scorecardresearch

Premium

रिंगणनाटय़ विचार आणि प्रयोग

आता मी एक भूमिका स्पष्ट करतो. मी भारतीय आहे. मी हिंदू आहे. पण आता हेही नीट ऐका. मी हिंदुत्ववादी नाही.

रिंगणनाटय़ विचार आणि प्रयोग

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या निर्घृण खुनानंतर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने रंगकर्मी अतुल पेठे यांच्या कल्पनेतून साकारलेले ‘रिंगणनाटय़’ महाराष्ट्रभर सादर केले. नाटकाद्वारे या घटनेचा अहिंसक व विधायक स्वरूपात निषेध करणे असे त्याचे स्वरूप होते. गेल्या दोन वर्षांत २२ गटांनी त्याचे पाचशेहून अधिक प्रयोग केले आहेत. या साऱ्या चळवळीची गोष्ट अतुल पेठे आणि त्यांचे सहकारी राजू इनामदार यांनी ‘रिंगणनाटय़’ या पुस्तकातून मांडली आहे. २० ऑगस्टला डॉ. दाभोलकरांच्या तिसऱ्या स्मृतिदिनी हे पुस्तक प्रकाशित होत आहे. त्यातील काही संपादित अंश..

विविध प्रकारची नाटकं ही रंगभूमीची संपत्ती आणि समाजाची समृद्धी असते. कौटुंबिक, राजकीय, पौराणिक, ऐतिहासिक, सामाजिक वगरे असे त्यांचे प्रकार असतात. ही झाली सोय. पण मुळात नाटक हे नाटक हवं; ते कुठल्याही प्रकारचं असो. जिवंत आणि रसरशीत अनुभव म्हणजे नाटक. जिवंत माणसं जिवंत माणसांसमोर जिवंत अनुभव मांडतात! यातला ‘जिवंत’ हा शब्द महत्त्वाचा आहे. कलाकार आणि प्रेक्षकांनी ‘जिवंत असणं’ ही नाटकाची अटच आहे. जिवंत असल्याशिवाय नाटक होतच नाही. जिवंत असणं ही व्यापक गोष्ट आहे. शरीरानं जिवंत असणं, मनानं जिवंत असणं, विचारांनी जिवंत असणं, संवेदनेनं जिवंत असणं. तर ‘जिवंत असणं’ ही नाटक या माध्यमाची गरज आहे. बरं, इथं फक्त आपण जिवंत असून भागत नाही, समाज ‘जिवंत ठेवणं’ हीसुद्धा आवश्यक बाब आहे. समाज असा जिवंत असला तरच नाटक त्याच्यापर्यंत पोहोचणार.
सध्याचा कालखंड नाटकाकरता अवघड आहे. खरं तर कुठलाही काळ दुस्तरच असतो; पण तरीही आताचा जास्त गुंतागुंतीचा आहे. १९९० नंतर साऱ्या जगभर अनेक उलथापालथी झालेल्या आहेत. इलेक्ट्रॉनिक माध्यमांनी जग जवळ आलेलं असताना माणसं मात्र दूर जात चाललेली आहेत. ‘कर लो दुनिया मुठ्ठी में’ असं बाजार म्हणत असताना, माणसाच्या हाती संपर्कमाध्यमं असूनही मुठीतून काहीतरी सतत निसटून जायचा भाव प्रखरपणे जाणवत आहे. हे काहीतरी निसटून जाणं काय आहे? तर माझ्या मते, ‘अनुभव’ घेण्याची आणि देण्याची क्षमता आपण गमावत चाललो आहोत. अनुभव येण्याअगोदरच तो जुना होतो. अनुभव येताच तो फुसका होतो. या अनुभवातून हाती काही येण्याअगोदरच तो निर्थक वाटू लागतो. सुखद वा दु:खद अनुभवातली ‘एक्साइटमेंट’ संपत चालली आहे.
