‘कलेसाठी कला की जीवनासाठी कला’ हे द्वंद्व मराठी साहित्य व कला प्रांतात नवे नाही. परंतु या द्वंद्वाच्या पल्याड जात ‘ज्ञानासाठी कला’ या नवसूत्राने गेली सुमारे १५ वर्षे ‘बोधी नाटय़ परिषद’ ही संस्थात्मक चळवळ कार्यरत आहे. २००३ साली स्थापना झालेल्या या संस्थेने महाराष्ट्राच्या विविध भागांत तब्बल २५ नाटय़लेखन कार्यशाळा व २२ नाटकांचा समावेश असलेले पाच नाटय़महोत्सव आयोजित केले. ‘बोधी..’च्या या कार्याचा यथोचित आढावा घेणारे व त्यामागील भूमिका विशद करणारे ‘आर्ट फॉर नॉलेज’ हे ज्येष्ठ नाटककार प्रेमानंद गज्वी आणि प्रा. आदित्य देसाई यांनी संपादित केलेले पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले आहे. पुस्तकाच्या सुरुवातीलाच ‘आर्ट फॉर नॉलेज- ज्ञानासाठी कला’ या दीर्घ प्रकरणात प्रेमानंद गज्वी यांनी ‘बोधी’ या संकल्पनेचे स्पष्टीकरण व कलेकडे ज्ञानात्मक दृष्टीने पाहण्यामागील त्यांची भूमिका मांडली आहे. त्यात रंजनात्मक आणि प्रयोगशील वाङ्मय व कलेपेक्षा ‘बोधी’चे निराळेपण गज्वी यांनी सांगितले आहे. मानवाला दु:खमुक्त करणे हाच कला-वाङ्मयाचा प्रधानहेतू असायला हवा आणि हा हेतू पूर्ण करण्यासाठी मानवाला सर्व प्रकारचे ज्ञान मिळायला हवे, अशा ज्ञानदर्शी भूमिकेचा पुरस्कार त्यांनी केला आहे. वेदना, जाणीव, नकार, विद्रोह आणि करुणा ही बोधी कलाकृतीची पाच लक्षणे गज्वी यांनी सांगितली आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

यानंतर २००३ ते २०१३ या काळात पार पडलेल्या २५ नाटय़लेखन कार्यशाळा व २००७ ते २०१३ या कालावधीत पार पडलेल्या पाच नाटय़महोत्सवांची माहिती पुस्तकात वाचायला मिळते. पुस्तकाचा हा भाग नोंदींचा असला तरी त्याद्वारे बोधी नाटय़ चळवळीच्या कार्याचे सारांशरूपाने दस्तावेजीकरण झाले आहे. पुस्तकाच्या पुढील भागात बोधी नाटय़लेखन कार्यशाळेत वाचल्या गेलेल्या नाटय़कृतींवरील परिचयपर लेखांचा समावेश केला आहे. त्यात ‘काळोखाची लेक’ (लेखक- प्रेमानंद गज्वी), ‘जातक नाटक’ (राजीव नाईक), ‘काय डेंजर वारा सुटलाय!’ (जयंत पवार), ‘तुकाराम कोळ्याची पोर’ (भालचंद्र कुबल), ‘एफ १/१०५’ (आशुतोष पोतदार) आदी १३ नाटकांचा परिचय करून दिला आहे. तर पुस्तकाच्या शेवटच्या ‘उपचिंतन’ या शीर्षकाच्या प्रकरणात या साऱ्या नाटकांच्या अनुषंगाने बोधी संकल्पनेवर स्पष्टीकरणात्मक भाष्य केले आहे. एकूणच हे पुस्तक म्हणजे गेल्या दीड दशकभरात आकाराला आलेल्या स्वतंत्र कलाजाणिवेच्या नाटय़चळवळीचे सारांशरूपाने घडविलेले दर्शन आहे.

‘आर्ट फॉर नॉलेज’

संपादन- प्रेमानंद गज्वी, प्रा. आदित्य देसाई,

बोधी प्रकाशन, मुंबई,

पृष्ठे- १६१, मूल्य- २०० रुपये. 

मराठीतील सर्व दखल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Art for knowledge book review
First published on: 10-12-2017 at 02:36 IST