डॉ. सुनीलकुमार लवटे हे सामाजिक कार्यातील सुपरिचित नाव. समाजसमूहातील वंचित-उपेक्षित घटक हा त्यांचा अतीव आस्थेचा विषय. या आस्थेतूनच समाजमन समूळ पोखरणाऱ्या प्रश्नांवर, दुर्लक्षित घटकांवर ते सातत्याने लिहीत आले आहेत. अशा प्रसंगानुरूप केलेल्या लेखांचे संकलन असलेला ‘एकविसाव्या शतकातील सामाजिक प्रश्न’ हा त्यांचा लेखसंग्रह.

मागील दोन दशकांपासून जागतिकीकरण, खासगीकरण व उदारीकरण यांची पाळेमुळे जगभरच्या समाजजीवनात खोलवर रुजत चालली आहेत. ही रुजवण वरवर पाहता फलदायी वाटत असली तरी दुसरीकडे ती अनेक विपरीत फळे चाखायला भाग पाडते आहे. आधुनिकीकरण, यांत्रिकीकरण या माध्यमातून वेगाने सुरू असलेल्या विकासप्रक्रियेच्या आवरणाखाली तळागाळातील समाजवर्गाचे असंख्य प्रश्न दबा धरून बसलेले आहेत.

Dignitaries in Kolhapur, kolhapur lok sabha seat, Dignitaries in Kolhapur Urge for Democratic Vigilance, Democratic Vigilance, Dignitaries in Kolhapur appeal win shahu maharaj, shahu maharaj, Hatkanangale lok sabha seat,
कोल्हापुरातील समाज धुरीण एकवटले; फोडाफोडीच्या राजकारणामुळे महाराष्ट्राची राजकीय नैतिकता गमावल्याची चिंता
loksatta readers reactions loksatta readers opinions loksatta readers response
लोकमानस : निवडणुकीत मुख्य मुद्दयांचा विसर
loksabha election 2024 Peoples issues banished from campaigning in Vidarbha
विदर्भात जनसामान्यांचे प्रश्न प्रचारातून हद्दपार
conceit of painter whose exhibition made critics take the term Ambedkari art seriously
हे विचार, हे जगणं दृश्यात आणलं पाहिजे…

या पाश्र्वभूमीवर भारतीय समाजाचे वर्तमान आजमितीस कोणकोणत्या स्थित्यंतरांना, बिकट समस्यांना सामोरे जात आहे याचा धांडोळा डॉ. लवटे यांनी या लेखसंग्रहात घेतलेला आहे. मार्क्‍सवादापासून ते जागतिकीकरण, पर्यावरण, शिक्षण, बालसंगोपन, स्त्री-अत्याचार तसेच अनाथ-अपंग-बेवारस समाजघटक अशा असंख्य सामाजिक प्रश्नांचा ऊहापोह या पुस्तकात केलेला आहे.

समताधिष्ठित समाजविकासाचे मार्क्‍सचे स्वप्न मूर्तरूप का घेऊ शकले नाही तसेच मार्क्‍सवादाचे टोकाचे समर्थक व विरोधक या दोघांनीही त्याचा कसा विपर्यास केला याचे थोडक्यात विवेचन पहिल्या लेखात वाचायला मिळते. त्यानंतर शाहूमहाराजांवरील लेखात त्यांची तळातल्या जात-वर्गाविषयीची कळकळ व गरीब- दुर्बल समूहातले, शिक्षणक्षेत्रातले अफाट कार्य याचा संक्षिप्त आढावा घेतला आहे. त्या अनुषंगाने धर्म नि जातिभेदाच्या दलदलीत भारतीय समाजमन अजूनही कसे रुतून बसलेले आहे, या वास्तवावर लेखकाने नेमके बोट ठेवले आहे. प्रजासत्ताक दिनाच्या सुवर्णवर्षांनिमित्त लिहिलेल्या दोन लेखांमध्ये डॉ. लवटे सद्य:स्थितीत समाजमनाला ग्रासून राहिलेल्या प्रश्नांना अधोरेखित करतात. शासनव्यवस्थेतील गलथानपणा, दिरंगाई, भ्रष्टाचार, शेतकरी व मजूरवर्गाची हतबलता, मानवाधिकार, नागरी अधिकार यांची पायमल्ली आणि सामान्य माणसाची कुचंबणा या समाजवास्तवावर नेमकी टिप्पणी केलेली आहे.

