प्रा. मं. गो. राजाध्यक्ष rajapost@gmail.com

चित्र-शिल्प-जाहिरात आदी कलाक्षेत्रांतील मुक्त मुशाफिरी, दिग्गज कलावंतांशी आलेला निकटचा संबंध, त्यांचे काम जवळून पाहण्याच्या मिळालेल्या संधीने विकसित झालेली मर्मग्राही वृत्ती या सगळ्याचे कॅलिडोस्कोपिक दर्शन घडविणारे  पाक्षिक सदर..

Child beaten teacher pune, pune,
पुणे : शिक्षिकेकडून मुलाला बेदम मारहाण; समाजमाध्यमात चित्रफीत प्रसारित
prostitution of Mumbai-Delhi girls through dating app Including those working in films advertisements
‘डेटिंग ॲप’च्या माध्यमातून मुंबई-दिल्लीच्या तरुणींचा देहव्यापार; चित्रपट, जाहिरातीत काम करणाऱ्यांचाही समावेश
Controversy on Ramayana
सीतेच्या हातून रावणाला गोमांस, हनुमानाचं विकृत चित्रण, विद्यापीठातील नाटकाचा वाद आहे काय?
Percival Everett is an American writer American fiction cinema Oscar
बुकबातमी: भटकबहाद्दराची मिसिसिपी मुशाफिरीच, पण भिन्न नजरेतून..

मं. गो. राजाध्यक्ष.. जे. जे. स्कूल ऑफ आर्टचे माजी अधिष्ठाता. अनेक कलासंस्थांमध्ये सल्लागार. कलाविषयक विपुल लेखन. विविध कलांचे जाणकार विश्लेषक.

भारतीय चित्रपटसृष्टी जगभरात प्रसिद्धी पावलेली आहे. एकेकाळी चित्रपटगृहात एखादा चित्रपट लागला की त्यावरील रंगीत बॅनर आधी आपले लक्ष खेचून घेत असत. चित्रपटाची निर्मिती जितकी मोठी, तेवढाच बॅनरवरील खर्च अफाट अशी त्याकाळी स्थिती होती. त्यावेळच्या मद्रासमधील निर्माते असे मोठे चित्रपट काढीत व त्यांची प्रसिद्धीही तेवढीच करीत. त्यापैकी जेमिनी स्टुडिओचे एस. एस. वासन यांनी १९४८ साली काढलेला ‘चंद्रलेखा’ हा चित्रपट! या चित्रपटाने त्या काळात रेकॉर्ड ब्रेक केला होता. आणि अशा अनेक कृष्णधवल चित्रपटांना रंगभोर आविष्काराने चित्रपटगृहांत प्रेक्षकांना खेचण्याचे काम हे बॅनर करीत असत. अर्थात असे बॅनर रंगवणारे अनेक कलाकार त्या काळात होते. काही नावाजलेले, काही अनामिक. एक मोठे क्षेत्रच होते ते. यापैकी काही जण चित्रपटांची पोस्टर्सही करीत असत. त्यापैकी काही ऑफसेटवर, तर काही चक्क हाताने लिथोच्या दगडावर काम करीत असत. पोस्टरमध्ये जितके रंग तितके दगड बनवून त्यावर प्रत्येक रंगाचे छपाईसाठी वेगळे काम करावे लागे.

