मुकुंद टाकसाळे

नव्वदोत्तरीपासून दहा वर्षांपूर्वीचा पंचवीस वर्षांचा काळ हा जागतिकीकरणानंतर शहरे-नगरे आणि अर्धशहरांना सपाट पातळीवर आणणारा. मानवी मूल्य आणि समाजमनाची उलथापालथ करणारा. ग्रामीण आणि निमशहरी जीवन अधिकाधिक उद्ध्वस्त, बकाल होण्याचा, ग्रामीण नैतिकतेचे तीन तेरा वाजण्याचा हा कालखंड. या ऱ्हासकालीन पडझडीचा दस्तऐवज बालाजी सुतार यांच्या ‘दोन शतकांच्या सांध्यावरच्या नोंदीं’मध्ये सापडू शकतो.

jallianwala bagh 105 years
जालियनवाला बाग हत्याकांड : १०५ वर्षांपूर्वीच्या रक्तरंजित इतिहासाचे स्मरण! नक्की काय घडले त्या दिवशी?
peter higgs death marathi news, peter higgs god particle marathi news
‘देव कणा’चा सिद्धान्त मांडणारा शास्त्रज्ञ काळाच्या पडद्याआड… पीटर हिग्ज यांच्या ‘हिग्ज बोसॉन’ संशोधनाचे मोल काय?
Uddhav Thackrey Kundli Shine In Loksabha Elections Till 2027
“उद्धव ठाकरेंच्या पत्रिकेतच पुरावा, लोकसभेत शिवसेनेला..”, ज्योतिषांची मोठी भविष्यवाणी
shukra and rahu planet will make vipreet rajyog these zodiac could be lucky
राहू- शुक्राच्या संयोगाने ५० वर्षांनंतर तयार होणार विपरीत राजयोग; या तीन राशींच्या लोकांचे नशीब फळफळणार?

‘दोन शतकांच्या सांध्यावरच्या नोंदी’ हा बालाजी सुतार यांचा कथासंग्रह १९९० ते २०१५ या पावशतकास अर्पण केलेला आहे. या दोन शतकांच्या सांध्यावरच्या काळात तरुण असणाऱ्या कथाकार बालाजी सुतार यांनी हा महत्त्वाचा कालखंड या पुस्तकातील कथांमध्ये विलक्षण ताकदीने आणलेला आहे. हा कालखंड आहे बाबरी मशीद पाडण्याचा, गुजरात दंग्यांचा, समाजातील हिंदू -मुस्लीम फूट गडद होण्याचा, जागतिकीकरणाचा, खासगीकरणाचा, उदार आर्थिक धोरणांचा, मोबाइल सार्वत्रिक होण्याचा.. तसंच खेडी, गावं झपाटय़ानं बदलण्याचा, खेडय़ांचं अर्धशहरीकरण होण्याचा, शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा, ग्रामीण सरंजामशाहीतले शिक्षणसम्राट अधिकाधिक माजुरडे होण्याचा, कॅम्प्युटर शिकण्याचा, शेतीचं काही खरं नाही असं मानून यूपीएससीच्या परीक्षांचा ध्यास घेणाऱ्या बहुजन समाजातील तरुणांचा, त्यांच्या बेकारीचा आणि ग्रामीण आणि निमशहरी जीवन अधिकाधिक उद्वस्त, बकाल होण्याचा. ग्रामीण नैतिकतेचे (किंवा एकुणातच नैतिकतेचे) तीन तेरा वाजण्याचा हा कालखंड. ‘विच्छिन्न भोवतालचे संदर्भ’ या पहिल्याच प्रातिनिधिक कथेतील सुरुवातीचे वातावरण प्रतीकात्मक वाटावे असे आहे. गावाबाहेरून जाणाऱ्या रिंग रोडवरचा तापलेला डांबरी रस्ता, डोक्यात शिरणारे प्रखर ऊन, रसवंती गृहातला मरतुकडा दुबळा बैल, त्याहून दुबळा असलेला ‘हडाडलेला’ रसवंतीगृहाचा गरीब मालक, त्यानं वारंवार त्या बैलाच्या पायाच्या नेमक्या हाडावर मारलेला सटका आणि त्याचा होणारा ‘खट्’ असा आवाज.. चरकात तीन तीनदा पिळून चिपाड होणारा ऊस, दूरवर हापशावर आतडं पिळवटून प्रचंड जोर लावून चुळकाभर पाणी मिळणारी कुणी एक बाई. आणि ‘बधिरपणे हा सुन्न भोवताल’ निरखून पाहण्यासाठी भरपूर कंटाळायुक्त वेळ असणारा कथेचा नायक-निवेदक राघव.

हा सुन्न भवताल संवेदनशील मनानं आपल्या कथांत टिपणाऱ्या बालाजी सुतार यांच्यापाशी अपार करुणेची नजर आहे. त्या नजरेतून ते ही सारी ‘आपली माणसं’ पाहतात. त्यांचे गुण-दोष, त्याचं माणूसपण जिव्हाळय़ाने समजावून घेतात. त्यांच्यापाशी एका कवीचं मन आहे. हापशावरच्या बाईला उद्देशून राघवच्या मनात येते, ‘.. पाण्यासाठी पाताळ धुंडाळू नकोस मायबाई. तुझ्यातलीच थोडी ओल माझ्यात पेरून जा.’ बालाजी सुतार यांनी या कथांसाठी ही आजच्या काळाला साजेल अशी शैली निर्मिलेली आहे. वेगवेगळय़ा खंडित वास्तवांचे तुकडे आपल्यापुढे मांडताना ते प्रसंगी कचकचीत शिव्या वापरतात, प्रसंगी विषण्णता व्यक्त करतात. इथल्या आयाबायांची दु:खं बघून, शेतकऱ्यांची दु:खं बघून ते कथेच्या मध्येच हळुवार गद्यकाव्याचा वापर करतात. याच ‘विच्छिन्न भोवतालचे संदर्भ’ कथेमध्ये एके ठिकाणी त्यांच्यातला कवी म्हणतो, ‘या सुन्नबधिर मातकट वाटेवरून बाया शिवारात कामाला जातात. या वाटेची सुख-दु:खं बायांना माहीत आहेत आणि बायांची वाटेला. या वाटेवर उन्हाने सणकून तापणारा पांढरमातीचा फुफाटा आहे आणि वाटेकडेला शुष्क पिवळय़ा रंगाचं खुरटं गवत असतं. या गवतात दबा धरून असलेले रानकाटे असतात. मध्येमध्ये बायांच्या जगण्याइतकाच रखरखीत माळ लागतो. पाय रोवून बाया या सगळय़ांवरून चालत जातात. पुफाटय़ाची आणि काटय़ांची बायांना जन्मजात ओळख आहे. माळावरचा रखरखाटही बायांना परका वाटत नाही. काही केल्या बायका अंतरीची ओल कोरडू देत नाहीत..’

ही शैली काळजाला थेट हात घालणारी. कमालीची वाचनीय. त्यामुळे जाणकार वाचकांइतकीच सर्वसामान्य वाचकांनाही त्यांची कथा ‘आपली’ वाटू शकते. आजच्या काळातलं हे वास्तव मराठी कथेला खरोखरच नवं आहे. अंगावर येणारं आहे. ते वाचताना आपल्याला लेखकाप्रमाणेच ‘कल्पितांना कथा समजून वाचण्यात फार दिवस व्यर्थ गेले. जिवंत गाथा वाचायच्याच राहून गेल्या’ अशी हळहळ वाटल्याखेरीज राहत नाही. सुतारांच्या या कथाविश्वात लोकांना लुबाडणारा तलाठी आहे, पिठाची चक्की चालवणारी आणि पिठाचा गाऊन गुडघ्यावर झटकून मांडय़ा दाखवणारी रईसा आहे, आत्महत्या करणारा शेतकरी आहे, कुण्या अभिमानच्या प्रेयसीला ज्युनिअर कॉलेजवर कायमस्वरूपी नोकरीचं आमिष दाखवून तिला भोगणारा शिक्षण संस्थेच्या अध्यक्षाचा पोरगा आहे. अशा विविधरंगी, विविधढंगी पात्रांचा एक मोठा पटच बालाजी सुतार आपल्यासमोर मांडतात. यावर बालाजी सुतार यांच्यातला कवी म्हणतो, ‘रक्तातून घोडे उधळतात आणि मेंदूत मुंग्याचं वारूळ फुटतं. इथे टिकाव धरून राहायचं असेल तर मज्जातंतूंना बधिर होण्याची सवय लाव. अगदीच हाताबाहेर गेलेलं आहे हे शहर.’ लेखक या कथेत पुढे प्रश्न करतो, ‘तांडेच्या तांडे फिरताहेत अकाली मेल्या स्वप्नांच्या तिरडय़ा खांद्यावर घेऊन. हे शहर आहे की स्मशान?’

