परीकथा, वीरकथा, ऐतिहासिक कथा, भक्तिकथा, गूढकथा अशा विविध भावाविष्कारांच्या कथानाटय़ांतून ‘लिट्ल थिएटर- बालरंगभूमी’ने बालप्रेक्षकांवर उत्तम संस्कार तर केलेच; त्याचबरोबर उत्तम कलाकृतींबद्दल एक छान आस्वादक दृष्टीही कळत्या वयापासून मुलांमध्ये निर्माण केली. जाणकार प्रेक्षक निर्माण व्हायला त्यामुळे मदत झाली.
ना टय़गृह मुलाबाळांनी ओसंडत होतं. गॅंगवेमधून मुलं धावत होती. गॅलरीतून खालच्या मुलांना हाका मारीत होती. पालक प्रथमच मुलांना घेऊन मुलांच्या नाटकाला आले होते. थिएटरमध्ये गडबड करणाऱ्या या मुलांचे काय करायचं त्यांना कळत नव्हतं. आवाजाने प्रेक्षागृहाचं वातावरण भरून गेलं होतं. आणि आणि तिसरी घटा जोरजोरानं घणघणली. हळूहळू शांतता पसरली. दिवे गेल्यावर तर सन्नाटाच झाला. पडदा उघडत गेला.
रंगमंचाच्या पाश्र्वभागी आकाश सकाळच्या झुंजुमुंजू प्रकाशाने भरून गेलं होतं. छोटंसं पठार आणि त्यावर एकटीच पडलेली प्रचंड शिळा. हळूहळू येणाऱ्या प्रकाशात ते पठार आणि त्यावरची ती प्रचंड शिळा नजरेस पडली आणि मघाच्या त्या गडबडीच्या आवाजाचे रूपांतर एकदम एकाच वेळी ‘हाऽऽऽ!’ अशा उद्गारात झालं. प्रौढांच्या नाटकातील पडद्याला पडलेली टाळी मी कितीतरी वेळा ऐकली होती. पण बालप्रेक्षकही नेपथ्याला अशी उत्स्फूर्त दाद देताहेत हे मी प्रथमच अनुभवत होतो. १९६० सालातली ही घटना. नाटक होतं- ‘अल्लादिन आणि जादूचा दिवा.’ सुधा करमरकरांच्या या नाटकाचं नेपथ्य केले होतं रघुवीर तळाशिलकर यांनी. ‘फॅण्टसीत माणसं लहान दिसण्यासाठी आजूबाजूचा निसर्ग प्रचंड करावा लागतो,’ हे त्यांचं विधान त्यांनी आपल्या नेपथ्यानं खरं करून दाखवलं होतं. मुलांच्या गोष्टींतला, पुस्तकातला निसर्ग प्रत्यक्षात समोर आल्यावर त्यांच्याकडून उत्स्फूर्त दाद आली नसती तरच नवल.
त्यावेळी दूरदर्शन नव्हतं, व्हिडीओज् नव्हते. पाश्चात्य बालचित्रपट पाहायची संधीही फारशी नव्हती. अशा वातावरणात त्यांनी एक प्रचंड शिळा रानावनात पहुडलेली पाहिल्यानंतर त्यांचं काय झालं असेल याची कल्पना आज कोणालाच करता येणार नाही. पण एवढय़ावरच हे थांबत नाही. जादूगार हातातली अंगठी फिरवतो आणि शिळेच्या मागून हिरव्या धुराचा लोट वर येतो. आश्चर्याने डोळे विस्फारले जातात. ‘कडकड कडकड’ आवाज करत ती प्रचंड, अचल वाटणारी शिळा बाजूला होते. आतून लालसर प्रकाशाचे झोत बाहेर येतात. जादूगार अल्लादिनला गुहेत उतरायला भाग पाडतो. त्याला आपल्या हातातली अंगठी देऊन गुहेतला दिवा व रत्नं आणायला सांगतो. दुसऱ्याच प्रसंगात वरून खाली गुहेत उतरणारा अल्लादिन दिसतो. ‘कडकड’ आवाज करत शिळा बंद होते. आपला अल्लादिन बाहेर कसा येणार? मुलं काळजीत पडतात. रत्नं-माणकांनी खचाखच भरलेली ती गुहा, सोन्याच्या दागदागिन्यांनी भरलेले ते हंडे पाहून अल्लादिनप्रमाणे मुलंही आश्चर्याचा आ करून पाहत राहतात.. भारावून जातात.
