‘उगवत्या सूर्याचा पर्वत’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अरुणाचल प्रदेशवर चीनकडून सातत्याने दावा केला जातो. त्यांच्याकडून सीमारेषेवर रस्तेबांधणी आणि इतर अनेक प्रकल्प सुरू आहेत. भारताला आव्हान देण्याचाच हा एक प्रकार. चीनच्या या कुरघोडीला शह देण्यासाठी भारत सरकारही प्रयत्नशील आहे. याचाच भाग म्हणून अरुणाचल आणि आसाम यांना जोडण्यासाठी ब्रह्मपुत्रा नदीवर पूल बांधण्यात येत आहे. या पुलामुळे वेळप्रसंगी लष्कराला जलद पावले उचलण्यासाठी मोठा फायदा होणार आहे. या पुलामुळे दोन्ही राज्यांतील दळणवळण सक्षम होऊन आर्थिक विकास साधला जाण्यास मदत होईल.
ब्रह्मपुत्रा नदीचे पात्र अतिशय महाकाय, उथळ आणि प्रचंड समुद्रासारखं भासणारं. तिचा पसारा १.२ ते १८ किलोमीटपर्यंत रुंद. पावसाळ्यात येणाऱ्या भल्यामोठय़ा पुरामुळे येथील संपूर्ण जनजीवन तब्बल सहा महिने ठप्प होतं. त्यामुळे अशा परिस्थितीत या नदीवर पुलाची उभारणी करणे ही अतिशय अवघड बाब. मात्र हिंदुस्थान कन्स्ट्रक्शन कंपनीकडून (एचसीसी) ढिब्रुगढजवळील बोगीबील येथे या नदीवर ४.९४ किलोमीटर लांबीचा पूल उभा करण्याचे काम सुरू आहे- ते अंतिम टप्प्यात आहे. या पुलाचे वैशिष्टय़ म्हणजे पुलाच्या खालच्या भागातून दुपदरी रेल्वे तर वरील भागातून तीनपदरी रस्ता करण्यात आला आहे. येत्या जूनअखेर हे काम पूर्ण होण्याची शक्यता असून जुलअखेर हा पूल सार्वजनिक वाहतुकीसाठी खुला करण्यात येईल.
भारत आणि चीन यांच्यामध्ये तब्बल ३,४८८ किमी लांबीची सीमारेषा आहे. यातील एकतृतियांश सीमारेषा अरुणाचल प्रदेशशी जोडली गेली आहे. अलीकडील काळात भारताने या भागात अधिक सावध भूमिका घ्यायला सुरुवात केली आहे. आसाममधील लष्कर आणि जनतेला अरुणाचल प्रदेशला जाण्यासाठी ब्रह्मपुत्रा नदीला ६०० किमीचा वळसा घालावा लागतो. यासाठी किमान १२-१३ तासांचा अखंड प्रवास आलाच. त्यामुळे तात्काळ लष्करी कारवाईसाठी हालचाल अथवा वैद्यकीय सेवा घ्यायची असेल तर अडथळा निर्माण होतो. मात्र या पुलामुळे आता हे अंतर फक्त ६० किमीवर आले असून, फक्त एका तासाच्या आत अरुणाचलमध्ये लष्कर पोहोचण्यास मदत होणार आहे.
आसामच्या या भागामध्ये मान्सूनचा काळ सुमारे सहा महिने (मे-ऑक्टोबर) असतो. या दरम्यान ब्रह्मपुत्रा ओलांडून जायची असेल तर फक्तबोटीचा पर्याय उरतो. मात्र पाण्याचा प्रचंड प्रवाह पाहता या बोटीही किनाऱ्यावरच थांबून राहतात. चक्क फेब्रुवारी महिन्यातही लोक कामावरून ये-जा करण्यासाठी बोटीचा वापर करतात. यावरूनच मान्सूनच्या वेळी या भागातील जनजीवन कसे ठप्प होत असेल याची कल्पना येते. नव्याने होणाऱ्या पुलाचे काम पूर्ण झाल्यास येथील जनजीवन सुखकर होऊन आर्थिक जीवनस्तर उंचावण्यास मदत होणार आहे.
ब्रह्मपुत्रा नदीवर आतापर्यंतचा हा चौथा पूल. या पूर्वीच्या दोन पुलांची निर्मिती एचसीसी कंपनीकडूनच करण्यात आली. पहिल्या भाजपप्रणीत एनडीए सरकारकडून १९९६ मध्ये या प्रकल्पाला मान्यता मिळाली. प्रत्यक्षात २००२ मध्ये या पुलाचे काम सुरू झाले. मात्र त्यानंतर सत्तेवर आलेल्या यूपीए सरकारने या प्रकल्पाकडे सुरुवातीला डोळेझाक केली. मात्र २००७ मध्ये केंद्र सरकारने या प्रकल्पाची राष्ट्रीय प्रकल्प म्हणून घोषणा केली. त्यानंतरही प्रत्यक्षात बांधकाम अतिशय धिम्या गतीने सुरू होते.मात्र विद्यमान सरकारने ईशान्येकडील राज्यांच्या विकासावर लक्ष केंद्रित करायला सुरुवात केली आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने या प्रकल्पाला गती मिळाली. तोपर्यंत २००२ साली १,७६७ कोटींचा असणारा हा प्रकल्प आता ६ हजार कोटी रुपयांवर जाऊन पोहोचला आहे.
