शांता शेळके यांच्यात एक प्रकारचा साधेपणा, हवाहवासा मोकळेपणा आहे. निर्मळ, अनाग्रही, सरळ जमिनीवर चालणाऱ्या, विविध प्रकारची पुस्तके आणि माणसे यांच्यात मनापासून रमणाऱ्या शांताबाई आळंदी येथे भरणाऱ्या ६९ व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा आहेत. त्यानिमित्ताने त्यांच्या वाङ्मयीन व्यक्तिमत्त्वाचा वेध घेणारा लेख..शांताबाइर्ंविषयी विचार करताना मला वाटते की, त्या आपल्या फारशा ओळखीच्या नसूनही खूप ओळखीच्या आहेत! आणि हा माझा समज त्यांनीच करून दिलेला आहे. शांताबाईंना मी प्रथम पाहिले तीस-बत्तीस वर्षांपूर्वी. त्या वेळी झालेल्या परिचयाचा धागा पकडून एकदा मी त्यांच्या घरी गेले. तेव्हा त्या दादरच्या एका मोठय़ा चाळवजा खोलीत राहात असत. आत गेल्यावर मला त्यांनी ताबडतोब ओळखले. आमच्या गप्पा सुरू झाल्या आणि थोडय़ा वेळातच माझी आवड हेरून त्यांनी मला एक अविस्मरणीय रेकॉर्ड ऐकवली. हृदयनाथांनी मीरेच्या भजनांना चाली लावलेल्या आणि लताबाईंनी ती गायिलेली. याक्षणी हे लिहीत असताना मला लताबाईंच्या स्वरांनी भारून गेलेली ती खोली, ते स्वर आणि त्या स्वरांमध्ये हरवून गेलेले आम्ही तिघेजण आठवताहेत. त्यानंतर अनेक वेळा, अनेक ठिकाणी शांताबाई भेटत राहिल्या- भेटल्या की खूप आपुलकीने खूप वेळ त्या बोलत असतात आणि त्यानंतर खूप वेळ त्यांचा विशिष्ट, झारदार गोड आवाज मनात रेंगाळत असतो. त्यांची ठसठशीत कुंकू लावलेली, नेहमी डोक्यावरून पदर घेतलेली साध्या मराठमोळ्या चेहऱ्याची जराशी ठेंगणी मूर्ती मी गेली कित्येक वर्षे कधी जवळून, कधी दुरून, त्या व्यासपीठावर मुलाखत देताना किंवा दूरदर्शनवर, एखाद्या संमेलनात शेजारी बसून पाहात आले आहे. आम्ही एका गावातल्या, एका वर्तुळातल्या नव्हेत, भेटीही काही खूपदा झालेल्या नाहीत. मैत्रिणीचे जिवाभावाचे बोलणेही आमच्यात नसते. पण तरीही दरवेळी त्या भेटल्या की आम्ही नेहमीच बोलतो, परवाच भेटलो होतो की अशा प्रकारच्या खास जिव्हाळ्याने त्या बोलू लागतात आणि आम्हा दोघींमधले सर्व प्रकारचे अंतर – भेटीतल्या मधल्या काळाचे, गावांचे, वयाचे, अनुभवाचे, जीवनपद्धतींचे, स्वभावांचे – क्षणार्धात मिटून जाते आणि मनावर तरळत राहतो तो आत्मीयतेचा स्पर्श देणारा एक गाढ चिरपरिचय.
