तुषार जोगची ‘रिकामी भिंत’

सामाजिक भान आणि दृश्यकलेतील प्रयोग यांची उत्तम सांगड घालणारे तुषार जोग नुकतेच निवर्तले.

(संग्रहित छायाचित्र)

अभिजीत ताम्हणे

सामाजिक भान आणि दृश्यकलेतील प्रयोग यांची उत्तम सांगड घालणारे तुषार जोग नुकतेच निवर्तले. त्यांची कारकीर्द का महत्त्वाची ठरली, याचा हा आढावा..

तुषार जोग. वर्ण केतकी गोरा. उंची सहा फुटांच्या आसपास. बावन्नाव्या वर्षीदेखील बेढब न झालेला बांधा. शरीर आणि मनानंही निरोगी असलेल्या माणसाचा उमदेपणा इतरांनाही जाणवतो, त्याला तुषार अपवाद नव्हता. हल्ली चेहरा किंचितसा थकलेला दिसे, पण उत्साह १९९७ मध्ये होता तसाच. हा असा तुषार मंगळवारी सकाळी ‘हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं’ गेला, यावर आजही अनेकांचा विश्वास बसत नाही. पण तुषार गेला हे वास्तव आता स्वीकारावं लागेल आणि तो गेला म्हणजे काय गेलं, नेमकं नुकसान काय झालं, हेही पाहावं लागेल.

राज्यघटनेवर विश्वास असणाऱ्या सामाजिक चळवळी आणि चित्र-शिल्पांचं किंवा ‘दृश्यकले’चं क्षेत्र, यांमधला एक महत्त्वाचा दुवा होता तुषार. शिक्षणानं तो शिल्पकार. पण सर्व प्रकारच्या दृश्यकलेत त्यानं संचार केला. ‘परफॉर्मन्स आर्ट’ (परफॉर्मिग आर्ट नव्हे) हा दृश्यकलेतला सर्वात नवा प्रकार. भारतात तो काहीजणांनी तुषारच्या आधीदेखील केला, पण तुषारनं त्याला एक निराळी नैतिक उंची दिली. कलावंताची नैतिकता हा कोणत्याही कलेचा गाभा असतो आणि अभिव्यक्तीमधल्या (म्हणजे कलावंत जे काही करतो, सादर करतो, त्यातल्या) सौंदर्यतत्त्वांना कलावंताच्या सातत्यपूर्ण नैतिक भूमिकेमुळे कालसुसंगत मूल्यांची जोड मिळत असते. हे सुविचारासारखं वाटणारं सार्वकालिक सत्य तुषारला उमगलं असावं, असं त्याचा कलाप्रवास आपल्याला सांगतो.

हा कलाप्रवास १९८४ मध्ये ‘जेजे स्कूल ऑफ आर्ट’ मध्ये तुषारनं प्रवेश घेतला तेव्हापासूनच सुरू झाला, असं मानणं भोळेपणाचं ठरेल. मुंबईच्या या अव्वल कलासंस्थेतलं शिक्षण पूर्ण करून तुषार १९८८ साली बडोदे इथल्या महाराजा सयाजीराव विद्यापीठात पदव्युत्तर शिक्षणासाठी गेला, तेव्हा समाजाकडे पाहणारे, समाजाचं प्रतिबिंब आपल्या चित्रांत यावं अशी आस धरणारे अनेक चित्र-शिल्पकार बडोद्यात कार्यरत होते. तोवर बडोद्याच्या या ‘नॅरेटिव्ह स्कूल’ला, बंगालच्या शांतिनिकेतनाचंही वारं लागलं होतं. त्यामुळे मुंबईतले ‘सामाजिक जाणीववाले’ १९८०-९० च्या दशकांत जो ताठा बाळगत, तो बडोद्यात नव्हता!  याचा आपसूक संस्कार तुषारवर झाला असेल का? ‘लकीरें’ या गॅलरीत १९९६ साली चित्रपटकलेची शताब्दी साजरी करणारं एक प्रदर्शन भरलं होतं, त्यात तुषारनं ‘व्हिलन’, ‘हीरो’, ‘नायिका’, ‘नायिकेचा बाप’ अशा त्याच-त्या व्यक्तिरेखांवर भाष्य करणारी छोटीछोटी चौकोनी भित्तिशिल्पं मांडली होती. भिंतीसरसं टांगता येणाऱ्या या टेराकोटा- मातीशिल्पांची घडण सांगत होती की, तुषारला के. जी. सुब्रमणियन महत्त्वाचे वाटतात!

