दीपाली दातार
कवीचं म्हणून एक वेगळंच भावविश्व असतं. त्यात कल्पनांचे कारंजे, भाव-भावनांचे तलम पदर, स्वप्नांचे धुके तर असतेच, पण वास्तवाचा विस्तव, त्या आगीत होरपळून जाणंही असतं नि अनुभवांच्या पावसात चिंब भिजणंही असतं. रसिक मनाचा जीव कवितांमध्ये गुंतून पडतो तो त्यामुळेच. अलीकडेच कवयित्री जुई कुलकर्णी यांचा ‘तुझ्याकडे येण्याच्या कविता’ हा संग्रह वाचनात आला.
अमलताश बुक्स प्रकाशनाने संग्रहाची निर्मिती फार देखणी केली आहे. ज्येष्ठ चित्रकार चंद्रमोहन कुलकर्णी यांचे पुस्तकाला लाभलेले मुखपृष्ठसुद्धा फारच कल्पक आहे. संग्रहाच्या शीर्षकात दोन मात्रा आहेत, त्या मात्रांवर दोघी उभ्या आहेत. शीर्षक ही वाट आहे एकमेकींना भेटण्याची. या दोघी कोण आहेत? कवयित्री आणि तिची कविता? दोन मैत्रिणी की स्त्री आणि स्त्रीचं स्त्रीत्व? की आणखी काही वेगळंच सूचन करायचं आहे?
पुस्तकाच्या अंतरंगातून प्रवास घडत गेला तसं वाटलं या कविता कुणा अशरीर, स्वप्नातल्या सखीकरता, सख्याकरता किंवा सत्यात भेटलेल्या प्रिय व्यक्तीकरता लिहिल्यात आणि त्या संबंधात हरवून जाताना आलेली शहाणीव, उमजलेला जीवनाचा, नातेसंबंधाचा अर्थ कवयित्री कधी अनेकविध प्रतिमांमधून, रुपकांमधून तर कधी थेट शब्दांतून आपल्यापुढे मांडते आहे.
त्याची साक्ष देणाऱ्या काही कवितांपैकी ‘भेटलो न भेटलो’ ही कविता. आपलं कुणाशीही एकदा नातं जुळलं की मग पुढे भेट झाली किंवा झाली नाही तरीही नातं कायम राहतंच. कवयित्री म्हणते की, ‘भेटलो न भेटलो तरीही आतुरतेचे गुणाकार, भागाकार, काळजीचे अधिक उणे, ओढीचं वर्गमूळ’ याचा अनुभव येतंच राहतो. त्याच वास्तवाला अधिक जाणतेपणाने भिडताना शेवटी ती म्हणते
‘‘आपण…
भेटलो न भेटलो तरी
या नात्यातलं गणित अचूक अनुत्तरित राहणार आहे.’’
एखाद्या व्यक्तीवर, गोष्टीवर प्रेम असलं म्हणजे नात्यातली गणितं अचूक सांभाळता येतात. काही प्रश्न अनुत्तरित राहिले तरी नात्यात खोट येत नाही की नात्यांचं गणित चुकलंय असंही वाटत नाही. शेवटच्या ओळीतली ‘अचूक, अनुत्तरित’ ही शब्दयोजना खऱ्या प्रेमाचं गणित सांभाळणारी आहे. ‘शिक्षा’ या कवितेत प्रियाराधनात नात्यांचा रोज एकेक नवा धडा गिरवावा लागतो याचा अनुभव कवयित्री घेते आहे. निरागसपणे कुणाकडे जावं तर समोरून अगदी थंड प्रतिसाद येतो. ‘थंड-आग’ या शब्दयोजनेत विरोध आहे आणि उपहासही. प्रेमभावनेने जवळ जाताना ज्यावर प्रेम करावं त्याला ते उमजलं नाही की मग हा दुहेरी अनुभव येतो.
संग्रहात ‘लाकडाची बाहुली’ नावाची चिंतनशील कविता आहे. निर्जीव, प्राणहीन अशी लाकडाची बाहुली, मुक्तीची वाटही न पाहणारी! पण एक गद्दार क्षण येतो आणि लाकडाची ती बाहुली भिजते.
कवयित्रीच्या ओळी आहेत –
‘‘एक लाकडाची बाहुली
एका गद्दार क्षणात
भिजली, रुजली, अंकुरली
नष्ट होतानाच जिवंत झाली
त्याची ही गोष्ट!’’
इथे ‘नष्ट होताना जिवंत झाली’ ही जी ओळ आली आहे, तिच्यात फार वेगळं दर्शन आहे. लाकडाची बाहुली भिजते, रुजते आणि अंकुरते, तिला फुटवा आल्याने ती खऱ्या अर्थाने जिवंत होते आहे, पण तेव्हाच तिचं बाहुली म्हणून असलेलं अस्तित्व नष्ट झालंय. रूपांतरात काही एक जन्मतं, तेव्हा काहीतरी मुळातलं नष्ट होतं हा निसर्गनियम आहे, त्या वास्तवाकडे पाहताना निर्जीव गोष्ट जिवंत होण्याचा आनंद होण्यापेक्षा जिवाभावाची बाहुली नष्ट झालीये, तिचं मूळ अस्तित्व तिने सोडलंय याकडे कवयित्रीने केलेला निर्देश फार वेगळा आहे. बाहुलीत कवयित्रीचं मन गुंतलंय. त्यामुळेच रुजण्याचा क्षण गद्दार वाटतोय तिला.
संग्रहातील कवितांमध्ये ‘विरहाचा अमलताश’, ‘अभावांचे उत्सव’, ‘संवादाचं बोलकं पाखरू’, ‘अंतराच्या घड्या’, ‘अंधाराची फुलं’, ‘जखमांचे गाव’, अशा छान प्रतिमा सापडतात. याशिवाय ‘असणं’, ‘कोणे एकेकाळी’, ‘सखीवेळा’, ‘तळ्याची भूल’, ‘बीमधलं झाड’ या कविता मनाला भिडणाऱ्या आहेत.
‘तुझ्याकडे येण्याच्या कविता’, – जुई कुलकर्णी, अमलताश प्रकाशन, पाने- २०८, किंमत- २५० रुपये.
lokrang@expressindia.com
