सुभाष अवचट

सुभाष अवचट.. एक मस्त कलंदर चित्रकार. लेखक. प्रगल्भ वाचक. आणि एक अथांग माणूसवेडा! त्यांच्यासोबत झालेल्या ‘लोकसत्ता गप्पां’च्या कार्यक्रमात त्यांनी श्रोत्यांशी केलेल्या मुक्त संवादातलं त्यांचं स्वच्छंद, मनमोकळं चिंतन..  त्यांचं आयुष्य, त्यांची चित्रकारिता, त्यातली स्पृश्यास्पृश्यता, भेटलेली आणि त्यांच्या चित्रांतून प्रकटलेली माणसं, त्यांचं साहचर्य आणि त्यातून परिपक्व होत गेलेले ते स्वत:..

Sarbajeet singh
सरबजित सिंगच्या मारेकऱ्याची पाकिस्तानात हत्या; मुलगी म्हणते, “हा न्याय…”
AAP MP Sanjay Singh
“केजरीवालांचा तुरुंगात छळ होतोय”, आप खासदार संजय सिंहांचा आरोप; म्हणाले, “त्यांच्या पत्नीलाही…”
jitendra awhad marathi news, lucky compound building collapse marathi news
“लकी कंपाऊंड दुर्घटनेनंतरही अधिकाऱ्यांनी शिकायला हवे होते, पण…”, आमदार जितेंद्र आव्हाड यांची पालिका अधिकाऱ्यांवर टीका
arvind kejriwal
तुरुंगात अरविंद केजरीवालांचं ४.५ किलो वजन घटलं, आप नेत्या आतिशी म्हणाल्या, “त्यांना काही झालं तर…”

ओतूर माझं गाव. सुंदर. छान. गावात जायला त्याकाळी तीन नद्या पार कराव्या लागत. गावात वीज नव्हती. वर्तमानपत्रं, मासिकं नव्हती. पण तरीही मजा होती. तिथला निसर्ग अप्रतिम होता. गाव धार्मिक होतं. त्यामुळे वारकरी होते. कीर्तनं होत. प्रवचनं होत. विविध प्रकारची माणसं तिथं येत. मला आठवतंय, गावात तेव्हा गोरक्ष यायचे. मस्त गायी, खिलारं घेऊन यायचे. अगदी गोकुळातनं आल्याप्रमाणे! हे गोरक्ष आता कुठं दिसतच नाहीत.. आमचं ओतूर गाव एखाद्या कुटुंबासारखं होतं. १९५५ च्या अलीकडं-पलीकडचा हा काळ. गावात मी फार हुंदडलोय. शाळेत फार गेलो नाही. शिक्षकांशी माझं जमतच नसे ना!

गावातली एक आठवण म्हणजे पावसाची! आम्ही ज्या वाडय़ात राहायचो त्याला पत्रे होते. त्यावर पावसाच्या सरी पडून त्यांचा आवाज चांगलाच घुमायचा. जणू हजारो माणसं एकत्र बसून प्रार्थनेचे सूर आळवतायत असा तो नाद असायचा. गारांचाही पाऊस यायचा कधी कधी. इथल्यासारखा पाऊस मी पुन्हा कधीच अनुभवला नाही.

या गावची, तिथल्या घराची दुसरी आठवण म्हणजे माणसांची! आमच्या घरात खूप सारी माणसं होती. ४५-५० हून अधिक असावीत. त्यात आज्या होत्या. वपन केलेल्या, आलवण नेसलेल्या. तिथं माझा एक खेळ चाले. त्या आजीला मी शिवलं की ती आंघोळ करी. मग मी तिला सारखं शिवायचो.. की पुन्हा आंघोळ करी. हा दुष्ट खेळ मी फार खेळत असे. शेवटी आजी वैतागली. म्हणाली, ‘‘तू शिव.. मी आंघोळच करणार नाही.’’ ही एक क्रांतीच होती की त्या वाडय़ात!

आमच्या वाडय़ात भोई होते. धनगराची, शेतकऱ्यांची मुलं होती. अनसूयाबाई नावाची आमची एक शेतकरीण होती. तिच्याकडेच मी जेवायचो. या मुलांबरोबर गावातले खेळ खेळायचो.

आता मागे वळून पाहिलं की एक जाणवतं, की इथलं माझ्या नेणिवेत काही राहिलं असेल तर ते म्हणजे- इथले रंग! डीप यलो कलर.. खुरासनीच्या शेतांचा. मातीच्या ढेकळांचा व्हॅन्डेट ब्राऊन रंग. डोंगर-टेकडय़ांच्या तर अप्रतिम रंगजुळण्याच दिसायच्या. अल्ट्रामरिन ब्ल्यू रंगाचे डोंगर, जंगलं मी तिथं पाहिली. माझी आई अप्रतिम रांगोळ्या काढी. चुन्यात मोरपीस बुडवून दिंडी दरवाजाबाहेर ती रांगोळी काढत असताना मी तिच्या आजूबाजूला रेंगाळायचो. आमच्या इथं हेमाडपंथी देवळं होती. गर्द झाडी, जंगलं होती. त्यात अनेक प्राणी होते. अगदी बिबटय़ा येऊन जायचा घराजवळून.. या अशा अनेक आठवणी आहेत तिथल्या. पण अधिक लक्षात राहिले ते रंगच. मला वाटतं, हे रंग सोडले तर माझ्या चित्रांत इथलं काही फारसं आलेलं नाही.