काही दिग्दर्शक बॅनरच्या बाबतीत अतिशय चोखंदळ असत. त्यांचे खास असे पेंटरही ठरलेले असत. त्यांचे स्टुडिओही ठरलेले असत. मुंबईत काही ठरावीक चित्रपटगृहांवर आकर्षक पद्धतीने या बॅनरची सजावट केली जात असे. त्यापैकी काही म्हणजे गिरगावातील ऑपेरा हाऊस, लॅिमग्टन रोडवरील इम्पिरियल, मेट्रो, मराठा मंदिर, नाझ, मॅजेस्टिक, लिबर्टी, मिनव्‍‌र्हा, नवीन उदयाला आलेले आणि राज कपूरच्या दोन इंटरव्हलच्या ‘संगम’ या पहिल्या चित्रपटाने सुरू झालेले अप्सरा ही चित्रपटगृहे होती. या चित्रपटगृहांवर बॅनरची आतषबाजी आणि इलेक्ट्रिक रोषणाई पाहणे म्हणजे एक पर्वणी असे. एकदा तर कोल्हापूरहून बाबुराव पेंटर स्वत: आपल्या एका चित्रपटाचे बॅनर रंगवण्यासाठी मुंबईला ऑपेरा हाऊसला आले होते. त्यांच्या उत्कृष्ट पेंटिंगचा दर्जा असलेले त्यांचे बॅनर पाहण्यासाठी आणि जे. जे. स्कूलच्या विद्यार्थ्यांना दाखविण्यासाठी तेथील डायरेक्टर कॅ. सॉलोमन स्वत: विद्यार्थ्यांना तिथे घेऊन आले होते.

बॅनर पेंटिंगची कामे करणारे काही नामवंत कलाकार त्या काळात होते. त्यात देव आनंद यांच्या चित्रपटासाठी काम करणारे अंकुश नावाचे पेंटर होते. त्यांनी केलेली ‘जुवेल थीफ’मधील डोक्यावर टोपी घातलेला व बारीक नजरेने आपणाकडे पाहणारा देव आनंद, ‘गाईड’मध्ये घुंगरू घेतलेला केवळ हात, त्यामागून दिसणारा वहिदाचा वैफल्यग्रस्त चेहरा, तसेच भगवी शाल गुंडाळून हताशपणे डोळे मिटून बसलेला देव आनंद त्या काळातील प्रेक्षकांच्या हृदयात ठाण मांडून बसले होते. नुसती पेंटिंगच नव्हे, तर त्याची मांडणी, रंगसंगती, व्यक्तीची ओळख या सर्वच बाबी कुशलरीत्या सांभाळलेल्या असत. सुचेता भिडे या कथक नर्तकीचे वडील विश्वनाथ भिडे हे बी. विश्वनाथ या नावाने बॅनर रंगवीत असत. त्यांची रंगसंगती अगदी पेंटिंगचा दर्जा असलेली होती. त्यांनी केलेले ‘अनुराधा’ या चित्रपटाचे बॅनर विशेष गाजले होते. हा चित्रपट संगीतबद्ध केला होता पं. रविशंकर यांनी. राजकमलच्या ‘नवरंग’मधील संध्याचे प्रचंड अशा घंटांवरील केलेले आणि मधुराज उपळेकरांनी बॅनरवर साकारलेले नृत्य हे या चित्रपटाचे खास आकर्षण ठरले होते. राजकमलच्या चित्रपटांच्या प्रसिद्धीचा दर्जा व्ही. शांताराम यांनी नेहमीच राखला होता.

