scorecardresearch

पर्यावरणाचा विवेक!

विजेवर चालणारी वाहने, सौर आणि पवनऊर्जा तसेच इथेनॉलचा वापर हे पर्याय प्रदूषणकारी नाहीत, हा एक भ्रामक समज आहे.

गिरीश कुबेर
विजेवर चालणारी वाहने, सौर आणि पवनऊर्जा तसेच इथेनॉलचा वापर हे पर्याय प्रदूषणकारी नाहीत, हा एक भ्रामक समज आहे. मुळात या विविध ऊर्जाच्या निर्मितीप्रक्रियेतच या ना त्या प्रकारे पर्यावरणीय हानी होत असते. पण त्याकडे सोयीस्कर काणाडोळा केला जातो, किंवा ही बाब लक्षातच घेतली जात नाही. याचा अर्थ अशी ऊर्जानिर्मिती अयोग्य असं म्हणता येत नसलं तरी यासंदर्भात सारासार ‘साक्षरता’ लोकांमध्ये निर्माण करणं गरजेचं आहे.
आपल्याला समाज म्हणून सरळ, एका वेगात चालताच येत नाही की काय, काही कळत नाही. बहुधा ते येत नसावंच. त्यामुळे मग सतत लाटांवर स्वार होत आपला प्रवास. या लाटा कधी दूध पिणाऱ्या गणपतीच्या असतात, कोणा कथित समाजसेवकाच्या असतात, नेत्याच्या असतात किंवा आणखी कोणाच्या तरी! जगण्याची शैलीही मग या लाटांवर ठरते. मग अचानक कधी ‘मुसेली’ हा अगम्य पदार्थ आरोग्यदायी म्हणत खाण्याची लाट, तर कधी दुधी भोपळा किंवा कशाकशाचे भयानक रस प्यायची लाट! कधी गावागावात भल्या सकाळी आरोग्यासाठी तृतीयपंथींची ओळख असलेल्या टाळ्या पिटणाऱ्यांची लाट, तर कधी केस काळे राहावेत म्हणून दोन्ही हातांच्या बोटांची नखं एकमेकांवर घासणाऱ्यांची लाट! कशालाही कोणाचंही काहीही प्रमाण नाही. तरीही या लाटांत वाहत जाणाऱ्यांची आपल्याकडे काही कमी नाही.
आताची ताजी लाट आहे पर्यावरण वाचवण्यासाठी विजेवर चालणाऱ्या वाहनांची, वाया जाणाऱ्या उन्हाची साक्ष काढत सौरऊर्जेच्या आणाभाका घेण्याची आणि साखर कारखान्यांतून तयार होणाऱ्या आणि वाया जाणाऱ्या (?) इथेनॉलचे दाखले देत आपण वाहनांसाठी इथेनॉल वापरणं कसं अत्यावश्यक आहे असं सांगणाऱ्यांची.. हे सगळं ऐकून माना डोलावणारे अगणित असल्याने बघता बघता त्या, त्या विषयांच्या लाटा सर्वदूर पसरतात आणि सगळा समाजचा समाज त्यात वाहत जातो. जणू काही यातला एकेक उपाय म्हणजे ऊर्जा समस्येवरचं अंतिम उत्तरच! ते आपल्याकडे प्रत्येकालाच गवसलेलं असतं. मग ‘हितसंबंधियां’च्या कारस्थानांमुळे हे सोपे उपाय कसे योजले जात नाहीत आणि मग आपला देश कसा मागास राहतो- याच्या कहाण्या पाठोपाठ आल्याच. यातील विजेवर चालणारी वाहनं, सौरऊर्जा आणि इथेनॉल या तीन लाटांवरचं निर्बुद्धतेचं शेवाळ दूर करून मुद्दय़ांना प्रवाही करण्याचा हा प्रयत्न..