भारतीय कलेला कालसुसंगत करू पाहणाऱ्या कोणालाही (मग ते कोणत्याही विचारसरणीचे असोत!) सुब्रमणियन ऊर्फ ‘मणिदा’ यांच्याकडे दुर्लक्ष करता येत नाही. त्यांचा तुषारवरला संस्कार बडोद्यानंतर आणखी दोन-तीन र्वष तरी थेटच दिसत राहिला असणार; पण त्या काळातली- अहमदाबादच्या ‘कनोडिया आर्ट सेंटर’मध्ये तुषार अभ्यासवृत्तीवर राहात होता तेव्हाची किंवा त्याला प्रतिष्ठेची ‘इन्लॅक्स स्कॉलरशिप’ मिळाली होती तेव्हाची- त्याची चित्रं/ शिल्पं आज माझ्यासकट कुणीच फारशी पाहिलेली नाहीत. पण पुढे कलेचा सूर स्वत:चा स्वत:ला गवसलाच पाहिजे, हेही तुषारनं ओळखलं. साधारण १९९३ मध्ये, मुंबईच्या ‘केमोल्ड आर्ट गॅलरी’त एका समूहप्रदर्शनात त्याला पहिली संधी मिळाली होती, त्यानंतरच्या पाच वर्षांत- म्हणजे १९९७ मध्ये तुषार पूर्णपणे ‘स्वतंत्र दृश्यकलावंत’ झाला होता. या प्रवासात बरंचसं एकटेपण आणि कौशिक मुखोपाध्यायसारख्या मित्राची, शर्मिला सामंत सारख्या मैत्रिणीची साथ होती. त्या एकटेपणातूनही ‘सर्वाबरोबर असणं’ काही सुटलं नाही. पुण्यात एक समूहप्रदर्शन भरवण्यात त्यानं पुढाकार घेतला होता म्हणतात, तो हाच- १९९२ ते ९७ दरम्यानचा काळ होता.

मानखुर्दला का वडाळय़ाला वर्कशॉपवजा स्टुडिओत काम करणाऱ्या तुषारनं, १९९२-९३ च्या दंगलीत तुटलेलं मुंडकं किंवा कापलेला मृतदेह पाहिल्याची आठवण तुषार-शर्मिलाकडून ऐकल्याचं अगदी ओझरतं आठवतंय. पण या दंगलीनंतर कंठाळी, पोस्टरवजा कामं तुषारनं केली नाहीत. मात्र त्या दंगलीनं तो हलून गेलाय, हेलावलाय, हे २००२ पासूनच्या त्याच्या संघटन-प्रयोगांतून स्पष्ट दिसू लागलं.

अ‍ॅमस्टरडॅमच्या ‘राइक्सअकॅडमी’ची स्कॉलरशिप १९९८ ते २००० या काळात तुषारला मिळाली. युरोप-वास्तव्यातल्या दोन वर्षांत तुषारनं भरपूर प्रयोग केले. स्वत:वरसुद्धा. शर्मिला सामंतही स्वत:च्या गुणवत्तेवर युरोपमध्ये पोहोचली होती. हे दाम्पत्य भारतात परतलं, ते आईबाबा होण्याच्या तयारीतच. पण २००० मध्ये तो भेटल्यावर ‘नवीन काय?’ हा घिसापिटा प्रश्न विचारताच, ‘अरे मी काम थांबवलंय’ हे धक्कादायक वाक्य त्यानं शांतपणे उच्चारलं, त्या काळात तो फक्त संघटनकार्य करायचा आणि मुलीला सांभाळायचा. ‘ओपन सर्कल’ ही संस्था उभारण्यात शर्मिला सामंत आणि शिल्पा गुप्ता यांच्यासह तोही होता. सात देशांमधल्या १३ तरुण कलावंतांचं एक शिबिर २००० साली चैतन्य सांब्राणी यांच्या  मार्गदर्शनाखाली त्यांनी भरवलं आणि या शिबिरात ‘विस्थापन आणि सांस्कृतिक बहुविधता’ यांची चर्चा झाली.. याच शिबिरानंतर अनंत जोशी हा मूळचा नागपूरचा प्रतिभाशाली चित्रकार विनासंकोच धारावीच्या बैठय़ा चाळीत राहू लागला, धारावीवर त्यानं चित्रंही केली, याला कुणी ‘सखोल वैचारिक परिणाम’ म्हणणार नसेल, तर ठीक आहे.

