राजहंस प्रकाशनातर्फे पोलीस अधिकारी विश्वास नांगरे पाटील लिखित ‘मन में है विश्वास’ या आत्मकथनपर पुस्तकाचे प्रकाशन आज होत आहे. त्यानिमित्ताने या पुस्तकातील एका प्रकरणाचा संपादित अंश..

सह्यद्रीच्या कुशीत आणि वारणेच्या मुशीत वसलेलं ‘कोकरूड’ हे माझं गाव. येथे रोज भल्या पहाटे मशिदीवरील अजानाच्या भोंग्यानं किंवा ज्ञानेश्वरीच्या पारायणानं जाग येते. बारा बलुतेदार, अठरापगड जाती गुण्यागोविंदानं इथे राहतात. ज्या वेळी मी खोल भूतकाळात डोकावतो, त्या वेळी मी दूधभाकरी खावी म्हणून हाक देणारा आजीचा आर्त आवाज ऐकायला येतो. उन्हाळ्यात नदीतील वाळूत खणलेल्या खड्डय़ात मारलेला सूर आठवते. ‘चिकल्या’सारखा छोटा मासा पकडल्यावर मारलेली आरोळी आठवते. शाळेत पोषणयोजनेत मोफत मिळणाऱ्या दुधाचा ग्लास रिचवल्यावर येणारा ढेकर आठवतो. चौगुले गुरुजींनी पाठीत दिलेला गुद्दा आठवतो. कुस्तीच्या मैदानात कुस्ती हरली, तरी मिळणारी बर्फी आठवते. अंकलिपीतल्या बाराखडीचा आवाज आठवतो. उसाच्या सरीतील पावसाच्या सरींचा नाद आठवतो. गुऱ्हाळातल्या उसाच्या रसाचा स्वाद आठवतो. चिपाडाच्या गंजीवरच्या उडय़ा आठवतात. घाणदेवीच्या दिवशी कपातून घेतलेल्या गावठी मळीच्या दारूचा उग्र दर्प दरवळतो. आईच्या हातच्या पुरणपोळ्याही आठवतात. बेंदराला सजवलेल्या बैलांची झूल आठवते. लेझिमातील हलगीची उडती चाल आठवते. दिवाळीतील केपांचा क्षीण आवाज आणि लक्ष्मी तोटय़ाचं ‘धडाम् धूऽम्’ आठवतं. हे आवाज कधी ट्रेनिंगमधल्या शूटिंग प्रॅक्टिसच्या राऊंडमध्ये, तर कधी २६/११ च्या रात्रीच्या लढय़ातील ग्रेनेडच्या ब्लास्टमध्ये बेमालूमपणे मिसळतात. ही सगळी सरमिसळ सदैव मनाच्या अंतरंगात चालूच असते.
ग्रामीण भागातील मुलं ही रानफुलासारखी असतात. त्यांना काळी कसदार जमीन, चांगलं खतपाणी, चांगला सूर्यप्रकाश मिळाला की ती अशी रुजतात, अशी उमलतात, अशी फुलतात की त्यांच्यासमोर सगळे गुलाब, कमळ, डॅफोडिल्स फिके पडतात. वारणेच्या काठावर अशीच काही रानफुलं उमलली आणि त्यांनी दिल्लीचं यू.पी.एस.सी.चं तख्त भेदलं. त्या यशस्वी रानफुलांमध्ये १९९७ सालच्या यादीत मी होतो.
आय.पी.एस.मध्ये निवड झाल्यावर अधिकाधिक मराठी मुलं यू.पी.एस.सी.चं शिवधनुष्य पेलण्यासाठी तयार व्हावीत, म्हणून मी महाराष्ट्रातील अनेक खेडय़ापाडय़ातील शाळा-महाविद्यालयांमध्ये गेलो. मुलांशी संवाद साधला. त्यांच्या मनातील सर्व शंका आणि प्रश्नांना उत्तरं देण्याचा प्रयत्न केला. काही मुलांनी माझी ही भाषणं यू टय़ूबवर अपलोड केली. लाखोंच्या संख्येनं ती पाहिली गेली. शालेय जीवन, कॉलेज डेज, स्पर्धापरीक्षांसाठीचे प्रयत्न आणि आय. पी. एस.मध्ये झालेली निवड हा प्रवास मी लेखणीबद्ध करावा, असे अनेक जणांनी ई-मेल केले, पत्रं लिहिली. विशेषकरून वेडी स्वप्नं घेऊन मुंबई-पुण्यात येणाऱ्या माझ्यासारख्या अनेक फाटक्या चड्डीतल्या खेडय़ातल्या अभिमन्यूंना हे प्रेरणादायी ठरू शकेल, असा त्यांच्या सांगण्यातला सूर होता. मलाही हे पटलं होतं.