मुंबईतही बॅनरची तसेच पोस्टरची रंगीबेरंगी दुनिया साकारणारे काही विशेष कलाकार म्हणजे सुदेश भोसले यांचे वडील डी. आर. भोसले, एन. आर. भोसले, बाळकृष्ण वैद्य, समर्थ आर्टमध्ये काम करणारे राव, कोल्हापूरचे मधुराज उपळेकर, दादरच्या पामार्टचे परचुरे, दिवाकर हे चित्रकार होत. पामार्टमध्ये ‘कानून’ या चित्रपटाची पोस्टर्स करताना मी विद्यार्थीदशेत बाहेर उभे राहून पाहिली आहेत. तसेच गुरुजी यांच्या समर्थ आर्टमध्ये राव यांच्याही कामाचा आविष्कार पाहिला आहे. या बॅनर पेंटरचे सार्वभौम सम्राट मानावेत असे कोल्हापूरचे जी. कांबळे! त्यांनी व्ही. शांताराम यांच्या राजकमलसाठी अगणित कामे केली. ‘दहेज’ चित्रपटाच्या बॅनरवर त्यांनी दाखविलेल्या नोटा खरोखरीच्या भासत. व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व प्रत्यक्षात बॅनरवरील चित्रात उतरवणे आणि त्यावर रंगांची उधळण करणे ही कांबळे यांची खासियत होती. व्ही. शांताराम त्यांची खास काळजी घेत. त्यांना लागणाऱ्या साहित्याकडे ते काळजीपूर्वक लक्ष देत. पुढे के. असिफच्या ‘मोगल-ए-आझम’ चित्रपटाच्या वेळी असिफने कांबळे यांना त्यांच्या संपूर्ण प्रसिद्धीसाठी पाचारण केले, तेव्हा त्यांनी सांगितलेली रक्कम त्यांनी तात्काळ मंजूर करून त्यांना आगाऊ रक्कम देण्यासाठी चेकबुक काढले. त्यावेळी कांबळेंच्या मनात एक वेगळीच योजना आकार घेत होती. महात्मा गांधींचे एक मोठे चित्रप्रदर्शन त्यांना करायचे होते. त्यासाठी आगाऊ रक्कम न घेता सर्व पैसे काम झाल्यावर एकरकमी घेण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. पण दुर्गाबाई खोटे यांनी त्यांना निदान ‘शकुनाचे म्हणून  पाच हजार तरी घ्या’ म्हणून आग्रह केल्यावर त्यांनी ते स्वीकारले. पुढे ‘मोगल-ए-आझम’च्या कांबळे यांच्या सिद्धहस्तातून निर्माण झालेल्या रंगांची उधळण करणाऱ्या बॅनरनी इतिहास घडवला. अकबराचे कर्तव्यकठोर, पण पुत्रप्रेमाने थोडेसे गहिवरलेले व्यक्तिमत्त्व नाईफच्या जाड अशा फटकाऱ्याने त्यांनी साकारले. त्याचवेळी सलीम व अनारकलीचा मूक प्रणय साकारताना त्यांनी रंगांतून व रंगलेपनातून दाखवलेला हळुवारपणा मनाला स्पर्शून जातो. जमिनीवर पहुडलेली मधुबाला व तिच्या चेहऱ्यावर हळुवारपणे पीस फिरवणारा सलीमच्या भूमिकेतील दिलीपकुमार यांचे केलेले उत्कट चित्रण हे कांबळे यांच्या कलेचा परिपाक होता. एका इतिहास घडवलेल्या चित्रपटाचे तितकेच अर्थपूर्ण बॅनर जी. कांबळे यांनी आविष्कृत केले होते. पण पुढे दुर्दैवाने के. असिफचा पुढचा चित्रपट आपटला व काही काळानंतर स्वत: असिफच पैगंबरवासी झाले व कांबळे यांचे सर्व पैसे बुडाले. पुढे चित्रकार हळदणकर यांच्या सांगण्यावरून त्यांनी चित्रपटांची ही अल्पजीवी कामे दूर सारली व कोल्हापूरला जाऊन त्यांनी पेंटिंग करण्यास आरंभ केला.

सोलापूरच्या यल्ला-दासी यांनीही आपल्या कलेने ही चित्रपटसृष्टी नटवली. त्यांची रंगभान होर्डिग्ज देहभान विसरायला लावत. वास्तविक विश्वनाथ यल्ला व सिद्राम दासी अशा दोघा मित्रांनी एकत्र येऊन ‘यल्ला-दासी’ या नावाने ते काम करीत. कामही असे करीत की त्यातील सौंदर्य डोळ्यांत साठवून घ्यावे. बेळगावातील एका चप्पल दुकानदाराने त्यांच्याकडून अंदाजे सहा फुटी माला सिन्हाचे नऊवारी साडी नेसलेले आणि पायात पांढऱ्या जरीच्या व लाल गोंडा असलेल्या चपला घातलेल्या पोशाखात पेंटिंग करवून घेतले होते. ते येणाऱ्या-जाणाऱ्यांचे खास आकर्षण होते. अशा या यल्ला-दासी जोडीने खूप काम केले. दिलीपकुमारच्या ‘गंगा जमुना’ चित्रपटाचा रौप्यमहोत्सव झाला त्यावेळी दिलीपकुमार सोलापूरला आले होते.  चित्रपटगृहावरील यल्ला-दासी यांनी केलेले मनमोहक बॅनर पाहून ते खूप प्रभावित झाले व त्यांनी या दोघा कलावंतांची भेट घेऊन त्यांच्या पुढील चित्रपटांची पोस्टर्स करण्याचा आग्रह धरला. पुढे ही कलावंत जोडी देशभर गाजली.