नर्मदा बचाओ आंदोलनाच्या मेधा पाटकर यांच्याशी तुषारचा संवाद होताच. त्यानं कला-विद्यार्थ्यांसह मंत्रालयासमोर ‘आम्ही प्लॉट आखतोय’ असा सृजनशील निदर्शनांचा प्रयोगही करून पाहिला होता. पोलिसांनी सृजनबिजन न पाहता अन्य मोर्चेकऱ्यांसारखी वागणूक दिली. पण ‘विस्थापन’ हा त्याच्या कामातला महत्त्वाचा आशय-धागा होता. गुजरात दंगलीचा ‘सुपरिणाम’ म्हणजे तुषार पुन्हा कलाकृती करू लागला. या कलाकृतींना आता मधल्या दोन वर्षांतल्या चिंतनाची धार आली. त्याच्या कामांमधून दिसू लागलं की, तो आता जास्तीत जास्त लोकांच्या भाषेत बोलायचा प्रयत्न करतो आहे. लोकांना आपल्या कलाकृती परक्या वाटणार नाहीत, असं पाहतो आहे. हे तर ‘मणिदां’च्याही कामात होतं. पण त्यांच्या कलाकृती विस्थापनाच्या किंवा संहार-काळाच्या प्रश्नांना थेट भिडत नव्हत्या, ते काम तुषारनं केलं. ‘जातक ट्रायॉलॉजी’ या २००४ सालच्या व्हीडिओ-कलाकृतीत त्यानं स्वत:च्या ‘कुलवृत्तान्ता’पासून ते नव्या पिढीच्या स्वप्नांपर्यंतचा वेध घेतला. मुंबईकर इतके सहनशील कसे, समूह आणि व्यक्ती यांचं नातं मुंबई कसं काय जोडते, यासारख्या प्रश्नांची स्वत:ला गवसलेली उत्तर जगाला सांगणारं जे प्रदर्शन त्यानं २००५ मध्ये ‘केमोल्ड गॅलरी’त भरवलं, त्यात लोकलगाडी ही महत्त्वाची प्रतिमा होती.  या ‘रोजमर्रा’ प्रतिमेला त्यानं जोड दिली होती फँटसीची.. म्हणजे त्यानं, ‘स्पायडरमॅन’सारखं गाडीच्या बाहेरच्या बाजूला चिकटून राहता येईल अशी साधनं बनवली होती! हे ‘खरं’ हँडल नसून कलाकृतीच आहे हे लोकांना कळण्याचा क्षण, हा ‘आर्ट अ‍ॅप्रिसिएशन’ किंवा ‘कलास्वादा’चा एकविसाव्या शतकातला महत्त्वाचा प्रकार होता आणि आहे. कसा ते पाहू, पण त्याआधी १९९७ सालीसुद्धा तुषारनं ‘यशवंतराव चव्हाण सेंटर’च्या तळघरात कौशिकसह जे प्रदर्शन केलं होतं, त्यात ‘अंगावर घालून पाहा आणि तुमचं नवं व्यक्तिमत्त्व आरशात न्याहाळा’ असा अनुभव देणारी रबरी शिल्पं त्यानं केली होती, याचीही नोंद घेऊ. या शिल्पांचं नातं त्याच्या ‘हीरो- व्हिलन- नायिका’ या ठोकताळय़ांवर नर्मविनोदी भाष्य करणाऱ्या माती-शिल्पांशी होतं, की पुढल्या- ‘एकविसाव्या शतकातल्या कलास्वाद पद्धतीं’शी? – असा प्रश्न ज्याचा त्यानं सोडवावा.

