मागच्या आठवडय़ात शशांक सोळंकींबद्दल लिहिताना मी असा उल्लेख केला होता, की मी जेव्हा पहिल्यांदा ‘वादळवाट’च्या सेटवर गेलो होतो तेव्हा तिथे एक धीरगंभीर माणूस होता. अत्यंत शांतपणे तो स्क्रीप्ट वाचत बसला होता. आजूबाजूला शाळा सुटल्यावर मुलं करतात तसा कलकलाट सुरू होता. पण त्याची समाधी काहीही केल्या भंग पावत नव्हती. आधी मला तोच माणूस शशांक सोळंकी वाटला होता. नंतर कळलं की, तो संगीत कुलकर्णी होता. ‘वादळवाट’चा दिग्दर्शक आणि नंतर ‘तुझ्याविना’, ‘थरार’, ‘अस्मिता’, ‘शुभंकरोति’, ‘तू माझा सांगाती’ यांसारख्या मालिकांचा निर्माता-दिग्दर्शक. संगीतदादाकडे पाहिलं, की मला पाण्यावर चालणारं जहाज आठवतं. मोठय़ा जहाजाकडे पाहून त्याच्या वेगाचा अंदाज कधीच येत नाही. खरंतर ते कमालीच्या वेगानं चाललेलं असतं, पण आपल्याला दिसताना ते स्थिर दिसतं. संगीतदादाचं बोलणं संथ आहे. त्याचा फोन आला तरी आपण फोन घेतल्यावर पलीकडून ‘हॅलो’ यायला काही सेकंद जातात. आमच्या चौदा वर्षांच्या ओळखीत मी त्याला आवाजाचे वरचे स्वर वापरताना फार म्हणजे फारच कमी वेळा ऐकलंय. त्याचं चालणंही संथ आहे. ‘पाऊल विचारपूर्वक टाका’ ही फ्रेज त्यानं तंतोतंत अंगीकारल्यासारखा तो चालतो. पण वरवर संथ वाटत असलं तरी हे कमालीच्या वेगानं पाणी कापणारं जहाज आहे.

मी ‘वादळवाट’ या मालिकेसाठी ‘जयसिंग राजपूत’च्या भूमिकेसाठी ऑडिशन दिली होती. माझी निवड अर्थातच झाली नाही. सुबोध भावेनं ही भूमिका केली. पुढे मी संवादलेखक म्हणून ‘वादळवाट’शी जोडला गेलो. एका मार्च महिन्यात मी, अभय परांजपे, शशांक सोळंकी आणि संगीतदादा आम्ही सगळे माझ्या चौलच्या घरी ‘वादळवाट’च्या स्टोरी सिटिंगसाठी गेलो होतो. त्या चर्चेत ‘समशेर सिंग’ या पात्राचा जन्म झाला. शशांक सर अत्यंत उत्स्फूर्तपणे म्हणाले, ‘‘हा रोल चिन्मय करेल.’’ आणि मी तितक्याच उत्स्फूर्तपणे म्हटलं की, ‘‘मला नाही करायचा हा रोल.’’ आपण गब्बरसाठी ऑडिशन दिली होती आणि आता आपल्याला ‘सांबा’ची भूमिका दिली जातेय, असा अत्यंत बालिश विचार माझ्या मनात आला. चर्चा पुढे सुरू राहिली. मग जेवणं झाली. जेवण झाल्यावर  संगीतदादा माझ्या खांद्यावर हात टाकून म्हणाला, ‘‘चल, पान आणायला जाऊ.’’ आम्ही गेलो आणि तिथे पानाच्या दुकानावर पानवाला पानांवर कत्था-चुना लावत असताना संगीतदादानं मला शब्दानं सोलायला घेतलं. मला तो सगळा प्रसंग अजूनही चित्रासारखा स्पष्ट आठवतो. चौल नाक्यावर पानवाल्याच्या दुकानासमोर हाफ चड्डय़ा घातलेले आम्ही दोघं, आणि तिथं माझ्या या कृष्णानं मला गीता सांगितली. त्या दिवशी संगीतदादा मला पान आणायला घेऊन गेला नसता, तर ‘शेरा’ झाला नसता.