तीच गोष्ट हल्लीच दिवंगत झालेल्या दिवाकर करकरे यांची. जे. जे. स्कूल ऑफ आर्टमधून कलाशिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी स्वत:चा स्टुडिओ सुरू केला. त्यांचे ड्रॉइंग उत्कृष्ट होते. विशेषत: पोट्र्रेट व त्यातील लाइकनेस यामध्ये त्यांचा हातखंडा होता. काही काळ त्यांनी चित्रमहर्षी एस. एम. पंडित यांच्याकडेही उमेदवारी केली होती. तेथे त्यांची चित्रपटसृष्टीशी ओळख झाली. त्यामुळे त्यांच्याकडे चित्रपटांची कामे येऊ लागली. चित्रपटांची कामे अल्पजीवी असली तरी त्यात ते आपले सर्वस्व ओतत आणि त्यांची कामेही पेंटिंगच्या दर्जाची असत. त्यासाठी ते ऑइल पेंट वापरीत असत. त्यानी नाईफने केलेले रंगलेपन, चेहऱ्यावरील मोजकेच पॅचेस, त्यातून होणारे भावदर्शन हे कोणत्याही पेंटिंगपेक्षा कमी नसे. अमिताभ बच्चन यांची शर्टाची टोके बांधलेला अ‍ॅंग्री यंग मॅन प्रतिमा झाली ती रसिकांपर्यंत पोचवण्याचे श्रेय दिवाकरांना नक्कीच द्यावे लागेल. अनेक मोठमोठय़ा बॅनर्सच्या चित्रपटांची कामे त्यांनी केली. त्यामध्ये ‘शोले’, ‘दीवार, ‘अमर अकबर अंथोनी’, ‘ऑंधी’, ‘सत्यम् शिवम् सुंदरम्’, ‘वक्त’ असे चित्रपट होते. ‘वक्त’च्या पोस्टरवर त्यांनी रंगवलेले राजकुमार, सुनील दत्त, साधना, शर्मिला टागोर, शशी कपूर यांची पोट्र्रेट्स हा तर पेंटिंगमधील एक चमत्कार होता. तसेच ‘अमरप्रेम’मधील स्वेटर घातलेल्या राजेश खन्नाच्या खांद्यावर रेललेली शर्मिला, ‘त्रिशूल’मधील संजीवकुमार, अमिताभ व शशी कपूर यांची पोट्र्रेट्स व त्याखाली हेमा मालिनी व राखी यांची पोट्र्रेट्स या सिद्धहस्त कलाकाराच्या आविष्काराची जाणीव करून देत असत.

पुढे कृष्णधवल चित्रपटांचा काळ जाऊन चित्रपट रंगीत झाले. तरी या बॅनर्सचे साम्राज्य अबाधित होते. मोठमोठय़ा भव्य चित्रपटांच्या बॅनर-पोस्टर्सनी चित्रपटगृहे नटत होती. या हातांनी रंगवलेल्या बॅनरमध्ये जाणवत असे ते कलाकाराचे कौशल्य, त्याची ओळख पटवण्याची हुकूमत, विषयाप्रमाणे जाणवणारे रंगलेपन, विलोभनीय रंगसंगती, शिवाय रंगांच्या फटकाऱ्यातून जाणवून दिलेले चित्रसामर्थ्य, प्रत्येक कलाकाराची वैशिष्टय़पूर्ण शैली आणि स्वतंत्र ओळख यामुळे ते केवळ मोठे केलेले फोटो वाटत नसत, तर एखाद्या प्रदर्शनातील पेंटिंगच आपण पाहतो आहोत अशी जाणीव होत असे.

