scorecardresearch

Premium

कस्तुरीगंध :बहुजनांच्या रंगभूमीचा मार्ग-नकाशा!

तुरुंग’ही वास्तू कुणालाही प्रिय नसते. कुणीही स्वेच्छेने तुरुंगवास पत्करत नाही. मात्र, ज्या राजकीय कार्यकर्त्यांच्या नशिबात तुरुंगवास येतो, त्यापैकी काहींच्या आयुष्यात आलेला तुरुंगवास त्यांच्या आयुष्यालाच मोठी कलाटणी देतो.

कस्तुरीगंध :बहुजनांच्या रंगभूमीचा मार्ग-नकाशा!

प्रा. विजय तापस
‘तुरुंग’ही वास्तू कुणालाही प्रिय नसते. कुणीही स्वेच्छेने तुरुंगवास पत्करत नाही. मात्र, ज्या राजकीय कार्यकर्त्यांच्या नशिबात तुरुंगवास येतो, त्यापैकी काहींच्या आयुष्यात आलेला तुरुंगवास त्यांच्या आयुष्यालाच मोठी कलाटणी देतो. असाच काहीसा प्रकार विसापूरच्या तुरुंगात असलेल्या मेहबूब हुसेन पटेल यांच्याबाबतीत घडला. गिरणी संपात पुढाकार घेतल्याने या गिरणी कामगाराला तुरुंगात जावं लागलं. बार्शीच्या ‘राजण मिल’मध्ये साधा कामगार असलेल्या मेहबूबच्या आचार-विचारांची घडणच विद्रोहाची, अन्यायावर तुटून पडण्याची होती. त्यामुळे मिलमधले राडे हा नेहमीचाच भाग होता. पहिल्यांदा ‘आयटक’शी आणि मग डाव्यांशी घनिष्ठ साथसंगतीचा व्हायचा तोच परिणाम झाला. प्रत्येक लढय़ासाठी सहकारी कामगारांना तयार करणं, त्यासाठी विविध मार्ग शोधत राहणं हाच त्याचा जणू धार्मिक आचार झाला. अशातच त्याच्या आयुष्यात कम्युनिझमचा प्रवेश झाला. त्या जुन्या काळात कम्युनिस्ट असणं म्हणजे देशद्रोही असणं! ‘ज्याचा रशियाशी वैचारिक संबंध आला तो देशद्रोही’ असं मानण्याचा आणि त्यासाठी अशा व्यक्तीला ‘ट्रोल’ करण्याचा तो काळ होता. (आजच्या अस्सल देशभक्तांना तसं वाटण्याचा तिळमात्र संबंध नाही. आता रशिया ‘आपला’ झाला आहे. कालमहिमा अगाध असतो तो असा!) त्यामुळे पोलिसांचा जाच मेहबूबच्या वाटय़ालाही यायला लागला. मग पोलिसांना चुकवत भटकणं आलं. याच काळात केव्हातरी मेहबूब हुसेन पटेलचं त्यांच्या मित्रांनी ‘अमर शेख’ म्हणून नामकरण केलं. हे नामकरण कदाचित पोलिसांना चकवण्यासाठीच बहुधा झालं असेल.
मात्र, महाराष्ट्राशी आणि इथल्या दलितांशी- श्रमिकांशी ‘अमर शेख’ हे नाव त्या दिवशी जे जोडलं गेलं ते कायमचं! आज कामगार चळवळी राहिल्या नसल्या, गिरण्यांची राखरांगोळी झाली असली आणि साम्यवादाचे जळून गेलेले कोळसे झाले असले तरी ‘अमर शेख’ नावाची जादू आजही मिणमिणती का असेना, शिल्लक आहे. या माणसाने ‘लाल बावटा’ गल्लीबोळांतून मिरवत राजरस्त्यावर आणला. ‘नाटक’ म्हणजे शाहिरांच्या हृदयाचा आवाज! ‘पहिला बळी’ हे नाटक हा त्याचा पुरावा! त्यांनी हे नाटक अर्पण केलं ते कम्युनिस्ट विचारवंत आणि नेते कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे यांना. कदाचित याच डांगे यांच्या आकर्षणातून अमर शेख कम्युनिस्ट पक्षाचे ‘कार्ड होल्डर’ झाले असावेत!