आणि हा केवळ माझाच अनुभव नाही. मराठी वाचकांनाही हाच अनुभव आहे. शांताबाईंनी साठ- बासष्ठ तरी पुस्तके लिहिली आहेत हे आपल्यापैकी अनेकांना ठाऊक नसेल. त्यांच्याशी प्रत्येकाची भेट झाली असेलच असे नाही. कुणी त्यांना एखाद दोनदा दूरदर्शनवर पाहिले असेल नसेलही. पण शांताबाई साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष म्हणून निवडून आल्या तेव्हा आपल्या जवळच्या, अगदी खूप परिचयातल्या व्यक्तीला अध्यक्षपद मिळाल्याचा आनंद सर्वाना झाला. फारशा ओळखीच्या नसूनही शांताबाई अशा खूप ओळखीच्या, अगदी जवळच्या बनून जातात त्या कशा हे एक कोडेच आहे. मला वाटते त्यांच्यात एक प्रकारचा साधेपणा, हवाहवासा मोकळेपणा आहे. ‘साहित्यिक’ मंडळी शालीसारखा स्वत:च्या खांद्यावर लेऊन वावरतात तो ‘साहित्यिकपणा’ नाही, एक निर्मळ, अनाग्रही, सरळ, जमिनीवर चालणाऱ्या अशा त्या बाई आहेत. विविध प्रकारची पुस्तके आणि विविध प्रकारची माणसे यांच्यात मनापासून रमून जाणाऱ्या. जगण्याचा प्रवाह कधी काठावर उभे राहून तर कधी त्यात बुडून जाऊन पाहणाऱ्या.
शांताबाईंनी निरनिराळ्या प्रकारचे लेखन केलेले आहे. कथा, कादंबरी, कविता आणि ललित लेखन अशा प्रकारांमध्ये ते बसवता येत असले तरी त्यातली विविधता आणि विपुलता चकित करणारी आहे. गेली साठेक वर्षे त्या वाङ्मयनिर्मितीत रमून गेल्या आहेत. त्यांच्या लेखनाचा मला जाणवणारा एक विशेष म्हणजे लेखन हा जवळजवळ व्यवसाय म्हणून स्वीकारलेला असूनही त्यांचे लेखन ‘व्यावसायिक’ नाही. लेखन ही त्यांची ‘करिअर’ नाही. आचार्य अत्र्यांच्या ‘नवयुग’मध्ये पत्रकार म्हणून लेखनकामाठी करण्यापासून त्यांनी लेखनाला सुरुवात केली. हुकमी, हवे त्या प्रकारचे लेखन त्या आरंभकाळापासून आजतागायत करताहेत. चित्रपटांसाठी गीते लिहिणे किंवा वृत्तपत्रांसाठी सदर लेखन हे अशा प्रकारचेच. पण त्यांचे ते लेखनही गरजेपोटी किंवा व्यवसायाखातर होणाऱ्या लेखनाच्या तऱ्हेचे नसते. त्या लेखनातही शांताबाईंच्या व्यक्तिमत्त्वाचे रंग खोलवर मिसळलेले असतात आणि म्हणून त्याला एक खास दर्जा असतो. या प्रकारचे लेखन करीत असतानाही शांताबाई अधिकाधिक मुरत, घडत गेलेल्या असतात. ‘प्रत्येक लेखकाने या पत्रकारितेच्या मांडवाखालून एकदा जरूर गेले पाहिजे’ असे शांताबाईंनी म्हटलेले आहे. पण पत्रकारितेच्या क्षेत्राचा लेखक म्हणून स्वत:ला वाढवण्यासाठी उपयोग करून घेणारे लेखक कमी असतात. शांताबाईंनी पत्रकारितेचा व्यवसाय सोडला. पुढे वेळोवेळी वृत्तपत्रांतून सदर लेखन केले ते आवडीने. त्यांच्याच शब्दात सांगायचे तर ‘ठराविक वेळी काही मजकूर लिहून देण्यातले आव्हान, अनपेक्षितता लेखकाची कसोटी बघणारे, म्हणून या लेखनातला आनंदही मोठा.’ त्यांनी ‘ललित’ मासिकातून तीन वर्षे चालवलेले ‘एकपानी’ हे सदर किंवा अलीकडचे ‘महाराष्ट्र टाइम्स’मधले ‘जाणता अजाणता’ हे सदर – शांताबाईंच्या व्यक्तिमत्त्वाची आणि लेखनाची सर्व वैशिष्टय़े प्रतिबिंबित करणारे हे लेखन आहे. सदर लेखनात ओढून ताणून आणलेला चुरचुरीतपणा, कृत्रिम शैलीदारपणा, खोटी काव्यात्मता आणि उसनी ‘पिळणारी’ चिंतनशीलता – यापासून हे लेखन अगदी मुक्त आहे. भरपूर माहिती असूनही हे लेखन ‘माहितीपर’ नाही. विविध प्रकारचे वाङ्मयीन संदर्भ, आठवणी आणि तपशील असूनही ते तपशिलांनी जड झालेले किंवा नॉस्टॅल्जिक – हळवे – वाटत नाही. रुक्षता, विद्वत्तेचे प्राचुर्य किंवा वाङ्मयेतिहासाची तटस्थता या लेखनात किती सहजपणे टाळलेली आहे. विनोद, कोटय़ा, शैलीचा अगम्य तिरकसपणा, नको तेवढी अंगचटीला जाणारी जवळीक किंवा अंगावर शहारा आणणारी भावुकता अशा सर्व प्रकारच्या आसपासच्या सदरलेखनात आलेल्या दोषांपासून सहजपणे मुक्त असणारे सदर लेखन वर्षांनुवर्षे करणे ही गोष्ट सोपी नव्हे. शांताबाई हे करू शकल्या, करू शकतात याचे रहस्यही त्यांच्या व्यक्तिमत्त्वातच दडलेले आहे. शांताबाईंनी प्रचंड वाचलेले आहे. शेक्सपियरपासून सिल्विया प्लाथपर्यंत, संस्कृत नाटके, काव्यग्रंथ- सुभाषितांपासून लोकसाहित्यापर्यंत, मराठी जुन्या नव्या कवितेपासून अलीकडच्या ताज्या कादंबरीपर्यंत विविध प्रकारातले विविध पातळ्यांवरचे वाचन त्यांनी केलेले आहे. समरसून, आसुसून, बुडून जाऊन केलेल्या या वाचनाने त्यांचा पिंड घडविला आहे. त्याच उत्सुकतेने त्यांनी जीवनही समरसून पाहिले आहे. वाङ्मयाचे आणि वाङ्मयातील स्वत:च्या आणि सभोवतीच्या माणसांच्या जीवनाचे डोळसपणे, चिकित्सकपणे अवगाहन त्यांनी केले आहे. मनातल्या मनात त्यातल्या संगती विसंगतीचे विश्लेषणही केलेले आहे. रसिकता आणि मर्मग्राही विश्लेषकता यांचा एक अनोखा मनोहारी मेळ शांताबाईंच्या व्यक्तिमत्त्वात झालेला आहे, त्याचे प्रतिबिंब त्यांच्या सदर लेखनात जसे उमटते, तसे त्यांनी निवडलेल्या लेखनाच्या इतर प्रकारात आणि काव्यातही. ‘मेघदूता’चा अनुवाद, जपानी हायकूंचा अनुवाद, ‘वडीलधारी माणसे’सारख्या व्यक्तिचित्रणात, एवढेच नव्हे तर त्यांनी लिहिलेल्या बालगीतांमध्येसुद्धा ते दिसते.