प्रथम वीज आणि विजेऱ्या- म्हणजे बॅटऱ्या- याबाबत. या मुद्दय़ाची चर्चा करण्याआधी एक सत्य लक्षात घेणं आवश्यक. ते म्हणजे या विजेऱ्यांतून वीज निर्माण होत नाही, तर ती फक्त साठवली जाते. अलीकडे या विजेऱ्या म्हणजे सर्व वीज समस्यांवर उपाय असल्याचं अनेकांना वाटू लागलं आहे, म्हणून हा खुलासा. हे असं वाटून घेणं म्हणजे अन्नधान्य समस्येवर गोदामं हा उपाय आहे असं मानणं. गोदामांत धान्य तयार होत नाही, तिथे फक्त ते साठवता येतं. त्याचप्रमाणे विजेऱ्यांचंही. त्या फक्त वीज- तीही काही काळ- साठवू शकतात.
म्हणजे वीज अन्यत्र कुठेतरी, कशावर तरी तयार करायची आणि विजेऱ्यांत साठवायची. यात का साठवायची? तर विजेवर चालणाऱ्या मोटारींची संख्या वाढून प्रदूषण कमी होईल म्हणून. हा विचार उत्तम. पण तो कृतीत आणायचा तर आपली पंचाईत ही, की आपल्याकडे ७० टक्के वीज कोळसा जाळून तयार केली जाते.. म्हणजे औष्णिक वीज. ही वीज अत्यंत प्रदूषणकारी असते. कारण जळणाऱ्या कोळशामुळे खूप प्रदूषण होतं आणि अशा वीज प्रकल्पांच्या परिसरात राहणाऱ्यांच्या आरोग्यावरही त्याचा परिणाम होतो. कसा, ते समजून घेण्यासाठी इच्छुकांनी विदर्भात चंद्रपूर आदी परिसरांस अवश्य भेट देण्याचे करावे! तेही या विद्यमान उन्हाळ्यात. याचा अर्थ असा की, मोटारीतनं बाहेर पडणाऱ्या धुराचं प्रदूषण टाळण्यासाठी विजेवर चालणाऱ्या मोटारी वापरायच्या आणि त्यासाठी लागणारी वीज कोळसा जाळून तयार करायची. हा झाला एक मुद्दा.
दुसरं असं की, या विजेऱ्या दोन प्रकारच्या असतात. एकदाच वापरायच्या, संपल्या की फेकून द्यायच्या. आणि दुसऱ्या असतात त्या पुन्हा त्यात वीज भरता येते अशा. विजेऱ्या कोणत्याही असोत; त्या वापरा किंवा वापरू नका, त्यातून वीज सतत पाझरत असते. म्हणजे विजेऱ्यांची क्षमता कमी कमी होत असते. पहिल्या प्रकारातल्या विजेऱ्या जास्त काळ वापराविना पडून राहिल्या तर हवेशी संयोग होऊन त्यांना ‘पाणी सुटतं’ आणि आतील रसायनं व धातू यांचा संयोग होत हे सगळं प्रकरण ‘विषारी’ व्हायला लागतं. पर्यावरणासाठी अत्यंत धोकादायक घटकांतील हा एक. ज्या दुसऱ्या प्रकारच्या विजेऱ्या असतात त्यात नेहमीच्यापेक्षा दोन घटक अधिक असतात. एक म्हणजे कोबाल्ट आणि दुसरं लीथियम. कोबाल्टमुळे त्या बॅटरीला स्थैर्य येतं आणि लीथियम पुन्हा पुन्हा वापरता येतं. ही दोन्ही दुर्मीळ खनिजं म्हणून ओळखली जातात.