चित्रांशी संबंधित या गावातली माझी एक सूक्ष्म आठवण म्हणजे ‘चांदोबा’ची! गावात पोस्ट ऑफिस नव्हतं. रनर पत्रं घेऊन येई. अख्खा गाव त्याची वाट पाहायचा. मीसुद्धा. ‘चांदोबा’साठी. हा अंक मद्रासहून यायचा. तर त्यात चित्रा नावाचा एक चित्रकार सुंदर चित्रं काढायचा. मला ती फार आवडत. या चित्रा नावाच्या चित्रकाराबद्दल फार उत्सुकता होती मला. पुढे काही वर्षांनी पुण्याला आल्यावर एके दिवशी वर्तमानपत्रात बातमी वाचली.. चित्रा गेल्याची!

दुसरी एक गोष्ट म्हणजे गावात सर्कस यायची. आम्ही सारे तिथं उडय़ा मारत जायचो. नदीकाठी वाळूत भरायची सर्कस. ही सर्कस म्हणजे फाटका तंबू आणि पेट्रोमॅक्सचे कंदील. वडील डॉक्टर. त्यामुळे तिथं आम्हाला पुढची जागा मिळायची. तर.. एक दिवस सकाळी मी उठलो आणि पाहतो तो विदूषक आमच्या घरी आलेला! मी एकदम खूश. सर्वाना बोलावलं.. विदूषक आलाय म्हणून. तो विदूषक रडत होता. त्याचा हात तुटला होता. पण मला ते कळलंच नाही. कारण तो त्याच्या रंगभूषेतच आला होता. आणि विदूषक म्हणजे हसणारा.. हसवणारा अशीच आमची समजूत. ही एक घटना. नंतर खूप वर्षांनी मी अमेरिकेतून परतलो होतो आणि अमूर्त चित्र करायला घेतलं होतं. पण कॅनव्हासवर उतरला तो विदूषकच.. हातमोडका विदूषक.

या ओतूरमध्येच माझ्या आयुष्याला टर्निग पॉइंट देणारी ती घटना घडली. झालं असं की, गावातल्या नदीच्या डोहात मी उडी घेतली. त्यात माझ्या उजव्या पायाला मार बसला. एखादा खडक लागला असावा. तेव्हा कळलंच नाही काही. पण नंतर पायातून कळा येऊ लागल्या. पुढे कळलं, की पायातली रक्तवाहिनी तुटलीय.  प्रचंड वेदना होत होत्या. मला पुण्याला आणलं उपचारांकरता. माझी आजी त्यावेळी सोबत होती. डॉक्टरांनी मला उजव्या पायाच्या अंगठय़ापासून छातीपर्यंत प्लॅस्टर केलं. या अवस्थेत मी सहा महिने होतो. पण या प्रकारात पाय आणखी वाळून गेला. कारण आत रक्ताभिसरणच होत नव्हतं. मग मी ओतूरला परतलो. तिथं मी कुबडय़ा घेऊन चालू लागलो. गावातली एरव्ही मला घाबरणारी मुलं मला ‘लंगडा’ म्हणून चिडवू लागली. त्यामुळे मी घराच्या बाहेर फारसा पडत नसे. मग वेळ घालवायला मी वाचू लागलो. तरीही एकटेपणा जाईना. त्यात आपला पाय कापावा तर लागणार नाही ना, असा मनात धसका. हा धसका भयंकर होता. काही दिवसांनी मला मुंबईला नेण्यात आलं. चर्नी रोडच्या इस्पितळात माझ्या पायाचं ऑपरेशन झालं. दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी मी क्लोरोफॉर्ममधून जागा झालो तर शेजारी काकू बसलेली. मी पहिल्यांदा पायाकडे पाहिलं. पाय कापलेला नव्हता. उजव्या पायाची बोटं दिसली. ती हलवली तशी हलली. मला हायसं वाटलं. काकूला म्हणालो, ‘मी हिमालय नाही पाहिलाय, ताजमहाल नाही पाहिलाय. मला तो पाहायचा आहे..’ पुढे पाय पूर्णपणे बरा झाला. या घटनेनंतर माझ्या आयुष्यात खूपच बदल झाला. मला आयुष्यात सर्व काही करून बघायचंय, त्यासाठी हे आयुष्य परत मिळालंय असं मला वाटलं. त्यानंतर पुढच्या वीसेक वर्षांत मी वेगानं खूप काही मिळवलं, त्यामागे हीच भावना तीव्रपणे असावी. या काळात वाचनाची गोडी लागली आणि सोबतीला एकटेपणही आलं. आजवर त्यांनी मला सोडलेलं नाही.

पुण्यात गंधे म्हणून आमचे एक शेजारी होते. ते आर्किटेक्ट होते. ते पस्र्पेक्टिव्ह रंगवत असत. ते मी पाहायचो. मला वाटलं, मला हेच करायचंय. मग वडलांनी मला आर्किटेक्चरला घातलं. पुण्यातलं अभिनव कलामहाविद्यालय. पण तिथं गेल्यावर कळलं, की सॉलिड जॉमेट्री, अप्लाइड मेकॅनिक्स शिकावं लागतं! मी एक महिना वर्गात बसलो. सकाळी सातपासून तास सुरू व्हायचे. मला पडसं व्हायचं. त्यात जॉमेट्री, मेकॅनिक्स! मग दांडय़ा मारायला सुरुवात झाली. पण जायचं कुठं? तर- रेल्वेस्टेशन! तिथं जाऊन स्केचेस करू लागलो. माझे सगळे मित्र एस. पी.-फग्र्युसनमध्ये. त्यांच्याकडे जायला लागलो. त्यांच्याबरोबर मी त्यांच्या वर्गात, ग्रंथालयात बसे. ट्रिपलाही त्यांच्यासोबत जाई. कुणाला कळलंच नाही, की मी त्यांच्या महाविद्यालयाचा विद्यार्थी नाही, हे. पण एक दिवस हे बिंग फुटलं. मग नेहमीप्रमाणे माझा भाऊ अनिल माझ्या मदतीला आला. ‘एक वर्ष वाया गेलं तर जाऊ दे..’ म्हणाला, ‘आपण तुला पाहिजे त्या ठिकाणी अ‍ॅडमिशन घेऊ.’ मला जायचं होतं फाइन आर्टला. पण त्यानं टाकलं कमर्शियलला!  कमर्शियलला मी कॅलिग्राफी, फोटोग्राफी, प्रिंटिंगमधले ब्लॉक मेकिंग शिकलो. अनेक तांत्रिक गोष्टी मला इथं शिकायल्या मिळाल्या. ‘व्हिज्युअलायझेशन’सारखे शब्द मात्र कधी तिथं कानावर पडले नाहीत! त्यादृष्टीनं पाटी कोरीच राहिली. हे एका अर्थी बरंच झालं. कारण इथून बाहेर पडल्यावर आम्हाला जे शिकायचंय ते पूर्वग्रहाविना शिकता आलं.