शांताबाईमध्ये एक विचारी पण मिश्कील निरीक्षक लपलेला आहे. ही वैचारिकता, रसिकता, मिश्कीलपणा सदर लेखनात हातात हात घालून फेर धरताना दिसतात. निरीक्षण, कुतूहल आणि लहानसहान गोष्टीतले समरसणे बालगीतांत दिसतात. कुसुमाग्रजांच्या किंवा विजया राजाध्यक्षांच्या कथांची किंवा मतकरींच्या गूढकथांची निवड आणि संपादन, मराठीतील निवडक प्रेमकवितांचे संपादन करणे, उत्कृष्ट पाश्चिमात्य चित्रपटांच्या कथा सांगणे, लोकगीतांमधले स्त्रीजीवन न्याहाळणे, चित्रपटांची गीते लिहिण्यासाठी संगीत दिग्दर्शकांबरोबर वेळ घालवून खूपसे त्यांच्याकडून शिकत जाणे, हे सारे काही कोणी ‘व्यवसायाचा भाग’ म्हणून करीत नाही. अर्थात काही जण केवळ हाच व्यवसाय करतात! शांताबाई हे सारे करतात ते त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा एक एक आविष्कार म्हणून. त्यामुळे त्यांच्या या सर्व लेखनाला एक कस आहे. त्यांच्या या बहुरंगी गोफासारख्या व्यक्तिमत्त्वाचे धागे त्यांच्या लेखनात ठिकठिकाणी विणले जात असतात. ‘एक पानी’त चिंतामणी पेटकरांच्या ‘गंगावर्णना’ची माहिती देताना त्यांच्या प्रस्तावनेचा उल्लेख त्या करतात. त्यावरून ‘आजकालच्या व्याजकाव्यात्मतेपेक्षा साधी सरळ अनलंकृत ठोस रचना परवडली. यमक – गझलाचा हात (की पाय) धरून राजरोस पुन्हा आत घुसले आहे’- असे भाष्य करतात आणि ‘आज पुन्हा एखाद्या चिंतामणी पेटकरांची गरज तीव्रतेने भासत आहे’ असे मिश्कीलपणे म्हणतात. त्यांचा ‘तीन चुंबने’ लेख आठवतो ना? एका संस्कृत श्लोकातले शंकराने घेतलेले गणेशाचे वात्सल्ययुक्त चुंबन, ‘फुलराणी’तल्या ‘पुऱ्या विनोदी’ संध्यावाताने घेतलेले फुलराणीचे चुंबन (‘ज्या चुंबनामुळे तिचे मन प्रणयचुंबनासाठी उन्मुख होते’ – इति शांताबाई. यातला ‘उन्मुख’ हा शब्द आणि आपल्या आजपर्यंत लक्षात न आलेला संध्यावाताच्या चुंबनामुळे फुलराणीला स्वप्नेही चुंबनाची पडतात हा सूक्ष्म तपशील ध्यानात आणून देणारी रसिक मर्मदृष्टी.) आणि आपल्या स्मरणशक्तीच्या अद्भुत पेटाऱ्यातून त्यांनी काढलेली एक विलक्षण चीज म्हणजे, चिंतामणी गणेश भानू यांच्या ‘शृंगेरीची लक्ष्मी’ या कादंबरीतले एक चुंबन. ‘एक अकृत्रिम, अप्रतिम असे भावचित्र’ असणारा प्रसंग. वेगवेगळ्या संदर्भातील गोष्टींना त्यांनी या लेखात किती सुरेख गुंफून घेतले आहे. ‘काही चोळीगीते’ या लेखातही एक दिलखुलास, नि:संकोच मोकळ्या आणि मार्मिक शांताबाई झळझळून दिसल्या होत्या. किती संदर्भानी तो लेख सजला होता, जुन्या-नव्या पिढीच्या संवादाने जिवंत झालेला होता- तुकडय़ाची, पारव्याची, माळणीची, बिनपारव्याची असे चोळीचे प्रकार सांगता सांगता अचानक, ‘नवखंड पृथ्वी तुझी चोळी’ असा टिपेचा सूर लावणारे आदिमायेचे स्तोत्र त्यांनी लेखात किती विलक्षणपणे गुंफले होते. या प्रकारची जीवनाची संदर्भ संपृक्तता असणारी पहिली ललितलेखिका म्हणजे दुर्गाबाई. पण ते प्रकरण शांताबाईंहून खूपच वेगळे आहे. हे आणि या प्रकारचे ललित लेखन आपण का केले हे सांगताना शांताबाईंनी म्हटले आहे, ‘चिमटीने उचलण्याचे अनुभव’- जे दुसऱ्या कोणत्याही वाङ्मय प्रकारात बसत नाही- ते व्यक्त करण्यासाठी आपण हे लेख लिहिले. पण लक्षात येते की, ही चिमूट साधी नाही. मार्मिकता आणि रसिकता, साधेपणा, व्युत्पन्नता, बहुश्रुतता असे ओंजळभर गुण असलेली ही चिमूट आहे. त्या चिमटीतून आपल्याला जे मिळते ते किती भरपूर असते.