..आणि मग गुहेतून बाहेर पडण्यासाठी अल्लादिन जादूची अंगठी फिरवतो. जादूच्या अंगठीचे प्रेमळ राक्षस एकामागोमाग एक बाहेर येतात. धीरगंभीर, घुमत्या आवाजात या राक्षसांचे समूहनृत्य सुरू होतं..
चीन चिरागे चिरागे चीन
आम्ही आहोत गुलाम जादूच्या अंगठीचे..
गाण्याचा ताल, सूर, लय, रंगीबेरंगी प्रकाशयोजना आणि नाचणाऱ्या राक्षसांची वेशभूषा हे सारं पाहता पाहता मुलं वेडावून जातात. राक्षसांबरोबर ताल धरतात.
तिसऱ्या अंकात अल्लादिनने शहजादीसाठी खास बांधलेला महाल दिसतो. पुन्हा एकदा प्रेक्षकांकडून ‘अऽऽऽ हाऽऽ हा!’ त्या महालाच्या मधोमध असलेल्या सज्जातून दिसते धावत्या ढगांचे आकाश. जादूगार आणि अल्लादिनची ढिश्याँव ढिश्याँव घमासान मारामारी. अल्लादिन सज्जाकडे तोंड करून उभा. जादूगार संधी साधून अल्लादिनच्या दिशेने झेप घेतो. अल्लादिन चटकन् खाली बसतो. जादूगार थेट बाहेरच्या आकाशात. बालप्रेक्षकांचा कल्लोळ. आरडाओरडा टिपेला पोचतो. प्रेक्षकांचा कोरस उत्स्फूर्तपणे उसळतो.. ‘चीन चिरागे चिरागे चीन.’ प्रचंड बेहोषी. टाळ्यांचा ठेका चालूच राहतो.
आजही हे नाटक अत्याधुनिक तंत्राच्या साहाय्याने लहान-थोर प्रेक्षकांना आकर्षित करू शकेल. मग ज्यावेळी अशा प्रकारच्या घटनांची रंगमंचीय शक्यताच नव्हती त्यावेळच्या मुलांचं हे काल्पनिक विश्व प्रत्यक्ष डोळ्यांसमोर अवतरल्यावर काय झालं असेल! ती पिढी आता वृद्धत्वाला पोचली असेल. पण आजही त्यांच्या डोळ्यांसमोर तो अल्लादिन, ती शहजादी (भक्ती बर्वे), ती शिळा, ती गुहा, ते रत्नांनी भरलेले हंडे आणि ती श्वास रोखून धरायला लावणारी मारामारी.. जशीच्या तशी उभी राहत असेल.
ऐन कळत्या बालवयात त्यांना हा अद्भुत आनंदाचा ठेवा बालरंगभूमीने दिला होता. तशी किंवा त्याहूनही प्रभावी दृश्ये आजच्या त्यांच्या मुलांनी कॉम्प्युटरवर वा दूरदर्शनवर पाहिली तरी त्यांना त्यांच्या मात्या-पित्यांनी अनुभवलेला जल्लोष, उत्स्फूर्त कल्लोळ, प्रचंड आरडाओरडा कसा अनुभवता येणार? बटन बंद केलं की टीव्ही, कॉम्प्युटर सारंच बंद होतं. संगणकाच्या आणि ‘छोटय़ा खोक्या’च्या प्रेक्षकांना माणसांचा सहानुभव, जिवंत अनुभव कसा लाभणार?