स्पर्धापरीक्षेचं स्वप्न उराशी बाळगून रोज असे किती तरी विश्वास मुंबई-पुण्याच्या गर्दीत घुसतात. आमदार निवासात किंवा कॉट बेसिसच्या १० बाय १० च्या खुराडय़ात चार-चारजण राहतात. शेतकरी आई-बापांनी पोटाला चिमटा काढून किंवा असली-नसलेली अर्धा एकर जमीन गहाण ठेवून पोरगा मामलेदार, फौजदार होणार या आशेवर पैसे पाठवायचे. गल्लीबोळातल्या टय़ूशनमध्ये अ‍ॅडमिशन घ्यायची आणि अभ्यासाला लागायचं. शहरातील झगमगाट बघून काहींचे डोळे दिपून जातात. मग रस्ता चुकतात व कुठे तरी भलत्याच ठिकाणी गुरफटतात. यातून बाहेर काढणारं, दिशा दाखवणारं, योग्य मार्गदर्शन करणारं कुणीच नसतं. मग बाकी शून्य. तरुणपण घोडचुका, प्रौढत्व संघर्ष व म्हातारपण पश्चात्ताप करण्यात निघून जातं. काही जण झपाटून अभ्यासाला लागतात. दिशाही मिळते. पण कधी परीक्षा होत नाही. कधी जागा कमी निघालेल्या असतात. या तीन टप्प्यांच्या परीक्षा-प्रक्रियेमध्ये काही जण पहिल्या टप्प्यात, काही दुसऱ्यात तर काही तिसऱ्यात बाद होतात. या सापशिडीच्या खेळात चार-पाच र्वष अथक परिश्रम करूनही काहीच हाती लागत नाही. काही कसलेले पैलवान मैदानात न उतरताच ‘एज बार’ झाल्यानं बाद होतात. मग सिस्टिमविषयी संताप व जगाबाबत नकारार्थी दृष्टिकोन घेऊन जगतात.
माझाही प्रवास असाच वळणावळणांचा. एखादा सिग्नल किंवा वळण चुकलं असतं, तर मीही नैराश्य आणि नकारार्थी जीवनगर्तेत अडकलो असतो. पण स्वप्नांना उमेद दिली, प्रयत्नांची जोड दिली, स्वत:ला वास्तवतेचे चटके दिले आणि कष्टाचे पंख लावले. अडखळत, धडपडत भरारी घेतली. ज्या वेळी पंखात बळ आलं व अभ्यासाची शिखरं पादाक्रांत करायला लागलो, त्यावेळी कधीही जमिनीवरची नजर ढळू दिली नाही. त्यामुळे या प्रवासात स्थिरावलो आणि बऱ्यापैकी यशस्वीही झालो.
‘कोकरूड’या छोटय़ाशा खेडय़ातून ‘शिराळा’ या तालुक्याच्या ठिकाणी शिराळ्यातून ‘कोल्हापूर’ या जिल्ह्यच्या ठिकाणी आणि कोल्हापूरहून ‘मुंबई’ या देशाच्या आर्थिक राजधानीमध्ये असा प्रवास करताना, ध्येयाचा शोध घेताना अनेक ब्रेक लागायचे, ठेचा लागायच्या, जखमा व्हायच्या. कोल्हापूपर्यंत जवळची सांभाळणारी माणसं होती, पण मुंबईत मात्र दोरी तुटलेल्या पतंगासारखी परिस्थिती व्हायची.
मुंबईची दोन रूपं आहेत. एक अत्यंत भव्य, दिमाखदार, ऐश्वर्यानं ओतप्रोत. तर दुसरं हिडीस, हिणकस, दरिद्री आणि घाणीनं माखलेलं. मी या दोन्ही रूपांच्या कुंपणावर भरकटत होतो. ध्येय असं निवडलं होतं, की यशस्वी झालो तर मुंबईतल्या उच्चभ्रू वर्गात एंट्री होणार होती
आणि नापास झालो, तर डिलाइल रोडवरच्या वाणी चाळीतल्या गाववाल्यांच्या खोलीत झोपायला ६ बाय ३ फुटांची जागा मिळवण्यासाठी धडपडावं लागणार होतं.
विश्वास नांगरे पाटील

Solapur, Prathanna Foundation, old age home, Son Refuses to Claim Father s Body Old, 76 year old man, funeral, last rites, family conflict, heart attack, civilized society, Solapur news, marathi news, latest news
वृध्दाश्रमात वृध्दाचे निधन; पित्याच्या अंत्यदर्शनासाठीही मुलगा आला नाही
Loksatta Documentary Discovery channel David Attenborough Director
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले: ‘पाहण्या’च्या पर्यायांत दिशादर्शक…
transport company accountant abscond after stolen rs 43 Lakhs
लेखापालानेच केला मालकांचा विश्वासघात,४३ लाख पळवले
heart touching video about mother and son Must watch
शेवटी आईचं ती! रस्त्याच्याकडेला बाळाला घेऊन बसलीये महिला, आईचा लेकरावर प्रेमाचा वर्षाव, पाहा हृदयस्पर्शी Video
When Competitors Become Comrades: Zomato Rider Helps Swiggy Delivery Guy in Pune
VIDEO: ‘हे फक्त पुण्यातच होऊ शकतं’ परस्परांचे स्पर्धक झाले परस्परांचे मित्र; पुण्याच्या रस्त्यावर नेमकं काय घडलं पाहाच
seven month old baby swallowed three keys the doctors of Rajawadi Hospital saved the babys life
सात महिन्याच्या बाळाने गिळल्या तीन चाव्या, राजावाडी रुग्णालयाच्या डॉक्टरांनी वाचविले बाळाचे प्राण…
Mohan Bhagwat asserts that Asha Bhosle sang songs of self interest and public interest Mumbai
‘स्वान्तः सुखाय, बहुजनहिताय’ पध्दतीची गाणी आशा भोसले यांनी गायली; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांचे प्रतिपादन
Kiran Pahal qualify for Paris Olympics
वर्षभराचा खंड पडूनही किरण पहलची कौतुकास्पद कामगिरी! पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कसे मिळविले स्थान, पाहा….