एकविसाव्या शतकाच्या पाश्र्वभूमीवर जागतिकीकरण, माहिती-तंत्रज्ञान या अनुषंगाने आलेल्या भौतिक समृद्धीच्या झगमगाटाखाली एक मोठा जनसमुदाय उपेक्षित, उपरे आणि कठोर संघर्षांचे जिणे जगत आहे हे वास्तव नोंदवताना रिमांड होम, बालगृहे, अनाथाश्रम येथील तसेच वेश्या-कुमारी माता यांच्या मुलांचे जीवघेणे प्रश्न लेखकाने आस्थेने मांडले आहेत. ‘विवाहबाह्य संबंध आणि संतती’, ‘राक्षसी क्रौर्यामागची करुण पडछाया’, ‘एक पाऊल दुसऱ्यासाठी’ हे लेख या-संदर्भात आवर्जून वाचण्यासारखे आहेत. त्याचबरोबर स्त्रीभ्रूणहत्या, स्त्रियांवरील कौटुंबिक, लंगिक अत्याचार, कुमारी माता, विधवा, परित्यक्ता या स्त्री-प्रश्नांचीही काही लेखांमधून थोडक्यात चर्चा केली आहे. इतर काही लेखांमधून सामाजिक बदलांचा आढावा घेताना कुटुंबातील वाढते विसंवाद, नाती-मूल्ये-नीतिमत्ता यांची वाताहत ही अत्याधुनिक, वैभवसंपन्न समाजमनाची दुखरी नसही लेखकाने नेमकेपणाने दर्शविली आहे. आपल्या अनुभवसिद्ध व तीव्र समाजभानातून सामाजिक समस्यांचा समाचार घेताना समाजहितासाठी झटणारे सेवाव्रती, कार्यकत्रे, संस्था, संघटना, सामाजिक उपक्रम याविषयीही लेखकाने सविस्तर लिहिले आहे.

मात्र सामाजिक प्रश्नांचा लेखाजोखा मांडणारे हे लेखन काही ठिकाणी प्रस्थापित सामाजिक समस्यांची केवळ नोंद घेते. त्यासंबंधी फारसे विवेचन करत नाही. काही लेखांमधून सामाजिक प्रश्नांची केवळ जंत्री हाताशी लागते. तसेच एकाच लेखात अनेकविध विषयांना हात घालण्याच्या प्रयत्नात काही ठिकाणी एकंदर आशय ढोबळ स्वरूपात मांडल्यासारखा वाटतो आणि व्यापक विवेचनाची कमतरता जाणवत राहते. त्याचप्रमाणे काही मुद्दे एकांगी आणि जुजबी माहिती देऊन पुढे सरकतात असेही वाटते. आशयाची आणि माहितीची पुनरावृत्तीही अनेक ठिकाणी जाणवते. त्यामुळे सद्य:स्थितीचे समाजवास्तव टिपणारे हे लेखन रूढार्थाने सामाजिक प्रश्नांचे टोकदार विश्लेषण ठरत नाही. परंतु नाना प्रश्नांनी ग्रासलेले समाजाचे अस्वस्थ वर्तमान अभिव्यक्त करण्याचे काम ते नक्की करते. या काही माफक त्रुटी सोडल्यास एकंदरीत हा लेखसंग्रह वाचकाचे समाजभान जागे करण्याचे आणि सहज न जाणवणाऱ्या समाजप्रश्नांची जाणीव करून देण्याचे काम निश्चित करतो.

‘एकविसाव्या शतकातील सामाजिक प्रश्न’ – डॉ. सुनीलकुमार लवटे, शब्दवेल प्रकाशन, कोल्हापूर, पृष्ठे- १६८, मूल्य- १८० रुपये.  ल्ल