आपण म्हणतो देशात लोकशाही आहे, घटनेचं राज्य आहे, वगरे. पण त्याची अंमलबजावणी नीट होते आहे काय? धार्मिक दंगली, जातीय खून, पाशवी बलात्कार, विविध जातीपातींची अरेरावी, खाप पंचायत, जातपंचायत, बुवा-महाराजांचे आश्रम, त्यात सापडलेली लंगिक अत्याचारांची प्रकरणं, ‘ऑकल्ट’ म्हणजे अघोरी विद्या, कर्मकांडं, गूढविद्या, तंत्रमंत्र, काळी जादू, जारणमारण करणारी टोळकी.. धर्माध संघटना.. ही कशाची लक्षणं आहेत? त्यातून प्रत्येकाच्या अस्मिता टोकदार झालेल्या आहेत. त्याचा फायदा विविध लोक आणि त्यांचे गट उठवतात. त्यातून ‘घोषित’ आणि ‘अघोषित’ सेन्सॉरशिप तयार झालेली आहे. कोणी काय खावं, बोलावं, बघावं, लिहावं, ऐकावं आणि परिधान करावं, यावर हिंस्र मतं आहेत. त्यासाठी कोणी मारही खात आहेत. प्रत्येक धर्म यास खतपाणी घालत आहे. कोणाचा आदेश असतो, तर कुणाचा फतवा! अशा या अनागोंदी वातावरणात मन पुरतं ढवळून निघत आहे.
आता मी एक भूमिका स्पष्ट करतो. मी भारतीय आहे. मी हिंदू आहे. पण आता हेही नीट ऐका. मी हिंदुत्ववादी नाही. आचार्य विनोबा भावे यांनी ‘हिंदू’ची फोड फार सुंदर केली आहे. ‘जो हिंसेने दु:खी होतो तो हिंदू’ अशी. या नियमानं मला दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी आणि इतरांच्या हिंसेमुळं दु:ख झालं. त्यावरून हे सिद्ध होतं, की मी ‘हिंदू’ आहे. हिंसेनं दु:खी होणारा हिंदू! हिंसेने सुखी होणारा ‘हिंसू’ म्हटला पाहिजे.. जो मी नाही. यांच्या खुनामुळं काहींनी जाहीर आनंद व्यक्त केला. त्यांच्या मते, या दुष्टांचं, दुर्जनांचं ‘निर्दालन’ झालं! वा रे वा! दाभोलकरांचं एक तरी पुस्तक या मंडळींनी वाचलं आहे काय? बरं, दुष्ट, दुर्जन यांची व्याख्या काय? तर ते ठरवतील ते दुष्ट! ‘हम करे सो कायदा.’ ‘हम करे सो कायदा’ म्हणजे काय, ‘जिस में हमारा फायदा!’ बाकी त्यांना कशाचंही काहीही पडलेलं नसतं. धर्माच्या नावाने हाळी ठोकायची. बस्स.
माझा हिंदू धर्म मला सहिष्णुता, सहभावना, समता, सद्भावना आणि साहचर्य शिकवतो. माझ्या बापाचा, बापाच्या बापाचा, त्यांच्याही बापाच्या बापाचा धर्म हिंदूच होता. आमचा हिंदू धर्म जास्त व्यापक आहे. तो द्वेष करायला शिकवत नाही. तो खून करायला शिकवत नाही. भडक पद्धतीने हिंदू धर्माची मांडणी केलीत तर आपल्याच धर्मात फूट पडेल आणि त्याची जबाबदारी या भडक हिंदूंवरच राहील. एका काळात जातीपातीचं राजकारण करून हिंदूंत भेद केलेत आणि आता धर्माचं असं राजकारण कराल तर अजूनच शकलं होतील. ‘माझा धर्म माझ्या हाती’ हेच माझं विधायक धोरण आहे. मला वाटतं, हेच मत दाभोलकरांचंही होतं. स्वत:च्या धर्माची स्वत:च चिकित्सा केली पाहिजे. तो अधिकार मला माझ्याच धर्मानं दिलाय. याशिवाय मला इतरही धर्माची चिकित्सा करण्याचा अधिकार आहे. हा अधिकार मला राज्यघटनेनं दिलाय. शोषणावर आधारलेल्या अंधश्रद्धा दूर झाल्याच पाहिजेत. श्रद्धा ही दाखविण्याची गोष्टच नाही. ती असण्याची गोष्ट आहे. नाटक करायला श्रद्धाच लागते. श्रद्धा ही प्रेमातून, आस्थेतून, सहभावातून आणि विश्वासातून येते. ती दुस्वासातून येत नाही.
