|| डॉ. आशुतोष जावडेकर
चार दिशांना चौघे आहेत. अस्मित अजून त्याच्या शेतातच अडकला आहे. अरिन पाल्र्याला त्याच्या घरी आठवडाभर गेला आहे. माही कोल्हापूरला गीतामावशीला अंबाबाईचं दर्शन घडवून आणायला गेली आहे. तेजस कंपनीच्या कामानिमित्त चेन्नईला गेला आहे. दिवसभर सगळे कामात अडकलेले होते. पण आता रात्री अस्मित मत्रिणीसोबत चॅट करत बसला असला, अरिन नेटफ्लिक्सवरची मालिका बघत बसला असला, माही हॉटेलच्या रूमवर येऊन ऑफिसचं राहिलेलं काम करत बसली असली आणि तेजस मरिना बीचवर रात्री कंपनीतल्या तिथल्या कलीगसोबत चालत असला तरी ते काहीतरी मिस करत आहेत. एकमेकांना मिस करत आहेत. अजूनही कुणाकुणाला मिस करत आहेत. अरिनला एकदा तेजस म्हणालेला, ‘‘अरे, तुम्ही लोक असं सारखं ‘मिस यू’ वगैरे काय म्हणता मेसेजमध्ये? मराठी येत नाही का?’’ आणि मग त्याचं त्यालाच जाणवलेलं- की ‘मिस करणे’ याला मराठीत एकच एक क्रियापद नाही! त्यात आठवण आहे, हुरहूर आहे, वाट बघणं आहे, स्वप्न बघणं आहे. तुम्ही मिस करता एखाद्याला तेव्हा बस.. मिस करता! तेजस मिस करतोय आत्ता त्याच्या बायकोला. रोजच्या घाई- गडबडीत भेटतही नाहीत ते. मुलाची शाळा, क्लास, बॉक्सिंगचा क्लास यांच्या वेळांचे निरोप ते दोघे एकमेकांना फोनवर पाठवतात. कधी पाठवतात पावतीचे फोटो, किराण्याचं गूगल पेवर केलेलं बिल. कधी त्रोटक निरोप असतात. कधी घरी पाहुणे येणारेत, ब्रेड कुणी आणायचा, दूध संपलंय का, वगैरे.. आणि ‘लव्ह यू’ म्हणणारी हृदयचिन्हेही नवरा-बायकोची असतात आपापसात- विशेषत: भांडणाच्या दुसऱ्या दिवशी. पण कधीतरी तेजस असा चेन्नईला कामाला गेला की त्याला खरंच कडकडून बायको आठवते. तो मरिना बीचवर चालताना एकीकडे टाईप करतो : ‘मिस यू’ आणि दुसरीकडे शहाळेवाल्याला ‘नंद्री’ असं म्हणत सुट्टे रुपये परत घेत पाकिटात ठेवत असतो. मागे रेहमानचं गाणं कुणीतरी वाजवत असतं फोनवर.. कानात स्पीकर न घालता. ‘ए इदयम.. उडैत्ता नोरुंगवे..’ किती सुंदर चाल असते! सोबतचा कलीग त्याला अर्थ सांगतो- ‘‘माझं इदयम – हृदय विदीर्ण झालंय.’ एकदम तेजसला मराठीत गावं, बोलावं असं वाटतं. ‘मिस’ करतोय तो मराठीला. आठवडाभर नुसता तमिळ कलकलाट आहे. आणि ऑफिसमध्येही तमिळमध्ये घोळलेली इंग्रजीच. रिक्षावालाही साला इथे हिंदी बोलत नाही. तेजस आता हिंदीलाही मिस करतोय. मग अरिनला तो मिस करतोय. कारण त्याला अरिनचं वाक्य आठवतंय. अरिन म्हणालेला- ‘तुम्ही चाळिशीचे लोक कसले उगाच सेंटी असता. सारखं याला ना त्याला मिस करता. शाळेत आवडलेल्या पोरीला- जिला तू ते कधी सांगितलेलंही नव्हतंस- तिला तू मिस करतोस तेजसदा! आम्हाला असं होत नाही. ‘मिस यू’ असं लिहितो आम्ही; पण अनेकदा