पुण्यात भाऊ अनिलमुळे (लेखक अनिल अवचट) युक्रांद वगैरे चळवळ्या गटांशी संबंध येत गेला. त्याच्यामुळेच मी ‘साधना’ परिवाराशी जोडला गेलो. शनिवार पेठेतल्या साधना प्रेसमध्ये रमू लागलो. जी. डी. आर्ट सुरू असतानाच ‘साधना’त काम करू लागलो. इथंच मला खरे शिक्षक मिळाले. एस. एम. जोशी, ना. ग. गोरे, यदुनाथ थत्ते, बाबा आमटे, वसंत पळशीकर, मधू दंडवते.. किती नावं सांगावीत! त्यातही एसेम् अण्णांच्या आठवणी असंख्य आहेत.

एक दिवस मी एसेम् अण्णांकडे गेलो. म्हणालो, ‘‘अण्णा, मी जी. डी. आर्टमध्ये पहिला आलोय. मला सरकारी नोकरी चालून आली आहे. तुमचं शिफारसपत्र हवंय.’’ ते काहीतरी लिहीत बसले होते. त्यांना हे ऐकून आनंद झाला. म्हणाले, ‘‘कुठे नोकरीला जाणार?’’ त्यांना सांगितलं, ‘‘मुंबईला! १२०० रुपये पगार आहे. टीए-डीए, राहायचीही सोय आहे!’’ त्यांनी विचारलं, ‘‘तुला इथं किती मिळतात?’’ ‘‘३० रुपये.’’ मग म्हणाले, ‘‘बरं, पण तिथं जाऊन तू काय करणार? रेल्वे जाळू नका, कुटुंब-नियोजन यावरची चित्रं काढणार?’’ माझ्या आनंदावर एकदम विरजणच पडलं. मला या कशाची कल्पनाच नव्हती. त्यांना म्हटलं, ‘‘मला नाही आवडणार असं करायला. मी नाही जाणार तिथं.’’ ते ऐकून म्हणाले, ‘‘शाबास! आता एक करू. तुझा पगार आपण ३०० रु. करू आणि तुला इथं स्टुडिओ काढून देऊ. बाहेरचीही कामं तू इथं करू शकतोस. कसं वाटतं?’’ मी ‘हो’ म्हणालो! अण्णांनी माझ्यासाठी शिफारसपत्र दिलं. त्यावर लिहिलं होतं- ‘हा एक होतकरू चित्रकार आहे. पण त्याला नोकरी देऊ नये!’

..आणि अशा रीतीने माझा पहिला स्टुडिओ आकाराला आला. आंब्याच्या फळ्या मारून केलेला स्टुडिओ. तिथं मला आर्ट पेपरवर किंवा फार रंग वापरून काम करण्याची संधी कधीच मिळाली नाही. ‘साधना’ प्रेसमधल्या न्यूज प्रिंटवरच मला चित्रं काढावी लागत. या कागदावर शाई फुटे. मात्र, त्यातूनच मला नवी स्टाईल मिळाली.. जी मी पुढे अनेक वर्ष मराठी पुस्तकं, मासिकांमध्ये वापरली. त्यामुळे मला सुंदर, चकचकीत कागदांवर कामच करता येत नाही. ‘साधना’त कधी कव्हर करायचं असलं की कुणीतरी म्हणे, ‘‘यावेळी सुंदर कव्हर करायचं. भरपूर रंग वापरायचे.’’ ‘भरपूर’ म्हणजे दोन रंग.. एक कागदाचा आणि दुसरा काळा!

