मुकुंद संगोराम mukund.sangoram@expressindia.com

अरुणाला सृजनाचा वरदहस्त आहे. प्रचंड वाचन हा तिचा छंद. तोच ध्यास आणि श्वासही! त्यामुळेच पहिला कवितासंग्रह प्रकाशित होता होताच ती एक महत्त्वाची कवयित्री आहे, हे साहित्याच्या परिसरात कळून चुकलं होतं. कविता हे आपलं सुखनिधान आहे, याची जाणीव झाल्याने तिनं कवितेला आपल्या अंतर्मनात अतिशय ममत्वानं जपायचं व्रत अंगिकारलं होतं.

तसं रोजच बोलणं होतं असं नाही, पण इकडून तिकडून सतत काही ना काही ऐकू येतच राहतं. जाहीर कार्यक्रमाबद्दलची चर्चा, व्हॉट्स अ‍ॅपवरून फिरून फिरून पुन्हा पुन्हा येत राहणारे तिच्या पुस्तकातले उतारेच्या उतारे, तिची भाषणं, तिच्या आवडलेल्या कविता हे सारं सगळीकडे सुरू असतानाही अरुणाला या कशाची कल्पनाही नसते. त्याची गरजही वाटत नाही तिला. म्हणजे मोबाईल नावाच्या वस्तूनं सारं जग व्यापून टाकलेलं असताना, ‘कशाला हवाय तो मोबाईल?’ अशी तिची स्वाभाविक प्रतिक्रिया. त्यामुळे तिच्याबद्दल एकूणच जगात काय काय गप्पा चालल्या आहेत, याचं तिला तसं सोयरसुतकच नाही. आपल्याला लिहिता येतंय, ते इतरांपेक्षा जरा बरं आहे आणि त्यामुळे आपल्याकडे इतरेजन ‘सेलिब्रिटी’ म्हणून पाहताहेत, हे तिच्या डोक्यातही येत नाही. असं काही असतं, हे तिच्या गावीही नसतं. अजूनही नाही. शनिवार पेठेतल्या नेने घाटातल्या वाडय़ातल्या तिच्या घरात भांडीकुंडी, दागदागिने, कपडेलत्ते या सगळ्यापेक्षा पुस्तकांची मिजास अधिक होती. ‘घरातलं प्रत्येक पुस्तक हाच खरा दागिना!’ हेच तर लहानपणापासून बिंबलेलं.

शनवारात राहूनही घर काही सुखवस्तू कुटुंबासारखं नव्हतं. वडील अण्णा- म्हणजे डॉ. रा. चिं. ढेरे हे संशोधनाच्या क्षेत्रातलं फारच मोठं नाव. त्यांना फक्त पुस्तकाचाच ध्यास. रस्त्यावरच्या पुस्तकविक्रेत्यांपासून ते ग्रंथालयांपर्यंत सगळीकडे मुक्त संचार असणारे अण्णा म्हणजे मूर्तिमंत कैवल्य. या भौतिक जगात काही चिंता असतात आणि त्या सोडवण्यातच आयुष्य खर्च करायचं असतं, हे अण्णांना ठाऊक नसावं. नवा संदर्भ सापडल्यानंतर त्यांना होणारा अपूर्वाचा आनंद त्यांच्या मोठय़ा डोळ्यांतही मावायचा नाही. संशोधनाच्या निमित्तानं अनेक ठिकाणी जायचं तर ते लाल डब्याच्या एसटीतून. तिथंही हॉटेलात उतरणं वगैरे नाहीच. कुणाकडे तरी राहून तिथल्या पोथ्या, पुस्तकं धुंडाळायची. जगण्याचा हा संदर्भ अरुणाच्या आयुष्याशी कधी चिकटून बसला, ते तिच्याही लक्षात आलं नाही. जगणं हे असंच असतं आणि त्यातले आनंदही कैवल्याचेच असतात असंच तिला वाटत होतं.

कॉलेजातल्या वक्तृत्व स्पर्धामध्ये भाग घ्यायचा तर मास्तरांनी लिहून दिलेलं भाषण पाठ करायचं नाही, हा तिचा खाक्या. त्यासाठी स्वत:च ग्रंथालयात जाऊन अभ्यास करायचा, तिथं गाडून घ्यायचं स्वत:ला. बक्षीस मिळेल- न मिळेल, पण विषय मुळापासून कळलाच पाहिजे, असं तिचं म्हणणं. बक्षीस हमखास मिळायचंच; पण ते मिळाल्याचं काही साजरं करणं नसायचंच. ‘वन बाय टू’ (म्हणजे आताचा कटिंग!) चहावरही भागून जायचं. त्यामुळे कॉलेजात आपण काकूबाई आहोत, याबद्दल जराही गंड न बाळगता अरुणा तिच्या वेगळ्या विश्वात रममाण होती. संशोधनाच्या विश्वात अण्णांबरोबर क्वचित कुठे कुठे जात होती. त्यावेळी आपणही असं काही करावं, असं वाटत असतानाच तिला कवितेचा शब्द सापडला. हा शब्द तिच्यापुढे फेर धरून नाचत होता आणि ती त्याला अतिशय सहजपणे सामोरी जात होती. कविता तिच्या आयुष्यात आपणहूनच आली असली पाहिजे.