शांताबाईंनी रूढ समीक्षा लिहिलेली नाही. पण त्यांची मार्मिक वाङ्मयीन समज, मर्मग्राही आकलनशक्ती आणि रसग्राही वृत्ती प्रकट करणारी अनेक रसग्रहणे त्यांच्या लेखनात सापडतात. स्वत:च्या आणि इतर संपादनांना त्यांनी लिहिलेल्या प्रस्तावनांतूनही याची साक्ष पटते. १९४० नंतरच्या लेखकांच्या पिढीचा गेली ६०-६५ वर्षे चाललेला वाङ्मयव्यवहार त्यांनी जवळून आणि चिकित्सकपणे न्याहाळलेला आहे. त्या संदर्भात त्यांची काही स्पष्ट आणि निश्चित निरीक्षणे आणि अभिप्राय आहेत, ते त्यांनी या ना त्या निमित्ताने सांगितलेही आहेत. कधी ‘पाचवी खुर्ची’सारख्या लेखात जराशा उपरोधाने आणि सूक्ष्मपणानेही त्यांचा एखादा अभिप्राय येतो. या ६० वर्षांत साहित्याने किती वळणे घेतली, वाद झडले, फड आणि पक्ष निर्माण झाले, सवतेसुभे उभे राहिले. पण शांताबाई या साऱ्यांमध्ये असूनही त्यांच्यापैकी कोणी नव्हत्या. या वाङ्मयव्यवहारातल्या प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष गमती, अंतर्विरोध न्याहाळूनही शांताबाई कोणाबद्दल हिणवणारे, अनादराने बोलल्या नाहीत. आढय़ता, अहंकार, असंतुष्टता, उच्चभ्रूपणा या गोष्टी त्यांच्या व्यक्तिमत्त्वात नाहीत. स्वत:बद्दल कसलेही गैरसमज नाहीत. ‘मी सामान्यांसाठी, त्यांना कळणारे लिहिते’ असे म्हणतानासुद्धा असे न लिहिणाऱ्यांपेक्षा आपण काही वेगळे वा उच्च पातळीचे करतो आहोत, असे त्यांना सुचवायचे नसते. परवा मुंबई मराठी साहित्य संघातल्या सत्कारप्रसंगी गंगाधर गाडगीळांनी म्हटले त्याप्रमाणे, ‘‘मळलेल्या, रुळलेल्या वाटेने जायला त्यांनी कधी अनमान केला नाही आणि जे परिचित, नित्य, त्यातला ताजेपणा जपून आपल्या लेखनातून व्यक्त केला.’’ शांताबाईंचे हे प्रगल्भ व्यक्तिमत्त्व आणि सुजाण जीवनदृष्टी आरपार जाणवते ती त्यांच्या कवितेतून. त्यांनी किती परोपरीची कविता लिहिली. गीते, चित्रपटगीते, कविता, बालगीते, नाटय़गीते.. गीतांतही किती रचनाप्रकार- पदे, गौळणी, भूपाळी, आरती, अंगाईगीते, द्वंद्वगीते, मुक्तछंद, गझल, सुनीत, भावकाव्य.. चित्रपटगीत लेखन केले त्यांनी व्यावसायिक हेतूने. १९५० साली ‘राम राम पाव्हणं’ या चित्रपटासाठी त्यांनी प्रथम गीतलेखन केले आणि ते गाणे होते लता मंगेशकर यांनी संगीतबद्ध केलेले आणि लताबाईंनीच गायिलेले- ‘तू गुपित कुणाला सांगू नको आपुले, मी नवनवलाचे स्वप्न काल पाहिले’ हे. मी गाणी गुणगुणत असे त्या काळात ‘जे वेड मजला लागले’, ‘बहरूनि ये अणुअणू, जाहली रोमांचित ही तनू’, ‘आळविते केदार’, ‘रेशमाच्या रेघांनी’, ‘पावनेर ग मायेला करू’ ही त्यांची चित्रपटातली काही गीते मनात रेंगाळली होती आणि ‘तोच चंद्रमा’, ‘गणराज