साक्षेपी अनुवादक उमा वि. कुलकर्णी यांच्या नजरेतून गिरीश कार्नाड!

गिरीश कार्नाडांचं निधन झाल्याचं समजलं तेव्हा या बहुगुणी, प्रतिभावान व्यक्तिमत्त्वाच्या विविध बाजू एकाच वेळी सामोऱ्या आल्या. अभिनय, दिग्दर्शन, नाटक, सिनेमा आणि नाटककार अशा सर्वच क्षेत्रांतल्या मान्यवरांनी त्यांच्यावर भरपूर लिहिलं. केवळ त्यांच्या मातृभाषेतच नव्हे, तर त्यांना ओळखणाऱ्या सर्वच प्रदेशांत त्यांच्यावर लिहिलं गेलं. अशा प्रकारे विविध क्षेत्रांत पारंगत असणाऱ्या व्यक्तीच्या बाबतीत तिच्या साहित्यातील योगदानासारख्या कमी ‘ग्लॅमरस’ पैलूकडे पूर्णपणे दुर्लक्ष होऊ शकतं. पण साहित्य क्षेत्रातल्या अकादमी पुरस्काराबरोबरच ‘ज्ञानपीठ’सारख्या राष्ट्रीय पातळीवरच्या सन्मानानं गौरवांकित झालेल्या कार्नाडांच्या बाबतीत मात्र असं घडलेलं नाही. त्यांना लेखक म्हणूनही खूपच मान्यता मिळाली. कार्नाड आपल्या नाटकांचे इंग्रजी अनुवाद करत. नंतर त्यांची नाटकं लगोलग बहुतांश भारतीय भाषांमध्ये भाषांतरित झाली आणि त्यांना राष्ट्रीय पातळीवरचा नाटककार मानलं जाऊ लागलं. या नाटकांनी संपूर्ण भारतीय नाटय़सृष्टी संपन्न केली.

अनेक पैलूंनी संपन्न असलेल्या कार्नाडांचंही एक ‘स्वप्न’ होतं, ते मोठा साहित्यिक म्हणवून घ्यायचं! त्यातही कवी म्हणवून घ्यायचं! जेव्हा आपण कवी न होता नाटककार होतोय हे त्यांना उमजलं, ‘त्या दिवशी खूप रडू आलं होतं’ अशी आठवण त्यांनी एका मुलाखतीत सांगितली आहे.

कार्नाडांच्या नाटकांचं वैविध्य कुणाच्याही लक्षात येण्यासारखं आहे. लोककथांवर आधारित (‘हयवदन’, ‘नागमंडल’), पुराणकथांवर आधारित (‘ययाति’, ‘अग्नी आणि पाऊस’), पुरातन पाश्र्वभूमीवर घडणारी (‘बळी’ आणि ‘पुष्पसाज’), ऐतिहासिक घटनांवर आधारित (‘तलेदंड’, ‘तुघलक’, ‘टिपू सुलतानचं स्वप्न’) आणि सद्य:परिस्थितीवर आधारित (‘वेडिंग अल्बम’, ‘बिखरे बिंब’, ‘काटेसावरी’, ‘उणेपुरे शहर एक’) अशी त्यांची नाटकं आहेत.

लोककथांवरील नाटकांच्या लेखनात ते लोककथेचा कालातीत असण्याचा गुण उणावू देत नाहीत. पुराणकथांना विविध परिमाणं देण्याची कर्नाटकात फार पूर्वीपासूनची परंपरा आहे. तेथील जैन साहित्यिकांनी सुरुवातीपासूनच हे केलं आहे. कार्नाडांच्या पाश्चात्त्य आणि आधुनिक दृष्टिकोनामुळे हे अधिक उत्तम प्रकारे झालेलं आहे. आधुनिक जीवनावर आणि सद्य:परिस्थितीवर भाष्य करताना ते फार प्रभावी ठरतं. समकालीन वास्तवावर भाष्य करणारी त्यांची नाटकं त्यामानानं कमी प्रसिद्ध पावलेली दिसतात. ऐतिहासिक पाश्र्वभूमीचा वापर करून लिहिलेली नाटकं मात्र एकीकडे लोकप्रिय ठरली, तशीच (‘तलेदंड’चा अपवाद वगळता) वादग्रस्तही ठरली आहेत.

विषय कोणताही असला, तरी त्याला नाटय़रूप देतानाची कार्नाडांची हुकूमत मात्र वादातीत आहे. त्यामुळे त्यातली प्रयोगशीलता दिग्दर्शकाला मोह घातल्याशिवाय राहत नाही. म्हणूनच भारतातच नव्हे, तर जगभरातल्या उत्तमोत्तम दिग्दर्शकांना या नाटकांचे आपापल्या भाषांमध्ये प्रयोग करण्याचा मोह होत असतो.