अण्णांची आणखी एक आठवण. त्यावेळी माझं मुंबईला येणं-जाणं होई. एकदा मुंबईतली माझी कामं आटोपून डेक्कन क्वीन पकडली तर डब्यात अण्णा बसले होते खिडकीपाशी. मी खूश. आता त्यांच्याबरोबर आपला प्रवास होणार म्हणून. प्रवासात किशोरी आमोणकरांपासून क्रिकेटपर्यंत अनेक विषयांवर आमच्या गप्पा झाल्या. शिवाजीनगर आलं. मी तिथं उतरणार होतो. मग अण्णाही माझ्याबरोबर उतरले. गप्पा करत रिक्षात बसलो. त्यांना त्यांच्या घरापाशी सोडलं. विचारलं, ‘‘आता काय करणार?’’ म्हणाले, ‘‘आंघोळ करून बाबा आढावांकडे हमाल पंचायतीच्या मीटिंगला जाणार.’’ त्यांना सोडून मी घरी आलो अन् थोडय़ा वेळाने अण्णांचा मुलगा डॉ. अजयचा फोन.. ‘‘अण्णांना तू शिवाजीनगरला का उतरवलंस? रिक्षातून का घरी आणलंस? आम्ही पुणे स्टेशनवर त्यांची वाट पाहत थांबलो होतो.’’ काय झालं ते मला कळेना. मी त्याला घडलेलं सगळं सांगितलं. तो म्हणाला, ‘‘अण्णा टाटा हॉस्पिटलमधून केमो घेऊन निघाले होते. त्यांना कमरेच्या हाडांचा कॅन्सर आहे. त्यांना बसता येत नाही. त्रास होतो प्रचंड..’’ या अशा वेदनांसह हा माणूस प्रवास करतो, गप्पा मारतो, रिक्षाने घरी जातो. इतकंच नव्हे तर तिथून हमाल पंचायतीच्या मीटिंगलाही जातो. पण वेदनांबद्दल, आजाराबद्दल अवाक्षरही काढत नाही.

ही अशी माणसं.. खूप काही शिकवून जाणारी.

अशी अनेक ध्येयवादी माणसं मला आयुष्यात भेटली. खूप काही देऊन गेली. त्यांच्यासोबत वावरताना त्यांच्या सहवासातूनच मला माझ्या चित्रांचे विषयही सहजतेनं सुचायचे. उदाहरणार्थ, हमालांवरील माझी चित्रमालिका. बाबा आढावांबरोबर मी हमाल पंचायतीत जाऊन बसायचो. भाऊ अनिल आणि वहिनी हमालांसाठी तिथं दवाखाना चालवीत. त्याआधी अनेक वर्ष मी रेल्वे स्टेशनवर बसून हमालांची स्केचेस केलेली होतीच. हमालांचं जगणं, त्यांचे प्रश्न मला माहीत होते. त्यातूनच मला हमाल रंगवावेसे वाटले. १९८६ साली प्रदर्शन भरवलं त्यांचं. त्यात एक चित्र होतं : छोटय़ा मुलापासून आजोबा-पणजोबापर्यंत सगळे जण गाडीची वाट पाहतायत. पाठीमागे काळ वेगाने चाललाय. ‘लास्ट सफर’ त्याचं शीर्षक.

चित्रांसाठी हे असे विषय घेतले की लोक मला प्रश्न करत. ‘हे काय विषय आहेत चित्रांचे? तू का काढतोस अशी चित्रं? ही चित्रं कोण विकत घेतं?’ असले प्रश्न विचारत. माझ्या शेजारी एक सर्जन राहत होता. मी ‘लास्ट सफर’ हे चित्र काढत असताना तो माझ्याकडे आला. त्यानं ते पाहिलं आणि मला हे प्रश्न विचारले. माझ्या घराच्या खाली एक गॅरेज होतं. तिथं मुक्या नावाचं एक लहान पोरगा काम करी. तो मला चहा वगैरे आणून देत असे. तो सर्जन माझ्याकडे आलेला असताना नेमका मुक्याही तिथं होता. मी चित्राकडं बोट दाखवत त्याला विचारलं, ‘मुक्या, हे काय आहे?’ त्यानं लगेच रेल्वेचा आवाज काढत हातवारे वगैरे करून ते चित्र काय आहे हे सांगितलं. मी सर्जनला म्हटलं, ‘बघ, याला कळतं, पण तुला नाही कळत!’ तुम्ही नीट पाहाल तर तुम्हाला दिसेल ना!

अशीच आणखी एक चित्रमालिका- ‘पेपर अँड पीपल’! ‘साधना’त काम करत असल्यामुळे कागदाच्या जगाशी ओळख झालेली होती. हे विश्व मी जवळून पाहिलं होतं. कागद..पेपर हेच तिथलं जीवन. त्यावरच बसायचं, त्यावरच जेवायचं. घामही कागदानेच पुसायचा. तेच माझ्या चित्रांतूनही उतरलं.

या काळात मी खूप फिरत होतो. अनेक गुहा पाहिल्या. इजिप्त, चीन, मेक्सिको, बँकॉक, जॉर्डन अशा जगभरच्या वेगवेगळ्या संस्कृती पालथ्या घातल्या. मायन संस्कृती असो वा चिनी वा िहदू संस्कृती; त्यांच्यातलं सगळं तत्त्वज्ञान फिरून दगडापाशी येतं असं मला जाणवलं. दगडात माणूस काहीतरी शोधत आला आहे असं मला वाटतं. त्याचीच ‘गोल्ड : द इनरलाइट’ ही चित्रमालिका झाली.