‘डहूळ डोहातले भोवरे’ ही कथा अशीच सुन्न करणारी कथा. हरिश्चंद्र शेकाटे हा कथानायक नगरपरिषदेत काम करत असतो. त्याचा शांताराम हा बोलघेवडा मित्र त्याला त्याच्या स्वत:च्या मेव्हणीनं फास लावून आत्महत्या केल्याचं वृत्त सांगतो. तिला तिच्या नवऱ्यानं सावकाराच्या कर्जाची परतफेड करण्यासाठी त्या सावकाराशी संबंध ठेवायला लावले, हे कारण त्यामागे असल्याचेही सांगतो. शांताराम म्हणतो, ‘तुम्हाला सांगतो, शेकाटेसाहेब, बायामानसाचा जलम लै बेकार. लैच बेकार.  आजच न्हाई, पार रामायेन, म्हाभारत पुराणकाळापासनं.. नवरा म्हननारा पुरुस हरेक बाईच्या अवघड जागेवरचं दुखनं व्हऊन बसल्यालं आसतंय. हितंच न्हाई, जगभर समदीकडंच..’ हरिश्चंद्राची बायकोही अशाच काही मजबुरीपोटी एकाशी संबंध ठेवून आहे. याबाबत आख्खा गाव त्याला कानकोंडं करून सोडत राहतो. पण तरीही हरिश्चंद्राचं बायकोवर प्रेम आहे. पण शांतारामाच्या मेव्हणीची कर्मकहाणी बायकोला ऐकवताना तो चाचरतो. आणि आत्महत्येचं कारण कळल्यावर त्याची बायको ‘चहासाठी घेतलेलं रिकामं पातेलं हातात धरून गोठल्या चित्रासारखी निश्चल जडपणे उभी राहते.’ पुढच्या अनेक भयाण शक्यतांचं सूचन करीत ही कथा संपते आणि आपल्याला कायमची अस्वस्थ करून जाते. बालाजी सुतार काहीशा अघळपघळपणे आपली कथा सांगतात. पण तो त्यांच्या जाणूनबुजून अंगीकारलेल्या चतुर शैलीचाच एक भाग आहे. आजूबाजूच्या तपशिलांतून ते बरंच काही इकडचं तिकडचं सांगतात. पण कथानकाचं सूत्र तरीही पक्कं ठेवतात. अनेक जिवंत पात्रं त्यांच्या कथांमधून येऊन जातात. त्यांची कथा ही कादंबरीप्रमाणे जगण्याचे अनेक आयाम व्यक्त करणारी, अनेक शक्यता व्यक्त करणारी ‘दीर्घकथा’च असते.

त्यांच्या दीर्घकथांमध्ये ज्याला इंग्रजीत अर्बन व्हिलेज म्हणतात, अशा अर्धशहरी गावाचा सचित्र लेखाजोखा येतो. ‘निळय़ा चमकदार काळोखातले अप-डाउन्स’  या कथेत लग्नानंतर खानदानी माणसाच्या कैदेत राहणाऱ्या चित्रा ही सुशिक्षित बाईची कथा येते. तिला फेसबुकमध्ये थोडी स्वातंत्र्याची झुळूक मिळते खरी, पण तिथला मित्र मोहन अचानक तिच्याकडे उघडय़ानागडय़ा शब्दांत संभोगाची मागणी करतो. ती मुळापासून हादरते. यावर लेखक म्हणतो, ‘आपलं जग कितीही विस्तारलं किंवा जवळ आलं, समाज म्हणून आपण कितीही लिबरल झालो, स्त्री-पुरुष व्यक्तिवाद आणि त्यातल्या स्पेसेस जपणं, असल्या विषयांवर चर्चा केल्या तरी स्त्रीचं जीवशास्त्रीय ‘मादी’ असणं आणि पुरुषातला ‘नर’ उफाळून येणं, या गोष्टीला तुम्ही सामाजिक नियमांत बांधू शकत नाही..’

खेडेगावाकडच्या कवीचं शहरी कवीसंमेलनातलं जग आणि त्याचं गावाकडचं वास्तवातलं क्रूर जग आपल्याला ‘दोन जगातला कवी’मध्ये आढळतं. कथेतला कवी शहरी कवींशी ‘कवितेमागच्या प्रयोजना’वर बोलत असताना  म्हणतो, ‘.. अत्यंत आक्रमक बाजारीकरणाने, मागच्या काही वर्षांतल्या हवामानातल्या, ऋतुचक्रातल्या अत्यंत विषम आणि अनियमित बदलांमुळे, जग मुठ्ठीत आणून देणाऱ्या मोबाइलमुळे, डिशमधल्या शेकडो चॅनेलांमधून खेडय़ातल्या बारक्या जगात घरोघर हिंस्रपणे घुसलेल्या बीभत्सपणामुळे जे नवे ताण निर्माण होत आहेत, ते आमच्या, माझ्या कवितेने मांडायला हवेत.’ हा बालाजी सुतार यांचा ‘माउथपीस’ म्हणता येईल. त्या पात्राच्या तोंडून स्वत: लेखक त्याच्या कथेबद्दल, कथेमागच्या प्रयोजनाबद्दल बोलतो आहे, असं म्हणता येईल.

