१९८५ साली डॉ. डेमिंगने जपानला भेट दिली होती. पाश्चात्त्यांच्या प्रभावाचा संसर्ग जपानला ग्रासणार आहे याची कल्पना त्याला आली होती. आपल्या एका भाषणात डॉ. डेमिंगने जपानी उद्योजकांना याची स्पष्ट कल्पनाही दिली होती. ‘पाश्चात्त्यांना ज्या अर्थाने स्पर्धेवर अधिष्ठित जग अपेक्षित आहे, त्या जगाची जीवनशैली फारशी सुखावह नाही. खुद्द अमेरिकन उद्योग जगताला या स्पर्धेमुळे मोठे नुकसान सोसावे लागते आहे. तुमचे (म्हणजे जपानचे) उद्योगविश्व सशक्त आहे; पण सशक्त शरीरालादेखील रोगाचा संसर्ग होऊ शकतो हे ध्यानात ठेवा.’..
मागील लेखात आपण टोयोटा या जगप्रसिद्ध कंपनीचे एक उदाहरण विचारात घेतले होते. टोयोटा या सर्वाधिक मोटार उत्पादन करणाऱ्या कंपनीने विकलेल्या दीड कोटी मोटारी ग्राहकांकडून परत मागवल्या, याचा उल्लेख मागील लेखात आलाच आहे. इतक्या मोठय़ा प्रमाणात विकलेल्या गाडय़ा परत मागवण्याइतकी कोणती गंभीर समस्या उद्भवली होती? झाले होते ते असे – एकाच कारखान्यात टोयोटा अनेक प्रकारची मॉडेल्स बनवते. मोटार उत्पादन करताना नजरचुकीने ड्रायव्हरच्या पायाखाली जे रबर मॅट घातले जाते, ते त्या त्या मॉडेलच्या आकारानुसार असते. अवघ्या दोन गाडय़ांमध्ये चुकून दुसऱ्या मॉडेलचे रबर मॅट घातले गेले होते. घातलेले चुकीचे मॅट्स आकाराने मोठे होते. ड्रायव्हरने ब्रेक दाबला तर कदाचित त्या मोठय़ा आकाराच्या मॅटमुळे ब्रेक पूर्ण दाबला जाणार नाही, असा धोका होता. ही चूक लक्षात आली खरी, पण एव्हाना फार उशीर झाला होता. नेमक्या कोणत्या दोन मोटारींमध्ये  चुकीची मॅट घातली आहेत हे कळणार कसे? कंपनीने तात्काळ सर्व गाडय़ा परत मागवल्या.
भारतात आपण अशा प्रकारच्या सेवेची कल्पना तरी करू शकतो का? ‘विक्रीपश्चात सेवा’ या नावाखाली बहुसंख्य ग्राहकांच्या पश्चात्तापच नशिबी येतो. ‘तीन वर्षांच्या गॅरंटीसह’, ‘पाच वर्षांच्या वॉरंटीसह’ अशा आकर्षक नावांखाली केवळ किमतीत वाढ केली जाते. पण प्रत्यक्ष अशा प्रकारची सेवा घेण्याची वेळ आली, की ‘भीक नको पण कुत्रे आवर’ असे म्हणण्याची पाळी ग्राहकावर येते.
जपानमध्ये ग्राहकांना कशी वागणूक मिळते ते आपण टोयोटाच्या उदाहरणावरून समजू शकतो. या सगळ्या प्रगल्भ कार्यसंस्कृतीची प्रेरणा डॉ. एडवर्ड डेमिंगच्या विचारसरणीत आहे. त्याचबरोबर याचे श्रेय मोठय़ा प्रमाणात जपानी जीवनशैलीलादेखील आहे. जपानी समाजजीवनाची मूलतत्त्वे आणि डॉ. डेमिंगची विचारसरणी हे एक अतिशय अनोखे, विलोभनीय अद्वैत आहे. जपानी समाजजीवनाची अनेक मूलतत्त्वे विचारात घेऊन त्याच्याशी सुसंगत अशी विचारप्रणाली डॉ. डेमिंगने विकसित केली. दुसरीकडे डॉ. डेमिंगच्या अनेक कल्पना जपानी उद्योजकांनी (आणि जनतेनेदेखील) अंधपणे न स्वीकारता आपल्या संस्कृतीशी त्या सुसंगत करून घेतल्या. ‘क्वालिटी सर्कल’, ‘कायझेन’ ही अशीच काही लोकप्रिय उदाहरणे.
