सानेगुरुजींनी विशाल मानवतेची शिकवण देणारे विपुल साहित्य निर्माण केले. साहित्याच्या विविध प्रांतांत त्यांनी अविरत योगदान दिले. ‘श्याम’, ‘धडपडणारा श्याम’, ‘श्यामची आई’ या पुस्तकांतून त्यांनी आपली जीवनगाथा कथन केली. पैकी ‘श्यामची आई’ हे पुस्तक मराठी भाषेतील अक्षरधन ठरले आहे. माय-लेकरातील प्रेम व संस्कारांच्या हृदयस्पर्शी आठवणी या पुस्तकात आहेत. श्यामच्या बालमनावर जे माणुसकीचे संस्कार त्याच्या आईकडून झाले त्या घटना या अजरामर कलाकृतीत कथन केल्या आहेत. सानेगुरुजींनी १९३३ साली नाशिकच्या तुरुंगात अवघ्या पाच रात्रींत हे पुस्तक लिहिले. एकदा आश्रमातील मित्रांनी त्यांना विचारले होते, ‘‘गुरुजी, तुमच्या जीवनात हा कस्तुरीचा सुगंध कोठून आला? तुमच्यामध्ये ही सेवावृत्ती, नि:स्पृहता कशी निर्माण झाली?’’ त्यावेळी गुरुजी अश्रुपूर्ण नेत्रांनी म्हणाले, ‘‘गडय़ांनो, हे सारे माझ्या आईचे देणे आहे बरं. आई माझा गुरू आणि तीच माझी कल्पतरू. प्रेमळ बोलावयास तिनेच मला शिकविले. केवळ मनुष्यावरच नव्हे, तर गाई-गुरांवर, फुलपाखरांवर, झाडा-माडांवर प्रेम करावयास तिनेच शिकविले. माझ्या आईनेच माझ्या जीवनात अत्तर ओतले. सारे तिचे! त्या थोर माऊलीचे!!’’

गुरुजींच्या आईचे लग्न ती लहान असतानाच झाले. माहेरी तिला कुणी ‘आवडी’ म्हणत, तर कुणी ‘बयो’ म्हणत. सासरचे तिचे नाव- यशोदा. आपल्या मुलांचे संगोपन कसे करायचे ही कला यशोदाबाईंना फार चांगली अवगत होती. बयो  प्रेमळ होती. आपली मुले चांगली निपजावीत म्हणून ती फार जपत असे. प्रसंगी कठोरही होत असे. घरातल्या गडीमाणसांशीही ती प्रेमाने वागे. गाई-गुरांवर, झाडामाडांवर तिची खूप माया. शेजाऱ्यापाजाऱ्यांशी ती आस्थेने वागे. अनेक नेमधर्म, व्रतवैकल्ये ती करी. असे असले तरी ती केवळ कर्मकांडे करणारी कट्टर धर्मपंथी नव्हती. आपल्या बोलण्यातून मुले जे शिकतात त्यापेक्षा जीवनातल्या वेगवेगळ्या अनुभवांतून ती अधिक शिकतात याची तिला जाणीव होती. श्यामच्या जीवनाचा झरा निर्मळ ठेवण्याचा तिने आटोकाट प्रयत्न केला. तिने त्याच्यात आचार-विचारांचे सौंदर्य निर्माण केले. ‘‘फुलांच्या कळ्या झाडावरून तोडू नयेत. फुलांना झाडावर नीट फुलू द्यावे. झाड म्हणजे फुलांची माता. मुक्या कळ्या तोडल्या की झाडाला अतिशय वाईट वाटते.’’ अशी काव्यमय शिकवण बालपणी आईने सानेगुरुजींना दिली.

लहानपणी खेळून आल्यावर श्यामने अंघोळ केली आणि पायाच्या तळव्यांना माती लागू नये म्हणून त्याने आईला लुगडय़ाचे ओचे धोंडीवर पसरण्यास सांगितले. आईला त्याचा हा हट्ट विचित्र वाटला, पण तो पुरवताना ती श्यामला म्हणाली, ‘अरे, पायाला घाण लागू नये म्हणून जसा जपतोस, तसाच मनाला घाण लागू नये म्हणूनही जप.’’ श्यामच्या आईचे हे साधेच बोल; पण त्यात किती खोल अर्थ भरला आहे!  गुरुजींचे मन सुंदर होण्यासाठी आईची ही शिकवण कामी आली.