यातलं कोबाल्ट अनेक देशांत मिळत असलं तरी ते प्राधान्याने आढळतं कांगोच्या खोऱ्यात. जगातल्या एकूण कोबाल्ट उत्पादनापैकी साधारण ७० टक्के कोबाल्ट हे कांगोच्या सर्वार्थानं अत्यंत दरिद्री खोऱ्यातनं आलेलं असतं. सर्वार्थानं याचा अर्थ कोणत्याही नीतिनियमांचा काहीही आदर न करणारा हा प्रदेश. त्या देशातला प्रत्येक दरिद्री पोटाची खळगी भरण्यासाठी कोबाल्ट उकरण्याचं काम करतो. हे कोबाल्ट जमिनीतून खणण्यासाठी दोन- दोन चौरस फुटांचे खड्डे करून लहान मुलं आत सोडली जातात. कोणतीही आयुधं नाहीत, मदतीला कोणी नाही. आणि आणीबाणीची परिस्थिती निर्माण झालीच तर जीव त्यागण्याखेरीज पर्याय नाही अशा वातावरणात हे कोबाल्ट जमिनीतून काढलं जातं. या उद्योगात किती अश्रापांचे प्राण जातात याचा हिशेबच नाही. मागास आणि दरिद्रींच्या जिवाची तशी पर्वा नसतेच कोणाला. त्यात हे कांगो खोरं! कसला हिशेब नाही की काही नाही. हे सारं प्रकरण इतकं भयंकर आहे की या कोबाल्टचा उल्लेख ‘ब्लड कोबाल्ट’ असाच केला जातो. विजेवर चालणाऱ्या मोटारींत ज्या बॅटऱ्या वापरल्या जातात त्यात साधारण चार ते सात किलोपर्यंत कोबाल्ट असतं. जवळपास १५०० कोटी डॉलर्सची ही कोबाल्टची जागतिक बाजारपेठ आहे. पण हे कांगोचं खोरं मात्र भिकेला लागलेल्यांनी भरलेलं आहे. जगातल्या अनेक भारदस्त वर्तमानपत्रांनी हे कोबाल्टचं रक्तरंजित वास्तव समोर आणलं आहे. टेस्ला ते अन्य बडय़ा मोटार कंपन्या हे सारे यातले ‘गुन्हेगार’ असं तिथल्या स्थानिकांचं म्हणणं आहे. गेल्या काही वर्षांत या कोबाल्टच्या मागणीत प्रचंड वाढ होऊ लागली आहे. कारण अर्थातच विजेवर चालणाऱ्या मोटारी! सध्या जगभरात मोजकीच असलेली विजेवर चालणाऱ्या वाहनांची संख्या पुढील पाच-सहा वर्षांत दहापट वाढेल असा अंदाज आहे. म्हणजे कोबाल्टची मागणी वाढणार.. आणि ते काढताना मरणाऱ्यांची संख्याही वाढणार.
आणि हे सारं पर्यावरण रक्षणासाठी! परत महत्त्वाचा मुद्दा असा की, यातल्या बॅटऱ्यांची निर्मिती प्राधान्याने झालेली आहे ती पाश्चात्त्य देशांतील हवामान लक्षात घेऊन. त्यामुळे आपल्याकडे या बॅटऱ्या पेटू लागल्यात. गेल्या काही आठवडय़ांत असे अनेक अपघात आपल्याकडे घडले. त्यामुळे विजेवर चालणाऱ्या किती मोटारी माघारी बोलवायला लागल्या याच्या बातम्या आहेतच.
दुसरी लाट सौरऊर्जेबाबतची. चांगलंच आहे तसं हे ‘वाया’ जाणारं ऊन पकडून त्यातून वीज तयार करणं! पण जितकी दाखवली जाते तितकी ही वीज पर्यावरणस्नेही असते का, हा खरा प्रश्न. त्याचं उत्तर थेट देण्याआधी मध्य प्रदेशातल्या रेवा प्रांतात काय घडलं याचा धांडोळा घ्यावा लागेल. इथं साधारण चार हजार एकरांत सौरशेत पसरलंय. नजर जाईल तिथपर्यंत सौरऊर्जेचे ते तेज:पुंज सपाट पत्रे. इथं तयार होणाऱ्या विजेवर दिल्लीतली मेट्रो धावते. हा प्रकल्प जेव्हा उभा राहणार होता तेव्हा सांगितलं गेलं की, इथे दोन हजारांहून अधिकांसाठी थेट रोजगार तयार होतील. अप्रत्यक्ष रोजगार तर यापेक्षा कितीतरी अधिक असणार होते. आज त्यात साडेचारशेही कामगार असतील-नसतील. ‘स्क्रोल’च्या प्रतिनिधीनं या जागेला भेट देऊन अलीकडेच एक विस्तृत वृत्तांत सादर केला. या प्रकल्पात साठेक कामगार नेमण्यात आलेत. त्यांचं काम काय?
..तर रोज संध्याकाळी सूर्य मावळला की या सर्व सौरपट्टय़ांना पाण्यानं अंघोळ घालायची. एक पट्टा धुण्याचे रोजचे फक्त ३० रु.! एक मजूर सरासरी २० पट्टे दररोज धुऊ शकतो. पण मुद्दा हा, की हे पट्टे मुळात धुवायचेच कशासाठी?