‘जिम्पग इन ऑरेंज’ या माझ्या चित्रप्रदर्शनाची कथाही अशीच. ओशोंशी (आचार्य रजनीश) धागा जुळवणारी. झालं असं की, विनोद खन्ना हा माझा मित्र. पुण्यातल्या रजनीश आश्रमात तो यायचा. तो माझ्या घरीच उतरायचा. ‘तू ओशोंना एकदा भेट..’ म्हणून त्याचा सारखा आग्रह चाललेला. तर एकदा त्याच्यासोबत गेलो. रजनीशांची भेट झाली. ते त्यांच्या पांढऱ्याशुभ्र वेशात आले. त्यांचे विलक्षण टपोरे डोळे पाहणाऱ्याला ट्रान्समध्येच घेऊन जायचे. ते आले तसे तिथले सगळे त्यांना पाहताना ट्रान्समध्येच गेलेले. मी मात्र त्यांच्याकडे चित्रासाठीचं मॉडेल म्हणून पाहत होतो. पोट्र्रेटसाठी त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा अंदाज घेत होतो. मी ओशोंकडे पाहतोय.. ते माझ्याकडे पाहतायत. असा काही वेळ गेला. मी काही प्रतिसाद देत नाही म्हटल्यावर ते हसून म्हणाले, ‘सुभास (‘ष’चा उच्चार ‘स’ असा करायची त्यांची मध्य प्रदेशी हिंदी स्टाईल!), तुमको इधर आना पडेगा.’’ मी म्हटलं, ‘आपको भी आना पडेगा!’ ते म्हणाले, ‘कहाँ?’ मी म्हटलं, ‘मेरे स्टुडिओ में.’’ त्यांच्या बोलण्यात फ्रेज येत. ते म्हणाले, ‘सुभास, यू हॅव टू जम्प इन ऑरेंज!’ त्या फ्रेजचा अर्थ काही माझ्या लक्षात आला नाही. माझ्या डोळ्यांसमोर चित्र आलं ते- एक मोठा स्वीिमग पूल आहे आणि सगळे संन्याशी त्यात उडय़ा घेताहेत. मी म्हटलं, ‘ये बहुत अच्छा सब्जेक्ट है. मं पेंट करूंगा. देखने के लिए आपको आना होगा.’ त्यावर हसून ते म्हणाले, ‘जरूर आऊंगा. लेकीन तुम कभी संन्यास नहीं लेना. सिर्फ पेंटिंग करते रहो!’  आणि त्या भेटीवर ‘जिम्पग इन ऑरेंज’ हे माझं चित्रप्रदर्शन झालं. १९७९ साली.

पुस्तकांची कव्हर्स करणं ही माझी पॅशन आहे. माझ्या आयुष्यातील पहिलं कव्हर मी केलं ते वयाच्या सोळाव्या वर्षी. ‘बंदिशाळा’ या कवी यशवंतांच्या पुस्तकाचं. कॉन्टिनेन्टलच्या अनंतराव कुलकर्णीनी ते मला दिलं. पुढे मी अनेक पुस्तकांची कव्हर्स केली. पुस्तकं, वाचन हा माझ्या आस्थेचा विषय. कव्हरच्या निमित्ताने पुस्तकांच्या संहिता वाचायला मिळत. त्यामुळेही माझा ओढा कव्हर्सकडे होता. मुख्य म्हणजे त्यामुळे मराठीतल्या जवळपास सगळ्याच मोठय़ा लेखक-कवींशी माझी दोस्ती झाली. व्यंकटेश माडगूळकर, श्री. दा. पानवलकर, दि. बा. मोकाशी, कुसुमाग्रज ते नामदेव ढसाळ अशा अनेकांच्या पुस्तकांची कव्हर्स मला करता आली आणि त्यांच्याशी त्यातून घट्ट मत्रीही झाली.

सत्तरच्या दशकाचा तो सगळा काळ परिवर्तनाचा होता. नाटक, कविता, संगीत, सिनेमा सारंच बदलत होतं. त्या अनुषंगाने माझी चित्रंही बदलत होती. आजूबाजूला जे बदल होताना मी पाहिले ते माझ्या चित्रांतून उतरत गेले. कव्हर्समध्येही हे दिसेल. मग ते नारायण सुर्वेच्या पुस्तकांची कव्हर्स असोत की ग्रेसच्या कवितांसाठीची चित्रं!