नानासाहेब शिरगोपीकरांच्या नाटकांतील चमत्कार मी पाहिलेले आहेत. ते तर चमत्कारांचेच नाटक करायचे. पण त्यात नाटकाचा चमत्कार नव्हता. ते चमत्कार कृत्रिम व ढोबळ असत. कदाचित त्यांच्या प्रेक्षकांची तीच मागणी असावी. लिट्ल थिएटर- बालरंगभूमीवरील ट्रिकसीन्स उत्स्फूर्त, स्वाभाविक वाटायचे. त्यात एक कलात्मकता होती. नाटकातील रंगभूषा, वेशभूषा, प्रकाशयोजना या साऱ्या घटकांना एक वेगळा, निरागस देखणेपणा लाभलेला असायचा. मुलांची सौंदर्यदृष्टी, बालप्रेक्षकांची नजर त्यामुळे आपतत:च तयार झाली. भडकपणा त्यांना खुपायला लागला. बालपणात लाभलेली हीच दृष्टी प्रौढपणी माणसाला कलासक्त बनवते. ‘कळलाव्या कांद्याची कहाणी’सारखं व्यंगनाटय़ बालरंगभूमीवरच काय, पण मराठी रंगभूमीवरही प्रथमच सादर केलं गेलं. कार्टून स्टाईलने हा प्रयोग सुधाताईंनी आकारास आणला होता. रत्नाकर मतकरीलिखित या नाटकात फार्सचे सगळे घटक होते. ते विलक्षण गतिमान आणि गुंतागुंतीचंही होतं. मी त्यात राजवैद्याची भूमिका करीत असे. भाई नारकर, मनोरमा वागळे, रमेश होनावर, महेश गोंधळेकर, नारायण मोरे, मीरा रेगे, राजा कारळे, जयंत सावरकर, विजय सोनाळकर, गोविंद पोंक्षे, जयवंत फडके, (भक्ती) लता बर्वे, सुधा करमरकर, प्रफुल्ला खानोलकर अशा नंतर लहान-थोर झालेल्या नटमंडळींच्या बालखुणा प्रथम या नाटकातूनच उमटल्या. सोनेरी हंसाला चिकटणाऱ्या पात्रांची माळ आणि रंगमंचावर त्या माळेला मिळणारे झोके पाहताना बालप्रेक्षकांना ‘मेरी गो राऊंड’मध्ये बसल्यासारखं वाटायचं. आम्हा नटांनाही खूप धमाल वाटायची. तुफान अॅक्शनबाज नाटक असूनही आम्ही कधी दमलो नाही. आणि फार्सिकल असूनही कुठंही ते पोरकट वा बालिश किंवा ‘स्वस्त’ झालं नाही. नंतर एक-दोन फार्सिकल नाटकांतून माझ्या भूमिका गाजल्या. त्याचं मूळ निखळ, स्वच्छ फार्सचे धडे मला ‘कळलाव्या’ने दिले होते, हे होतं. या नाटकाच्या नेपथ्याबरोबरच रघुवीर तळाशिलकरांनी या नाटकाच्या पुस्तकात छान छान रंगीत व्यंगचित्रंही (व्यक्तिरेखांची!) काढली होती. बालनाटय़ाचं इतकं देखणं, लोभस पुस्तक मराठीत दुसरं नाही. पॉप्युलरच्या रामदास भटकळांनी या नाटकाची दुसरी आवृत्ती काढायला हवी. तेही बालरंगभूमीला जागवणारं एक रंगकार्यच आहे.
