डॉ. माधव सूर्यवंशी
करोनाने मानवी जीवनाच्या सर्व बाजूंवर प्रभाव टाकला आहे. करोनामुळे शाळा बंद आहेत. पण याचा परिणाम मुलांच्या शारीरिक, मानसिक, शैक्षणिक आरोग्यावर झाला आहे. त्याकडे डोळसपणे पाहण्याची गरज निर्माण झाली आहे. मुले शालाबा होऊ नयेत, शिक्षणाच्या मूळ प्रवाहात टिकून राहावीत यासाठी माहिती-तंत्रज्ञानाचा आधार घेऊन स्मार्टफोन, यू-टय़ूब, गुगल मीट, गूगल क्लासरूम, हँगआऊट, ई-लायब्ररी, दूरदर्शन अशा विविध माध्यमांतून मुलांना शैक्षणिक धडे देण्याचे प्रयोग या करोनाकाळात सुरू आहेत.

करोनामुळे शाळा सुरू करता येणार नाहीत हे निश्चित झाल्यावर शाळेतील वर्गाध्यापन ऑनलाइन माध्यमाकडे कसे संक्रमित करायचे असा प्रश्न होता. ऑनलाइन वर्गाध्यापनात विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यातील संवाद महत्त्वाचा. यादृष्टीने ऑनलाइन शिक्षणाचे कोणते माध्यम उपयुक्त ठरेल याचा विचार करू लागलो. वापरायला सोपे व उपयुक्त म्हणून ‘झूम’ हा पर्याय निवडला. विद्यार्थी प्रत्यक्ष वर्गात नाहीत, आभासी विश्वातून त्यांच्याशी संवाद करायचा आणि अध्यापन प्रक्रिया यशस्वी करायची याचा ताण जसा आमच्यावर होता तसाच अर्थात तो विद्यार्थ्यांवरही होता.

आमची शाळा मुंबई महानगरात असली तरी विद्यार्थी आर्थिकदृष्टय़ा निम्न स्तरातील व वंचित घटकांतील आहेत. करोनामुळे रोजगार थांबले आणि पोटापाण्याचे प्रश्न पालकांसमोर उभे ठाकले. शाळा बंद असली तरी मुलांचे शिक्षण सुरू राहिले पाहिजे यासाठी मुलांबरोबरच पालकांशीही संपर्क साधून त्यांना समजावून सांगितले. आता प्रत्यक्ष शाळा भरणार नाही, परंतु ऑनलाइन शिक्षण हा त्याला पर्याय आहे. मुलांना स्मार्टफोन उपलब्ध करून द्या म्हणून विनंती केली. ज्यांना आर्थिक अडचणी होत्या अशा मुलांची यादी बनवून त्यांना काही मदत करता येईल का, याचाही विचार सुरू झाला. पालक मुलांना स्मार्टफोन कसा उपलब्ध करून देता येईल याचा विचार करू लागले. काहींनी खरेदीही केला. मात्र अडचण अशी होती की, घरात स्मार्टफोन एकच आणि शिकणारी अपत्ये दोन किंवा तीन. तेव्हा पालकांशी व मुलांशी चर्चा करून विद्यार्थ्यांना सोयीचे वेळापत्रक बनवण्यात आले.

मुलांशी चांगला संवाद झाला पाहिजे, या नवीन तंत्रज्ञानाचा वापर त्यांना करता आला पाहिजे यासाठी सुरुवातीचे तीन दिवस आम्ही फक्त मुलांना झूम लिंक पाठवायचो, मग मुले जॉइन व्हायची. असंख्य प्रश्न मनात घेऊन ही मुले यायची. त्यांना  आपल्या सवंगडय़ांसोबत गप्पाही मारायच्या असायच्या. तेव्हा सुरुवातीला मी हातात पुस्तक घेऊन अध्यापन केले नाही. मुलांसोबत गप्पा मारल्या, त्यांना व्यक्त होऊ दिलं. कित्येक दिवस लॉकडाऊनमुळे मुलं मनातलं कोणासोबत बोललीच नव्हती. त्यांचं ऐकून घेतलं, त्यांच्या चेहऱ्यावर फुललेला आनंद पाहता आला. मुलं मानसिकदृष्टय़ा हळूहळू स्थिर झाली. मग मी अभ्यासक्रमाकडे वळलो.

सुरुवातीस ऑनलाइन वर्गास कमी प्रतिसाद मिळत होता. तेव्हा पुन्हा कारणांचा शोध घेतला. स्मार्टफोनची उपलब्धता असणाऱ्या मुलासोबत दोन-दोन मुलांचा गट बनवून एकत्रितरीत्या ही मुलं वर्गाला उपस्थित राहू लागली. को-लर्निगच्या मदतीने ही मुलं शिकू लागली. सुरुवातीला चांगला सराव झाल्याने झूम म्युट, अनम्युट करणे, स्क्रीन शेअर करणे, चॅट बॉक्स पाहणे, त्यात प्रश्न अथवा उत्तरे लिहिणे त्यांना जमायला लागले. प्रत्येक विद्यार्थ्यांशी समोरासमोर संवाद करणे शक्य झाले. श्रवण, वाचन, लेखन, संभाषण सहजपणे घडू लागले. माझा अध्यापनाचा विषय मराठी भाषा असल्याने कठीण शब्द, त्यांचे अर्थ, शुद्धलेखन, व्याकरण, स्वाध्याय, लेखन आदीसाठी मला व्हाइट बोर्डचा उपयोग झाला. मुलांनाही आपण प्रत्यक्ष वर्गात शिकत आहोत याचा ‘फील’ यायला लागला.

