शांता गोखले यांना लक्ष्मीबाई टिळकांच्या ‘स्मृतिचित्रे’ या आत्मकथनाच्या केलेल्या इंग्रजी अनुवादासाठी यंदाचा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यानिमित्ताने..
ललित व नाटय़लेखन, कलासमीक्षा, कलेतिहासाचं लेखन, चित्रपट पटकथा, अनुवाद अशा विविध माध्यमांतून सतत स्वैर संचार करणाऱ्या शांता गोखले यांना नुकताच लक्ष्मीबाई टिळकांच्या ‘स्मृतिचित्रे’ या आत्मकथनाच्या त्यांनी केलेल्या इंग्रजी अनुवादासाठी साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे. मराठीतील चिं. त्र्यं. खानोलकर, विजय तेंडुलकर, गो. पु. देशपांडे, महेश एलकुंचवार, सतीश आळेकर यांची नाटकं त्यांनी अनुवादित केली आहेत. तसंच दुर्गा खोटेंचं आत्मकथनही त्यांनी भाषांतरित केलं आहे. नाटककारांना केंद्रस्थानी ठेवून मराठी रंगभूमीची १८४३ ते आजवरची वाटचाल यावर त्यांनी समीक्षात्मक पुस्तक लिहिलं आहे. त्याचप्रमाणे छबिलदास नाटय़चळवळीवरील पुस्तकही त्यांनी संपादित केलेलं आहे. ‘रिटा वेलिणकर’ आणि ‘त्या वर्षी’ या कादंबऱ्या त्यांच्या खाती जमा आहेत; ज्या पुढे इंग्रजीतही प्रसिद्ध झाल्या. अनेक चित्रपट व अनुबोधपटांचं लेखन त्यांनी केलेलं आहे. नाटय़विषयक समग्र लेखनासाठी त्यांना यापूर्वी संगीत नाटक अकादमी पुरस्कार मिळाला आहे. त्यात आता साहित्य अकादमी पुरस्काराचीही भर पडली आहे. यानिमित्ताने त्यांच्याशी केलेला हा संवाद..
तुम्हाला लक्ष्मीबाई टिळकांच्या ‘स्मृतिचित्रे’चा मुळात अनुवाद करावासा का वाटला? कारण आजच्या पिढीला त्या माहीत असण्याची किंवा त्यांच्याबद्दल फार आस्था असण्याची शक्यता नाही..
– ‘स्मृतिचित्रे’चा अनुवाद का करावासा वाटला, याचं प्रथम उत्तर देते. ज्या साहित्यावर अनेकांनी भाष्य केलं आहे, प्रेम केलं आहे, ज्याला साहित्यिक जगात मानाचं स्थान आहे आणि जे प्रकाशकांनादेखील जिवंत ठेवावंसं वाटलं आहे असं साहित्य मराठी वाचक वर्तुळाच्या पलीकडच्या वाचकांनी वाचावं, ही या अनुवादामागची प्रेरणा होती. मी ‘स्मृतिचित्रे’च्या अनुवादासाठी १९९६ साली प्रकाशित झालेली ‘तिसरी सुधारित अभिनव आवृत्ती’ वापरली. लक्ष्मीबाई टिळकांचं हे लेखन आजही जिवंत आहे याची अधिक ग्वाही देण्याची आवश्यकता नाही. पण अनुवाद करण्यामागे आणखी एक प्रेरणा होती, जी तितकीच महत्त्वाची होती. या आत्मचरित्रावर माझं अतोनात प्रेम आहे. एवढंच नव्हे तर त्याचा माझ्या लेखनावर खोल परिणाम झाला आहे.
तुमच्या प्रश्नाला जोडून एक विधान आहे, त्याविषयी माझा दृष्टिकोन वेगळा आहे. आपण सहज म्हणून जातो की आजच्या पिढीला अशा साहित्याविषयी आस्था असण्याची शक्यता नाही. पण ही आजची पिढी कोण? ती कुठे राहते? खरं सांगायचं तर माझ्या पिढीतल्या अनेक मैत्रिणींनीसुद्धा ‘स्मृतिचित्रे’ वाचलेलं नाही. आमच्या ३५ मुलामुलींच्या वर्गात एका हाताच्या बोटांवर मोजता येतील इतकीच मुलं सकस साहित्य वाचत होती. दुसरी गोष्ट अशी की टिकाऊ साहित्य कोणत्याच एका पिढीच्या वाचकांवर अवलंबून नसतं. तिसरी गोष्ट अनुवादाचं प्रयोजनच असतं की आपली भाषा जे वाचक वाचू शकत नाहीत त्यांनी आपलं साहित्य वाचावं, ही इच्छा. तेव्हा अनुवाद करताना आपल्याकडील वाचकांच्या कोणत्याही पिढीचा विचार करणं गैरलागू ठरतं.
