा’ हे शरद बाविस्करांचे खुपविके आत्मकथन यांच्यासाठी संमेलनात वाचक दिसले. दोन्ही पुस्तकांच्या नेलेल्या प्रत्येकी शंभर प्रतींच्या गठ्ठय़ांची दीड दिवसात विक्री झाली. त्यामुळे तातडीने नवे गठ्ठे आणावे लागले; पण इतर पुस्तकांना ३५ ते ५० टक्के सवलत देऊनही वाचकांचा हात कमी लागला. चंद्रकांत खोत यांची पुनप्र्रकाशित कादंबरी ‘दुरेघी’ आणि भुजंग मेश्राम यांच्या ‘ऊलगुलान’ या पुनप्र्रकाशित कविता संग्रहाला बरी मागणी असल्याचे कोकरे यांनी सांगितले. संमेलनात पुस्तकविक्रेत्यांना निवासासह जेवणा-स्वच्छतेच्या अडचणी या कायम बाबी असल्या तरी संमेलनात वाचकांचा जो उत्साहाचा माहोल असतो, तो इथे पूर्णपणे अनुपस्थित असल्याचे कोकरे यांनी सांगितले. त्यांच्या विक्रीचा आकडा १ लाख नव्वद हजारांच्या जवळपास होता.

मेहता पब्लिशिंग हाऊसची या ग्रंथदालनात बहुतांश सर्वाधिक म्हणजे एकाच वर्तुळात तीन ठिकाणी १२ दालने होती. ‘झपुर्झा’, ‘ययाती’, ‘अमृतवेल’, ‘नॉट विदाऊट माय डॉटर’, ‘किटाळ’ ही मेहता पब्लिशिंगची संमेलनातील आणि इतर ठिकाणचीही बेस्ट सेलर पुस्तके. या संमेलनात ‘कास्ट मॅटर’ सूरज येंगडे यांचे पुस्तक बेस्ट सेलरच्या पंगतीत दाखल झाले. याशिवाय जेफ्री आर्चर, सुधा मूर्ती यांच्या पुस्तकांची उचल झाल्याचे मेहताच्या प्रतीक येतावडेकर यांनी सांगितले. आम्ही ज्या अपेक्षेने पुस्तकविक्रीचे नियोजन केले होते, त्या प्रमाणात अपेक्षेच्या निम्म्याइतकीच पुस्तकविक्री झाली. मेहताच्या सर्व दालनांमधून साडेसहा लाख रुपयांची पुस्तके विकली गेली. प्रत्येक संमेलनात हा आकडा किमान १० लाखांच्या वर असतो. आयोजकांकडून मिळणाऱ्या सुविधांच्या दर्जाबाबत आमची कोणतीही तक्रार नाही, मात्र अधिकाधिक वाचक ग्रंथदालनांपर्यंत फिरकावा, त्यांना सहज पुस्तके चाळण्याची इच्छा व्हावी यासाठी पुरेशी मेहनत झाली नसल्याचे मेहता पब्लिशिंगचे अखिल मेहता यांनी सांगितले.

प्रत्येक प्रकाशकाने येथे किमान लाखभराची गुंतवणूक करून पुस्तके आणली. आमच्या तीन दालनांमधून दोन-अडीच लाखांचीच पुस्तकविक्री झाल्याचे रोहन प्रकाशनाचे प्रदीप चंपानेरकर यांनी सांगितले. लोक येत होते, त्यात स्थानिकांहून संमेलनाचे वातावरण अनुभवण्यासाठी नजीकच्या गावांतील आणि मुंबई-पुणे-नाशिक येथील दर्दी वाचकांचा भरणा अधिक होता. आमच्या राजकीय आणि वैचारिक पुस्तकांची सर्वाधिक विक्री झाल्याचे चंपानेरकर यांनी सांगितले. ‘नरसिंहावलोकन’ आणि यशवंतराव चव्हाण यांची पुस्तके, काही कथा-कादंबऱ्यांचे सेट्स सर्वाधिक विकले गेले; पण गेल्या तीन संमेलनांत प्रत्येक प्रकाशनाच्या दालनांत खरेदीसह पुस्तक चाळण्यासाठी जशी झुंबड उडालेली दिसत होती, तशी या वर्षी अजिबातच दिसली नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