असे हे चित्रपटांचे भव्य बॅनर्स तयार होताना पाहणे या आमचा शालेय- महाविद्यालयीन काळातील एक आवडता छंद होता. प्रथम निवडक असे चित्रपटाचे १०ह्णह्ण ७ १२ह्णह्ण  आकाराचे स्टील फोटोग्राफ निवडून त्यावरून लेआऊट केले जायचे. त्यावर साधारण अर्ध्या इंचाचे चौकोन आखून त्यापटीने बॅनरवर तसेच मोठे चौकोन दोऱ्याला रंगीत पावडर लावून आखले जात. त्यावर आऊटलाइन केली जात असे. नंतर मोठमोठय़ा ब्रश व नाईफने त्यावर प्राथमिक रंगलेपन केले जाई. हे काम बहुधा शिकाऊ अथवा नवशिक्या कलाकारांकडून करवले जाई. त्यानंतर प्रत्यक्ष काम करणारा कलाकार आपल्या अंतिम फटकाऱ्यांनी त्याचा चेहरामोहरा बदलून टाकत असे. हे काम करताना शिडीवर चढून करावे लागे. त्यावेळी कलाकार व कॅनव्हास यामध्ये केवळ दोनेक फुटांचे अंतर असे. पेंटर जेव्हा ईझलवर स्ट्रेचर ठेवून काम करतात ते त्यांच्या पूर्ण आटोक्यात असते; पण इथे सर्व काही जवळून करायचे. त्यातही आकार मोठा असल्याने बॅनरवरील कलाकाराचा एकेक डोळाच सुमारे तीन फुटांचा असे. तोही जवळून करणे व रास्त अंदाज घेणे हे मोठेच कौशल्याचे काम असे. या काम करणाऱ्यांना पैसे मिळत, तेही चौरस फुटांच्या आकारावर. पुन्हा चित्रपटगृह सजवल्यावर हे बॅनर उतरवले जात ते नंतर झोपडपट्टय़ांमधील टपऱ्यांवर पावसापासून बचाव करण्यासाठी टाकलेले दिसत. या कलाप्रकाराला आपल्याकडे कधीच प्रतिष्ठा मिळाली नाही वा तिचे रक्षण केले गेले नाही. नंतर आधुनिक तंत्रज्ञान आले. मशीनवर फोटोग्राफीच्या साहाय्याने विनायलचे बॅनर बनू लागले. वाहतुकीसाठी ते सुलभ झाले. मुख्य म्हणजे ते सहजरीत्या बनत असल्याने वेळ वाचू लागला. एका रात्रीत अनेक चित्रपटगृहांवर ते लावता येऊ लागले. आणि हळूहळू हाताचे कौशल्य दाखवणारे बॅनर कलाकार कमी होऊ लागले. एका जिवंत अशा कलाविश्वाला निर्जीव तंत्रज्ञानाने गिळून टाकले. आज अशा बॅनर-पोस्टर्सना एक पुरातन महत्त्व प्राप्त झाले आहे. अनेक कलाकार जुन्या पोस्टरप्रमाणे बनवून देण्याचा व्यवसाय आजही करीत आहेत. श्रीमंत लोक या पोस्टर्सनी आपले दिवाणखाने सजवू लागले आहेत. पण एकेकाळी एम. एफ. हुसेनसारखे जगप्रसिद्ध कलाकारही चित्रपटाचे बॅनर रंगवून आपला उदरनिर्वाह करीत होते. आज जेव्हा फोटोग्राफी व तंत्रज्ञानाच्या आधारे बनवलेले बॅनर मी चित्रपटगृहावर पाहतो, तेव्हा त्यात ना असतो कलाविष्काराचा प्रत्यय, ना नयनरम्य रंगलेपनाची उधळण, ना कलाकाराच्या मुक्तपणे मारलेल्या ब्रशच्या फटकाऱ्यांचे सामर्थ्य, ना चित्रपट कलाकाराचे ब्रशच्या साहाय्याने उलगडून दाखविलेले व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू!  असतो तो फक्त यांत्रिक निर्जीवपणा. फुलदाणीत शोभेला ठेवलेल्या कृत्रिम फुलांप्रमाणे. त्याला ना सुगंधाचा दरवळ, ना मनाला प्रफुल्लित करणारा तजेला! खरेच, ते कलावैभव पुन्हा कधीच दिसणार नाही.