‘पहिला बळी’ची नायिका म्हणजे ‘जनामावशी’! ती एकटी नाही, ती समूह आहे. जनामावशी म्हणजे महाराष्ट्रातील कामगार, शेतमजूर, गरीब शेतकरी, गिरणी कामगार, कष्टकरी, दलित, पददलित जनता! ही जनामावशी नागवली, छळली, तुडवली आणि मारलीही जाते ती भांडवलदारांकडून आणि सत्ता-संपत्तीतून मस्तवाल झालेल्या राज्यकर्त्यांकडून. असाच एक मोठा संघर्ष ‘पहिला बळी’ नाटकातून अमर शेख आपण (नाटकाचे प्रेक्षक-वाचक) संवेदनशील आहोत असं मानून आपल्यासमोर आणतात. (खरंच, आपण तसे संवेदनशील असतो का, हा प्रश्नच आहे.) मात्र, संवेदनशीलतेचा, वैचारिकतेचा टेंभा मिरवणाऱ्या वर्गाला या नाटकात एक आव्हानही आहे आणि आवाहनही! ‘जनामावशीच्या रक्ताला चटावलेल्या धनपशूंच्या वर्गाला, त्यांच्या दलालांना, ठेवलेल्यांना तुम्ही-आम्ही कधीच जाब विचारणार नाही का?’ असा खडा सवाल अमर शेखांनी नाटकाच्या प्रस्तावनेत केला आहे तो उगीच नाही. सर्व चळवळींना मूठमाती देऊन त्यांना कबरीत गाडणाऱ्या आजच्या काळात ‘पहिला बळी’ची याद जागवणं म्हणजे खरं तर ७१ वर्षांनंतर राहून गेलेली श्रद्धांजली वाहण्यासारखं आहे.
नाटकाकडे जाण्यापूर्वी एक गोष्ट नमूद करायला हवी. ती म्हणजे १९५१च्या काळातल्या मराठी रंगभूमीच्या ब्राह्मणी, पांढरपेशी, सोज्वळ परंपरेत या नाटकाचा विचार करता येत नाही. कारण तेव्हाचं मुख्य धारेतलं मराठी नाटक त्याच्या आशयाचा विचार करता या नाटकापासून फटकून राहणारं होतं. स्वतंत्र भारतात आणि जगात काय चाललं आहे याचा आवाका कळावा, उमजावा इतकी वैचारिक समजच मराठी नाटकाकडे तेव्हा नव्हती. तेव्हा त्या रंगभूमीच्या संदर्भात या नाटकाचा विचार करता येणार नाही. या विधानाचा अर्थ असा नाही की, मराठी नाटकाला सामाजिक-आर्थिक-राजकीय भान नव्हतं. ते भान असलेल्या तशा नाटकांचा अपवाद करता शेष मराठी नाटक ‘कम्युनिटी ड्रामा’च्या पलीकडे झेपावणारं नव्हतं. म्हणूनच ‘पहिला बळी’चं कोणतंही नातं तत्कालीन मराठी नाटकाशी जोडता येत नाही. या नाटकाची नाळ जोडायचीच झाली तर ती या नाटकानंतर सहा वर्षांनी उदयाला आलेल्या दलित रंगभूमीशी जोडावी लागेल. ‘सर्वहारा वर्गाची रंगभूमी असावी, त्यातून नाटक यावं’ ही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची इच्छा जणू ‘पहिला बळी’ प्रत्यक्षात आणतं आहे असं मानता येईल. याला कारण या नाटकात बहुजन वर्गाचं जीवनदर्शन तर आहेच, पण त्यात राजकारण, समाजकारण आणि ग्रामीण अर्थकारणाचे अनेक धागेही एकवटलेले आहेत. ‘१८९४ चा लँड अॅाक्विझेशन कायदा आणि त्यात होरपळून गेलेला शेतकरी-शेतमजुरांचा वर्ग’ हा विषय अमर शेख यांना मोलाचा वाटला यात नवल नाही. या नाटकाच्या काळात १९५०-५१ मध्ये शेतमजुरांचं दरडोई दैनिक उत्पन्न फक्त २ रुपये १५ पैसे इतकं होतं, यातच वास्तवाची भयावहता लक्षात येऊ शकते. नाटकात कॉंग्रेस सरकारला लक्ष्य केलेलं दिसतं. त्यांनी अस्तित्वात आणलेले दलित, पददलित, कष्टकरी, शेतकरी, शेतमजूर यांच्या भल्याचा डांगोरा पिटत केलेल्या कायद्यांची इथे चिरफाड केलेली आहे. कॉंग्रेस सरकारने जी भांडवलशाही पोसली आणि वाढवली त्याचा सडेतोड, निबर त्वचा सोलून काढणारा, प्रसंगी टोकाचा कडवट असा हिशेब या नाटकातली पात्रं मांडत राहतात. हा हिशेब सर्वार्थाने बिनतोड असल्याचा पुरावा म्हणजे त्या दशकातलं प्रत्यक्ष वास्तव! नाटकात काहीसा प्रचारकी अतिरेक असला तरी तोही तत्कालीन वास्तवाचाच आविष्कार ठरतो.
या नाटकात जनामावशी ही वरकरणी जरी नायिका भासत असली आणि नाटकातल्या महत्त्वाच्या घटना जरी ती स्वत: तिचा तुरुंगात अडकलेला मुलगा चंदा आणि तिची सून ऱ्हाई यांच्या संदर्भात घडत असल्या तरी ती म्हणजे नाटकाचं सारसर्वस्व नाही. तिची जिद्द, लढाऊ वृत्ती, तिला शेती आणि मातीबद्दल असलेलं प्रेम, सत्तालोभी किडय़ांच्या हीन राजकारणाबद्दलची तिची समज आणि सदैव प्रतिकार करायला तिचं तयार असणं हा या नाटकाचा गाभा आहे. तिच्या या साऱ्या चित्तवृत्ती नाटकातली कपटी-कारस्थानी पात्रं वगळता उरलेल्या पात्रांमध्ये संक्रमित होताना दिसतात. सुभाना, अब्दुल, धर्मा, गेना, ऱ्हाई, सावित्री आणि इतर सारीच पात्रं ही जणू एकमेकांचे ध्वनी-प्रतिध्वनी आहेत. (यात धर्म आणि जात या संदर्भाना वावच नाही.) सारेच शेतमजूर वा शेतकरी. सगळेच आर्थिक हलाखी भोगणारे, नागवले जाणारे शोषित. सगळ्यांचं दु:ख आणि यातना समान. सगळीच बळी जाणारी माणसं. उद्या सुपातून जात्यात जाणं अटळ असणारी. स्वातंत्र्यानंतर उदयाला आलेल्या आणि अल्पावधीतच राक्षस झालेल्या भांडवलशाहीचा उल्लेख दुसऱ्या अंकात धर्मा शेतकरी ‘नवी मरीआई’ असा करतो. तिला भावना, विचार कळत नाहीत. तिला फक्त जमीन दिसते. दृष्टीच्या टप्प्यात आलेली जमीन गिळंकृत करणं हाच तिचा ध्यास आहे. त्यासाठी कितीही माणसं मातीला मिळाली वा भुकेकंगाल झाली तरी या मरीआईला फरक पडत नाही. नाटकाच्या तीन अंकांत कथानक साधारणपणे ‘आहे रे आणि नाही रे’ वर्ग किंवा शोषक-शोषित यांच्यातील संघर्ष टप्प्याटप्प्याने विकसित करणारं आहे. नाटकाचा प्रारंभ जनामावशी आणि तिची सून ऱ्हाई यांचं घर फोडून त्यांच्यावर हल्ला करणाऱ्या प्रसंगाने होतो आणि नाटकाच्या अखेरीस