जी. ए. कुलकर्णी या गूढ माणसाशी माझा संबंध आला तोही कव्हरमुळेच! एक दिवस श्री. पु. भागवतांनी मला बोलावलं. एक संहिता माझ्यासमोर ठेवली. ती जीएंच्या ‘इस्किलार’ची होती. म्हणाले, ‘हे घे आणि इथंच वाच. बाहेर न्यायचं नाही.’ बाहेर पाऊस पडत होता. मी तिथं त्यांच्या ऑफिसमध्ये बसून जीएंच्या कथा वाचल्या. आणि माझ्या डोळ्यासमोर प्रथम आल्या त्या ग्रीक मायथॉलॉजीतल्या प्रतिमा! मी तिथं बसूनच त्यावर चित्रं काढली. चित्रासाठी आर्ट पेपरच हवा अशी काही भानगड नव्हती. मी ‘समाजवादी’ चित्रकार असल्यामुळे न्यूज िपट्र आणि पेन मला पुरेसं होतं. चित्रं श्रीपुंकडे दिली. जीएंनी ती पाहिली. त्यांना उत्सुकता.. की चित्रं कोणी काढली? मग राम पटवर्धनांना जीएंची पत्रं यायला लागली त्याविषयी. पटवर्धनांनी ती माझ्याकडे पाठवली. त्यातून मग माझा आणि जीएंचा पत्रव्यवहार सुरू झाला. ते धारवाडला. मी मुंबईला. अशी १५०-२०० पत्रं असतील माझ्याकडे त्यांची. पुढे त्यांच्यावरचं माझं एक पुस्तकही आलं. त्यामागेही एक कथा आहे.. एकदा अनंतराव कुलकर्णी मला धारवाडला घेऊन गेले. त्यांचा जीएंशी घनिष्ठ परिचय. आमची गाडी थांबली ती थेट एका जुनाट क्लबपाशी. तिथं जी. ए. पत्ते खेळत. कुणालाही तिथं त्यांच्या लेखक असण्याविषयीची काही माहिती नव्हती. त्यांच्या कथांमधल्या वातावरणासारखाच तो क्लब होता. तर- आम्हाला तिथं पाहून जी. ए. दचकलेच. ‘मला जावं लागेल..’ म्हणत उठून काढता पाय घेऊ लागले. अनंतरावांनी त्यांना गाडीत बसवलं. जी. एं.नी पुढे थोडय़ा अंतरावर गाडी थांबवली आणि ते उतरले. म्हणाले, ‘मला थोडं काम आहे इथं. तुम्ही उद्या या.’ आणि एका बोळात ते निघून गेले. अनंतराव म्हणाले, ‘आता हे लपले असतील इथंच कुठंतरी. तू जा आणि त्यांना शोधून आण.’ संध्याकाळची सात-साडेसातची वेळ. मी त्यांच्या मागावर गेलो तर जी. ए. एके ठिकाणी लपून  राहिलेले दिसले. म्हटलं, ‘ही लहानपणची लपाछपी झाली. चला ना आमच्याबरोबर..’ तसं ते म्हणाले, ‘आज नाही. उद्या या.’ त्याप्रमाणे मग आम्ही दुसऱ्या दिवशी गेलो त्यांच्याकडे. घरासमोर एक गेट. लहानसंच. पण त्याला मोठं कुलूप घातलेलं. घराचा दरवाजा, खिडकीलाही कुलूप. ते पाहिलं आणि मी म्हटलं, काय गमतीशीर माणूस आहे हा! तिथं व्हरांडय़ात जीए. गॉगल लावून बसलेले. काही पेंटिंग्जही होती घरात त्यांच्या. माझ्याकडे तेव्हा एक जुना कॅमेरा होता. तिथं मार्केटमध्ये मला एक रोल मिळाला होता नशिबानं. जीएंना म्हणालो, ‘फोटो काढू का?’ तर म्हणाले, ‘‘नाही.’’ मग मी कुलपांचे फोटो काढू लागलो. तर ते म्हणाले, ‘कुलपांचे फोटो का काढताय?’ म्हटलं, ‘सिम्बॉलिक आहे- तुमच्यासारखं!’ त्यावर ते म्हणाले, ‘तू माझे फोटो काढ.’ मी त्यांच्याकडं पाहिलं. तर ते वळून तिरके बसलेले. माझ्या लक्ष्यात आलं- त्यांचं नाक थोडंसं तिरपं होतं. मी त्यांना म्हटलं, ‘जीए, तुमचं नाक सरळ दिसेल असे फोटो मी काढतो.’ आणि मी त्यांचे फोटो काढले. तेच आज सर्वजण वापरतात.

तात्या.. व्यंकटेश माडगूळकर हे माझे जवळचे मित्र. उमदे. जीन्स घालणारे. हॅण्डसम माणूस. ते शेजारी राहायचे. पु. ल. देशपांडेही जवळच राहायचे. माझा स्टुडिओही तिथंच होता. मला आठवतंय, मी ‘वारकरी’ चित्रमालिका करत होतो. तिथं तात्या यायचे. पुलंही यायचे. मग त्यांना घेऊन मी गच्चीत जायचो. गो. नी. दांडेकर, वसंत बापट ही मंडळीही यायची. तिथं आमच्या गप्पांच्या मैफिली रंगायच्या. अनेक विषयांवर. गप्पांचा धबधबाच! उशीर होतोय असं वाटलं की पुलंना घरी जायचं असायचं. मी म्हणायचो, मी बोलतो सुनीताबाईंशी. त्यांना फोन केला की त्या स्वत:हून खाण्याचा डबा घेऊन यायच्या!

..सुनीताबाईंबद्दल अनेकांना भीती वाटे. त्यांचा दबदबाच होता तसा! पण मी मात्र त्यांची आपुलकी तेवढी अनुभवली. मला सुनीताबाईंविषयी आणि त्यांना माझ्याविषयी काहीच माहीत नव्हतं तेव्हाची एक आठवण.. पुलंचं पुस्तक- ‘तुका म्हणे आता’ कव्हरसाठी माझ्याकडं आलं होतं.. मधुकाका कुलकर्णीकडून. मी त्याचं कव्हर तयार केलं. डोईवरील गंध आणि त्यावर शीर्षक असं. ते घेऊन पुलंकडे गेलो. दार सुनीताबाईंनी उघडलं. म्हणाल्या, ‘कोण तुम्ही? भेटीची वेळ घेतलीय का?’ वगैरे. म्हटलं, ‘मी जातो.’ तेवढय़ात पुलं आतून बाहेर आले. ‘ये..’ म्हणाले. गेलो. पुलंना चित्र दाखवत होतो, तर सुनीताबाई मधेच ‘हे काय आहे?’ म्हणून विचारू लागल्या. मला काही माहीत नव्हतं त्यांच्याविषयी. पुलंना म्हटलं, ‘‘भाई, या कोण आहेत? मधे मधे का बोलतायत?’’ पुलं बघतच राहिले! म्हणाले, ‘‘अरे, सुनीताबाई आहेत या.’’ मी म्हणालो, ‘‘अहो, मग चहा करायला सांगा ना त्यांना!’’ सुनीताबाई माझ्याकडे बघत म्हणाल्या, ‘‘बरं, आणते!’’ ..तिथून आमची जी मैत्री झाली ती शेवटपर्यंत. त्यानंतर त्या जिथे जातील तिथून माझ्यासाठी उत्तम चहा घेऊन येत! इतकंच नव्हे तर जीएंवरील माझ्या पुस्तकाचं संपूर्ण प्रूफरीडिंग आणि ड्राफ्ट त्यांनीच तपासला होता.

तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशींशी माझी भेट योगायोगानेच झाली. झालं असं की, सोलापूरचे श्रीराम पुजारी यांच्या बंधूंनी संत रामदासांवर पुस्तक लिहिलं होतं. त्याचं कव्हर मी केलेलं. त्या पुस्तकाचं प्रकाशन होतं. प्रकाशक कुलकर्णीनी बस केलेली जाण्यासाठी. मीही त्यात. बसमध्ये माझी सीट शास्त्रीजींच्या शेजारीच. मला ते कोण वगैरे काही माहीत नव्हतं तेव्हा. त्यांना विचारलं, ‘‘आपण?’’ तसे कुलकर्णी चिडले. मला म्हणाले, ‘‘तर्कतीर्थ आहेत ते..’’ मला काही समजेचना. म्हटलं, आम्ही दोघं काय ते पाहतो. तर्कतीर्थाना मी विचारलं काय करता म्हणून. ते म्हणाले, ‘‘नवभारत करतो. वाईला असतो.’’ मग त्यांनी खिशात हात घातला आणि बेन्सन अ‍ॅण्ड हेजेसचं पाकीट बाहेर काढत मला म्हणाले, ‘‘ओढता का?’’ म्हटलं, ‘‘ओढतो. पण इथं मोठय़ांसमोर लाज वाटते.’’ त्यांनी सिग्रेट शिलगावली आणि विचारलं, ‘‘पिकासोबद्दल काय वाटतं?’’ मी चकीत! धोतर, पांढरी टोपी, जॅकेट अशा वेशातला, मंत्र्यासारखा दिसणारा हा माणूस आणि पिकासो! पिकासोवर आमच्या खूप गप्पा झाल्या. नंतर प्रकाशनाचा कार्यक्रम आटोपून आम्ही परतत होतो तर्कतीर्थासोबत. मला त्यांनी विचारलं, ‘‘पंढरपूर पाहिलंय का?’’ मी ‘नाही’ म्हणालो. तसे म्हणाले, ‘‘चला, आधी पंढरपूरला जाऊ या.’’ मग बस पंढरपूरकडे वळवली. तिथं गेलो. देवळाच्या पायऱ्या चढू लागलो तसं कोणीतरी पाय पकडला. म्हटलं, ‘‘हे काय?’’ तर, ‘‘ही पुंडलिकाची पायरी. पैसे टाका!’’ तर्कतीर्थानाही त्याचा राग आला होता. मग पाय झिडकारत देवळात पोहोचलो. दुपार होती. दार बंद! आता? तिथं बाजूला बडव्यांचं कार्यालय होतं. मी तिथं विचारलं, तर विठोबाच्या विश्रांतीची वेळ आहे म्हणाले. तर्कतीर्थ संतापले. श्रद्धेचा गैरफायदा घेतायत म्हणून कडाडले. मी विनोदाने त्यांना म्हटलं, ‘‘आबा, विठ्ठल-रखुमाईला शांत झोपू द्या. त्यांच्या रोमान्समध्ये आपण नको.’’ राग आवरत ते म्हणाले, ‘‘नाही. रखुमाईचं देऊळ पलीकडे आहे.’’ तो बडवा म्हणाला, ‘‘५० रु. द्या आणि दर्शन घ्या.’’ म्हटलं, आम्हाला शो बघायचाच नाहीय. तर्कतीर्थाना म्हटलं, ‘‘चला, तुम्ही जरा गाडीत बसा. मी आलोच.’’ ते गेले. मग मी बडव्याच्या खोलीत गेलो. दार बंद केलं. त्याला बडव बडव बडवला आणि गाडीत येऊन बसलो. तर्कतीर्थ म्हणाले, ‘‘कायं झालं?’’ म्हटलं, ‘‘विठोबा पावला!’’

पुढे काही वर्षांनी मी अ‍ॅमस्टरडॅमला गेलो होतो. तिथं व्हॅन गॉगच्या चित्रांचं प्रदर्शन होतं. माझ्या मैत्रिणीने त्याची तिकिटं काढून ठेवली होती. प्रदर्शनाच्या ठिकाणी गेलो तर ती तिकिटं आदल्या दिवशीची असल्याचं कळलं. आत चित्रं आहेत, मी उंबरठय़ावर उभा आहे; पण चित्रं पाहता येत नाहीयेत. मी अस्वस्थ. तेवढय़ात कोणीतरी आलं आणि म्हणालं, ‘‘मी ऐकलं तुमचं. ही माझ्याकडची दोन तिकिटं घ्या तुम्हाला..’’ विठोबा पावला!

माझ्याकडे अनेक जाहिरातींची कामं येत होती. माहितीपटांचीही कामं मी करत होतो. पण मी पूर्णवेळ पेंटिंगकडं वळण्याला कारण ठरल्या दोन घटना..

एकदा एका फुलपेज जाहिरातीचं काम माझ्याकडे आलं. तेव्हा डिजिटल वगैरे काही नव्हतं. आमच्या टीमने रात्रंदिवस मेहनत घेऊन काम केलं. वर्तमानपत्रात ती जाहिरात प्रसिद्ध झाली. त्या दिवशी आम्ही जोशात सेलिब्रेशन केलं. घरी आलो तर बायको त्याच जाहिरातीच्या पानाचं वह्य़ांना कव्हर घालत होती! तसं माझ्या लक्षात आलं- ही लगेचच शिळी होणारी कला आहे. हे काम जास्त काळ टिकत नाही. आणि मुख्य म्हणजे हे काम कोणीतरी करायला सांगितलेलं आहे. त्यामुळे त्यात आनंद नाही. मग मी ठरवलं, कुणासाठी तरी काम करायचं नाही.