सौरऊर्जेची खरी काळजी आणि मर्यादा या प्रश्नाच्या उत्तरात आहे. आपल्या देशातलं वातावरण असं आहे की या सौरपट्टय़ांवर सारखी धूळ बसते. त्यामुळे त्यांची वीजनिर्मिती क्षमता घटते. मुळात सौरऊर्जा अन्य वीज प्रकल्पांसारखी सांगितली जाते तितकी वीज निर्माण करू शकत नाही. तांत्रिक भाषेत ज्याला ‘प्लांट लोड फॅक्टर’ म्हणतात तो सौरऊर्जेचा नेहमीच कमी असतो. त्यात हे धुळीचं संकट! म्हणजे ही पर्यावरणस्नेही ऊर्जा मिळवण्यासाठी पाण्याचा अपव्यय करायचा! शिवाय आयुष्य संपलेल्या सौरपट्टय़ांचं करायचं काय याचंही उत्तर जगात कोणाकडे नाही. या पट्टय़ा जणू अमर असतात- प्लॅस्टिकसारख्या. म्हणजे परत पर्यावरणाला धोका आहेच.
या सौरऊर्जेबाबत कितीही गलेलठ्ठ दावे केले जात असले तरी याबाबतची आकडेवारीही एकदा तपासायला हवी. गेल्या एका वर्षांत आपण १० गिगावॅट सौरऊर्जा क्षमता वाढवली, हे खरंय. आता आपल्या देशात ५० गिगावॅट वीज सूर्यापासून मिळते. ही कामगिरी कौतुकास्पदच. पण या ५० गिगावॅटमधली ४२ गिगावॅट ही फक्त जमिनीवरच्या प्रचंड अशा सौरशेतीतून मिळते. पण इमारतींवरच्या वगैरे सौरपट्टय़ांतून मिळणारी वीज फक्त ६.४८ गिगावॅट इतकीच आहे. यंदाच्या- म्हणजे २०२२ पर्यंत अशा छतावरच्या सौरपट्टय़ांतून वीजनिर्मितीचं लक्ष्य होतं ४० गिगावॅट. त्या तुलनेत आपली छतावरची वीजनिर्मिती आहे फक्त ६.४८ गिगावॅट इतकी. या छतावरच्या सौरऊर्जेची महती आणि कौतुक अशासाठी, की सौरऊर्जा ‘जिथे वापरायची तिथे’ तयार करता यायला हवी. ही सोय फक्त सौरऊर्जेत आहे. म्हणजे मोठय़ा पारंपरिक वीजनिर्मिती प्रकल्पांप्रमाणे वीजनिर्मिती एकीकडे आणि ग्राहक दुसरीकडे असं असता नये. पण आपल्याकडे तसंच आहे. सरकारी धोरणांमुळे लहान लहान सौरऊर्जा केंद्रं अजूनही विकसित होऊ शकलेली नाहीत. ही धोरणात्मक कारणं जशी आर्थिक आहेत, तशी तांत्रिकही आहेत. तांत्रिक म्हणजे स्थानिक पातळीवरच्या वीज वितरण जाळ्यांत या लहान सौरऊर्जा केंद्रांना सामावून घ्यायची व्यवस्थाच आपल्याकडे नाही. आणि रेवासारख्या भव्य सौरप्रकल्पांतून वीजवहन हे पारंपरिक वीज प्रकल्पांप्रमाणेच जिकिरीचं अणि बरीच वीज वाया घालवणारं असतं. आणि घराच्या छतावरच्या असोत वा दारच्या प्रकल्पाच्या- या सौरपट्टय़ा धुणं हे वेगळंच संकट आणि डोकेदुखी!
तिसरं अलीकडचं कौतुक म्हणजे इथेनॉल. अनेकांचा असा समज आहे की साखर कारखान्यात आडपैदास म्हणून तयार होणारं इथेनॉल घ्यायचं आणि मिसळायचं पेट्रोल-डिझेलमध्ये! आहे काय नि नाही काय! पण वास्तव अर्थातच तसं नाही. ते काय आहे हे लक्षात घ्यायला हवं!
