माणसाचं आयुष्य म्हणजे एक न सुटणारा गुंता असतो याची जाण फार कमी लोकांना असते. आणि ज्यांना असते, तेच कथा-कादंबऱ्यांचे विषय होतात. हरीबा सणस असाच एक पोट मारून जगणारा, हरमळी तरमळीचे आयुष्य जगणारा कष्टकरी माणूस. बापजाद्यांची वंशपरंपरेनं आलेली जमीन तो जिवाच्या करारानं राखतो आणि भानूनाना, दामूअण्णा आणि रामभाऊ या तीन तऱ्हेच्या तीन पोरांच्या हवाली करून मरून मोकळा होता. ही या कादंबरीची सुरुवात!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘भुई भुई ठाव दे’ या सीताराम सावंत यांच्या कादंबरीने शहराजवळच्या खेडय़ाच्या काळ्याकरंद जमिनीचा घास कसा घेतला जातो याचे यथार्थ चित्रण केले आहे. शहरी कंत्राटदारांना धनाचे अजीर्ण झाल्याने जमिनी विकत घेण्याची राक्षसी भूक त्यांना लागते. कबंध राक्षसाचे अनेक वंशज या कादंबरीतील झोडमिशे आणि इतर दलालांच्या रूपाने इथे भेटतात. खेडय़ातल्या ग्रामसंस्कृतीचा गळा घोटून त्यांना हवे तसे मजले उठवणारे बिल्डर खेडय़ांच्या आणि खेडय़ांतल्या हतबल झालेल्या माणसांच्या जीवावर उठले आहेत. माणसांच्या गरजा हेरायच्या, त्यांना कमिशनची आमिषे दाखवायची आणि हव्या तशा त्यांच्या जमिनी गिळंकृत करायच्या. यातून अतिरिक्त पैशांतूनच नव्या दु:खाची विनाशकारी पिलावळ जन्म घेते आणि बघता बघता सगळ्यांना संपवून टाकते.
आई-बापाच्या मृत्यूनंतर त्यांच्या इच्छेप्रमाणे त्यांना जाळायला शेत तरी होते; पण आता आपले काय? याचे उत्तर या तीन पिढय़ांच्या कहाणीमध्ये वाचकावर सोपवून कादंबरीकार मोकळा होतो. ही शेतकऱ्याची पोरं गुंठेवारी जमिनीच्या विक्रीच्या गळाला लागतात. धड शिस्तशीरपणे शिकतही नाहीत. नद्या निर्मळ वाहत होत्या; पण यांच्या जगण्याच्या नदीला जागोजाग खांडवे पडलेले आहेत. लहान लहान घरात, खोपटात, छपरात, म्हशीच्या गोठय़ात नव्या नवऱ्या येतात, चार दिवस गुलगुलतात आणि लगेच जुन्याही होऊन जातात. गावातलं घर विकलं जातं.. इथून त्यांच्या वजाबाकीला सुरुवात होते. कुडाची घरे, लुटुपुटूची भांडी.. पण माझ्या माहेरातून आणलेल्या बाजल्यावर दीर-भावजय झोपतात- एवढे छोटेसे कारणही भावकीला भांडायला पुरेसे होते. मग भांडय़ाला भांडे लागण्याच्या आतच भांडय़ाकुंडय़ांची वाटणी, रानातली घरे आणि जमिनी गुंठय़ावर विकायला सुरुवात होते. मेल्या आई-बापाच्या सरणाचे पैसे वाटून घेणारी ही पोरे एकत्र राहतीलच कशी? आधी दारिद्रय़ाने आणि मग संकुचित वृत्तीने ही माणसे प्रपंचात कुजत राहतात.
धाकटा रामभाऊ गुंठेवारीने जमीन विकायला सुरुवात करतो आणि कादंबरी वळण घेऊ लागते. घटना वेगाने घडतात. थोरल्याचा विरोध होतो; पण त्याकडे दुर्लक्ष करून व्यवहार होत राहतात. शेंबूड आला म्हणून नाकच कापले जाते. वैशालीसारखी एखादी डॉक्टर होणारी मुलगी या परिवारात अपवादानेच आढळते. बाकी सारे इथे- तिथे रेंगाळणारे, हौसेने धंदा टाकून निवांत राहणारे, दलाली करणारे, त्यात भानगडी होऊन परागंदा होणारे, दुसऱ्यांना फसवणारे, बारमध्ये केवळ मस्तीने भांडण करणारे, नव्या संस्कृतीतील विकृतीच्या आहारी जाणारे, व्यसनी बनणारे, आपल्याच घरातून चोरून आणलेल्या बापाच्या पैशावर रुबाब करणारे, खुशालचेंडूचे जीवन जगण्याची चटक लागलेले.. आणि दुर्दैव म्हणजे त्याचेही तत्त्वज्ञान बनवून आई-बापांना आरामात फसवणारे दिवटे या कादंबरीत आहेत. तसेच उशिरा शहाणपण सुचून मुलामुलींच्या भवितव्याची काळजी वाटणारे, नवरा ऐकत नाही, कामाला जात नाही म्हणून जाळून घेणाऱ्या हतबल माणसांचेही जग यात आहे. परंतु तिथेच जिवंत असताना ज्या जावेशी जमले नाही तिच्या मुलांना नंतर जीव लावणारी तुळसाही आहे.