रंगी’, ‘आधी वंदू तुज’, ‘जिवलगा राहिले रे’, ‘ही वाट दूर जाते’, ‘जाईन विचारित रानफुला’, ‘वादळवारं सुटलं गं’, ‘चांदण्या रात्रीतले ते स्वप्न’ अशी कितीतरी गीते दिवसाच्या कोणत्याही प्रहरी सहजच आठवत, ओठावर येत. अजूनही येतात. हृदयनाथांनी संगीत दिलेली त्यांची काही गाणी तर आपण या आयुष्यात विसरू असे वाटत नाही. शांताबाईंनी लिहिलेल्या सर्व चित्रपटगीतांचा ‘चित्रगीते’ हा संग्रह प्रकाशित झाला आहे. तो चाळताना वेगवेगळ्या संगीतकारांनी दिलेल्या सुंदर चालींसह मनात रुतून बसलेली कितीतरी गीते लकेरी होऊन मनात घुमायला लागतात. अशी गीते लिहिणाऱ्या शांताबाईंना गीतरचनेचे नुसते तंत्र जमलेले आहे असे नव्हे. शास्त्रीय संगीतातल्या बंदिशीचे वजन किंवा पारंपरिक भावगीतातला मोकळा प्रवाहीपणा दोन्ही सहज बांधून घेणारी शब्दकळा शांताबाईंनी कमावली आहे. त्यासाठी परिश्रम केले आहेत. अनेक संगीत दिग्दर्शकांकडून विनम्रभावाने गीतलेखनासाठी आवश्यक ती तंत्रे त्यांनी शिकून घेतली. पण त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे मराठीतल्या लोकगीतांचा, स्त्रीगीतांचा आणि प्राचीन आणि आधुनिक गीतकाव्यांचा संपन्न वारसा, संस्कारांतून आणि अभ्यासातून स्वत:त मुरवून घेतलेला आहे. सुंदर, बांधीव, आकर्षक मुखडा, साधी प्रासादिक भाषा, कल्पनारम्यता आणि ज्या व्यक्तीच्या तोंडी ते गीत आहे तिची भावना शब्दात आणण्यासाठी आवश्यक असलेले नाटय़गुण हे सारे शांताबाईंच्या गीतांमध्ये आढळते. शांताबाईंपूर्वीचे महत्त्वाचे अर्वाचीन गीतकाव्ये लिहिणारे कवी म्हणजे भा. रा. तांबे, बा. भ. बोरकर आणि ग. दि. माडगूळकर. शांताबाईंनी कवी-गीतकारांची ही परंपरा मोठय़ा आनंदाने पुढे चालविली. गीतरचना हाही केवळ त्यांच्या व्यवसायाचा भाग राहिला नाही. आविष्काराच्या, रचनेच्या निर्मितीच्या आनंदाचा भाग बनून गेला.
‘जिवलगा राहिले रे’, ‘जाईन विचारित रानफुला’ किंवा ‘ही वाट दूर जाते’ यांसारख्या शांताबाईंच्या गीतांतून स्पष्टपणे जाणवणारा आत्माविष्काराचा ध्वनी अर्थातच त्यांच्या कवितांमधून अधिक उत्कटतेने आणि अस्सलपणे व्यक्त होतो. गीताच्या रचनेतच असणारे ध्रुवपदाचे किंवा कडव्याचे सीमितत्व कवितेत विरघळून जाते. शांताबाईंनी प्रथम लिहिली ती कविता आणि नंतर गीतांच्या समांतरपणेच त्यांची कविताही विकसित होत गेली. १९४७ साली शांताबाईंचा ‘वर्षां’ हा संग्रह प्रकाशित झाला. रविकिरण मंडळाच्या, विशेषत: माधव ज्यूलियनांच्या कवितेने शांताबाईंना किती प्रभावित केले होते ते शांताबाईंच्या अनेक लेखांतून, भाषणांतून तसेच ‘वर्षां’तल्या कवितांवरूनही कळते. पण नंतर मात्र इतर कोणा कवीचा प्रत्यक्ष प्रभाव