नागपूरच्या दिनकर देशपांडे यांनी लिहिलेल्या ‘हं हं आणि हं हं हं’ या बालनाटय़ाची मजा काही औरच होती. भारतातील श्रेष्ठ बालनाटय़ांत त्याची गणना होऊ शकेल. पूर्णपणे स्वतंत्र असलेल्या या बालनाटय़ाचा पहिला प्रयोग २५ जुलै १९६५ रोजी भारतीय विद्याभवन (चौपाटी) येथे झाला. ‘एक फार्सवजा फॅण्टसी’ असंच या नाटकाचं वर्णन करता येईल. मुलांच्या गोष्टीतलीच पात्रं घेऊन लेखकाने आपल्या प्रतिभेनं त्यांना वेगळं, रंगतदार रूप दिलं होतं. राजा खार व चिमणीला भयंकर घाबरतो म्हणून त्यांचा उल्लेख फक्त ‘हं हं’ आणि ‘हं हं हं’ने करायचा असा राज्यात नियम होता. या नाटकातला लाडव्या राक्षस म्हणजे खात्या राक्षसाची प्रेमळ आवृत्ती होती. त्याला कावळ्याची व चिमणीची गोष्ट सांगितली की तो झोपायचा आणि तीच गोष्ट ‘कावळ्याचं घर होतं मेणाचं’ अशी उलटी सांगितली की जागा व्हायचा. विलास गुर्जरचा लाडव्या राक्षस मुलांचा लाडका होता. डॉक्टर कांदे म्हणजे एक विदूषकच होता. पेशंटला तपासायला आल्यावर कुणाला तपासायचं, हेच तो विसरायचा. त्याच्या हातात आवाज करणारी एक स्प्रिंगची सुतळी होती. त्याने तो पेशंटची छाती ठोकायचा. लाडव्यापासून सुटका करून घेण्यासाठी तोच लाडव्याच्या पिंजऱ्यात अडकून बसायचा आणि लाडव्याला बाहेर ठेवायचा. या नाटकातली खाऊची बाग म्हणजे मुलांच्या स्वप्नातलीच बाग होती. झाडाला लाडू, करंज्या लटकलेल्या असायच्या. चकलीचे वेल झाडावर चक्र धरून बसलेले असत. याशिवाय एक श्रीखंडाची विहीर होती. या विहिरीत लाडव्या राक्षस पडतो आणि श्रीखंडाने बरबटतो. डॉ. कांदे त्याचं अंग चाटतो आणि श्रीखंड मटकावतो. ‘राजा भिकारी माझी टोपी घेतली’ हे गाणं ढोलकीच्या तालावर म्हणत जमाडय़ा उंदीर येतो तेव्हा प्रेक्षक त्याला ‘ढुम ढुम ढुमक’ने साथ देतात. अख्खं प्रेक्षागृह ‘ढुम ढुम ढुमक’नं वाजत राहायचं.
हेमांगी हुमणे जमाडय़ा उंदराचं काम मस्त करायची! (त्यावेळचे सांस्कृतिक खात्याचे प्रमुख राजाराम हुमणे यांची ही चिमखडी कन्या. उत्तम कलावंताबरोबरच शासकीय सांस्कृतिक विभागाशी स्नेहाचे नातं निर्माण करणारी ही सुधाताईंची ट्रिक असेलही; परंतु नाटय़परिणामात मात्र त्यामुळे काही उणेपणा आला नाही. ‘एका दगडात दोन पक्षी’ म्हणा हवं तर!) हेमांगी हुमणेच्या या रंगतदार भूमिकेच्या ‘हं हं हं’ नाटकाच्या समीक्षणाचं माझे शीर्षक होत- ‘हे हु’चं ‘हं हं हं’!
‘चिनी बादाम’ या नाटकाचं वेगळेपण वेगळंच होतं. चीन-भारत युद्धाच्या पाश्र्वभूमीवर आधारित हे बालनाटय़ म्हणजे देशप्रेम जागवणारी एक प्रभावी रहस्यकथा होती. रहस्य, संघर्ष, भावुकता आणि संगीत यांचं रंगतदार मिश्रण असलेलं हे नाटक. नंतर व्यावसायिक रंगमंचावर ख्यातनाम झालेल्या पुरुषोत्तम दारव्हेकरांनी ते लिहिलं होतं. बालप्रेक्षकांचा या नाटकाला पडदा उघडल्यापासूनच प्रचंड प्रतिसाद मिळत असे.
