उत्क्रांती एक वैज्ञानिक अंधश्रद्धा?’ हे डॉ. अरुण गद्रे यांचे पुस्तक आणि त्याला मिळालेला शासन पुरस्कार व त्यानिमित्ताने ‘लोकरंग’मधील प्रसिद्ध झालेले लेख यानिमित्ताने काही सुटून गलेले महत्त्वाचे मुद्दे आपण सर्वानी समजून घेणे आवश्यक आहे असे वाटते.

अरुण गद्रे यांचे पुस्तक हे केवळ छद्मविज्ञान नव्हे, तर त्या पुढे जाऊन ते विज्ञानविरोधी आहे. छद्मविज्ञान हे विज्ञानाचे सोंग घेऊन आलेली भोंदुगिरी असते. पण छद्मविज्ञान कमीत कमी विज्ञानाचे सोंग तरी घेत असते! गद्रे यांचे पुस्तक तसेही करत नाही. ते थेट विज्ञानाच्या अस्तित्वावरच प्रश्न निर्माण करते. उदाहरण म्हणून पुस्तकातील काही वाक्ये बघू या. लेखक म्हणतो की, ‘‘विज्ञानाची व्याख्या विज्ञानच वैज्ञानिक भाषेत करू शकत नाही!’’(पान २७). हे लेखकाचे पूर्णत: असत्य आणि अज्ञानमूलक भाष्य आहे. विज्ञानाच्या कुठल्याही व्याख्येतला सगळय़ात महत्त्वाचा गाभाघटक ‘कार्यकारण भाव’ आहे. ‘प्रत्येक गोष्टीला कारण असते आणि ते कारण आपल्या बुद्धीने शोधता आणि तपासता येते,’ असा त्याचा अर्थ आहे. विज्ञानयुग येण्याआधी जगातील कुठल्याही गोष्टीचे कारण हे एक तर ‘देवाची इच्छा’ किंवा ‘धर्मग्रंथाची आज्ञा’ हे समजले जायचे. त्यामध्ये चिकित्सेला आणि बदलाला वाव नव्हता. वैद्यानिक दृष्टिकोनामुळे तो बदलला. वैज्ञानिक दृष्टिकोन ही माणसाला आपल्या आजूबाजूचे ज्ञान प्राप्त करण्याची सध्या उपलब्ध असलेली ही सगळय़ात यशस्वी पद्धत आहे. ‘विज्ञान म्हणजे काय रे भाऊ?’ या प्रकरणात लेखक विज्ञानाच्या ज्ञाननिर्मिती आणि आकलन याविषयीच्या ज्या प्रमुख गोष्टी आहेत त्याचा प्रतिवाद करून त्या खोडून काढल्याचा दावा करतात! प्रत्यक्षात यामधील जवळजवळ सर्व विधाने ही अज्ञानावर आधारित आहेत. एक उदहरण बघू या, ‘‘विज्ञान हे निरीक्षणांवर आधारित असते आणि निरीक्षणे ही कधीच व्यक्ती आणि परिस्थिती निरपेक्ष नसतात म्हणून विज्ञान हे चुकीच्या पायावर उभे आहे,’’(पान ३४ ते ३८) असे एक विधान लेखक करतो. लेखकाला कदाचित हे माहीत नाही की, ‘व्यक्तीनिरपेक्ष आणि परिस्थितीनिरपेक्ष निरीक्षणे कशी नोंदवली जातात याविषयी विज्ञान अभ्यास अतिशय पुढे गेला असून, त्यासाठी डबल ‘ब्लाईड ट्रायल’ ‘मेटाअनालिसिस’सारखी अनेक तंत्रे वापरली जातात.’

maharashtra Andhashraddha Nirmoolan Samiti offer cash reward for predict correctly voting
कंगना, गडकरी, राहूलना मते किती मिळतील ते अचूक सांगा, २१ लाख रुपये बक्षिस मिळवा – अंनिसचे ज्योतिषांना आव्हान
loksatta kutuhal features of self aware artificial intelligence
कुतूहल : स्वजाणीव- तंत्रज्ञानाची वैशिष्टये..
Husband Appreciation Day
Husband Appreciation Day : महिलांनो, नवऱ्याला गृहीत धरता का? त्यांच्या पाठीवर कधी देणार कौतुकाची थाप?
Upsc Preparation  Economics Kaleidoscope of Pre Exam career
Upsc ची तयारी : अर्थशास्त्र: पूर्व परीक्षेचा कॅलिडीस्कोप

लेखकाने विज्ञानच्या मूलभूत धरणांवर उपस्थित केलेले सर्व आरोप असेच अज्ञानमूलक आहेत. ते अगदी सहज खोडून काढता येऊ शकतील. या पूर्ण प्रकरणाचा भर हा विज्ञान नावाची गोष्ट कशी बिनबुडाची आहे असे दाखवण्याचा असून, तो केवळ छद्मविज्ञानापुरता मर्यादित नाही तर सरळसरळ विज्ञानविरोधी आहे हे आपण ध्यानात घ्यायला हवे. एवढे सगळे सुरुवातीला सांगून लेखक पुस्तकात त्यानेच निरुपयोगी म्हणून सांगितलेल्या तर्क, निरक्षण, अनुमान याच विज्ञान पद्धतींचा वापर करतो हा मोठा विरोधाभास आहे.