त्यांच्या कवितेतून फारसा दिसत नाही. त्यांच्या ‘रूपसी’ या संग्रहाचा काही ठसा याक्षणी माझ्या मनावर नाही, पण मी सत्यकथा वाचत होते तेव्हा सातत्याने वाचलेल्या आणि नंतर ‘गोंदण’मध्ये समाविष्ट झालेल्या कविता पाहिल्या की जाणवते की, शांताबाईंची कविता इतरांच्या संस्कारापासून मुक्त, स्वतंत्र, शुद्ध आत्मानुभूतीतून उमललेली आणि आत्माविष्काराची आर्त- उत्कटता अंगभूत असणारी अशी आहे. ‘अघ्र्य जसा ओंजळीत धरला जन्म उभा शिणलेला..’ किंवा, ‘स्मरणाच्या पार कुठेसे/ विमनस्क कुणीतरी असते, ती राख हलविता हाती/ बोटाला ठिणगी डसते..’ असे स्वत:च्या जाणिवांचे, भावनांचे घट्ट पीळ प्रामाणिकपणे व्यक्त करणारी कविता शांताबाई पुढे आणखी २० वर्षे लिहीत राहिल्या. वास्तविक १९४५ ते ९५ या काळात कवितेने किती वळणे घेतली! नवनवे प्रवाह आणि प्रवृत्ती आल्या. सामाजिक जाणीव आपल्या कवितेत नाही म्हणजे काहीतरी आपले चुकत तर नाही ना, असे भाबडेपणी वाटायला लावणारी सामाजिक जाणिवेच्या कवितांची लाट आली आणि पु. शि. रेगे वगळता बहुतेक सर्व कवी सामाजिक जाणिवेच्या धारेखाली न्हाऊ-वाहू लागले! या सर्व काळात शांताबाई स्वत:ची, स्वत:च्या आतल्या विश्वाची, स्वत:च्या जाणिवेची कविता लिहीत राहिल्या, निष्ठेने आणि अविचलितपणे, पुष्कळदा त्यांची कविता स्मृतीत रंगली, गेलेल्या आयुष्याबद्दल बोलत राहिली – ‘ओल्या आठवणी, अनावर हसे, दूरस्थ दु:खे तशी’ किंवा ‘आयुष्याच्या वळणावरती आठवणी एकेक/ तेवत ठेवून उरात आपण विझून गेले कैक’, ‘किती उमलले गुलाब आणिक किती पाकळ्या गळल्या, दूर कोठल्या आभाळातून किती घनमाला वळल्या’- त्या मनाशी जागवीत राहिली. ‘गोंदण’ आणि नंतरचे ‘अनोळख’ आणि ‘जन्मजान्हवी’ हे संग्रह सलगपणे वाचताना मला वाटले, शांताबाईंची कविता या काळातल्या इतर कवयित्रींच्या कवितांपेक्षाही वेगळी आहे. निसर्ग वा प्रेमजाणीव स्त्रियांनी ज्या ठरावीकपणे व्यक्त केली, विशेषत: शांताबाईंच्या समकालीन कवयित्रींनी- त्याहून शांताबाईंची कविता निराळी दिसते. त्यांच्या कवितेतून आयुष्याचा अर्थ उमजून आलेल्या माणसाचा अंतस्थ स्वर ऐकू येतो. जीवनाच्या सुखदु:खाचे वस्त्र सर्वागाभोवती मायेने लपेटून त्यातल्या सुताधाग्याचा खोलवर स्पर्श अनुभवण्याची वृत्ती दिसते. त्यामुळे अगदी स्वाभाविकपणे वैताग, नैराश्य, औदासीन्य, उद्वेग, तुच्छता वा नकार त्यांच्या कवितेत दिसत नाही किंवा निसर्गाचे, प्रीतीचे, लौकिक क्षीण भावभावनांचे पडसाद अशीही ती वाटत नाही.
‘कधि उत्कट भोगातून, कधि उदास त्यागातून
रागातून रंगत कधि तर कधि अनुरागातून
जगणे हे निर्हेतुक, कधि जगणे कधि मरणे
जन्मान्तर फिरून फिरून एकच या जन्मातून!’