पडदा उघडतो त्यावेळी रंगमंचावरची मुलं नाटय़गृहावर नजर टाकत ‘चिनी बादाम, चिनी बादाम’ अशा हाका मारतात. डोक्याला तपकिरी, उंच नेपाळी टोपी. अंगात वुलनचा लांब, जुना डगला. खांद्यावर झोळी. आणि झोळीत शेंगदाणे व शेंगदाण्याच्या पुडय़ा. चिनी बादाम म्हणजेच शेंगदाणे.
‘चिनी बादाम, चिनी बादाम, ले लो चिनी बादाम
खा लो चिनी बादाम
गरीब खाये, अमीर खाये, कमाल का है नाम!
ले लो चिनी बादाम..’
हे गाणं म्हणत मुलांना शेंगदाणे वाटत हा चिनी बादाम प्रेक्षकांतून रंगमंचावर यायचा. तेव्हापासूनच तो पोरांचा प्यारा होतो. मीच ती भूमिका करीत होतो. मुलं माझ्याबरोबर गाणं म्हणायची. टागोरांच्या ‘काबुलीवाला’ या नाटकाची छाप ‘चिनी बादाम’वर पडली होती. नाटकातल्या पात्रानं प्रेक्षकांतून रंगमंचावर यायची ही कृती १९६५ सालची. दिग्दर्शिका होत्या सुधा करमरकर. ‘घाशीराम’मध्ये प्रेक्षकांतून येणारी ब्राह्मणांची रांग १९७३ सालची. ‘चिनी बादाम’ पाहिलेल्या प्रेक्षकांना या घाशीरामी रांगेचे विशेष आश्चर्य वाटले नसावे.
नाटकातला खलनायक चिनी बादामवर हंटरचे फटके सपासप मारतो. कळवळून तो बेशुद्ध पडतो. मुलं हा अंक संपल्यावर रंगमंचामागे यायची. सुधाताईंना म्हणायची, ‘नका हो मारू आमच्या चिनी बादामला. बरा आहे ना तो?’ मुलांच्या त्या प्रतिक्रिया ऐकून मार खाऊन दमलेल्या त्या अवस्थेतही मला भूमिका परिणामकारक झाल्याचा आनंद मिळायचा.
‘अलिबाबा आणि चाळीस चोर’चा प्रयोग बालमोहन विद्यामंदिर येथे होता. काही तांत्रिक बिघाडामुळे अचानक रेल्वेगाडय़ा बंद झाल्या होत्या. चाळीस चोरांतले नेमकेच चोर हजर झाले होते. प्रयोग ‘हाऊसफुल्ल’ होता. पोरांचा धुमाकूळ चालूच होता. प्रयोग सुरू झाला. चोर गुहेत प्रवेश करतात तो प्रवेश सुरू झाला. प्रवेश कसला? कर्मकठीण प्रसंगच तो! ‘खुल जा सिम सिम..’ ‘कडकडकड..’ दरवाजा उघडत असल्याचा आवाज आला. त्या आवाजात गाण्याच्या तालावर चोर गुहेत प्रवेश करू लागले. सुधाताई विंगेत उभ्या राहून चोरांची संख्या त्यांच्या कपडय़ात बदल करून वाढवत होत्या. कुणाची टोपी काढ, कुणाला जॅकेट दे, कुणाचं तोंड झाकून टाक, कुणाला फेटा घाल.. असं सुधाताईंचं विंगेत दिग्दर्शन चालू होतं. गाण्याचं एक कडवं संपतं- न संपतं तोच बालमोहनच्या गॅलरीतून एका मुलाचा आवाज आला- ‘अलिबाबा आणि चार चोर!’ प्रचंड हशा निर्माण झाला. गुहेच्या प्रवेशद्वारावर पडदा पडला. सुधाताई एवढंच म्हणाल्या, ‘मुलांना फसवणं सोपं नाही.’