त्यांची ‘नागमंडल’ आणि ‘हयवदन’ ही नाटकं तर परिवेश बदलला की जगातल्या कुठल्याही भाषांमध्ये सामावून घेतली जाऊ शकतात. ‘नागमंडल’मधल्या पहिल्या भागात गावातले सगळे दिवे मालवल्यावर त्या सगळ्या ज्योती गावाबाहेरच्या पडक्या देवळात जमतात आणि आपापल्या घरात घडणाऱ्या घटनांवर गॉसिप करतात. ते अनुवादित करताना मी रोमांचित झाले होते. पण हे नाटकात किंवा सिनेमात दाखवताना दिग्दर्शकाची भंबेरी उडते याचाही अनुभव मी प्रेक्षक म्हणून घेतला होता. तसंच ‘हयवदन’मधलं ‘गरिबीची देवता’ हे प्रकरण! कुणीच तिच्या देवळात जात नसल्यामुळे ती किरकोळ प्रार्थनेनं पटकन् प्रसन्न होते! लोककथांमध्ये येणारी अशी अफलातून देवता ते नेमकेपणानं हेरतात आणि तिचा प्रभावीपणे वापर करतात. एका प्रस्तावनेत ते लोककथांचे प्रयोजन सांगताना लिहितात : ‘या कथा आजी नातवंडांना सांगत असली तरी अवतीभवती तिच्या लेकी-सुनाही वावरत असतात. त्यामुळे हे एका दगडात दोन पक्षी मारायचं प्रकरण असतं!’

पुराणकथांवरची नाटकंही वास्तवाकडे वेगळ्या प्रकारे पाहायचा दृष्टिकोन देतात. विद्यार्थी म्हणून परदेशी जायचं ठरत असताना मनात उद्भवलेल्या विविध भावनांना मार्ग करून देण्यासाठी अवचितपणे ‘ययाति’ हे नाटक त्यांच्या हातून लिहून झाले, तेव्हा त्यांना स्वत:लाच धक्का बसला होता. (कार्नाड त्यावेळी स्वत:ला कवी समजत होते!) एक म्हणजे ते काव्य नसून नाटक होतं. दुसरं म्हणजे ते कन्नड भाषेत लिहिलं गेलं होतं. तेही कन्नड भाषेवर फारशी हुकूमत नसताना! मराठी मनामध्ये ‘ययाति’चं जे कथानक घोटाळत असतं, त्यापेक्षा या नाटकाचं कथानक खूपच धक्कादायक आहे. वडिलांना आपलं तारुण्य देणाऱ्या पुरूच्या नवतरुण पत्नीचं मनोगत यात भेदकपणे येतं आणि नाटकातला वेगळाच पैलू वाचकाला अस्वस्थ करतो! तसंच ‘अग्नी आणि पाऊस’मध्ये मानवी मनाचे विविध खेळ ते दाखवतात. (या नाटकावर हिंदी चित्रपटही आला होता. ज्यात अमिताभ बच्चन यांनी इंद्राची भूमिका केली होती.) ‘बळी’ या नाटकाला (बहुधा) एका जैन कथेचा आधार आहे. ‘पुष्पसाज’मध्ये जुना कालखंड असला तरी त्याला कसलाही आधार नाही.

ऐतिहासिक घटनांवर आधारित नाटकांपैकी ‘तलेदंड’ या नाटकाच्या लेखनासाठी त्यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला. हे नाटक बसवेश्वराच्या जीवनातल्या अखेरच्या टप्प्यावर घडलेल्या एका दु:खद घटनेवर आधारलेलं आहे. या घटनेवर कन्नडमध्ये आधीही नाटकं लिहिली गेली होती. नाटकाच्या प्रस्तावनेत कार्नाड ‘हा दुखऱ्या दातांकडे पुन्हा पुन्हा जीभ वळण्याचा’ प्रकार असल्याचं सांगतात. हिंदू समाजातल्या जातिव्यवस्थेविरुद्ध बाराव्या शतकात बंड केलेल्या बसवेश्वराचा रोटी-व्यवहार समाजानं स्वीकारला. पण ब्राह्मण मुलीचं चांभार मुलाशी लग्न ठरवल्यावर मात्र रक्ताचे पाट वाहवत समाजानं तो उधळून लावला. या नाटकातले बसवेश्वर त्या सर्वसंबंधित पात्रांच्या मनोव्यापाराचाही विचार करतात. सनातन्यांच्या क्रूरतेविषयी कार्नाड लिहितात, त्याचप्रमाणे क्रांती करताना समाजाकडून होणाऱ्या चुकाही लपवीत नाहीत. त्यामुळे अखेरीस मनात विषण्ण भाव दाटून येतात. या नाटकातही इतर नाटकांप्रमाणे भरपूर नाटय़मय प्रसंग असले तरी महाराष्ट्रात याचं व्यावसायिक रंगभूमीवर म्हणावं तसं स्वागत झालं नाही. तसंच काहीसं ‘टिपू सुलतानचं स्वप्न’ या नाटकाचंही झालं. या विषयांमधला प्रादेशिक इतिहासच कदाचित यास कारणीभूत ठरला असावा. ‘तुघलक’चं मात्र तसं झालं नाही. कदाचित ज्या काळात संपूर्ण भारतभरात नव्या नाटकाची लाट गाजत होती, तेव्हा हे नाटक आलं आणि त्यानं भारतीय नाटय़सृष्टी व्यापून टाकली. या नाटकाचे हिंदीतले प्रयोग तर विशेष गाजले.