या सखोल आत्मभानातून त्यांनी जीवनाकडे पाहिलेले आहे. शांताबाईंनी जीवनाला ‘जन्मजान्हवी’ म्हटले आहे. आयुष्याचा अखंड, खळाळता, निरुद्देश, सतत वळणे घेणारा, नित्यनूतन आणि शांतविणारा प्रपाती, आवेगपूर्ण अन् पवित्र प्रवाह.. या साऱ्या अर्थच्छटा एकाच त्या शब्दात गोठवलेल्या आहेत.
‘कळत नाही माझे मला, साऱ्यात मी पसरते आहे
की सारे माझ्या ठायी सामावते आहे ओत प्रोत?
अशा वेळी जीव कसा भरून येतो काठोकाठ
उमगतो जन्मजान्हवीचा सनातन मूलस्रोत’
शांताबाईंच्या कवितेचे सत्त्व कळून घेण्यासाठी त्यांच्या ‘गोंदण’ या संग्रहातल्या अनेक कविता विशेषत: ‘रहस्य’, ‘रंग’, ‘तिरपाक्षण’, ‘भूतातूनच’, ‘दुभंग’, ‘सायुज्य’, ‘आरसा’, ‘एकोऽ हं बहुस्यां’, ‘देणे’- ही अप्रतिम सुनीते पुन: पुन्हा वाचवीत. एकाच वेळी सनातन आणि अत्याधुनिक असा जीवनबोध या कवितांमध्ये सापडतो. शांताबाईंच्या आत दडून असलेली एक गंभीर – स्वत:लाही क्वचित, अचानकपणे दिसून जाणारी एक वेगळीच ‘मी’ तिथे साक्षात भेटते. जीवनाशी एकतानतेने भिडलेली, त्याचा तळठाव शोधू बघणारी, त्याच्या एका रूपाने पुलकित तर दुसऱ्याने कासावीस होणारी अशी ही कवयित्री आहे.
‘सारे काही इथे आणि आताच
काल नाही, उद्या नाही, आहे केवळ या क्षणाचा श्वास
आणि चिरडलेल्या अवस्थेतही
जगण्याचा हव्यास..
सुरांचे अटळ आवाहन, दऱ्या-डोंगरांचे भय
दोन्ही एकत्र सांभाळत मी, जिवापाड,
नि:संशय..’
असा स्वत:चा शोध घेणारी-
‘अंगावरचा पालवीचा निर्थक पसारा
सावरीत
झाडाची मुळे वर्षांनुवर्षे जातच असतात
खोल
स्वीकारतात अटळपणे भुईखालचे जगणे
अदृश्य
चाचपतात अंधार, मिळेल ती शोषून घेत ओल..
झाड मोहरते, थरथरते, डवरते, झडतेही
शहाणे यालाच आयुष्य म्हणतात की
काय..’
असा जीवनाचा अर्थ उमगलेली ही स्थितधी कवयित्री गेली कित्येक वर्षे मी दुरून, कधीमधी आणि नेहमी, अगदी जवळून बघते आहे. तिच्या साहित्यातून वेगवेगळ्या रूपात भेटते आहे. पण तरीही, शांताबाई माझ्या खूप ओळखीच्या आहेत आणि तरीही अद्यापि त्या आपल्याला पुरेशा कळलेल्या नाहीत, असेच मला वाटत असते. त्यांच्याच एका कवितेच्या ओळी आठवतात, वेगळा संदर्भ घेऊन-
‘दिसते न दिसतेसे
सारे संदिग्ध धूसर
काही अंतस्थाचा रंग
चढे वस्तुजातावर..’
प्रभा गणोरकर
(लोकरंग – २८ जानेवारी १९९६)
संग्रहित लेख, दिनांक 28th Aug 2016 रोजी प्रकाशित
‘काही अंतस्थाचा रंग चढे वस्तुजातावर’
शांताबाइर्ंविषयी विचार करताना मला वाटते की, त्या आपल्या फारशा ओळखीच्या नसूनही खूप ओळखीच्या आहेत!
Written by लोकसत्ता टीम

First published on: 28-08-2016 at 00:37 IST
मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi author prabha ganorkar article on kavayitri shanta shelke