पाश्चात्त्य जग आणि विशेषत: अमेरिका, जपानची प्रगती पाहून अक्षरश: दिङ्मूढ होऊन गेले होते. या प्रगतीचे मर्म समजावून घेण्याचा त्यांनी आपल्यापरीने खूप प्रयत्न केला. अमेरिकन उद्योग- विशेषत: वाहन उद्योग- तर जपानच्या रेटय़ाने पार मोडकळीस आला होता. पण जपानी जीवनशैली आणि डॉ. डेमिंगची विचारसरणी यांचे अद्वैत जोवर समजत नाही, तोवर हे जपानच्या प्रगतीचे इंगित समजणार नाही. जपानी कंपन्यांशी तांत्रिक करार करणे, त्याचाच एक भाग म्हणून आपले कर्मचारी जपानी उद्योगधंद्यांत प्रशिक्षणाकरिता पाठवणे असे वरवरचे अनेक उपाय अमेरिकन लोकांनी करून पाहिले. त्याला यश येणे शक्यच नव्हते. बराच काळ ‘जपान’ हे एक मोठे कोडे होते जगासाठी. विशेषत: अमेरिकनांसाठी.
आपण ही आज नेमकी अशाच प्रकारची चूक करतो आहोत का? अमेरिका आणि पाश्चात्त्य जगातील अनेक गोष्टींचे अंधानुकरण करून आपण आपली प्रगती साधू पाहात आहोत का? हा प्रश्न केवळ उद्योग जगतापुरताच मर्यादित नाहीये. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात आपण प्रगतीकरता पाश्चात्त्यांकडे पाहतो आहोत का? आणि असे करताना आपण केवळ अंधानुकरण करतो आहोत. गाभा समजावून घेणं आणि मग ती मूलतत्त्वे भारतीय संस्कृतीशी- समाजमानसाशी- जीवनशैलीशी सुसंगत करून घेऊन विकास साधणं हा खरा कळीचा मुद्दा आहे.
नुकतेच ‘झिम्मा’ हे विजया मेहता यांचे नितांत सुंदर आत्मचरित्र वाचनात आले. मेहता यांनी नाटय़कलेचे जे प्रशिक्षण परदेशात घेतले- परदेशी तज्ज्ञ रंगकर्मीशी त्यांचा जो संपर्क आला, त्याचा उपयोग करून त्यांनी भारतीय नाटय़परंपरेचा प्रवाह अधिक विस्तारित- अधिक जोमदार केला. पण असे उदाहरण अपवादात्मकच. बाकी आमच्याकडची बरीचशी मंडळी पाश्चात्त्य नाटक-सिनेमांच्या निकृष्ट कॉप्या मारण्यातच मश्गुल आहेत.

डॉ. एडवर्ड डेमिंग यांची विचारसरणी आणि भारतीय तत्त्वज्ञान- भारतीय जीवनशैली याची सांगड घालणे सहजशक्य आहे. शिक्षण-आरोग्य-उद्योग आणि सरकार या चार घटकांच्या परस्पर समन्वयाशिवाय जपान अणुस्फोटाच्या विनाशातून सावरणार नाही ही स्पष्ट जाणीव डेमिंगने दिली होती. जपानी नेतृत्वाने सामान्य जनतेच्या प्रत्यक्ष सहभागातून हा चमत्कार घडवून दाखवला. आजही जपानवर नित्यनवी संकटे कोसळत असतात. भूकंप आणि सुनामी या दोन नैसर्गिक आपत्ती आता नित्याची बाब वाटावी इतक्या सातत्याने जपानवर आदळत असतात आणि तरीही विश्वास बसू नये इतक्या वेगाने या देशातील परिस्थिती मूळ पदावर येते.
काही काळापूर्वी महाभयंकर सुनामीचा तडाखा जपानला बसला. हे संकट सामान्य वाटावे इतका भयानक परिणाम झाला या सुनामीचा; तो म्हणजे अणुभट्टी उद्ध्वस्त झाली आणि किरणोत्सर्गाचा धोका निर्माण झाला. इतक्या भयानक संकटातही हा देश डगमगलेला नाही. डॉ. एडवर्ड डेमिंग यांची मोठी मुलगी डायना हिने या प्रसंगी जपानी जनतेला उद्देशून एक पत्र लिहिले. या पत्रात ती म्हणते- ‘अणुबॉम्बच्या संकटानंतर डॉ. डेमिंग तुमच्याबरोबर होते. आजचे संकटही तितकेच भयावह आहे.    डॉ. डेमिंग आता नाहीत. पण त्यांचे विचार, त्यांची तत्त्वे, त्यांची शिकवण आजही तितकीच प्रेरणादायी आहे.’