गावगुंडांच्या आणि त्यांनाच फितूर असणाऱ्या पोलिसांच्या हल्ल्यात जनामावशी रक्ताच्या थारोळ्यात पडून तिचा मृत्यू होतो- इथे नाटकाचा शेवट होतो. एका बाजूला अल्पभूधारक शेतकरी, भूमिहीन शेतकरी, शेतमजूर असलेली पात्रं आणि दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांच्या जमिनी लाटणारे साखर कारखानदार आणि त्यांनाच सहाय्य करणारी सरकारी यंत्रणा यांचा तीव्र संघर्ष हेच या नाटकाचं सूत्र आहे. जमिनी आणि माणसं यांचा अन्याय्य सौदा करणाऱ्या गिधाडांचं हे नाटक आहे यात शंका नाही. नाटकात सरळसरळ दोन गट अस्तित्वात आहेत. इथे सातत्याने संघर्षमयता अनुभवायला येते. व्यक्ती आणि समष्टी यांचा कुटुंब ओलांडून जाणारा एक अप्रतिम भावबंध, नातेसंबंध नाटकातल्या सर्वच प्रसंगांतून अनुभवता येतो. मला या नाटकाचं एक वैशिष्टय़ सुखावतं, ते आहे कथानकाच्या प्रवाहात तळपून उठणाऱ्या स्त्रीप्रतिमा हे. रांगडेपणा, हिंमत, कष्टातून आलेली शहाणीव आणि सरकारी यंत्रणेच्या फौजेशी लढताना या स्त्रिया दाखवत असलेलं धाडस ही या नाटकाची जमेची बाजू आहे. नाटकाची संवादभाषा इतकी थेट, नितळ आणि अनलंकृत आहे की आपण आजही त्या भाषेच्या प्रेमात पडावं! या भाषेचा ग्रामीण ढंग, तिची अकृत्रिम वाकवळणं आणि तिचं मातीशी असलेलं थेट नातं फारच लोभावणारं आहे. महाराष्ट्रातल्या शेतकरी- शेतमजुरांचं जीवन आणि आक्रंदन स्वातंत्र्यानंतरच्या पहिल्या दशकातच अत्यंत वास्तव शैलीत ‘पहिला बळी’मधून साकारलं गेलं, हेच या नाटकाचं खरंखुरं, अधोरेखित व्हावं असं यश आहे हे निर्विवाद! या नाटकातले संवाद आणि पात्रांचा एकमेकांशी असणारा संबंध खरोखरच अकृत्रिम आहे. वयाच्या अवघ्या ५३ व्या वर्षी जरी अमर शेख गेले असले तरी त्यांनी ‘पहिला बळी’च्या रूपाने बहुजन रंगभूमीच्या प्रवासाचा मार्ग-नकाशा १९५१ मध्येच प्रकाशित केला असं नक्कीच म्हणता येईल.
vijaytapas@gmail.com

vinoba bhave
गांधीजींच्या सहवासाचा अनुभव
women, men, house, home loan
गृहकर्ज घेणं पुरुषांपेक्षा महिलांसाठी अधिक सोपं!
lost to the world
अतिरेक्यांच्या ताब्यातील पाच भीषण वर्षे..
Palghar, palghar news, Senior legal expert, advocate, GD Tiwari, passed away
पालघर : ज्येष्ठ विधी तज्ञ एड.जीडी तिवारी यांचे निधन

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व लोकरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Communism kasturigandh bahujan theater route map prisonpolitical activists mill amy

First published on: 17-04-2022 at 00:06 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×