‘स्मृतिचित्रे’ इंग्रजीत अनुवादित करताना त्या काळाचे संदर्भ इंग्रजी भाषिकांना कळावेत म्हणून कोणती खबरदारी घ्यावी लागली?
– एखादा वाचक जेव्हा परसंस्कृतीतलं अनुवादित साहित्य वाचतो तेव्हा ते केवळ उत्तम लेखन आहे म्हणून तो वाचत नसतो. त्याला वेगळ्या संस्कृतीचा, काळाचा परिचय करून घ्यायचा असतो. हा वेगळेपणा पचवण्यासाठी मनाची जी लवचीकता लागते ती त्याच्यापाशी असते. आपण सर्वानीच इतर भाषांमधून अनुवादित केलेलं साहित्य वाचलेलं आहे. त्या वाचनातून आपल्याला परिचित जगाबाहेरच्या जगांची ओळख झाली आहे. ती आपल्याला मौल्यवान वाटली आहे. तसं व्हावं यासाठी अनुवादकाला विशेष खबरदारी घ्यावी लागत नाही. त्याच्याकडे दोन्हीही भाषांची आणि त्यात गोवलेल्या संस्कृतींची आतून जाण असेल, हे आपण गृहीत धरलं तर मूळ मजकुराशी निष्ठा ठेवणं एवढीच खबरदारी त्याला घ्यावी लागते. लेखिका काय म्हणते आहे, तिच्या लेखनाचा सूर काय आहे, त्यात ती कोणत्या प्रकारचे अलंकार वापरते आहे, तिला एकूण कोणता परिणाम साधायचा आहे हे अनुवादकाने जाणून घेतलं की अनुवाद पारदर्शी होतो. त्यातून वाचकाला लेखिका स्पष्टपणे दिसते, तिचा काळ दिसतो आणि तिची संस्कृतीही कळते. अनुवादाच्या प्रक्रियेत लहानसहान शाब्दिक अडचणी येतच राहतात. ‘स्मृतिचित्रे’च्या बाबतीत पटकन् आठवते ती अडचण म्हणजे ‘लोळण फुगडी’चं भाषांतर काय करायचं, हा प्रश्न मला पडला होता! याचं इंग्रजीत थेट भाषांतर करणं अशक्य होतं. कारण त्या संस्कृतीत हा बायकांचा खेळ खेळला जात नाही. वस्तू नाही म्हणजे शब्द नाही. इथे बाईचं पोट दुखत आहे, त्या वेदनेनं ती शरीराचं मुटकुळं करून जमिनीवर तडफडते आहे आणि त्याचं वर्णन ती ‘माझी लोळण फुगडी’ असं करीत आहे. या प्रतिमेतला विनोद परभाषेत अनुवाद करताना हातून निसटणार हे उघड होतं. तरी त्यातला किमान विरोधाभास तरी साधायचा असं ठरवून मी अनुवाद केला. कधी कधी अनुवादात इतपतच करणं शक्य असतं.
प्रकाशन संस्थेने कमिशन्ड रायटिंग म्हणून तुमच्याकडून हे पुस्तक लिहून घेतलं का? तसं नसेल तर प्रकाशकांचा हे शंभरेक वर्षांपूर्वीचं आत्मकथन इंग्रजीत प्रसिद्ध करण्यामागचा हेतू काय?