‘पराभवाच्या बखरीतली काही पाने’ या कथेत इराण्याच्या मुलीवर प्रेम करणारा नामदेव रामदेव धसकाटे आहे. फोनवरून तिच्याशी बोलताना तो तिला ‘बेब’ म्हणून तिचा ‘उऽऽम्ह’ करून मुका घेतो.  यावर कथेतला  ‘मी’ मनातल्या मनात मल्लिनाथी करतो, ‘मुदलात ‘नामदेव रामा धसकाटे’ हे नाव असणाऱ्यालाही ‘बेब’ प्रकारच्या शहरी मुली आवडून घेतात, ही आपल्यासारख्यांना आशादायक गोष्ट आहे.’  पुढे त्याच कथेत तो त्या ‘बेब’वाल्या मित्राला म्हणतो, ‘कॉलेजात कसली घाण काम करावी लागतात म्हायती नाही तुला. आजच्या पैसाकेंद्री जगातही मराठी विषय घेऊन बी. ए. करणाऱ्या अर्धवट पोरांपुढं मराठी कविता शिकवावी लागण्याइतकं घाण काम निदान तुला करावं लागत नाही. आणि आमचा अर्धा स्टाफ संस्थाचालकाच्या वावरात कामाला लावला जातो शेतातल्या हातघाईच्या दिवसात..’ या प्रकारचा कडवट विनोद हेही बालाजी सुतारांच्या शैलीचे एक महत्त्वाचे वैशिष्टय़ आहे. हा विनोद हसवतोही आणि अंतर्मुखही करून जातो. जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती आणि शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष शेंडगे यांच्या मुलीचे लग्न आहे. मास्तरलोकांना पत्रावळी उचलण्याच्या कामावर लावलेलं आहे. पत्रावळय़ांचा ढीग नेताना कथानायकाच्या हातून तो सांडतो, त्याच्या पॅंटवर सारं खरकटं सांडलेलं असतानाच त्याच्या कानावर संस्थेच्या अध्यक्षांच्या मुलाचे शब्द पडतात, ‘‘नीट काम करा च्युत्यायहो..’’    यावर त्याला स्वत:च्या लाचारीची प्रचंड शरम वाटते. निर्बुद्ध अरेरावी माज असलेल्या पुढाऱ्याच्या समोर आपण चड्डी फेडून ओणवे उभे आहोत, असे त्याला वाटायला लागते.  

‘पराभवाच्या बखरीतील काही पानं’  आणि ‘दोन शतकांच्या सांध्यावरच्या नोंदी’ या कथांमध्ये बालाजी सुतार बाबरी मशीद पाडापाडीनंतर निर्माण झालेला (की केलेला?) हिंदू-मुस्लीम प्रश्न आणि त्यातलं कारुण्य त्यांच्या भेदक टिप्पणीसह आपल्यापुढे उभं करतात. आजच्या खेडय़ातली बिलाल गुंड, त्याची आजारी बायको, दोन मुलं एक वेडसर आई ही आणि अशी आणखीही काही अस्सल मुस्लीम पात्रं बालाजी सुतार यांच्या कथेत आपल्याला भेटत राहतात.

माणसातलं क्रौर्य, अमानुषता, आपल्या जगण्यातल्या नैतिक मूल्यांचा ऱ्हास, असहाय्य बायकांविषयीची कणव, उदात्त मानवी मूल्यांविषयीची आस्था हे सारे मुद्दे एखाद्या गाण्याच्या धृवपदाप्रमाणे वारंवार बालाजी सुतार यांच्या कथेत येतात. ‘दोन शतकांच्या सांध्यावरच्या नोंदी’ या आजच्या ऱ्हासकालीन पडझडीचे भयाण, भकास भगभगीत वास्तव आपल्यासमोर उभे करतात आणि आपल्याला कायमचं अस्वस्थ करून सोडतात.

जाता जाता : मुंबई विद्यापीठात हा कथासंग्रह बी. ए.च्या अभ्यासक्रमात नेमला असताना तो आपल्याला न कळवता नेमला म्हणून बालाजी सुतार यांनी मागे घ्यायला लावला. विद्यार्थ्यांपर्यंत एक सकस कथासंग्रह पोचता पोचता थांबला. तुकोबांच्या शब्दांत सांगायचे तर ‘त्यांत कोणाचे काय बा गेलें। ज्याचें तेणें अनहित केले।।’

पत्रकारितेपासून लेखनाला सुरुवात. विनोदी लेखक म्हणून ओळख. सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींवर चौफेर नजर ठेवून गंभीर, व्यंगात्मक आणि तितक्याच खुमासदार  शैलीत विविध नियतकालिकांत सदर लेखन. विनोदी कथा आणि लेखांची ‘आनंदीआनंद’, ‘तिरपागडय़ा कथा’, ‘नाही मनोहर तरीही’  ही पुस्तके लोकप्रिय.

mukund.taksale@gmail.com