ती फॉम्र्यालिटी असते. येस, मी इराला मिस करेन, अस्मितला मिस करेन- कॉलेज संपलं की. पण किती काळ? मला नाही वाटत- काही महिन्यांहून जास्त! आम्ही तरुण सपसप स्पिंट्र मारतो रे नात्यांच्या! इतकं कुठे कुणात अडकत बसा! मिस करणं म्हणजे टोटल शक्ती वाया घालवणं. आम्हाला रोज नवी मॉडेल मोबाइलवर चालते, आवडते. तुम्ही अजून ती ‘रंगिला’मधली ऊर्मिला आठवता! चक्! मिसिंग इज इंज्युरीयस टू हेल्थ!’ पण तरी तेजस मिस करणार आहे. त्याला नाही पटत अरिनचं. आणि खुद्द अरिनही मिस करतोच आहे आत्ता नकळत. त्याला घरात कंटाळा आलाय- आठवडाभर राहिल्यावर. यापेक्षा अस्मितच्या शेतावरच राहायला जायला हवं होतं. पाल्र्याच्या मित्रांचा ग्रुप परवा भेटला कॉफीला. पण कुणीच कुणाला फारसं मधल्या काळात मिस केलेलं नसल्याने बऱ्याच कालावधीने ते एकत्र भेटले तरी गप्पा रंगल्या नाहीत! आत्ता अरिन इरालाही मिस करत नाहीये. कारण तिने आत्ताच तिचा झोपण्याच्या कपडय़ातला एक सेल्फी पाठवून दिलाय. खूश आहे अरिन तेवढय़ावर. तो मिस करत नाहीये तेजसदाला.. कारण त्याचाही मेसेज आला आहेच. तो माहीला मिस करत नाहीये, कारण माही आहेच की तिथे कोल्हापूरला- माहितीय त्याला. तो मिस करतो आहे जुन्या पाल्र्यात निर्वेध राहणाऱ्या अरिनलाच. आता शिक्षण संपत आलंय आणि मग नुसतं धावायचं आहे, हे त्याला कळलंय. डहाणूकर कॉलेज ते साठे कॉलेजमधल्या सगळ्या गल्लीबोळांत दोस्तांसोबत भटकणारा अकरावी- बारावीतला अरिन जो होता त्याला- आत्ताचा अरिन जबरदस्त मिस करतोय. आणि हो, अरिन त्याच्या पुण्याच्या कॉलेजच्या कॅन्टीनमधली मिसळ मिस करतोय..
रेळेकाका तिकडे मुलाकडे अमेरिकेत राहत असताना भारताला मिस करत आहेत. भारतात आत्ता पडणारा सुंदर पाऊस आठवत ते हळहळताहेत. जुन्या कविता आठवत राहतात. बा. भ बोरकर त्यांचे लाडके कवी. ‘हवा पावसाळी, जरा रात्र काळी..’ असं ते गुणगुणत असतात. पण मागे मात्र वेगळी कविता रेंगाळते : ‘कळत जाते तसे का रे एकटा एकटा होतो जीव?’ जगताना भेटलेली अनेकानेक माणसे त्यांना नित्य आठवतात. कधी कोण केव्हा स्मरेल हे त्यांचं त्यांनाही आजकाल कळत नाही. म्हातारपणी त्यांनी ऐकलंय- की लघवीवरचा ताबा जाऊ शकतो. आजकाल त्यांना भय वाटतं- की तसा मनावरचा ताबा जाणार नाही ना? आठवणींच्या, स्मरणाच्या गत्रेत हरवायला होणार नाही ना? मग ते बेसमेंटमध्ये जातात. मुलाच्या खास अमेरिकन ढंगाने नटवलेल्या छोटय़ाशा बारकडे नजर टाकतात. आणि मग नुसतेच तिथे काही काळ हरवून जातात. धुक्यात बोट समुद्रात हरवावी तसे! तेजसला मेसेज टाकतात : ‘कसा आहेस?’ तेजसला तोवर माही आठवते. तो तिला लिहितो, ‘पोचलीस ना गं नीट ड्राइव्ह करत कोल्हापूरला?’ ती आता काम थांबवून गीतामावशीसोबत रंकाळ्यावर चक्कर मारते आहे. रात्र झाली असली तरी निर्जन नाहीये तिथे. तलावातलं पाणी दिसण्याआधी पावभाजी आणि भेळेच्या दुकानाचे चकचकीत दिवेच त्यांना दिपून टाकतात. त्या दोघी तिथे गेल्यावर आता शांत राहतात. थोडं चालतात. कोल्हापूरची सुंदर हवा आहे. गीतामावशीला अगदी बरं वाटतंय. ती म्हणते, ‘आज अंबाबाईचं दर्शन नीट झालं.. नाही?’ माही मान हलवते. ‘आज मंदिरात ह्य़ांची फार आठवण आली. मला प्रेमाने घेऊन यायचे. पोमेंडीतून कोल्हापूर तसं लांब नाही म्हणा. पण मी काही म्हणण्याआधीच हे मला सांगायचे, की या रविवारी जाऊ या देवीला.’ माही विचारते, ‘मिस करतेस खूप काकांना?’ गीतामावशी सुस्कारा टाकत म्हणते- ‘गेलेला माणूस परत काही यायचा नाही हे कळतं बुद्धीला.. पण मनाला नाही अगं कळत पटकन्. फार मेहनत घ्यावी लागते ते कळवून घेण्यासाठी.’ माही समजू शकते आहे. रिकीला मिस करणं तिने आता प्रयत्नपूर्वक थांबवलं आहे. अमेरिकेतले तिचे दिवस म्हणजे रिकीच्या सहवासाचे दिवस! पण आजकाल ती वर्तमानात राहते. अरिनचं ऐकते. मिस करत बसत नाही कुणाला. रंकाळ्याचं शांत, आंदुळणारं पाणी ती बघत असताना मागून गीतामावशी थट्टेत म्हणते, ‘तुझ्यासाठी इथला कोल्हापूरचा लांब मिशीवाला आणि फेटेवाला कुणी रुबाबदार मुलगा शोधायला पाहिजे. म्हणजे आमचं अंबाबाई दर्शन सारखंच होणार!’ हसतात त्या दोघी.. रात्री हॉटेलवर परत जाताना माहीला कॅला क्विनच्या पुस्तकातलं वाक्य आठवत राहतं : But nothing makes a room feel emptier than wanting someone in it…. तिकडे अस्मित शेतावर रात्री एकटा बसलाय. त्याला शहरच आवडतं आजकाल. नाही रमत त्याचा जीव शेतात. नगरमध्येही नाही रमत. पुण्यात-मुंबईत अशा मोठय़ा गावात बरं असतं. दोस्त जीव लावतात. इकडे कोण राहिलंय गावाकडे? अरिनला मिस करतोय तो आत्ता.
पण त्याला तो मेसेज नाही पाठवणार. फार शेफारतो अरिन मग!
तेजस चेन्नईच्या समुद्राकडे नजर लावून शांत बसलाय. त्याचा सोबती त्याचा निरोप घेऊन गेलाय. आसपास काही प्रेमी जोडपी आहेत. काही छोटी मुलं खेळत आहेत. मिस करतोय तो आत्ता इथे नांदेडच्या शाळेच्या दोस्तांना, गोदावरी नदीला, आई-बाबांना, बायको-मुलाला, मित्र-मत्रिणींना. भरून येतंय त्याला.. आणि त्याला अरिनच्या पिढीसारखं ठरवून कोरडं नाही व्हायचंय! मिस करायचंय त्याला आत्ता. त्याला ‘ला ला लँड’ चित्रपटामधलं सुंदर गाणं आठवतंय.. ‘सिटी ऑफ स्टार्स.. आर यू शायिनग जस्ट फॉर मी?’ मरिना बीचच्या शेजारचं दीपगृह समुद्राच्या जलात दूरवर प्रकाश पसरवत आहे. आणि सगळंच कसं अंधूक, हवंहवंसं, जीवघेण्या ओढीसारखं तेजसच्या डोळ्यांपुढे तरळतं आहे..
ashudentist@gmail.com