राजहंस प्रकाशनाच्या दालनातून यंदा पावणेचार लाख रुपयांची पुस्तकविक्री झाल्याचे डॉ. सदानंद बोरसे यांनी सांगितले. अभय बंग, गिरीश कुबेर यांची सर्व अकथनात्मक पुस्तके विक्रीत आघाडीवर होती. ईशान्य भारताची प्रवास वर्णने पुस्तके आणि पवन नालट यांचा नुकताच युवा साहित्य अकादमी मिळालेला कवितासंग्रह याला वाचकांची सर्वाधिक पसंती होती; पण अपेक्षेपेक्षा या संमेलनात ३० ते ४० टक्के कमी विक्री झाल्याचे बोरसे यांनी मान्य केले.

वर्धा येथील संमेलन आम्हा प्रकाशकांच्या अपेक्षेच्या अगदी उलट घडले. आयोजक जे दोन कोटींची पुस्तके विकल्याचा दावा करीत आहेत तो बरोबर नाही. फार तर कोटीच्या आतच विक्री झाली असावी, असे ‘संस्कृत’ प्रकाशनच्या सुनीताराजे पवार म्हणाल्या. मुळात संमेलनात साहित्यप्रेमींचीच संख्या कमी होती. त्यात पुन्हा ढिसाळ नियोजन आणि पोलिसांच्या अतिरेकाने कहर केला. याशिवाय दालनाचे वर्तुळ मोठे असल्याने ऊन थेट गाळय़ात येत होते. त्याचा परिणाम दिवसा पुस्तकविक्रीवर झाला, असेही त्यांनी सांगितले.

गांधीजींच्या वास्तव्यामुळे वर्धा शहर गेल्या अनेक दशकांपासून हिंदीशी जोडले गेले आहे. राष्ट्रभाषा प्रचार समितीचे कामही याच शहरातून बराच काळ चालले. त्यामुळे या संमेलनाच्या पुस्तक दालनांमध्ये हिंदी वाचकांनाही खूप चांगली पुस्तके होती. हिंदीतील प्रख्यात वाणी प्रकाशनाचे ग्रंथदालन येथे होते. तर ‘पपायरस’सह काही मराठी विक्रेत्यांची उत्तमोत्तम नवी-जुनी हिंदी पुस्तके मराठी ग्रंथांसह ठेवण्यात आली होती.

बहुतांश बडय़ा प्रकाशकांनी आपल्या पुस्तकांवर संमेलनापुरती चाळीस ते पन्नास टक्के इतकी मोठी सूट दिली होती. काही प्रकाशकांनी जुन्या- अभिजात पुस्तके पन्नास टक्के विशेष सवलतीत ठेवली होती. दालनांच्या सजावटीत आणि पुस्तकांच्या मांडणीत अधिकाधिक आकर्षकता यंदा पाहायला मिळाली असली, तरी नवा वाचक जो पुस्तक वाचायला आणि ते खरेदी करायला आसुसला असल्याचे दिसले नाही. शाळा, कॉलेजमधील विद्यार्थाना परिसंवादात उपस्थितीसाठी बळेबळे आणल्याचे चित्र दिसत होते. एका गंभीर विषयावरच्या संवादात या शाळकरी मुलांना पुस्तकांऐवजी पॉपकॉर्नवाल्याचे सर्वाधिक आकर्षण पाहायला मिळाले. पस्तीस ते सत्तर वयोगटातील वाचकांची उपस्थिती दरवर्षीप्रमाणे याही संमेलनात होती; पण स्थानिक आणि विदर्भाच्या पातळीवर प्रतिनिधींकडून संमेलनाची जी हवा तयार व्हायला हवी, ती झाली नाही. याचा परिणाम अमरावती, नागपुरातून अपेक्षित पुस्तकप्रेमी संमेलनात आले नाहीत. गांधीविचारांच्या, चळवळींच्या वर्धा येथे मराठी ललित किंवा ललितेतर साहित्याला पोषक वातावरण नसल्यामुळे तेथील वाचकांनी संमेलनाकडे बऱ्यापैकी पाठ फिरवली. आयोजक जर संमेलनातील साहित्यिक वातावरणाला वृद्धिंगत करण्याऐवजी, ग्रंथविक्रीऐवजी राजकारण्यांच्या सुरक्षेला अधिक प्राधान्य देणार असतील तर वाचक कसा घडणार आणि ग्रंथ या घटकामुळे होणाऱ्या संमेलनाच्या मांडवाचे भविष्य ते काय उरणार, असा प्रश्न यंदा वर्धा येथील संमेलनाने उपस्थित केला आहे. पुस्तकविक्रीच्या आकडय़ांच्या आकर्षकतेत त्याचा विचार पुढील काळात अधिक होणे गरजेचे आहे. त्यातच संमेलनाची यशस्विता मोजता येऊ शकेल.