सध्या या पुलाचे ७० टक्के काम पूर्ण झाले आहे. हा पूल ४.९ किमी लांबीचा असून, भारतातील तिसऱ्या क्रमाकांचा सर्वात लांब पूल आहे. तसेच ब्रह्मपुत्रा नदीवरील आतापर्यंतचा हा सर्वात मोठा पूल आहे. या पुलासाठी ४२ खांब उभारण्यात आले आहेत. पुलाच्या निर्मितीसाठी तब्बल ७० हजार मेट्रिक टन स्टील वापरण्यात आले. तसेच हा पुल सुमारे १२० वष्रे वापरण्यायोग्य राहील असे सांगितले जात आहे. पूर्ण क्षमतेने पूर आला तरी पुलावरील वाहतूक थांबणार नाही एवढय़ा उंचीवर हा पूल बांधण्यात आल्याने, मान्सूनच्या दिवसांत वाहतुकीमध्ये कोणत्याही प्रकारचा खंड पडणार नाही. पूर्ण वेल्डेड बांधकाम असणारा भारतीय रेल्वेचा हा देशातील पहिलाच प्रकल्प आहे.
आसाम हे राज्य जसे चहाचे कोठार म्हणून ओळखले जाते, तसेच ते भूकंपासाठीही ओळखले जाते. येथे लहानमोठे भूकंप सतत होत राहतात. मागील इतिहास पाहता येथे भूकंपामुळे अपरिमित हानी झालेली दिसून येते. भूकंपाला टाळता येऊ शकत नाही, मात्र त्यातून होणारे नुकसान टाळता येऊ शकते. त्यामुळे या पुलाची उभारणी करताना त्यात भूकंपरोधक प्रणाली बसवण्यात आली आहे. ८ ते ९ रिश्टर स्केलचा भूकंप झाला तरी तो धक्का सहन करण्याची क्षमता या पुलामध्ये आहे. त्यामुळे हा पूल भविष्यात भूकंपप्रवण क्षेत्रात बांधण्यात येणाऱ्या पुलांसाठी मार्गदर्शक ठरू शकेल.
या पुलामध्ये आसाम आणि अरुणाचल प्रदेशमधील अंतर खूप कमी होणार असल्याने दोन्ही राज्यांतील व्यापार वाढण्यास मदत होईल. त्यामुळे येथील जनतेचा आर्थिक विकास होण्यास मदत होणार आहे. सध्या आसाममधील १५.२३ लाख उच्चशिक्षित तरुण बेरोजगार आहेत. मात्र या पुलामुळे येत्या काळात तेथे उद्योगनिर्मितीस चालना मिळेल आणि या तरुणांसाठी रोजगार उपलब्ध होतील. तसेच मुलींना पळवून नेण्याचे प्रमाण आसाममध्ये सर्वाधिक असून, विकासाची चाके फिरल्यामुळे ते नक्कीच कमी होण्यात मदत होईल.
कधी नक्षलवादी हल्ला करतील याचा नेम नाही, अशी भीती या भागात प्रवास करताना जाणवत राहते. येथे संध्याकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास सूर्य मावळतो. त्यामुळे रात्री उशिरा फिरणे मृत्यूला सोबत घेऊन फिरण्यासारखेच. बोडो नक्षलवाद्यांचे प्रमाण इथे मोठय़ा प्रमाणावर आहे. रोजगारासाठी उद्योगधंदे नसल्याने येथील जनतेला आर्थिक उत्पन्नासाठी चहाच्या मळ्यांवर अवलंबून राहावे लागते. मात्र चहाच्या बागांमधील पानांची तोडणी झाल्यानंतर हे हात रिकामे राहतात, त्यामुळे ते नकळत बोडो संघटनेकडे ओढले जातात. उद्योगांचा विकास झाल्यामुळे या चळवळींचा जोर काही प्रमाणात तरी कमी होण्यास मदत होईल.
ब्रह्मपुत्रा नदीवर आतापर्यंत बांधण्यात आलेले पूल हे आसाम आणि अरुणाचल प्रदेशला जोडणारे नव्हते. मात्र हा पूल या दोन्ही भागांना थेट जोडणारा असल्याने दोन्ही राज्यांच्या विकासासाठी याचा मोठा फायदा होईल. त्याने पायाभूत सुविधांमध्येही वाढ होऊ शकेल. तसेच दोन्ही राज्यांतील सांस्कृतिक देवाणघेवण वाढून एकोपा वाढण्यास यामुळे मदत होईल. चीनने सीमेवर काही हालचाल केली तर त्यांच्याविरोधात जलद कारवाई करण्यासाठी या पुलाचा वापर करता येणार आहे.
अरुणाचल प्रदेशची जनता भारतीयांना ‘इंडियन’ नावाने संबोधून स्वत:चे वेगळे अस्तित्त्व दाखवण्याचा प्रयत्न करते. देशाला स्वातंत्र्य मिळूनही कायम दुर्लक्षित राहिल्याने त्यांनी तशी भूमिका होणे स्वाभाविकच. या पाश्र्वभूमीवर विद्यमान सरकारने ईशान्य भारताच्या विकासासाठी सध्या मोठय़ा प्रमाणावर लक्ष केंद्रित केले आहे. असे अनेक प्रकल्प ईशान्य भारतामध्ये दिसून येतात. या प्रकल्पांमुळे फक्त दोन राज्येच जोडली जातात असे नव्हे, तर त्याचा तेथील संपूर्ण भागावर सकारात्मक परिणाम होत असतो. ब्रह्मपुत्रा नदीवरील या पुलाच्या प्रकल्पामुळे ते दिसून येत आहेच, मात्र असे आणखी प्रकल्प या भागात उभे करण्याची गरज आहे; तरच आपल्याच देशातल्या लोकांनी ‘तुम्ही इंडियन’ हा लावलेला शिक्का पुसण्यास मदत होईल.
चंद्रकांत दडस chandrakant.dadas@expressindia.com