साखरनिर्मितीच्या वाटेवर तयार होणारा द्रव म्हणजे हे इथेनॉल. ते सर्व पिष्टमय पदार्थापासून- म्हणजे बटाटे, रताळं, मका इत्यादी- तयार करता येत असलं तरी हे प्रकार तितके ग्राहकस्नेही नाहीत. आपल्याकडे इथेनॉल प्राधान्याने तयार होतं ते साखर कारखान्यांतच. या प्रक्रियेत पहिल्या ‘धारे’चं जे इथेनॉल मिळतं ते जेमतेम ८ ते १२ टक्के इतकंच असतं. म्हणजे शंभर लीटर मळीतनं इतकंच इथेनॉल हाताशी लागतं. पण तितकं काही पुरणार नसतं. म्हणून हे संहत इथेनॉल पुन्हा पाणी घालून पातळ केलं जातं. पुन्हा ते उकळायचं. या अशा उकळण्याचा एक टप्पा असा येतो की त्याची तीव्रता ९८ टक्क्यांपर्यत वाढते. या अवस्थेला म्हणतात ‘अझिओट्रॉपिक’! म्हणजे या अवस्थेत कितीही पाणी घातलं तरी इथेनॉलची तीव्रता ९८ टक्क्यांपेक्षा कमी होत नाही. पण ही अवस्था येण्यासाठी मूळच्या संयुगातनं जवळपास सर्व पाणी काढावं लागतं. आधी ते घालायचं आणि नंतर ते काढायचं म्हणजे उकळणं आलंच. ती वाफ जमा करून त्यातनं पुन्हा काही प्रमाणात इंधननिर्मिती करता येते. पण म्हणजे पुन्हा ते सर्व तापवणं आलं.
याचा अर्थ १२ टक्क्यांवर मिळणाऱ्या इथेनॉलला ९८ टक्क्यांवर न्यायचं तर पाणी आणि उष्णता दोन्ही प्रचंड हवी. ती का खर्च करायची? तर पेट्रोल आणि डिझेल यांना पर्यावरणस्नेही बनवण्यासाठी त्यात इथेनॉल मिसळता यावं म्हणून. म्हणजे पर्यावरणीय खर्च किती करायचा आणि तो किती ‘सोसायचा’ (सस्टेन) याचाही विचार करायला हवा.
याचा अर्थ या सगळ्यांची काहीच उपयुक्तता नाही आणि हे सर्व थोतांड आहे असं अजिबातच नाही. ऊर्जा मिळेल त्या मार्गाने मिळवायला हवी. भान बाळगायचं ते इतकंच, की ती मिळवण्याचा एकही मार्ग असा नाही की ज्याचे काही म्हणजे काहीही दुष्परिणाम नाहीत. दुष्परिणामांशिवाय परिणाम विज्ञानात संभवत नाहीत. तेव्हा सौरऊर्जा, विजेवर चालणारी वाहनं, इथेनॉल वगैरे सर्व काही संपूर्ण पर्यावरणस्नेही असतं हा भ्रम आहे. इतकंच काय, पवनऊर्जेसाठी वापरल्या जाणाऱ्या अजस्र पात्यांतील घटकांचे पर्यावरणीय दुष्परिणाम हादेखील अभ्यासकांमध्ये चिंतेचा विषय आहे. या पवनचक्क्या उभारण्यासाठी लागणारं पोलाद, सिमेंट, अन्य धातू वगैरेंचे मुद्दे आहेतच. हे सर्व ऊर्जास्रोत पेट्रोल-डिझेल आदींपेक्षा नक्कीच पर्यावरणस्नेही आहेत. त्यांचा वापर वाढायलाच हवा. पण म्हणून त्यांचे काहीच दुष्परिणाम नाहीत आणि त्याचं सर्व काही चांगलंच असं मानणं हा दूधखुळेपणा!
तो सुखाने पर्यावरणवादी म्हणवून घेणाऱ्यांना करू द्यावा! इतरांनी आपला विवेक गहाण टाकायचं काही कारण नाही, इतकंच! लाटा टाळून विचार करण्याची सुरुवात कधीतरी करायला हवी!
girish.kuber@expressindia.com
twitter:@girishkuber

मराठीतील सर्व लोकरंग ( Lokrang ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Conscience environment vehicles electricity solar wind power ethanol polluting power generation amy

ताज्या बातम्या