डॉ. दाभोलकर म्हणतात त्याप्रमाणे वस्तुत: आपल्या रोजच्या आयुष्यात ‘विज्ञानसृष्टी’ काठोकाठ भरलेली आहे. पण आपल्याला ‘विज्ञानदृष्टी’ नाही. विज्ञान महत्त्वाचं आहे. माणसाचं आयुष्य केवळ आणि केवळ विज्ञानानं वाढवलेलं आहे. आज धर्माध माणसंही विज्ञानाचा दुस्वास करून विज्ञानाचाच वापर करतात. असं असताना वैज्ञानिक दृष्टिकोनाचे शत्रू कशाकरता भांडायला उभे ठाकतात? वैज्ञानिक दृष्टिकोन वाढवणाऱ्या दाभोलकरांवरच फुल्या मारतात. हे फुल्या मारणारे लोक धर्म वाढवतात की बुडवतात? तेव्हा या धर्माध लोकांच्या कचकडय़ा, अभिनिवेशी, आवेशी, उग्र धर्माविरुद्ध मी विवेकाच्या बाजूनं उभा आहे. कुठलीही कला ही लोकशाहीतच वाढते; हुकूमशाहीत नाही. विचारांचं, अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य हे लोकशाहीतच मिळतं.
सध्याच्या वातावरणात- म्हणजे भेदाभेद करण्याच्या काळात आपण ठामपणे उभं राहिलं पाहिजे. माणसा-माणसांतले भेद हे राजकीय हेतूनं प्रेरित असतात, हे आपण जाणतोच. सध्या भावनिक स्फोट घडवले जाताहेत. बहुतेक ठिकाणी जगण्यात हिंस्र कलकल जाणवतेय. सांगता येणारी आणि न सांगता येणारी अस्वस्थता आहे. आपल्या निवडून दिलेल्या कुठल्याही सरकारनं आपल्याला माणूस म्हणून उन्नत करणाऱ्या योजना फार राबविलेल्या नाहीयेत. त्यांनी लोकानुनयी लोकप्रिय राजकारणच केलं आहे. दाभोलकर, पानसरे, कलबुर्गीचा निर्घृण खून झाला आहे. खुनी मोकाट फिरत आहेत. यांच्याबरोबरच साध्या साध्या माणसांचेही खून पडलेले आहेत. अस्वस्थता आत भरून राहिली आहे. दाभोलकरांसारख्या विवेकी माणसाची दिवसाढवळय़ा हत्या होते यानं आपण सारेच हादरून गेलो. अशा गोष्टींचा थेटपणे निषेध करायचा होता. रागानं हाताच्या मुठी वळत होत्या. पण माझ्यासारखा नाटकवाला नाटक करण्यावाचून दुसरं काय करू शकतो? तर यातूनच ‘रिंगण’नाटय़ाचा जन्म झाला.
सडक नाटक, नुक्कड नाटक आणि पथनाटक याला समांतर अशीच ‘रगण’ची संकल्पना आहे. आपलं ‘रिंगण’ हे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं एक जाहीर विधान आहे. यात येणारे विषय ‘अंधश्रद्धा निर्मूलन’ याच हेतूनं प्रेरित असतील. याअंतर्गत खूप विषय येतात. उदा. भारतीय संविधान. अशा जोडलेल्या अनेक विषयांना आपल्या नाटकात स्पर्श करावा, लोकांचं प्रामुख्यानं प्रबोधन करावं, हा मूळ हेतू जपतानाच सकस नाटय़ानुभव द्यावा, ही अपेक्षा आहे. यातील ‘प्रबोधन’ हा शब्द नीट लक्षात ठेवू या. ‘रगण’च्या माध्यमातून लोकांच्यात जाऊन ‘अंधश्रद्धा निर्मूलन’ या विषयाच्या व्यापकपणावर भर देऊन विचार परिवर्तन घडवायचं आहे. आपलं नाटक प्रचार अथवा माहिती देणारं अथवा जाहिरातबाजीचं नाही, हे स्पष्टपणे ध्यानात घ्या. प्रबोधन म्हणजे ‘सतत उपदेश’ असाही अर्थ मी घेत नाही. उत्तम मनोरंजनातून प्रबुद्ध करणारा अनुभव यातून मिळणं ही अपेक्षा आहे. प्रबोधन ही दीर्घकालीन प्रक्रिया आहे. आपलं नाटक कधीही ‘भडक नाटक’ होऊ नये, ही काळजी आपण घेतली पाहिजे. लोकांच्या भावना भडकावणं किंवा माथेफिरूपणा करायला उद्युक्त करणारी सवंग नाटकं आपण टाळावीत. इथं विचार करायला लावणारी, तर्कनिष्ठ आणि बुद्धिप्रामाण्यवादी.. विवेकी नाटकं असावीत अशी अपेक्षा आहे.
अशी नाटकं निर्माण करणं खरोखर अवघड गोष्ट आहे. ते एक आव्हानच आहे. एकाच वेळी आपलं नाटक ‘वैचारिकदृष्टय़ा प्रगल्भ’ आणि ‘कलात्मकदृष्टय़ा सकस’ हवं. ही मागणी पूर्ण करणं हे आव्हान आहे. आपल्यासारख्या नाटकात कार्यकत्रेच काम करत असतात. हे कार्यकत्रे बऱ्याच वेळा वैचारिक पातळीवर शिकाऊ असतात, नवे असतात आणि प्रामाणिक, उत्साही असतात. त्यांची या विचारांशी अढळ बांधिलकीही असते. ते रस्त्यावर येऊन विचारांकरिता प्रसंगी मारही खातात. पण आपल्याला नाटकातून व्यक्त व्हायचं असेल तर? आपल्याला चित्रपट काढायचा असेल अथवा कविता वा कादंबरी लिहायची असेल तर? तर मग अधिक गोष्टींची गरज पडणार. बहुतेक वेळा आपण तिथं तोकडे पडतो.
एखाद्या कलेतून स्वत:ला व्यक्त करणं ही अजिबात सोपी गोष्ट नाही. सुरुवातीला नकळत काही गोष्टी उत्स्फूर्ततेतून साधूनही जातील; पण वरची पातळी गाठायची असेल तर वेगळे कष्ट घ्यावे लागतील. कुठल्याही कलेच्या तीन पातळ्या असतात : बौद्धिक, मानसिक आणि शारीरिक!
सखोल विचारांतूनच बौद्धिक खोली वाढेल. त्याकरता चौफेर वाचन आणि त्याचं आकलन हवं. मी माझ्या बुद्धीला किती तऱ्हेचं खाद्य पुरवतो हे फार महत्त्वाचं ठरतं. एखादा विचार मांडताना अक्षरश: हजारो प्रश्न पडत असतात. अनेक बाजू दिसू लागतात. वर्तमान प्रश्नांचा शोध घेता घेता आपण हजारो वाटांवरून प्रवास करू लागतो. आपण भूतकाळात डोकावू लागतो. त्यात आपल्या प्रश्नांचे धागेदोरे पार शतकानुशतकं मागं गेलेले दिसतात. आपले इथले प्रश्न बाहेरच्या प्रांतांत आणि देशांतही दिसू लागतात. अशा वेळी आपल्या प्रश्नांचा इतिहासच नाही, तर भूगोलही बदलू लागतो. सामाजिक, राजकीय, आíथक, ऐतिहासिक, मानसिक असे अनेक स्तर त्यात गुंतलेले दिसू लागतात. आपली बुद्धी ताणली जाते. साध्या प्रश्नाचा आवाका ‘आ’ वासून उभा राहतो. त्यातून मग वाट काढावीच लागते. तर्क बिनतोडपणे उभा करून अर्थ लावावे लागतात. लागलेल्या अर्थाना नेमक्या आणि नेटक्या शब्दांत पकडावं लागतं. भाषा संवादी असण्याची गरज पडते. नव्या व्याख्या तयार कराव्या लागतात. नवे सिद्धान्त सहज संवादी पद्धतीनं उलगडावे लागतात.