एरवी अत्यंत शांत आणि मितभाषी असलेला संगीतदादा सेटवर असला, की लोकं उगिचंच सावरून राहत. काही माणसांच्या व्यक्तिमत्त्वात ही जादू असते. तसं पाहायला गेलं तर संगीतदादाची उंची पाचपाच-पाचसहापेक्षा जास्त नाही. मिशी काढली तर तिशीतला वाटेल असा तो अजूनही दिसतो. आवाजही तसा मऊच. पण त्याच्या पर्सनॅलिटीत असं काहीतरी आहे ज्यामुळे तो सेटवर असला, की माणसं शहाण्यासारखी वागतात. सकाळी सेटवर गेलं, की संगीतदादा एका हातात पेन्सिल घेऊन स्क्रिप्टवर मार्किंग करत बसलेला दिसे. कामाची पद्धतपण अत्यंत शिस्तबद्ध, नो नॉनसेन्स आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अभिनेत्याच्या, तंत्रज्ञाच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर द्यायची तयारी. आपल्याकडे दिग्दर्शकांच्या अनेक पद्धती आहेत. काही लोकांची तंत्रावर हुकूमत असते. तिरपागडे कॅमेरा अँगल्स, काळाच्या एक पाऊल पुढच्या एडिटिंग टेक्निक्स त्यांना अवगत असतात. त्यांना उत्तम शॉट घेता येतो, पण त्यांना चांगली कथा सांगताच येते असं नाही. काही दिग्दर्शकांची कथेवर कमांड असते, पण तंत्राच्या बाबतीत ते त्यांच्या कॅमेरामनवर, असोसिएटवर खूप अवलंबून असतात. संगीतदादाच्या भात्यात ही दोन्ही अस्त्रं आहेत. राजदत्त, गिरीश घाणेकर अशा मातबर  दिग्दर्शकांकडे त्यानं उमेदवारी केलीय. त्याचे वडील दत्ता केशव सिद्धहस्त लेखक. स्वत: संगीतदादा एकांकिका स्पर्धा, राज्यनाटय़ स्पर्धेच्या मुशीतून तयार झालाय. त्यामुळे कथा आणि तंत्र या दोन्हीशी तो लीलया खेळतो. अभिनेत्यांना एखादी गोष्ट समजावून सांगताना त्याला शब्द शोधावे लागत नाहीत, त्याच्या हळुवार आवाजात तो गोष्ट सांगितल्यासारखे भूमिकेचे पदर तुम्हाला उलगडून दाखवतो. मग ती भूमिका हसत हसत लोकांचे जीव घेऊ शकणाऱ्या समशेरची असो किंवा आपल्या अभंगांमधून जगासमोर ज्ञानाची दारं उघडी करणाऱ्या तुकाराम महाराजांची.

मी संगीतदादाबरोबर चार मालिका केल्या. स्टोरी सिटिंग्जच्या निमित्तानं आम्ही बाहेरगावीही खूप एकत्र राहिलो. २००४ साली ‘इफ्फी’ कायमस्वरूपी गोव्यात शिफ्ट झाला. मी, संगीतदादा आणि अभय सर दैनंदिन मालिकांच्या रामरगाडय़ातून दहा दिवस रजा काढून तो फिल्म फेस्टिव्हल पाहायला गेलो होतो. संगीतदादा शालान्त परीक्षेची तयारी करणाऱ्या अभ्यासू मुलाच्या निगुतीनं रोज रात्री फेस्टिव्हलमधल्या फिल्मस्ची पुस्तिका घेऊन बसे. उद्या कुठले कुठले सिनेमे आहेत त्यांचे सिनॉप्सीस वाचून काढे. मग त्या दिवसात जास्तीत जास्त आणि चांगले सिनेमे पदरात कसे पाडून घेता येतील याचं वेळापत्रक बनवे. मी आणि अभय सर हुशार विद्यार्थ्यांवर अवलंबून असलेल्या उनाड मुलांसारखे त्यानं दिलेलं वेळापत्रक ‘कॉपी’ करत असू. बरेचदा दहाव्या मिनिटाला सिनेमा बोअर करे. आम्ही दोघं थिएटरमधून बाहेर येऊन गोव्याच्या गमतीजमती पाहण्यात रमायचो. संगीतदादा मात्र मुख्य पेपरला पाच-सहा दणदणीत सप्लीमेंट जोडून उठणाऱ्या मुलासारखा संपूर्ण सिनेमा पाहूनच उठे. ‘‘वाईटच होता पिक्चर. पण नेमकं चुकतं कुठे तेही कळलं पाहिजे,’’ आमच्या खिल्लीला तो तितक्याच शांतपणे उत्तर देई.