सरस्वती प्रसन्न असणं हे किती मोठं वरदान आहे, हे तर तिला कळतच होतं. पण त्यामागच्या सर्जनाच्या प्रेरणाही तिला समजावून घ्यायच्या होत्या. कवितेच्या प्रांतात ती रमत होती आणि त्याचवेळी संशोधनाचा प्रांतही तिला खुणावत होता. आपल्यातले हे बदल इतक्या सहजपणे ती आत्मसात करत होती, की बी. ए. च्या परीक्षेत पुणे विद्यापीठात मराठी विषयात सर्वप्रथम येणं आणि सुवर्णपदकाबरोबर अकरा पारितोषिकं पटकावणं, किंवा दोनच वर्षांनी एम. ए. च्या परीक्षेतही सर्वप्रथम येऊन तेरा पारितोषिकं मिळवणं, हे तिच्यासाठी तेवढं अप्रूपाचं नव्हतं. कॉलेजातल्या मित्र-मैत्रिणींबरोबर हसत- खिदळत असतानाही अभ्यासाच्या जोडीला सर्जनाचं देणंही द्यायचं असतं, हे ती विसरत नव्हती. शब्दांच्या बरोबरीनं दूरचित्रवाणी माध्यमात काहीतरी करायचं असं ठरवून पुणे विद्यापीठातल्या एज्युकेशनल मीडिया रीसर्च सेंटरमध्ये अध्यापक आणि निर्माती असा एक समांतर प्रवासही सुरू झाला. याही क्षेत्रात हुकमी प्रतिभा उपयोगाची असते याची जाणीव तिला झाली आणि हे सगळं अचानक बंदही झालं.

अरुणाला सृजनाचा वरदहस्त आहे. प्रचंड वाचन हा तिचा छंद. तोच ध्यास आणि श्वासही! त्यामुळेच पहिला कवितासंग्रह प्रकाशित होता होताच ती एक महत्त्वाची कवयित्री आहे, हे साहित्याच्या परिसरात कळून चुकलं होतं. ही कोण, असा खोचक प्रश्नार्थक चेहरा करणारे तेव्हाही होतेच. पण अरुणाला त्याच्याशी काही घेणंदेणं नव्हतं. कारण  कविता हे आपलं सुखनिधान आहे याची जाणीव झाल्याने तिनं कवितेला आपल्या अंतर्मनात अतिशय ममत्वानं जपायचं व्रत अंगिकारलं होतं. कवितेला शरण जाणारी अरुणा ललित गद्याच्या प्रांतातही तेवढीच टवटवीत राहिली, याचं कारण जगाकडे बघण्याची तिची विशाल दृष्टी! त्यातही स्त्री आणि तिचं अंतर्मन हा कायमचा ध्यास. त्यामुळे सहजसुंदर स्फुरणारं तिचं ललित लेखनही दिवाळी अंकांमधून यायला लागलं आणि कवयित्री या बिरुदाबरोबरच लेखिका हेही नामाभिधान तिला चिकटलं. संशोधन करून मिळवलेली पीएच. डी.ची पदवी नावामागे लावण्याची गरज तिला कधी वाटली नाही. ‘मी आपली अरुणा ढेरेच बरी!’ असा तिचा हट्ट.

कुणाच्या अध्यात नाही की मध्यात नाही. आपण बरं की आपलं विश्व बरं. राजकारणाच्या वाटेला जाण्यापेक्षा आपल्या कोशात राहणं अधिक बरं, ही अरुणाची प्रवृत्ती. कथा, कविता, ललित, संशोधन अशा सगळ्या क्षेत्रांत लीलया संचार करतानाही अरुणाला कधी प्रतिष्ठेची, मान्यतेची झूल पांघरावीशी वाटली नाही. खूप सारे गौरव आणि पुरस्कार यांनी हुरळून जायचा आणि नावावर साठेक पुस्तकं आहेत म्हणून नजरेतली स्निग्धता कमी होण्याचा तिचा स्वभाव नाही. आपल्या कर्तृत्वावर विश्वास ठेवून सतत काम करत राहायचं आणि त्यात स्वत:ला गुरफटून टाकायचं, एवढंच तिला कळतं. आणि खरं तर तेच अधिक ठीकही आहे.

परिसरातली सगळीच माणसं खूप चांगल्या स्वभावाची असतात, असा एक गोड गैरसमज करून घेऊन तिनं स्वत:ला घडवलंय. त्यामुळे भांडण करणं आणि कुणाला पाण्यात पाहणं, उखाळ्यापाखाळ्या काढणं हे तिच्या स्वभावधर्माच्या विरुद्धच. आपलं अवखळपण असं आयुष्यभर अंगावर ल्यायलाही कमालीची स्थितप्रज्ञता लागते. अरुणाच्या ठायी ती आहे. म्हणूनच तर आयुष्य असं सृजनशील करून सुंदर करण्याचं कसब तिला गवसलं आहे.