अध्यापन सुरू असताना काही मुले जाणीवपूर्वक किंवा नकळत स्क्रीनवर रेघोटय़ा मारताना दिसत. अशा वेळेस मी कंट्रोल बारमधील क्लीअर ब्रासचे बटण क्लिक करून रेघोटय़ा पुसून काढतो. जी मुले व्हिडीओ ऑफ करून, म्युट होऊन गायब होतात अशा मुलांवर लक्ष ठेवून त्यांना अधूनमधून प्रश्न विचारतो किंवा वाचन करण्यास सांगतो. मुलांच्या मग लक्षात येतं की, आपल्याला प्रश्न विचारला जाईल. या भीतीने मुलं लक्ष देतात.

आमच्या शाळेतील बहुसंख्य मुलं ही चाळीत राहणारी आहेत. चाळीतील घरं लहान आणि दाटीवाटीची असतात. फेरीवाले, भटके कुत्रे, आपसात बोलणारी माणसं, लहान मुलं यांचा गोंगाट कानावर आदळत असतो. अशावेळी मुलांना म्यूट करणं एवढाच पर्याय हातात असतो. मुलांचे व्हिडीओ ऑन असल्याने ती दिसतात. मुलांना अगोदर सूचना दिली आहे की, एखादा शब्द नाही समजला की लगेच हात वर करायचा. अनम्यूट केलं की आपली शंका विचारायची. पाठ संपल्यानंतर एखादा भाग नाही समजला तर प्रश्न विचारण्यासाठी, चर्चा करण्यासाठी काही वेळ राखून ठेवलेला असतो. झूमसोबत पाठास पूरक असे बनवलेले व्हिडीओ, ऑडिओ, विषयास अनुसरून असलेला एखादा यू-टय़ूब व्हिडीओ, दीक्षा अ‍ॅपवरील काही महत्त्वाचा भाग मुलांना पूरक अभ्यासासाठी आम्ही पाठवतो. गुगल फॉर्मच्या मर्यादा लक्षात घेऊन मुलांचा लेखन सराव अधिक वाढावा म्हणून स्वाध्याय, कृतिपत्रिका, निबंध, पत्र, व्याकरण लेखन करण्याच्या सराव पत्रिका नियमितपणे मुलांकडून सोडवून घेतल्या जातात. यामुळे लेखनाचा वेग कायम टिकून राहतो.

अध्यापन प्रक्रिया कितपत प्रभावी ठरते आहे ही तपासणारी यंत्रणा म्हणजे मूल्यमापन तंत्र! मी माझ्या वर्गाचा व्हॉट्स अ‍ॅप समूह बनवला आहे. त्यावर महत्त्वाच्या सूचना व झूम लिंक शेअर करतो. मात्र त्यावर रोजचा गृहपाठ घेत नाही. याचे कारण असे की, त्यावर खूप इमेजेस येतील, सर्व इमेजेस डाऊनलोड करायला लागतील. त्यामुळे वेळ, मेमरी वाया जाईल. म्हणून मी padletapp चा पर्याय निवडला. हे अ‍ॅप नि:शुल्क आहे. कोणासही ते डाऊनलोड करता येते. मुलांना ते डाऊनलोड करायला सांगितले. मुले त्यावर आपला गृहपाठ डाऊनलोड करतात. त्या अ‍ॅपमध्ये वर्गनिहाय कप्पे केले. त्यात सर्व स्वाध्याय, उत्तरपत्रिका, गुगल फॉर्म यांचे जतन केले गेले आहे. त्यामुळे मूल्यमापनास मदत झाली. वर्गाध्यापनाच्या पलीकडे जाऊन आमच्या शाळेतील माजी विद्यार्थ्यांचा ‘प्युपिल्स ऑन ट्रस्ट’ आहे; त्यांच्या माध्यमातून गरजू आणि नियमितपणे ऑनलाइन वर्गास हजेरी लावणाऱ्या माझ्या वर्गातील पाच मुलांना स्मार्ट मोबाइल, मुलींच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या सॅनेटरी नॅपकिन्स, वह्य, इंग्रजी व्याकरण सराव पुस्तिका, ऑनलाइन वर्गास नियमित येणाऱ्या गुणवत्ताधारक मुलांना शिष्यवृत्ती देण्यात आल्या.

तथापि विद्यार्थी तासन् तास स्मार्टफोनच्या छोटय़ा स्क्रीनवर डोळे लावून बसत असल्यामुळे डोळ्यांचे आजार वाढले आहेत. जास्तीच्या स्क्रीन टाइममुळे मुले चिडचिडी झाली आहेत. डोकेदुखीच्या तक्रारी वाढल्या आहेत. मैदानी खेळांकडे दुर्लक्ष झाल्याने ‘शिक्षणातून सर्वागीण विकास’ ही संकल्पना लोप पावत आहे. आमच्या शाळेत शिकणारी काही मुलं मात्र आर्थिक अडचणीमुळे लहान-मोठी कामं करून पैसे कमावताहेत, ज्याचा पालकांना आधार होतो आहे. परंतु ही मुलं पुन्हा शाळेत येतील का, असा प्रश्न मला पडतो. आर्थिक विषमतेबरोबरच शैक्षणिक विषमता वाढीस लागली आहे. अर्थतज्ज्ञ रघुराम राजन यांनी नुकतेच एक विधान केले आहे की, ‘जर तुम्ही मुलांना दीड वर्ष शाळेपासून दूर ठेवत असाल तर असे समजा की, ती तीन वर्षे मागे जातील. यामुळे सरकारने शाळा पुन्हा सुरू करण्याबाबत विचार करावा. हे नाही झाले तर आपण एक पिढी हरवून बसू..’

madhavsurya7@gmail.com

(लेखक ‘शिक्षण विकास मंच, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई’चे समन्वयक आहेत.)