मानसिक पातळीवर आपल्याला अजून दुसरी डुबी मारावी लागते. आपल्या बौद्धिक प्रश्नाला आपल्या जगण्याच्या पातळीवर दृष्टान्तस्वरूपात मांडावं लागतं. एखादा प्रश्न विद्यापीठाच्या पेपरमध्ये वाचणं आणि नाटकातून तो मांडणं यांत खूप फरक आहे. आपल्या विचाराला अनुभवाच्या पातळीवर न्यावं लागतं. इथं फार घालमेल होते. शब्द सुचता सुचत नाहीत. विचार कोरडेपणानंच येतात असं वाटतं. अशा वेळी अनेकदा पथनाटकात थेट संदेशबाजी येते. प्रेक्षकांच्या मानसिक पातळीवर त्या प्रश्नानं अनेक प्रश्न उभे राहण्यापेक्षा सोपी उत्तरे उमटतात. प्रेक्षक कुठल्याही निर्णयप्रक्रियेत सामील न होता फक्त ‘बघा’ होतो. पण त्याला बघ्याची भूमिका देण्यात आपलाच वाटा असतो. कारण आपण तो प्रश्न ‘विचार’ या स्वरूपातच त्याच्यासमोर ठेवतो. विचाराला वाङ्मयाचा स्पर्श घडवणं सोपं नसतं.
आता या दोन्ही प्रक्रिया समजा घडल्या, तर तिसरी एक पायरी असते. विशेषत: नाटकाकरिता. ती म्हणजे ‘शारीर अनुभव.’ त्याकरिता अभिनयाचे गुण आपल्याला अंगीकारावे लागतील. हा अभिनय जितका तरल, पारदर्शी आणि नसíगक वाटेल, तेवढा तो प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवतो. ‘शोषण’ या विषयावरचं चार तासांचं व्याख्यान आणि एखाद्या सराईत अभिनेत्यानं किंवा अभिनेत्रीनं फक्त डोळ्यांतून दाखविलेले कमालीचे शोषित भाव तितक्याच तोलामोलाचे असतात.
आपण कदाचित बोलता बोलता फार पुढं आलो. पण आपण जर इतके पुढे गेलो तरच आपलं ‘रगण’- नाटक चांगलं होईल. अन्यथा पथनाटकांना असलेला एकसुरीपणाचा, ढोबळपणाचा, खोटेपणाचा, सोपेपणाचा आणि प्रभावहीनतेचा ठपका आपल्यावरही बसेल. आपल्या नाटकाद्वारे प्रेक्षकांच्या आयुष्यात काही घडायचं असेल तर आपल्याला साधनाच करावी लागेल. आपलं ‘रिंगण’ अर्थपूर्ण, सघन व्हायचं असेल तर नव्या कल्पनांना पंख फुटले पाहिजेत. आजूबाजूचं जग रसरसून पाहा. जगा. आपण आपला विषय सोडून इतरत्र लक्षही देत नाही. यातून संकुचितपण येतं. ते टाळा. विविध चित्रपट पाहा. पुस्तकं वाचा. नृत्य पाहा. चित्रं-शिल्पं अनुभवा. जग हिंडा. परिसर निरखा. माणसांशी बोला. आणि स्वत:ला त्रास होईल इतका विचारही करा.
आता आपल्या तऱ्हेच्या नाटकांची ‘प्रोसेस’ आपण समजावून घेऊ या. या प्रकारात ‘लेखकानं नाटक लिहिलं आणि ते दिग्दर्शकानं नटांना घेऊन उभं केलं’ ही पद्धत नाही. इथं एका संवेदनशीलतेचे, एका विचारानं प्रेरित असलेले आणि तो नवा, विधायक विचार लोकांत पसरवू पाहणारे लोक एकत्र जमतात. नाटय़माध्यमातून विचारांचा प्रभाव हेच या नाटकाचं वैशिष्टय़ असतं. असं नाटक चच्रेतून, अभ्यासातून आणि निकडीतून तयार होतं. सुरुवातीला एक साधारण विषय जाणवलेला असतो. तो हळूहळू करता करताच आकार घेत जातो. रोज नवनवे धुमारे त्याला फुटत जातात. काही दिवसांनंतर त्याचा एक किमान पक्का ढाचा तयार होतो.