इतर राज्यांत

केरळ : मल्याळी भाषकांची केरळमधील संख्या आहे साडेतीन कोटी. (आपल्याहून निम्म्यापेक्षा कमी). मात्र तेथे गेल्या दशकभरात तीन साहित्य महोत्सव लोकप्रिय झाले आहेत. त्यातला ‘केरळ लिट फेस्टिव्हल’ सहाव्या वर्षांतच जयपूरच्या आंतरराष्ट्रीय सोहळय़ाइतका महत्त्वाचा बनला असून, गेल्या महिन्यात या सोहळय़ात सात कोटी रुपयांच्या पुस्तकांची विक्री केवळ १२४ दालनांतून झाली. या महोत्सवात २००हून अधिक मल्याळम् आणि आंतरराष्ट्रीय सेलिब्रेटी लेखकांचे परिसंवाद, मुलाखती आणि भाषणे होती. त्यात तरुणांची उपस्थिती ८० टक्के होती. इंग्रजीचा सोस असला, तरी स्थानिक भाषेतील साहित्य वाचण्याची हौस तरुणांतही शिल्लक असल्याचे पुस्तकविक्रीतून स्पष्ट होते. 

तामिळनाडू : गेल्या महिन्यात चेन्नईत झालेल्या पुस्तकमेळय़ात साडेतीनशेहून अधिक पुस्तकांच्या अनुवादाचे करार झाले. इतर भाषांतून तमिळ आणि तमिळमधून इंग्रजी भाषेत पुस्तके अनुवादासाठी आर्थिक निधीची तरतूद करण्यात आली. गेल्या वर्षी या महोत्सवात १२ कोटी रुपयांच्या पुस्तकांची विक्री झाली. यंदाही जवळपास तितकीच विक्री झाली; पण या महोत्सवाचा माहोल जर्मनीतील फ्रँकफर्ट पुस्तक महोत्सवासारखा तयार करण्यात आला होता. त्यासाठी महोत्सवाच्या आयोजकांनी फ्रँकफर्टला जाऊन तेथील आयोजक आणि ३५ आंतरराष्ट्रीय प्रकाशकांशी बोलणी केली. चेन्नईचा पुस्तकमेळा जागतिक बनविण्यासाठी खर्च केला. सरकारी खर्चाने तमिळमधील ३० नवी पुस्तके इतर ३० भाषांत प्रकाशित होणार असून जगातील ३० देशांतील साहित्य तमिळमध्ये आणण्यासाठी निवडण्यात आले. 

कोलकाता : कोलकात्यातील ‘बोईमेल्या’त गेल्या वर्षी ५२ कोटींची पुस्तकविक्री झाली होती. यंदा हा मेळा आज (१२) फेब्रुवारीपर्यंत चालणार असून तिथली यंदाची पुस्तकविक्री विक्रमी असण्याची चिन्हे आहेत. कारण ३० हून अधिक देशांतील प्रकाशकांची इथे उपस्थिती आहे; पण स्थानिक नागरिकांमध्ये पुस्तकखरेदीची चूष सर्वाधिक आहे. 

आसाम : अडीच कोटी लोकसंख्येच्या आसामी वाचकांनी डिसेंबरअखेर ते जानेवारीच्या आरंभीच्या आठवडय़ापर्यंत चाललेल्या पुस्तकमेळय़ात पाच कोटी रुपयांची पुस्तकखरेदी करून दाखविली. यातले बहुतांश ग्रंथ स्थानिक भाषेतीलच होते.

संकलन

पंकज भोसले, शफी पठाण, राखी चव्हाण

lokrang@expressindia.com