‘राजा शिवछत्रपती’ या नाटकात शिवाजीमहाराजांच्या पराक्रमांबरोबरच लोककलांचाही परिचय बालप्रेक्षकांना करून दिला होता. ‘जाणता राजा’ रंगमंचावर यायच्या अगोदर कितीतरी वर्षे आधी लिट्ल थिएटरचं हे ‘राजा शिवछत्रपती’ रंगमंचावर आलं होतं.
विनोदी लेखक चिं. वि. जोशी यांची ओळख मुलांना करून दिली गेली ती ‘सर्कशीत चिमणराव’ या विजय तेंडुलकरलिखित नाटकाने. ‘गणपती बाप्पा मोरया’ या श्याम फडकेलिखित नाटकानं गणपती मुलांचा अधिकच प्यारा झाला होता. त्यातली विजय सोनाळकररचित गाणी आजही लोकप्रिय आहेत.
परीकथा, वीरकथा, ऐतिहासिक कथा, भक्तिकथा, गूढकथा अशा विविध भावाविष्कारांच्या कथानाटय़ांतून ‘लिट्ल थिएटर- बालरंगभूमी’ने बालप्रेक्षकांवर उत्तम संस्कार तर केलेच; त्याचबरोबर उत्तम कलाकृतींबद्दल एक छान आस्वादक दृष्टीही कळत्या वयापासून मुलांमध्ये निर्माण केली गेली. भावी जाणकार प्रेक्षक निर्माण व्हायला त्यामुळे मदत झाली. पुढे व्यावसायिकदृष्टय़ा यशाची खात्री नसलेल्या काही चांगल्या नाटकांनी व्यावसायिक रंगमंचावर घवघवीत यश मिळवलं, त्यामागे लिट्ल थिएटरने तयार केलेला हा जाणकार प्रेक्षकवर्ग होता, हे विसरून चालणार नाही. आज एक नाटय़समीक्षक म्हणून मी ओळखला जात असलो तरी त्यातील यशस्वी समीक्षेचे कारण लिट्ल थिएटर- बालरंगभूमी आणि दिग्दर्शिका सुधा करमरकर हे आहे.
‘अलिबाबा आणि चाळीस चोर’ या नाटकात मी कासीमचं काम करीत असे. कव्हरच्या पडद्यावरच्या एका प्रसंगात पाठीमागच्या प्रसंगाची मांडणी करेपर्यंत मला एक कव्वाली म्हणावी लागत असे. मी ती बेसूरपणे रंगवीत असे. या कासीमला मर्जिनाकडून सोन्याच्या दोन मोहरांची बक्षिसी मिळते तेव्हा तो म्हणतो-
खिसा माझा जड झाला जरा ऽऽ
खिशात माझ्या दोन मोहरा ऽऽ
या बालरंगभूमीने माझ्या सांस्कृतिक जाणिवेच्या खिशात भर टाकली. तो खरोखरीचा जड केला. त्यावेळच्या माझ्याबरोबरच अन्य संबंधितांना आणि प्रेक्षकांनाही या बालरंगभूमीनं हे मोठंच देणं दिलेलं आहे.
संग्रहित लेख, दिनांक 3rd Mar 2013 रोजी प्रकाशित
खिसा माझा जड झा ऽऽ ला जरा ऽऽऽ
परीकथा, वीरकथा, ऐतिहासिक कथा, भक्तिकथा, गूढकथा अशा विविध भावाविष्कारांच्या कथानाटय़ांतून ‘लिट्ल थिएटर- बालरंगभूमी’ने बालप्रेक्षकांवर उत्तम संस्कार तर केलेच; त्याचबरोबर उत्तम कलाकृतींबद्दल एक छान आस्वादक दृष्टीही कळत्या वयापासून मुलांमध्ये निर्माण केली. जाणकार प्रेक्षक निर्माण व्हायला त्यामुळे मदत झाली.

First published on: 03-03-2013 at 01:01 IST
मराठीतील सर्व नाटकबिटक बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Impact of little theatre