पुस्तकाचे नाव आणि रचनेवरून हे पुस्तक हे तार्किक पद्धतीने उत्क्रांतीच्या सिद्धांतातील फोल दाखवण्याच्या निष्कर्षांवर येईल असे वाटते, पण प्रत्यक्षात पुस्तकातील निष्कर्ष आणि पुस्तकातील मांडणी यांचा काहीही संदर्भ नाही. सर्व पुस्तकात उत्क्रांतीचा सिद्धांत हा कसा चूक आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे, पण निष्कर्ष मात्र हा उत्क्रांतीचा सिद्धांत चुकीचा आहे एवढय़ापुरता मर्यादित काढण्याऐवजी पुढे जाऊन ‘उत्क्रांतीचा सिद्धांत चुकीचा आहे म्हणून जगाचा निर्माता निर्मिक आहे!’ असा काढला आहे. सगळय़ात गंभीर भाग म्हणजे, जगाचा निर्माता निर्मिक आहे या आपल्या धारणेला लेखकाने कोणतेही पुरावे दिलेले नाहीत. ‘एखादा सिद्धांत नाकारणे म्हणजे दुसरा सिद्धांत स्वीकारणे असे होत नाही,’ इतके साधे लॉजिकदेखील यामध्ये पाळले गेले नाही. भले आपण असे मानले की, सध्याचा उत्क्रांतीचा सिद्धांत चुकीचा आहे तर आपण जास्तीत जास्त असे म्हणू शकू की, ‘मानवी जीवन कसे सुरू झाले याची आज तरी आपल्याला संपूर्ण माहिती नाही.’ त्या पुढे जाऊन ते निर्मिकाने निर्मिले आहे असे म्हणणे हा बौद्धिक अप्रामाणिकपणा आहे. हा कल्पनाविलास येथे थांबत नाही तर लेखक उपसंहार प्रकरणात असे म्हणतात की, या पुस्तकातील पुराव्यांनुसार, ‘विश्वाचे राहटगाडगे चालवण्यात निर्मिकाचा हातभार आहे. म्हणजे तो केवळ निर्माता नाही तर तो या जगाचा चालकदेखील आहे.’ (पान २४६, २४७) या विधानातील शेवटचा भाग हा बहुतांश अंधश्रद्धांचे उगमस्थान आहे. जगाचा निर्माता म्हणून निर्मिक मानणे याविषयी वाद होऊ शकतो, सगुण स्वरूपात देवाची आराधना करणे ही मानवी जीवन उन्नत करणारी गोष्ट म्हणून समजून घेता येऊ शकते, पण एकदा का आपल्या सर्व गोष्टींचा चालक हा दुसरा कोणी आहे असे मान्य केले की माणूस म्हणून आपल्या हातात जे निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य आहे ती गोष्ट पूर्ण संपुष्टात येते. एका कठपुतली बाहुलीप्रमाणे आपण जीवन जगत आहोत आणि त्याचे दोर ज्याच्या हातात आहेत त्या शक्तीला प्रसन्न करण्यासाठी किंवा ती नाराज होऊ नये म्हणून विविध धर्मात सांगितलेली कर्मकांडे आणि अंधश्रद्धा येऊ लागतात. म्हणजे मुळात जे अंधश्रद्धा निर्मूलन करण्याचा हे पुस्तक आव आणते, त्याच्याबरोबर उलटय़ा पावलाचा प्रवास निष्कर्षांवर पोहचेपर्यंत पूर्ण होतो. त्या मधले निष्कर्ष हे आपल्या देशात आणि राज्यात चालू असलेल्या राजकारणाला एकदम पूरक आहेत. फरक फक्त एवढाच आहे की पुस्तकातील मांडणीला हिंदू धर्माच्या राजकारणाऐवजी ख्रिश्चन धर्माच्या राजकारणाची पार्श्वभूमी आहे. लेखकाच्या धारणा आणि पुस्तकातील निर्मिक संकल्पना (जरी नाव जोतिबा फुले यांनी दिलेले वापरले असले तरी) याचे मूळ ख्रिश्चन धर्मातील वर्चस्वाच्या राजकारणातून येतात हे फारसे लपून राहत नाही.

आपल्या देशात गेल्या काही वर्षांमध्ये चालू असलेले धर्माच्या वर्चस्वासाठीचे राजकारण आणि या पुस्तकातील कल्पना यांची नावे जरी वेगळी असली तरी मूळ धारणा ही धार्मिक वर्चस्ववादाची आहे हे सामान्य नागरिक म्हणून आपण समजून घेतले पाहिजे. एकदा का विज्ञानवाद्यांना बाजूला केले की एका धर्मातील कट्टरतावादी आणि दुसऱ्या धर्मातील कट्टरतावादी यांना रान मोकळे होते. यामुळेच सध्याच्या सरकारने हा पुरस्कार दिला की काय अशी शंका मनात निर्माण होते. – हमीद दाभोलकर