स्पर्धा आणि सहकार्य याविषयीचे पायाभूत आमूलाग्र चिंतन ही डेमिंगची असली खासीयत. त्याच विचारसरणीचा आधार घेत जपान सरकारने प्रत्येक नागरिकाला हक्काचा रोजगार दिला आणि रोजगारानंतरही बारा वर्षे त्याने प्रशिक्षण घेतलेच पाहिजे अशी योजना आखली. ही योजना यशस्वीपणे राबवली आणि जपान महासत्ता बनली.
अर्थात जपानमध्ये सर्व काही आलबेल आहे असे समजायचे कारण नाही. पाश्चात्त्य संस्कृतीचा वरवंटा उर्वरित जगावर फिरत असताना जपान अलिप्त कसे राहील? सोनी आणि टोयोटा या दोन सर्वात मोठय़ा कंपन्यांनी कर्मचारी प्रशिक्षणाची ही योजना काही काळापूर्वी बंद केली. त्याचे परिणामही त्यांना भोगावे लागले. वास्तविक संगीताच्या बाजारपेठेत सोनीने धुमाकूळ घातला, तो आपल्या ‘वॉकमन’च्या जोरावर. १९७९ साली सोनीने वॉकमन बाजारात आणून संगीत ऐकण्यासाठी एका जागी बसावे लागते ही संकल्पनाच मोडीत काढली. पण गेल्या वर्षी सोनीने वॉकमनचे उत्पादन अधिकृतरीत्या बंद केले. जगप्रसिद्ध अमेरिकन कंपनी ‘अ‍ॅपल’ने आयपॉड बाजारात आणून सोनीच्या वर्चस्वाला धक्का दिला. ‘स्पर्धा’ या अवगुणाची लागण सोनीलाही झाली आणि ‘अ‍ॅपल’ला हरवायचे या एकमेव नादात ही कंपनी आपली ओळखच गमावते की काय अशी अवस्था निर्माण झाली. याचाच परिणाम म्हणजे आज टीव्हीच्या बाजारपेठेतील त्यांचे वर्चस्व संपुष्टात आले असून ती जागा सॅमसंगने काबीज केली आहे.
डेमिंगच्या विचारसरणीला दुय्यम समजण्याची अशीच चूक टोयोटाने केली. याचा मोठा फटका त्यांना बसला. सुदैवाने टोयोटाच्या संस्थापकाच्या नातवाने आता टोयोटाचे व्यवस्थापन आपल्या हाती घेतले आहे. सर्वोच्च पदावर बसल्यावर त्याने पहिला आदेश काढला- ‘डॉ. डेमिंगच्या ज्या ज्या योजना आपण मधल्या काळात रद्दबातल केल्या होत्या, त्या त्या सर्व योजना नव्याने पुन्हा सुरू करा.’
१९८५ साली डॉ. डेमिंगने जपानला भेट दिली होती. पाश्चात्त्यांच्या प्रभावाचा संसर्ग जपानला ग्रासणार आहे याची कल्पना त्याला आली होती. आपल्या एका भाषणात डॉ. डेमिंगने जपानी उद्योजकांना याची स्पष्ट कल्पनाही दिली होती.
‘पाश्चात्त्यांना ज्या अर्थाने स्पर्धेवर अधिष्ठित जग अपेक्षित आहे, त्या जगाची जीवनशैली फारशी सुखावह नाही. खुद्द अमेरिकन उद्योग जगताला या स्पर्धेमुळे मोठे नुकसान सोसावे लागते आहे. तुमचे (म्हणजे जपानचे) उद्योगविश्व सशक्त आहे; पण सशक्त शरीरालादेखील रोगाचा संसर्ग होऊ शकतो हे ध्यानात ठेवा.’
‘स्पर्धा’ या संसर्गापासून आपण स्वत:ला कसे वाचवणार हा खरा कळीचा मुद्दा आहे.   

Hindu Muslim binary In Narendra Modi lone Muslim MP Choudhary Mehboob Ali Kaiser
एकमेव मुस्लीम खासदाराने सोडली साथ; म्हणाला, “मोदींच्या सत्ताकाळात द्वेष वाढला”
British scientist Peter Higgs waited 48 years to present his research
आइनस्टीनलाही प्रदीर्घ प्रतीक्षा करावी लागली होती; तर इतरांची काय कथा?
loksatta explained article, bahujan vikas aghadi, hitendra thakur, politics, Vasai, Palghar
विश्लेषण : पालघर-वसईत हितेंद्र ठाकुरांशी सर्वच पक्षांना जुळवून का घ्यावे लागते? ठाकुरांच्या यशाचे रहस्य काय?
kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !