|| सुहास पळशीकर
महात्मा गांधींच्या दीडशेव्या जयंती वर्षांत जसे सरकारी गांधींचे स्मरण केले जाईल, तसेच इतर अनेक गांधींचेही स्मरण होईलच. एकीकडे सरकारने गांधींना स्वच्छतेमध्ये बंदिस्त केले आहे; आणि दुसरीकडे गांधींच्या मारेकऱ्याची आठवण सन्मानाने जपण्याचे दिवस आले आहेत. अशावेळी इतर गांधी काहीसे झाकोळून गेले तर नवल नाही. अशा वातावरणात गांधींच्या जीवनशैलीचा स्वत:च्या आयुष्यात अंगीकार करून त्यांचा वारसा उद्याच्या समाजापर्यंत पोचवण्याचा जिद्दीने प्रयत्न करणारे दिलीप कुलकर्णी यांच्यासारखे अनेक कार्यकर्ते देशभर अजूनही वेगवेगळ्या भागांत पसरलेले आहेत, ही बाब उल्लेखनीय आहे.
आता दिलीप कुलकर्णी यांनी ‘उद्यासाठी’च्या गांधींवर स्वत:चे आणि इतर अनेक लेखकांचे विचार एकत्र करून मांडले आहेत आणि त्यातून मराठीमध्ये ‘गांधी’ या विषयावर बहुपदरी चर्चेला एक वाट मिळवून दिली आहे. ‘गांधी उद्यासाठी’ या पुस्तकाचे शीर्षक त्यामुळेच आकर्षक वाटते. कारण येत्या शतकात बहुविध सामाजिक प्रश्नांना भिडताना गांधी कसे आणि कु ठे रस्ता दाखवतील, हा नक्कीच चर्चेचा विषय आहे.
एकूण सतरा विभागांमध्ये मिळून तब्बल एकोणपन्नास छोटे-मोठे लेख आणि मिलिंद बोकील यांची प्रस्तावना, तसेच संपादकांचे प्रास्ताविक आणि समारोप असा भलामोठा ऐवज घेऊ न हे पुस्तक आपल्यापुढे येते. खरे तर पुढे चर्चा केल्याप्रमाणे पुस्तकातील अनेक विचार आणि लेख यांच्याबद्दल मतभेद असून देखील, या विषयावर असा महत्त्वाकांक्षी पुस्तक प्रकल्प करताना जास्त सफाईदार संपादन आवश्यक होते. लेखांची निवड हा संपादक कु लकर्णी यांचा अधिकार होता हे मान्य केले, तरी किमानपक्षी त्यांची जास्त संगतवार मांडणी करण्यासाठी प्रयत्न व्हायला हवे होते. उदाहरणार्थ- अर्थकारण, विकास, ग्रामविकास, शेती इत्यादींविषयीच्या लेखनाचा एक विभाग होऊ शकला असता. किंवा व्यक्तिगत जीवनात करावयाच्या गांधीवादी परिवर्तनाचा एक विभाग होऊ शकला असता, इत्यादी. तसेच, प्रत्येक विभागात घेतलेले लेख विस्कळीत वाटू नयेत म्हणून संपादकांनी त्या-त्या विभागाला संपादकीय टिपण जोडले असते तर वाचकाला जास्त सोयीचे गेले असते.
अर्थात तरीही वर म्हटल्याप्रमाणे, मराठीत या विषयावर चर्चा सुरू करून देण्यासाठी हा लेखसंग्रह किती चालना देणारा आहे, आणि संपादक म्हणतात त्याप्रमाणे तरुणांना आकर्षित करण्यासाठी त्याचा किती उपयोग होईल, हे प्रश्न जास्त महत्त्वाचे आहेत. गांधी जाऊ न आता सात दशके उलटली, त्यामुळे आज आणि उद्या गांधींची आठवण का ठेवायची? हा प्रश्न अर्थातच अत्यंत कळीचा आहे. आधुनिक भारतातील अत्यंत मूलभूत वैचारिक योगदान देणाऱ्या अगदी थोडय़ा व्यक्तींमध्ये गांधींचा समावेश करावा लागेल. तो वैचारिक वारसा एव्हाना आपण जवळपास सोडून दिला आहे. असा सामाजिक करंटेपणा करायचा नसेल तर गांधी विचाराचा अभ्यास, परीक्षण आणि परिपोष होणे गरजेचे आहे. या अर्थाने, ‘गांधी उद्यासाठी’ हा प्रकल्प महत्त्वाचा आहे.
मात्र, शीर्षकातील हा आकर्षकपणा आणि सदर पुस्तकातील लेखांची झेप यात फारच तफावत आहे. याचे एक कारण म्हणजे, बहुतेक लेख वेगवेगळ्या संदर्भात वेगवेगळ्या लेखकांनी वेगवेगळ्या वेळी लिहिले आहेत हे आहेच; पण गांधी म्हणजे काय? आणि उद्या ते कशासाठी लागणार आहेत? याबद्दल स्वत: संपादक कुलकर्णी आणि अनेक लेखकांच्या मनात ठोकळेबाज आणि प्रसंगी बालसुलभ कल्पना असल्यामुळेही हे जाडजूड पुस्तक वाचकांची बव्हंशी निराशा करणारे आहे.
अर्थात, लेखकांना दोष देतानाच त्यांच्यापुढील आव्हानांची जाणीव ठेवणे आवश्यक आहे. गांधी अनेक होते आणि गांधी सर्वत्र होते. म्हणजे, त्यांनी आपल्या दीर्घ आयुष्यात अनेक क्षेत्रांमध्ये काम केले आणि अनेक क्षेत्रांबद्दल स्वत:चे म्हणून काही ठोकताळे बसवले आणि म्हणूनच सर्वच विषयांवर मते मांडली. आहारनिद्रादी नित्य मानवी व्यवहार, आरोग्य आणि वैद्यकापासून ते शिक्षण आणि सार्वजनिक स्वच्छता इथपर्यंत आणि संस्कृती, राज्यसंस्था यांसारखे व्यापक सामाजिक विषय या सर्वाविषयी गांधींनी काहीतरी कृती केली किंवा काहीतरी विचार मांडले. त्यामुळे कोणाला फक्त- खादी घातली की गांधी स्वीकारले- असे वाटेल. कोणाला आधुनिक वैद्यकाला नाके मुरडली की आपण गांधीवादी झालो असे वाटेल. कोणाला (२ ऑक्टोबरला) हाती झाडू घेतला की गांधींचा वारसा टिकवला याचे समाधान मिळेल, तर कोणाला गांधींचे गाईबद्दलचे प्रेम म्हणजे गांधीवाद वाटेल. त्यामुळे त्यांचे अनुयायी म्हणवणाऱ्या लोकांमध्ये वैचारिक दिशाभिन्नता आढळते. सादगीवाले, चरखावाले, गायवाले, शाकाहारवाले, आयुर्वेदवाले, यंत्र-विरोधक, छोटे यांत्रिक अशा सगळ्यांच्या गर्दीत (सत्याग्रही) गांधी हरवले नाहीत तरच नवल!
दुसरे म्हणजे, समाजापुढे किंवा जीवनापुढे असणाऱ्या सर्व प्रश्नांना एकाच व्यक्तीच्या विचारात सुफळ संपूर्ण उत्तरे मिळाली पाहिजेत अशा श्रद्धावान जगात आपण वावरतो. त्यामुळे या पुस्तकात अनेक गांधीप्रेमिकांच्या लेखनात सर्व समस्यांवर एकच अक्सीर इलाज म्हणून गांधी भेटतात, सगळे प्रश्न आपल्या (म्हणजे आजच्या समाजाच्या) अनुचित आयुष्यामधून निर्माण होतात यावर विश्वास ठेवून गांधींना शोधणारे त्यांचे अनुयायी इथे भेटतात. आणि गंमत म्हणजे, सगळे गांधी एकमेकांना सहसा भेटत नाहीत की काय अशी शंकाही येते. सर्वच ‘विचारप्रणालीं’च्या वाटय़ाला येणारे आणखी एक भागधेय गांधीविचाराच्यादेखील वाटय़ाला येते, ते म्हणजे एक प्रकारचा आग्रही मूलतत्त्ववाद. म्हणजे गांधीप्रणीत मार्ग हाच एकमेव मार्ग असा दावा येतो. किंवा आजचे सगळे जीवनमान टाकाऊ , नि:सत्त्व आहे अशी निराशा आढळते.
अशा गदारोळात मग चतुरपणे पटेलांवरचा अन्याय सांगणारे अविनाश धर्माधिकारी यांचे लेखन अलगदपणे या पुस्तकात घुसलेले दिसते. गांधींच्या ‘राज्यविचारा’वर जसा नेहरूंचा फारसा विश्वास नव्हता, तसाच पटेलांचाही नव्हता हे माहीत असूनदेखील धर्माधिकारी गांधींच्या नावाने सुरुवात करून नेहरूंवर टीका करताना बिनदिक्कत ‘आता’च्या ‘किमान सरकार, कमाल प्रशासन’ या कार्य-तत्त्वाला गांधीवादी असल्याचे प्रमाणपत्र देऊ न टाकतात (पृ – ५२६); आणि ‘संघ, सावरकरांप्रमाणेच अखंड भारत हे गांधींचे- सुद्धा स्वप्न होते,’ असं दडपून सांगतात (पृ – ५१८- अधोरेखन माझे). असे अनेक फसवे, पोकळ आणि संदर्भरहित गांधी नेहमीच लोकांपुढे प्रस्तुत केले जातात; आणि हे पुस्तकदेखील हा धोक्याचा रस्ता टाळू शकलेले नाही.
व्यापक अर्थाच्या राजकारणापासून हे पुस्तक कमालीचे अलिप्त राहते. त्याला अपवाद केवळ सुनीती सु. र. यांच्या प्रदीर्घ लेखाचा. त्यांनी समकालीन आंदोलनांचा थेट लोकशाहीशी असणारा संबंध अधोरेखित केला आहे. पण पुस्तकातील इतर लेखांना हे राजकीय परिमाण अजिबातच नाही. अर्थात यातील अनेक लेख प्रामाणिक भावनेने लिहिलेले आहेत. अशा अत्यंत तळमळीने लिहिलेल्या लेखांमध्ये मानवी समाजाच्या आजच्या स्थितीबद्दल समीक्षा आहे. तिच्या उपभोगवादी दिशेला विरोध आहे (स्वत: दिलीप कुलकर्णी यांचे लेख). आजच्या प्रगतीचा निषेध आहे, पर्यावरण हे अंतिम आहे आणि मनुष्याने त्यात हस्तक्षेप करू नये अशी अपेक्षा आहे (याला माधव गाडगीळांचा लेख अपवाद). ग्रामविकासाची अ-राजकीय मांडणी आहे (उदाहरणार्थ- गिरीश बापट यांचा लेख), आणि मंगला आठलेकर यांच्यासारख्या एखाद्या लेखाचा अपवाद सोडला, तर सर्वसाधारणपणे आज आणि उद्या सर्व प्रश्नांवर फक्त गांधीच उत्तरे देऊ शकतात, असा एकंदर सूर आहे. त्यामधली निष्ठा वादातीत आहे, पण राजकारण व सामाजिक वास्तव यांच्याविषयीच्या भानाचा अभाव, चिकित्सेची तयारी अपुरी असणे, भावुकता.. अशा मर्यादांमुळे या लेखनाला भारावलेल्या स्तुतीचे स्वरूप येते किंवा अ-राजकीय, बिन-सार्वजनिक, वैयक्तिक तपश्चर्येचा सूर त्यातून आळवला जातो.
गांधी सगळ्याच प्रश्नांना पुरेशी उत्तरे देऊ शकतात हा दावा अतिशयोक्त तर आहेच, पण त्यात खुद्द गांधींची सत्य शोधण्याची पद्धत सोडून देण्यावर आणि पोथिनिष्ठा अंगी बाणवण्यावर भर दिला जातो. गांधींची विचारपद्धती न स्वीकारता त्यांचे विचार स्वीकारण्याची चूक अनेक वेळा केली जाते आणि या पुस्तकातील बहुतेक लेख या पठडीतले आहेत, ही खरी समस्या आहे.