त्यानंतरच्या काळात संगीतदादा आणि माझ्या वाटा काही काळापुरत्या दुरावल्या. संगीतदादानं ‘मिशन चॅम्पियन’ नावाचा सिनेमा केला. किशोरवयीन मुलावर आपल्या पालकांच्या अपेक्षांचं ओझं वाढत गेल्यावर नेमकं काय होऊ शकतं, याचं उत्तम चित्रण या सिनेमात आहे. मग संगीतदादा काही काळ हिंदी मालिकांकडे वळला. नाही म्हणायला त्या आधी आम्ही ‘शुभंकरोति’ नावाची मालिका एकत्र केली. पण ती मालिका करताना मला भयंकर मनस्ताप झाला. अतिशय छान, नाजूक कथानक असलेली ही मालिका नंतर टी.आर.पी.चा पाठलाग करता करता कुठल्या कुठे भरकटत गेली. संगीतदादामधला दिग्दर्शक आणि निर्माता यांतला झगडा मला तेव्हा जाणवत होता. कथेत करावे लागणारे अपरिहार्य बदल त्याच्यातल्या दिग्दर्शकाला कदाचित पटत नव्हते, पण निर्माता म्हणून मालिकेचं वारू दौडत ठेवणं अपरिहार्य होतं.

२०१४ सालच्या जून महिन्यात मला एका रात्री संगीतदादाचा फोन आला. ‘‘तुकाराम आणि आवलीवर सीरियल करतोय.’’

‘‘कळलं मला.’’ मी म्हणालो.

‘‘आवलीच्या वडिलांचा रोल करणार का? कॅमीओ आहे.’’ तेव्हा ‘तू तिथे मी’ या मालिकेचं शूटिंग संपून काही दिवसच झाले होते, पुन्हा रोज उठून शूटिंगला जायला मन तयार नव्हतं. मी नम्र नकार कळवला. दोन दिवसांनी पुन्हा फोन आला- ‘‘तुकाराम करशील?’’

आता पॉज घ्यायची पाळी माझी होती. ‘‘मी? तुकाराम?’’

‘‘ऑडिशन द्यावी लागेल.’’ इथे माझ्या आत उलथापालथ घडवून त्याचा आवाज तितकाच शांत होता.

दोन दिवसांनी मी ‘तुकाराम’च्या ऑडिशनसाठी उभा राहिलो. संगीतदादा जवळ आला, त्यानं शांतपणे माझ्या खांद्यावर हात ठेवला. ‘‘चॅनलचा तुझ्या नावाला विरोध आहे. तुझी इमेजच वेगळी आहे कारण. पण मला तू हवायस. चांगली दे ऑडिशन.’’ बायकोवर संशय घेणाऱ्या आक्रस्ताळी नवऱ्याची भूमिका मी त्या आधी दोन वर्ष करत होतो. अशा नटाचा ‘तुकाराम’ म्हणून विचार करणं हेच मुळात धाडसी होतं.