डोक्यावर लाकूडफाटा घेऊन जाणाऱ्या अस्पृश्य म्हातारीला श्यामने मदत केली. त्या काळात अस्पृश्यांना कोणी शिवले तर त्यास दूषण देत. परंतु श्यामच्या आईने त्याच्या मदतीने लाकडाची मोळी घरात आणली. म्हातारीला खाऊपिऊ घालून मोळीचा मोबदला दिला. आणि ती श्यामला म्हणाली, ‘‘श्याम, चांगले काम करताना लोकांच्या बोलण्याकडे फार लक्ष देऊ नये. गरीब, दुबळ्यांच्या मदतीला जाताना कसली लाज? कोणत्याही जातीपातीचा असो; सर्वाना मदत करावी.’’ नि:स्वार्थी सेवेचे अन् आत्मार्पणाचे धडे आईने श्यामला दिले. ती म्हणे, ‘‘श्याम, आपल्याजवळ असेल तर गरजवंतास द्यावे. दुसऱ्यांचे अश्रू थांबवावे. त्याला हसवावे आणि सुखवावे. या आनंदासारखा आनंद नाही. दगड उचलावा. काटा फेकावा. फुलझाड लावावे. रस्ता झाडावा. कोणाशीही गोड बोलावे. आजाऱ्याजवळ बसावे. रडणाऱ्याचे अश्रू पुसावेत. अरे, मनुष्य अन्नावाचून जगेल, पण प्रेमावाचून जगणार नाही.’’ गुरुजींच्या हृदयात ही प्रेमाची भूक त्यांच्या आईनेच उत्पन्न केली.

दिवाळीत मिळालेले भाऊबीजेचे पैसे तिने श्यामच्या वडिलांना नवीन धोतर घेण्यासाठी खर्च केले. वास्तविक तिलासुद्धा किती दिवस नवीन लुगडे मिळाले नव्हते. वडिलांना याचे वाईट वाटे. ‘‘तुम्ही नवीन धोतर नेसलात म्हणजे मीच नवीन लुगडे नेसण्यासारखं आहे,’’ अशी समजूत घालून ‘आज दिवाळीत साऱ्यांनी हसायचे,’ असे तिने सांगितले. गरिबीमध्येही मातेच्या या प्रेमपूर्वक त्यागाचा अनुभव गुरुजींनी घेतला.

श्यामने मित्राच्या पुस्तकातून रामरक्षा लिहून काढली व पाठ केली याचा आईला खूप आनंद झाला. ‘‘असाच कष्ट करून मोठा हो. पण एक गोष्ट लक्षात ठेव, की दुसऱ्यापेक्षा आपल्याला अधिक काही येते या गर्वाने कोणाला हिणवू नकोस,’’ असा सल्ला श्यामला तिने दिला.

रात्रीच्या वेळी जात्यावर एकटय़ाने दळण दळणाऱ्या आईला श्याम मदत करीत असे. त्यावरून शेजारच्या जानकीवहिनी ‘श्यामला अगदी बायकोच करून टाकले आहे,’ असे म्हणून त्याची थट्टा करीत. ‘‘जानकीवहिनी, पुरुषांना कधी कधी बायकांची कामे करावी लागतात. त्यात कमीपणा थोडाच आहे! श्याम मला धुणीभांडी सर्वच कामांत मदत करतो. श्यामला बायको करून टाकला आहे, ते आवडते हो त्याला..’’ श्यामच्या आईने जानकीवहिनींची घातलेली समजूत आणि ते स्फूर्तिमय शब्द श्यामच्या अंत:करणात कायमचे कोरले गेले. आईच्या या संस्कारांमुळे श्याम मातृहृदयी बनला. या गुणांमुळेच अंमळनेरच्या छात्रालयात सानेगुरुजी समस्त विद्यार्थ्यांची आई बनले. मातेप्रमाणे ते सर्व मुलांची काळजी घेत. सेवा, त्याग आणि प्रेम या गुणांनी गुरुजींनी अल्पावधीतच छात्रालयात तेज निर्माण केले होते.

पोथ्या-पुराणे वाचून श्यामचे मन प्रेमळ, भक्तिमय, भावमय झाले होते. त्यातून आई-वडिलांनी श्यामची मनोभूमिका तयार केली होती. वाचनाच्या या ओढीनेच एकदा एक पुस्तक विकत घेण्यासाठी श्यामने पाहुण्यांच्या खिशातील पैसे चोरले. याबाबत श्यामला विचारण्यात आले. परंतु ‘माझा श्याम कोणाच्याही वस्तूस हात लावणारा नाही,’ या विश्वासाने आईने त्याचे समर्थन केले. त्यावेळी श्यामने पुस्तक वाचून मोठा होण्यासाठी आपण चोरी केल्याचे कबूल केले. तेव्हा ‘‘श्याम, पुन्हा नको हो हात लावू. हाच पहिला व शेवटचा हात लावलास हो. तू कबूल केलेस चांगले झाले. शिक. पण चांगला हो. मोठा नाही झालास तरी गुणी हो,’’ असे तिने श्यामला सांगितले. आईच्या या बोलण्यातील खोल अर्थ श्यामला समजला. आणि त्यातून श्याम घडत गेला.