दुसरी घटना.. मी मित्राकडे अमेरिकेत गेलो होतो. तिथं एक कलाविभाग पाहायला माझा मित्र मला घेऊन गेला होता. तिथल्या एकाला मी माझी कामं दाखवली. मिळालेल्या पुरस्कारांची माहिती दिली. तर ते म्हणाले, ‘‘पण यात ड्रॉइंग कुठंय?’’ मी शांत! मग त्यांनी इलस्ट्रेशन्स आणि ड्राइंग्जमधला फरक मला सांगितला. त्यांना म्हटलं, ‘‘थँक यू!’’

तिथून परत आलो आणि माझं कमर्शियलचं दुकान पहिलं बंद केलं. आता फक्त पेंटिंगच करायचं ठरवलं. लोकांनी मला वेडय़ात काढलं. कमर्शियलचे चांगले प्रोजेक्ट माझ्याकडे येत होते. पण मी ते सारं बंद केलं आणि पूर्णवेळ पेंटिंग सुरू केलं. तब्बल २५० चित्रं तयार झाली. तोवर माझ्याकडचे पैसे संपत आले होते. आता प्रदर्शन करणं गरजेचं होतं. ट्रक भरून मी मुंबईला आलो. जहांगिरला प्रदर्शन! आदल्या दिवशी रात्री आम्ही ती चित्रं लावत होतो. रात्रीचे दोन वाजलेले. तर बाहेर एक जोडपं आलं होतं. त्यांना चित्रं पाहायची होती. म्हटलं, अजून लावलेली नाहीत. त्यांना तशीच पाहायची होती. म्हटलं, या. ते जोडपं आलं आणि त्यांनी १९ चित्रं विकत घेतली. सुरुवात तर चांगली झाली. पुढे आठ दिवस लोक येत होते, चित्रं पाहत होते, पण एकही चित्र गेलं नाही. आम्ही आवराआवरीला सुरुवात केली. रविवार होता. आणि आश्चर्य! लोक येऊ लागले. ते अमुक क्रमांकाचं चित्र कुठंय, म्हणून विचारू लागले. मग माझ्या लक्षात आलं, की लोकांना चित्रं घ्यायची होती, पण कोणीतरी माझी चित्रं फार महागडी असल्याची अफवा पसरवली होती. आर्ट गॅलऱ्यांचं ते राजकारण होतं. असो. पण त्या दिवशी माझी सगळी चित्रं विकली गेली!

आपल्या समाजाला चित्रकलेची समज आहे का, याविषयी मला शंका आहे. पाश्चात्त्य समाजात कलेविषयीची आस्था आहे. लोक बाजारात गेले की एखादं तरी चित्राचं प्रिंट विकत घेतात. आपल्याकडं मात्र असं कुणाला वाटत नाही. मुलांना घेऊन जावं असं कलासंग्रहालय आपल्याकडं नाही. चित्रकलेचं चांगलं मासिक नाही. टीव्हीवर त्यासंबंधी काही दाखवत नाहीत. कुठून येणार कलाजाणीव? याला चित्रकार समाजही तितकाच जबाबदार आहे असं मला वाटतं. चित्रकारांमध्येही एक वर्णव्यवस्था निर्माण झालेली आहे. कुणी म्हणतं, आम्ही निसर्गचित्रं काढतो, कुणी रिअ‍ॅलिस्टिकवाले, कुणी ग्राफिक, तर कुणी अ‍ॅब्स्ट्रॅक्ट करणारे. हे सगळे एकमेकांच्या प्रदर्शनाला जात नाहीत. त्यात पुन्हा टोळ्या. पुण्याची टोळी, मुंबईची टोळी. एकजूट नाही. संवाद नाही. त्यामुळे प्रश्नही सोडवता येत नाहीत. कलाशिक्षणाचंच पाहा. गेल्या १५-२० वर्षांत कलेचं शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांची आता काय परिस्थिती आहे, ते पाहा. त्यांचं काय चाललंय, कुठे राहतायत, चित्रं काढतायत का, याचा शोध घ्या. तळागाळातून येऊन आयुष्यातली सोनेरी वर्ष घालवून कलाशिक्षण घ्यायचं, सर्टिफिकेट पदरात पाडायचं; पण त्यात काही ‘अर्थ’ नाही. त्यांना नोकरी मिळत नाही. एक प्रदर्शन लावायचं तरी पाच-सात लाख रुपये खर्च. मग ही मुलं चित्रांपासून दूर जातात. काही जण शेतीत राबतात, काही सैन्यात भरती होतात.

यावर मला उपाय सुचतात ते असे : लहानपणापासून मुलांसमोर चित्रं यायला हवीत. पाठय़पुस्तकांमधल्या चित्रांचा विचार वेगळ्या पद्धतीने व्हायला हवा. निसर्गाने प्रत्येकाला सौंदर्यदृष्टी दिली आहे. मुलांना चित्रं, पुस्तकं द्या. ते आपोआप शिकतील. शंका असेल तर विचारतील. दुसरं म्हणजे- चित्रकला हा महागडा छंद आहे. आपलं मूल ते निभावून नेऊ शकेल का, याचा आधी विचार करा आणि मग त्याला कलाशिक्षणात जाऊ द्या. मुख्य म्हणजे कलाशिक्षणाचा अभ्यासक्रम बदलायला हवा. सिरॅमिक, फोटोग्राफी, अ‍ॅनिमेशन अशी जीवनोपयोगी तंत्रं त्यांना शिकवायला हवीत. कलेच्या विद्यार्थ्यांना भरघोस शिष्यवृत्ती द्यायला हव्यात. सरकारने स्टुडिओ बांधून ते माफक दरात उपलब्ध करून द्यायला हवेत. हे शक्य नसेल तर चित्रकारांना ‘आरक्षण’ द्या!

शब्दांकन : प्रसाद हावळे