शूटिंगच्या पहिल्या दिवशी, पहिल्या शॉटला संगीतदादा मॉनिटरमागे बसला होता. पहिला शॉट झाला, त्यानं मला सहज बाजूला घेतलं. ‘‘आपण ‘तुकाराम’ करतोय याचं प्रेशर दिसतंय खूप. ते सोडून दे. तो तुझ्या-माझ्यासारखाच एक सामान्य माणूस होता. आयुष्यात जे समोर आलं त्याला तो सामोरा गेला आणि त्यात त्याच्या विठ्ठलभक्तीनं त्याला तारलं, आणि तो ‘तुकाराम’ झाला. खांद्यावरचं ओझं उतरव. सोपं कर सगळं स्वत:साठी.’’ आज ‘तू माझा सांगाती’ ही मालिका हजार भाग पार करून पुढे गेलीय; पण हेच वाक्य उराशी बाळगून ‘तुकाराम’ या माणसाला, भूमिकेला, चमत्काराला मी आजही सामोरा जातोय. माझ्या या वाटाडय़ानं पहिल्याच दिवशी माझी वाट खूप सोपी करून दिली.

त्याला जसं भूमिका सोपी करून सांगण्याचं तंत्र अवगत आहे, तसंच आपल्याला हवं ते अभिनेत्याकडून काढून घेण्याचं तंत्रही अगवत आहे. मग अगदी त्या अडचणीच्या तारखा का असेना. ‘‘ही बघ, अशी परिस्थिती आहे. आता तू ठरव. तू तारीख दिलीस तर काम होऊ शकेल, नाहीतर..’’- मंद हसून तो वाक्य अधांतरी सोडतो. मग आपलं आपल्यालाच गिल्ट! झक मारत आपण अ‍ॅडजेस्टमेंट करतो. क्रिकेटमध्ये आग ओकणारे वेगवान गोलंदाज बाऊन्ड्री बाहेर फेकले जात असताना, हळूच एक स्लोअरवन टाकून विकेट काढणाऱ्या गोलंदाजासारखा संगीतदादा समोरच्याची विकेट काढतो. तुमच्याशी वाद घालणाऱ्याला, भांडणाऱ्याला तुम्ही ‘नडू’ शकता. पण ‘तूच ठरव आता कसं काय ते..’ असं म्हणून काळजालाच हात घालणाऱ्याचे हात तुम्ही कसे धरणार?

संगीतदादाच्या या सगळ्या प्रवासात त्यानं अनेक माणसं जोडली आहेत. काही माणसं त्याच्याबरोबर वर्षांनुवर्ष काम करतायत. पण एकीकडे तो सेंचुऱ्या मारत असताना नॉन स्ट्रायकर एंड नेटानं धरून ठेवणारी त्याची जोडीदार म्हणजे त्याची पत्नी रुची. संगीतदादाच्या सगळ्या मालिकांमध्ये ती तंबू तोलून धरणाऱ्या खांबाच्या खंबीरपणानं उभी असते. हे सगळं असलं तरी मला त्याच्याबद्दल एक तक्रार आहे. ‘निर्माता संगीत कुलकर्णी’नं अलीकडे ‘दिग्दर्शक संगीत कुलकर्णी’ला जवळजवळ अज्ञातवासातच ढकललंय. संगीतदादा आता ‘शो क्रिएटर’ म्हणून काम पाहतो. पण गळ्याभोवती रुमाल आणि हातात पॅड धरून कॅमेऱ्याच्या बाजूला उभा राहिलेला संगीतदादा आता बघायला मिळत नाही. मध्यंतरी त्यानं ‘क्षणोक्षणी’ नावाचा सिनेमा केला. सुबोध भावे, उमेश कामत, अमृता सुभाष, मधुरा वेलणकर, अतुल परचुरे असे एकापेक्षा एक कलाकार या सिनेमात आहेत. पण दुर्दैवानं हा सिनेमा रिलीजच होऊ शकलेला नाही. निर्माता म्हणून संगीतदादा आता बऱ्यापैकी यशस्वी आहे आणि ते यश असंच वाढत राहो. पण ‘अ फिल्म बाय संगीत कुलकर्णी’ लवकरच पाहायला मिळावी, अशी माझी एक प्रेक्षक म्हणून माफक अपेक्षा आहे.

चिन्मय मांडलेकर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

aquarian2279@gmail.com