श्यामला पाण्याची उगीचच भीती वाटायची. पोहोण्यासाठी मित्र बोलवायला आले की तो लपून बसायचा. आईला ते आवडायचे नाही. ती त्याला पोहोण्यासाठी फटके देऊन विहिरीवर पिटाळून लावी. श्यामला याचा राग येई. परंतु आईच्या हट्टापुढे त्याचे काही चालत नसे. मात्र यामुळेच श्याम पोहोण्यास शिकला. याबद्दल आईने त्याला सुनावले, ‘‘श्याम, तू भित्रा आहेस असे का तुला जगाने म्हणावे? माझी मुले भित्री आहेत असे कोणी म्हटले तर ते तुला आवडेल का?’’ आपली मुले निर्भय, न लाजणारी, चांगुलपणाने वागणारी व्हावीत यासाठी श्यामची आई खूप धडपडत असे. आईच्या या संस्कारांमुळेच श्याम धीट बनला. गरिबीमुळे श्यामला गावी शिक्षण घेणे अशक्य झाले तेव्हा आईने त्याला- ‘‘तू घर सोडून जा. बाहेरच्या अफाट जगात जा. आई-बाप सोडून ध्रुव रानात गेला. तपश्चर्या केल्याशिवाय काय मिळणार? स्वत:च्या पायावर उभा राहा. मोठा होऊन घरी ये. मी तुझ्याजवळ आहेच,’’ असे सांगितले. श्यामला या तिच्या समजावण्यातून प्रेरणा मिळाली. गावापासून अतिशय दूर असलेल्या औंध संस्थानात काही वर्षे त्याने पुढील शिक्षण घेतले. आपल्या प्रेमळ स्वभावाने अनेक मित्र जोडले. आता आईच्या संस्कारांमुळे श्याम निर्भय बनलेला होता. स्वातंत्र्यासाठी गांधीजींनी सत्याग्रहाचे रणशिंग फुंकले. गांधीजींच्या सत्याग्रह चळवळीचा संदेश सांगत निर्भय बनलेला श्याम वाऱ्यासारखा फिरू लागला. स्वातंत्र्ययुद्धात त्याने उडी घेतली. नाशिक, धुळ्याच्या तुरुंगात त्याला डांबण्यात आले. तुरुंगात विनोबा भावे यांनी गीतेवर दिलेली प्रवचने श्यामने जशीच्या तशी टिपून घेतली. भारतातील जवळपास सर्व भाषांत अनुवादित झालेल्या या प्रवचनांनी लोकांना भक्तिमार्ग सांगितला. तुरुंगात त्यांच्या हातून एक महान कविता कागदावर उमटली..

‘खरा तो एकचि धर्म

जगाला प्रेम अर्पावे।’

हळुवार भावनांचे मनोहर काव्य आईने श्यामच्या हृदयात ओतले, त्याचाच हा परिणाम!

श्यामच्या जीवनावर आईचा कमालीचा प्रभाव होता. ती त्याच्यासाठी केवळ प्राकृतिक आई नव्हती, तर ती संस्कारांची जननी होती. सानेगुरुजींची आई भारतमातेच्या रूपात त्यांच्या अखेरच्या जीवनात उरली होती. आईचे निधन झाले तेव्हा गुरुजी म्हणाले, ‘‘देवाने थोर माता आम्हांस दिली. जगाच्या बाजारात अशी आई मोठय़ा भाग्याने मिळते. माझी आई गेली. परंतु भारतमातेच्या सेवेसाठी मला तयार करून गेली. हा श्याम माझ्या मोहात गुरफटेल, स्वातंत्र्ययुद्धात तो मातृमोहाने पडणार नाही, म्हणून आईने स्वत:ला दूर केले असेल. सर्व भारतातील माता माझ्या श्यामच्या होऊ देत, यासाठी माझी आई निघून गेली. जिकडे तिकडे आता माझ्याच आया!’’ देशप्रेम व मानवतेचा केवढा अत्युच्च विचार श्यामच्या आईने त्याला दिला होता. नवे चैतन्य आणि सामर्थ्य निर्माण करण्याची शक्ती सानेगुरुजींच्या आईच्या या संस्कारांत आहे. पुढच्या अनेक पिढय़ांची जीवने विशुद्ध व विशाल बनविण्याची विलक्षण संजीवनी श्यामच्या आईमध्ये आहे. ‘मातृप्रेमाचे महन्मंगल स्तोत्र’ म्हणून गौरविल्या गेलेल्या या ‘श्यामची आई’ला त्रिवार अभिवादन!

– सुरेश पोतदार