विशेष म्हणजे मिलिंद बोकील यांच्या प्रस्तावनेत ज्या मुद्द्दयाचा थेटपणे उल्लेख येतो तो अत्यंत मध्यवर्ती मुद्दा अख्ख्या पुस्तकात गायब आहे- तो म्हणजे हिंसा आणि अहिंसेचा. गांधी-विचार म्हटल्यावर सत्याग्रह (म्हणजे सामूहिक लढे), हिंसा आणि अहिंसा यांचा संघर्ष. राज्यसत्ता अधिकाधिक मानवी, अहिंसक आणि म्हणून दमनातीत बनवणे. व्यक्तीमधील बदल आणि सामाजिक बदल यांचे एकात्मिक नाते, आणि ‘विकास’ व चिरंतन सार्वजनिक हित यांच्या संतुलनाची धडपड.. या किमान पाच बाबी सर्वात जास्त पथदर्शक म्हणून दाखवता येतील. त्यांची खरोखरीच आजच्या आणि उद्याच्या संदर्भात चर्चा झाली तर ती गांधी-विचारात मोठी भर ठरेलच; पण उद्याच्या समाजाला दिशा देण्यासाठी तिचा उपयोग होऊ शकेल. परंतु त्याऐवजी, सुटे-सुटे गांधीप्रणीत कार्यक्रम घेऊ न त्यांचे उदात्तीकरण करणारे लेखन झाले तर त्यातून गांधींचे रूपांतर संत- महात्म्यांमध्ये किंवा अर्कचित्रांमध्ये (कॅरिकेचर्स) होते.
गांधीविचाराला सामोरे जाण्यासाठी तीन सूत्रे मनाशी बाळगायला हवीत. एक म्हणजे, दूरचे क्षितिज आणि जवळ- जिथे पोचून नांगर टाकता येईल असे बेट.. याचा समतोल राखण्याचे भान गांधींना होते. आज गांधींच्या कल्पनेतील विकासाचे राजकारण करताना या सूत्राचे भान राखणे जरुरीचे आहे, नाहीतर गांधीविचार म्हणजे भव्य कविकल्पना ठरेल, पण प्रचलित समाजापासून तो तुटलेला राहील.
दुसरे सूत्र म्हणजे, गांधी विचार हा आज्ञावली म्हणून वापरणे निर्थक आहे. त्यापेक्षा गांधी वर्तमानाची चिकित्सा करण्याची दिशा देतात हे लक्षात ठेवले पाहिजे. अशी चिकित्सा करताना काही मूलभूत तत्त्वे असतील, पण चिकित्सेनंतर जे ‘राजकारण’ (म्हणजे कृतीचे क्षेत्र) असेल ते स्थलकालसापेक्ष असेल, प्रत्येक समाजाची वाटचाल त्याच्या त्या-त्या वेळच्या प्रज्ञेने होईल, व्हायला पाहिजे. गांधी ब्ल्यू-प्रिंट देत नाहीत, तर आजच्या वास्तवाचे परीक्षण करण्यासाठीची दृष्टी देतात असे हे सूत्र आहे. अहिंसा, सर्वाचे हित, आणि मानवी जीवनाची प्रतिष्ठा ही आधारतत्त्वे घेऊ न आपण निघालो, तर आज त्या तत्त्वांच्या विरोधात सर्वात मोठा जो अडथळा असेल त्याविरोधात सामूहिक ताकद उभी करणे हे आजचे गांधीवादी राजकारण असते. आणि म्हणून आज त्या तत्त्वांच्या विरोधात काय आहे हे ठरवून लढणे हे कायमच करत राहण्याचे राजकारण असते.
तिसरे सूत्र म्हणजे इतिहासाचे भान. इतिहासाकडे परत जाता येत नाही, तसे परत जाणे हा गांधींचा कार्यक्रम नाही. मानवी इतिहास हा पुढच्या समाजासाठी शिकण्याची सामग्री असतो, परतण्याचा रस्ता नव्हे. त्यामुळे पूर्वी समाज किंवा माणूस कसा साधा, सुखी किंवा सच्चा होता अशा मांडणीला.. किंवा निसर्गाकडे परत चला, गावाकडे परत चला अशा कार्यक्रमाला गांधीवादी म्हणता येणे अवघड आहे.
दुर्दैवाने या पुस्तकात परिश्रमपूर्वक एकत्र मांडलेले अनेक लेख या सूत्रांचे भान ठेवत नाही. आणि त्यामुळे उद्याच्या राजकारणासाठी त्यांचा उपयोग कितीसा होईल याची शंकाच आहे.
‘गांधी उद्यासाठी’,
संपादक- दिलीप कुलकर्णी,
राजहंस प्रकाशन,
पृष्ठे- ५७९, किंमत- ६०० रुपये.