इथं मी ‘सॉक्रेटिस ते दाभोलकर, पानसरे व्हाया तुकाराम’ या आपल्या नाटकाचं उदाहरण देईन. आमच्या शिबिरात एक कल्पना प्रा. संजय बनसोडे यांच्या मनात आली. त्यावर अनेक तास आमची चर्चा झाली, वगरे. नाटक सेन्सॉरला पाठवायचं होतं. त्यांनी त्या नाटकाची संहिता मला पाठवली. ‘दाभोलकरांचा निर्घृण खून’ हा विषय होता. पुढं त्यांनी काही महिने त्यावर खल केल्यावर राजा शिरगुप्पे यांच्याकडून संहिता नव्यानं लिहून घेतली. त्यात प्रा. एकनाथ पाटील आणि प्रा. संजय बनसोडे यांनी मदत केली. इस्लामपूरचा सारा गट त्या प्रक्रियेत सहभागी होता. दिग्दर्शक विजय पोवार आणि साहाय्यक योगेश कुदळे त्या नाटकाला आकार देत होते. तर अशा घुसळणीतून ते नाटक तयार झालं. पुढं काही महिन्यांनंतर पानसरे सरांचाही खून झाला. यामुळे सारे सुन्न झाले आणि प्रक्षुब्धही झाले. नंतर एका प्रयोगात जुजबी चर्चा करून आम्ही पानसरे सरांचं पात्र उभं केलं. नाटकाच्या नावात ‘सॉक्रेटिस ते दाभोलकर, पानसरे व्हाया तुकाराम’ असा बदलही केला. त्या प्रयोगात मी पानसरे सरांचं काम केलं होतं. माझ्याजवळ लिखित संवाद वगरे नव्हते. मी पानसरे सरांचं लिखाण वाचलेलं होतं. त्यांचे विचार मला माहीत होते. ते तत्काळ बोललो. मात्र, या दोन प्रयोगांनंतर ‘रिंगण’च्या टीमने ते संवाद अधिक नेमकेपणानं लिहिले आणि तालमी करून आजचं नाटक तयार झालं. या साऱ्या प्रवासात या नाटकात अनेक बदल होत गेले. घट्ट संहितेपेक्षा प्रवाही संहिता हा त्याचा महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे हे नाटक दोन वेळा ‘सेन्सॉर’ झालं.
असं नाटक खरं तर रोजच सेन्सॉर करून घ्यावं लागेल! या तऱ्हेच्या नाटकांना ‘ऑफिशियल’ आणि ‘अनऑफिशियल’ असे दोन सेन्सॉर असतात! राज्यव्यवस्था आणि वेगळ्या विचारसरणीचे गट हे कायम अशा नाटकांवर डोळे वटारून असतात. मुळात ‘सेन्सॉरशिप’ असूच नये या विचारांचा मी आहे. २०१६ सालात अशी ‘संस्था’ असणं हेच अप्रगल्भतेचं आणि असमंजसपणाचं लक्षण आहे. काय बोलायचं आणि काय नाही, हे प्रत्येक व्यक्तीनं जबाबदारीनं ठरवावं. आक्षेप असल्यास वादविवाद करता येतो अथवा कोर्टात न्याय मागता येतो. गंमत अशी की, महाराष्ट्र आणि गुजरात वगळता देशात कुठेही नाटकावर सेन्सॉरशिप नाही! इंग्रजांच्या काळातली ही व्यवस्था देशाला स्वातंत्र्य मिळून इतकी र्वष झाली तरीही चालू आहे, हे विचित्र आहे. पण कला ही राज्यकर्त्यांना नेहमीच ‘डेंजरस’ वाटते!
अर्थात ‘रगण’ हे कुठंही ‘भडक वा तडकभडक नाटक’ होऊ नये हीच अपेक्षा आहे. आपलं नाटक नव्या रीतीने सादर करा. त्यातल्या आशयाकडे सतत लक्ष ठेवा. सुरुवातीला आपण रचलेली गाणी सादर होतील. काही घोषणा आणि मग नाटक असं त्याचं सादरीकरण व्हावं. नाटक करताना चुकीचे फॉर्म निवडू नका. राजा-प्रधान वगरे प्रकार वापरताना भान ठेवा. राजा आणि राजेशाही किंवा गर्दी जमवण्याकरिता बाईला नाचायला लावणं यातून आपल्याच विचारांवर आपण पाणी ओतत नाही ना, याकडं लक्ष ठेवा. तेव्हा आपली कृती ही आपल्या विचारांचाच भाग आहे हे लक्षात ठेवू या.