– प्रकाशकाच्या मागणीवरून मी हा अनुवाद केलेला नाही. मला तो पहिल्यापासून करायचा होता. मी प्रकाशकाला पुस्तकाची साधारण कल्पना दिली. अनुवाद प्रकाशित करण्यात त्याला रस आहे असं त्याने मोघम कळवलं. मी अनुवाद केला. प्रकाशकाला तो आवडला. बस्स! पूर्वीच्या मानाने हल्ली अनुवादाला महत्त्व आलं आहे. अनुवादाचा खप कमी प्रमाणात होत असला तरी आपल्या यादीत अनुवादित साहित्य असणं हे आपल्या प्रतिमेच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे असं आजचे प्रकाशक मानतात. याचबरोबर आणखी एक गोष्ट झाली आहे. अनुवाद हा अभ्यासण्याचा विषय म्हणून विद्यापीठांत प्रस्थापित झाला आहे. तसेच िलगभाव अभ्यास केंद्रेदेखील विद्यापीठांमध्ये निर्माण झाली आहेत. या दोन्ही अभ्यासक्रमांत ‘स्मृतिचित्रे’ बसते. प्रकाशकाला याचा दिलासा नक्कीच वाटला असेल. ‘स्मृतिचित्रे’ प्रसिद्ध झाल्यानंतर लगेचच त्यातील काही तपशिलांबाबत पीएच. डी. करीत असलेल्या एका स्कॉटिश अभ्यासकर्तीने मला ईमेलद्वारा दोन-तीन प्रश्न विचारले होते.
अनुवादासाठी पुस्तक निवडताना काय निकष असतात तुमचे? किती काळात हे लेखन झालं? कोणत्या अडचणी आल्या? भाषिक, संदर्भाच्या? अन्य?
– पहिला निकष : सदर लेखनावर माझं मनापासून प्रेम असलं पाहिजे. त्याची साहित्यिक मूल्यं उच्च दर्जाची असली पाहिजेत. ते सामाजिक आणि राजकीयदृष्टय़ा मला पटलं पाहिजे. सरतेशेवटी त्याची रचना आणि/ किंवा भाषा माझ्यातील अनुवादकाला जर आव्हान देत असेल तर दुधात साखर पडली असं मी समजते.
‘स्मृतिचित्रे’च्या अनुवादाचं लेखन, पुनर्लेखन, पुन:पुनर्लेखन असं सर्व हिशेबात धरलं तर अनुवाद पूर्ण व्हायला दिवसा सहा तास काम याप्रमाणे दीड वर्ष लागलं. नशिबाने या कामात मोठे म्हणावे असे व्यत्यय आले नाहीत, म्हणून त्याचा ओघ राखता आला. एखाद्या कामात पूर्णपणे बुडून राहिलं की त्यात वेगळाच रस निर्माण होतो, याचा हा अनुवाद करताना मला प्रत्यय आला. भाषिक, सांस्कृतिक अडचणी येणं हा अनुवादकाच्या कामाचा अविभाज्य भाग असतो. एका भारतीय भाषेतून दुसऱ्या भारतीय भाषेत अनुवाद करत असताना त्यामानाने खूपच कमी अडचणी येतात. भारतीय भाषेतून युरोपियन भाषेत अनुवाद करताना त्या अडचणी कैक पटीने वाढतात. त्याचं कारण : सांस्कृतिक अंतर. पण अशा अडचणींवर मात करणं हा अनुवादकाचा आवडता खेळ आहे. तेव्हा त्याचा मी बाऊ करत नाही.
आज या पुस्तकास अनुवादित पुस्तकासाठीचा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाल्यावर काय वाटतंय?
– अर्थातच आनंद होतो आहे. एक प्रकारचं ऋण फेडल्याचा आनंद आहे हा. मी १६ वर्षांची असताना आईने मला सांगितलं होतं की, आपल्याकडील उत्तमोत्तम साहित्याचे जर मी अनुवाद केले तर माझ्या शिक्षणाचं चीज झालं असं ती समजेल. त्याप्रमाणे मी सातत्याने अनुवाद करत होते.. शिक्षणाचं चीज होत होतं. पण प्रतिष्ठित अनुवादकांच्या एका मंडळाने जेव्हा या राष्ट्रीय पुरस्कारासाठी ‘स्मृतिचित्रे’ची निवड केली तेव्हा माझ्या मते, त्यांनी जाहीर केलं की महाराष्ट्रदेशी दीडशे वर्षांपूर्वी ज्या बाईंचा जन्म झाला, ज्या निरक्षर असूनही ज्यांनी इतक्या उच्च प्रतीची साहित्यकृती निर्मिली, ज्यासाठी आचार्य अत्रे यांनी त्यांना ‘साहित्यलक्ष्मी’ हा किताब बहाल केला, ज्या बाईंचं खडतर जगणं, प्रगल्भ विचार आणि मिश्किल विनोदबुद्धी आज इंग्लिशमध्ये बोलत आहे, त्या बाईंचा हा सन्मान आहे.
प्रतिनिधी