आपली जमीन बैल घ्यायला, राहण्यासाठी घर बांधायला विकली तर ठीकच; परंतु ती चैनीसाठी जेव्हा या पोरांच्या आयुष्यातून डिलीट होते, तेव्हा हतबलतेशिवाय यांच्या हाती काहीच लागत नाही. सीताराम सावंत यांनी प्रचंड तपशिलांनिशी आजच्या खेडय़ांतला हा ज्वलंत प्रश्न वाचकांसमोर ठेवला आहे. मराठी कादंबरी जीवनाशी समांतर चालत नाही असे जे म्हटले जाते, त्याला ही कादंबरी सणसणीत उत्तर देते.
खेडय़ातल्या जमिनीच्या परंपरा कधीच एकपदरी नसतात. तिथल्या श्रद्धांना चिकटून असलेल्या अंधश्रद्धाही फार बळकट असतात. मग बैल मेला की कुणी जावेनं करणी केली असेल असे उगीचच वाटते. ‘कौशल्येची म्हस मेली ती त्या सटवीला समजलं नसंल का? तिनं नुस्तं इथवर यायला हवं हुतं. खुशाल घरात बसलीय..’ असे गैरसमज ओघातच येतात. अज्ञान, अंधश्रद्धा, अडाणीपणा, अरेरावी, आळस, अहम् आणि या साऱ्याच्या संपर्काने येणारी आपत्ती या ‘अ’च्या बाराखडीमध्ये ही फाटकी माणसं स्वत:चा गळा गुंतवून टाकतात. तर काही साधी साधी माणसंही गावगाडय़ामध्ये मोठी कामं करत होती. मरीबा रामोशी जनावरांच्या आजाराचा माहीतगार माणूस. बैल, गायी-म्हशींची वेदनेतून सोडवणूक करणारा. सज्जन माणूस. तर दुसऱ्यांना गुंठय़ामध्ये विकत घेऊन गाडून टाकणारा झोडमिशेसारखा दलाल शहराच्या हद्दी वाढवण्याच्या नादात मूळ मालकांनाच गाडून टाकतो.. ही विसंगती लेखकाने या कादंबरीत दाखवून दिली आहे.
कादंबरीच्या शेवटी नाना एका प्लास्टिकच्या डब्यामध्ये काळी माती भरलेली असते ती डबी विजूला- म्हणजे पुढच्या पिढय़ांना भेट म्हणून देतो. ही माती कसायची होती; पण जमले नाही. जिने जगवले तिलाच कृतघ्नतेने विकून टाकले. सगळ्या बाजूने मोठमोठय़ा इमारती उभा राहिल्या. माणसांची वर्दळ वाढली तशी बेफिकीरीही वाढली. इमारतींच्या खिडक्यांतून वापरलेल्या निरोधपासून प्लास्टिकच्या कचऱ्यापर्यंत खरकटय़ासह जमिनीवर पडू लागले. जमीन गुदमरली. शेवटी तीही विकावी लागली. याचे जीवघेणे दु:ख थोरल्याला होते.
खरे तर ही सगळी माणसं मातीवर प्रेम करणारी होती. पण जगण्याच्या प्रचंड वेगात त्यांचा रस्ता चुकतो आणि एकेकाळचे हे मालक त्याच जमिनीवर खड्डे खोदायला, सेंटरिंगची कामे करायला सिमेंट, वाळू, खडी कालवायला जातात. अवमानित होतात. बायका धुणेभांडी करू लागतात. मजुरी करतात. दुसऱ्यांचे जुने कपडे आपल्या पोरांसाठी आणतात. हा बदल कादंबरीकार फार सूचकपणे दाखवतो. नियोजनाचा अभाव, ऐतखाऊपणा हा जितका त्यांच्या विनाशाला कारण आहे, तितकीच त्यांना कचाटय़ात पकडून जमीन विकायला लावणारी परिस्थितीही जबाबदार आहे. बिल्डरांच्या क्रूर जगात माणसांना किंमत नाही. किंमत जमिनीला. इथे प्रतिष्ठा फसवणाऱ्यांना. एकच गुंठा अनेकांना विकणाऱ्यांचे हे जग आहे. पण त्यांच्या मालकीची असूनही ज्यांच्या आयुष्यातून भुईच डिलीट झाली, त्यांचे काय? शहरे उभी राहतात तेव्हा त्यांच्या पायात काय काय गाडले गेले आहे याची फिकीर कुणालाच नसते. कुणी एक नायक नसलेली ही कादंबरी मातीलाच नायक बनवून तिची हेळसांड व्यक्त करते. कादंबरीची अर्पणपत्रिकाही खूप अर्थपूर्ण आहे. गुंठा गुंठा विकून देशोधडीला लागलेल्या बळी परंपरेतल्या सर्वाना ही कादंबरी अर्पण केलेली आहे. कादंबरीचे मुखपृष्ठ सुधीर पटवर्धन यांनी अत्यंत आशयपूर्ण केलेले आहे.

‘भुई भुई ठाव दे’- सीताराम सावंत,
लोकवाङ्मय गृह प्रकाशन, मुंबई,
पृष्ठे- २५८, किंमत- २७५ रु. ल्ल

मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Book review
First published on: 15-11-2015 at 00:13 IST