आपलं ‘रिंगण’ नाटक उभं करताना ते कुठंही सादर होईल असं असावं. ते कधी बंदिस्त जागी होईल, तर कधी उघडय़ावरसुद्धा होईल. ‘मिनिमलिस्टिक’, अवडंबर न करण्याचा दृष्टिकोन आणि अल्प सामग्री हेच या प्रकाराला आवश्यक आहे. ‘रिंगणनाटय़’ आपण बहुतेक वेळा नीट आयोजित केलेलं असतं. म्हणजे रस्त्यावर जाऊन अचानकपणे आपण सहसा ते करीत नाही. प्रेक्षकांना प्रयोगाविषयी, स्थळ आणि वेळेविषयी कळवलेलं असावं. प्रयोगाकरिता प्रेक्षकांच्या सोयीची वेळ ठरवली जावी.
सादरीकरणात गलथानपणा नसावा. योग्य तितक्या तालमी करून नवखेपणा घालवण्याचा सतत प्रयत्न करावा. आमच्या ‘सत्यशोधक’ या नाटकाकरिता ‘Didactic’असा शब्द गो. पु. देशपांडे सरांनी वापरला होता. ‘नाटक करता करता नाटककर्मीचे शिक्षण करणारे नाटक’ असा त्यांनी त्याचा अर्थ लावला होता. मला तो अर्थ अशा प्रकारच्या नाटकाकरिता फार महत्त्वाचा वाटतो. ‘नाटय़शिक्षण’ हा शब्द प्रचलित आहे. पण मी आपल्या अशा नाटकाला ‘शिक्षणनाटय़’ असे आताशा म्हणू लागलो आहे. नाटय़शिक्षणात ‘नाटक कसं करायचं’ हे शिकवलं जातं, तर शिक्षणनाटय़ात ‘जगायचं कसं’ याचा शोध असतो. शिक्षणनाटय़ात मूल्यशिक्षण जास्त होतं. ‘रिंगणनाटय़’ करता करता असं सारं शिक्षण आपल्याला सुरू ठेवायचं आहे. आपलं जगणं जितकं सकस होत जाईल तितकं नाटक प्रगल्भ होईल.
बादल सरकारांनी ‘अंगणमंच’ हा असाच एक प्रकार नाटय़सृष्टीला दिला. त्या अंगणात आपण ‘रिंगण’ धरत आहोत. बादल सरकार, हबीब तन्वीर आणि सफदर हाश्मी या परंपरेला आपण ताकदीनं जोडून घेऊ या आणि नवी रचना करायचा प्रयत्न करू या. अशा प्रकारच्या नाटकातून कोणालाही पसे अथवा मानमरातब मिळेलच असं नाही. या तऱ्हेच्या नाटकात हीरो-हीरॉइन नसतात. समूहाचा विचार मध्यवर्ती असतो. हा विचार ज्यांना पटला, ते आणि फक्त तेच लोक यात भाग घेतात. रिंगणनाटय़ाशी अशी आपली वैचारिक बांधिलकी हवी. अन्यथा हे शक्य नाही.
‘रिंगणनाटय़’- अतुल पेठे, राजू इनामदार,
साधना प्रकाशन, पृष्ठे- १८४, मूल्य- १५० रुपये
(सवलतीत १०० रुपये)

constitution of india liberty equality and fraternity for democracy
संविधानभान – उबुंटु : आस्थेचा पासवर्ड
loksatta ulta chashma satire article on ajit pawar controversial remarks
उलटा चष्मा : स्पष्टवादी राजकारणी!
article about upsc exam preparation guidance upsc exam preparation tips
UPSC ची तयारी:  प्रकरण अभ्यास (भाग १)
upsc exam preparation guidance upsc exam preparation tips
UPSC ची तयारी : सामाजिक मानसशास्त्र भावनिक बुद्धिमत्ता

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Atul pethe and raju inamdar book ringan natya review

First published on: 14-08-2016 at 01:55 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×