हे पाहता कार्नाड आजच्या वास्तवाला थेटपणे कमी प्रमाणात भिडलेले दिसतात. भावा-बहिणीच्या नात्यावरचे ‘काटेसावरी’, आधुनिक भाष्य करणारे ‘वेडिंग अल्बम’, महानगर बनताना बदलणाऱ्या मानसिकतेवर प्रकाश टाकणारं ‘उणेपुरे शहर एक’ आणि आजच्या स्पर्धेच्या युगात चुकीच्या प्रतिमेवर जगणाऱ्या मानसिकतेवर प्रकाश टाकणारं ‘बिखरे बिंब’ अशी चार नाटकं त्यांनी लिहिली आणि त्यात ते यशस्वीही झाले.

कार्नाड हे अनेकदा आपल्या स्फोटक विधानांमुळे प्रसिद्धीच्या झोतात आले असले तरी त्यांच्या ‘तुघलक’ आणि ‘टिपू सुलतानचं स्वप्न’ या नाटकांमुळेही त्यांच्यावर टीकेची झोड उठवली गेली. या दोन्ही व्यक्तिमत्त्वांचा वेध घेताना इतिहासातून लेखकानं आपल्या सोयीनुसार सगळ्या घटना उचलल्या असून त्यामुळे खरी व्यक्तिमत्त्वे साकार होत नाहीत असा टीकाकारांचा सूर होता.

कार्नाडांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाला तेव्हा कर्नाटकात झालेल्या टीकेचा सूर असा होता : ‘यांनी ना नवं कथानक निर्माण केलं आहे, ना नवी पात्रं. रेडिमेड सामान वापरून जुन्या कथानकांना आणि पात्रांना नवे रंग दिले आहेत.’ अशा प्रकारची चर्चा प्रत्येक ज्ञानपीठ पुरस्कारानंतर नेहमीच रंगत असते.

एक मात्र खरं, कार्नाडांनी कन्नड नाटकात आधुनिक वैचारिकता आणली याविषयी दुमत व्हायचं कारण नाही. त्यांच्या लेखनातली लवचीकता नाटय़दिग्दर्शकाला नेहमीच आव्हान देत राहिली आहे. ‘नागमंडल’चे दोन शेवट तर स्वत: लेखकानंच दिले आहेत. कर्नाटकातल्या बी. जयश्री यांच्यासारख्या दिग्दर्शिका त्याला तिसराही एक शेवट दाखवू शकतात.

‘पुष्पसाज’ आणि ‘बिखरे बिंब’ ही दोन्ही नाटकं नाटय़छटांच्या जवळपासची आहेत. त्यातही ‘बिखरे बिंब’ या नाटकात तर त्यांनी टीव्हीचा आणि त्यातील प्रतिबिंबाचा वेगळा प्रयोग केला आहे. हा तंत्राच्या दृष्टीनंही वेगळा प्रयोग होता.

कार्नाडांचे राजकीय विचार त्यांनी कधीही लपवून न ठेवल्यामुळे ते सगळ्यांना ठाऊक आहेत. पण कलाकृतीच्या लेखनाच्या वेळी त्यांचं केवळ तेवढंच ध्येय राहत नाही. राजकीय विचार काहीसे मागे हटलेले दिसतात आणि मानवी मनाचा शोध हाच हेतू प्रकर्षांनं सामोरा येतो. लोककथांवर संस्कृतीची फारशी पुटं चढलेली नसल्यामुळे तिथं त्यांना मानवी मन अधिक उघडपणे दिसलं असावं. म्हणून त्यांना लोककथांचा वापर करायचा मोह झाला असावा. शिरसीसारख्या गावात बालपण गेल्यामुळे यक्षगान-दशावतारासारख्या लोककलांद्वारे त्यांच्यातील कलाकाराचं पोषण झालं. त्यामुळे त्यांना पुराणकथांमधल्या अमर्याद शक्यता दिसल्या. परदेशातील वास्तव्यामुळे त्यांना आधुनिक वैचारिकतेबरोबरच पाश्चात्त्य जीवनाचाही जवळून परिचय झाला होता. ग्रंथांच्या अभ्यासामुळे ते इतिहासातलं नाटय़ही हेरू शकत होते. या साऱ्याचा परिपाक म्हणूनच गिरीश कार्नाड हे बहुआयामी व्यक्तिमत्त्व बनलं आणि त्यांच्यातला प्रतिभावान लेखकही साकारला.

virupaxuma@gmail.com