‘एकविसाव्या शतकातली कलास्वाद पद्धत’ असं ज्याला म्हणतोय, ती कळायची असेल तर मुंबईच्या ‘काला घोडा कला उत्सवा’त सेल्फी काढणारे तरुण पाहावेत! आस्वाद आणि भोग यांमधलं अंतर मिटवणारं- म्हणूनच ‘मॉलमध्ये विरंगुळा’ शोधणारं- हे जागतिकीकरणोत्तर शतक आहे, त्याचा परिणाम ‘भारतीय’ कलेवर देखील होणारच. व्हायलाही हवा. पण कसा? तर भोगापासून पुन्हा आस्वादाकडे खेचून आणणारा! हे काम तुषारच्या कलाकृती २००५ ते २०१८ या काळात नित्यनेमानं, अथकपणे आणि नवनव्या प्रकारे करत होत्या.  ‘व्हीडिओगेम’ मधलं वातावरण, ‘सुपरहीरों’सारखी पात्रं हे सारं जणू काही तुम्हालासुद्धा पॉवरफुल बनवणारं असतं, पण या आभासी सत्तेत जीव रमू नये, याचं भान तुषारच्या कलाकृती- अगदी, ज्यांची चर्चा फारशी कधी झालीच नाही अशी त्याची साधीसुधी मोठय़ा आकारातली चित्रंसुद्धा- वारंवार देत.

साधारण २००५ पासूनच, ‘युनिसेल- पीडब्ल्यूसी’ (‘पब्लिक वर्क्‍स सेल’ची आद्याक्षरं) अशी आभासी संस्था स्थापून ‘लोकांचं जीवन आम्ही सुकर बनवतोय’ असा प्रचारकी पवित्रा तुषारनं घेतला होता. ‘प्रचार हे जर प्रतिपक्षाचं हत्यार असेल तर त्याची बोथट धार आपण दाखवून द्यायला हवी’ अशा बांधिलकीनं जणू तो हे करत होता. ‘प्रतिपक्ष’ कोण? तर विकासासाठी विस्थापन आवश्यकच आहे असं मानभावीपणे मानणारे (पण स्वत:चं विस्थापन मात्र अजिबात होऊ नये अशी लबाडी करणारे) सारेजण. उदाहरणार्थ, ‘मुंबईत कालव्यांमधून वाहतूक सुरू करण्याच्या प्रकल्पासाठी तुमचं घर रिकामं करावं लागेल’ असा नोटिसवजा मजकूर त्यानं ‘युनिसेल’तर्फे पोस्टकार्डावर अनेक मुंबईकरांना पाठवला. त्यावर जे वैतागले, त्यांच्याशी विस्थापनाबद्दल संवाद साधला. हे ‘भोगापासून आस्वादाकडे’पेक्षा निराळं- ‘बनचुकेपणापासून संवादाकडे’ जाणारं  कला-प्रतिरूप होतं.

त्यानं काही ‘आयकॉनिक’ किंवा प्रतिमाप्रधान म्हणता येतील अशीही शिल्पं केली. पण त्यातल्या प्रतिमांचा संबंध लोकांच्या सामूहिक स्मृतीशी तसंच त्या स्मृतीबरोबर अपरिहार्यपणे येणाऱ्या भावनांशी होता. उदाहरणार्थ, मुंबईच्या ‘फ्लोरा फाउंटन’ या ब्रिटिश कारंज्याचं शिल्प हलक्या वजनात घडवून मुंबईच्या गल्ली-चौकांमध्ये नेलं आणि ठेवलं. लोक कुतूहलानं जमत, त्यावर तुषार त्यांच्याशी बोलणं सुरू करी. शहर सुंदर करण्याच्या बदलत्या कल्पनांची चर्चाही आपसूक सुरू होई. सद्दाम हुसेनचा पडका पुतळा ही प्रतिमा त्याच्या एका प्रदर्शनात होती, तर तालिबान्यांनी उद्ध्वस्त केलेल्या बामियान बुद्ध-प्रतिमांची भगदाडं त्याच्या शिल्पांत आणि चित्रांत अनेकदा येत होती. या साऱ्या प्रतिमा स्मृतीमध्ये असतातच, पण विवेक जागा होण्यासाठी वा जागा राहण्यासाठी या प्रतिमा दिसणं महत्त्वाचं आहे, असं तुषारला वाटत असावं.

कॉमिक बुक्स किंवा ‘ग्राफिक नॉव्हेल’ च्या पद्धतीची, पण मोठय़ा आकाराची त्याची चित्रं हा आणखी एक प्रकार. त्यात तुषारच्या ‘युनिसेल’चा एक सुपरहीरो नेहमी दिसायचा. हा सुपरहीरो अर्थातच सामान्यांच्या, गरीबांच्या बाजूचा. पण सामान्यजनांवर येणारी संकटं कोणती, हेही या चित्रमालिकांमधून दिसायचं. ही दररोजचीच संकटं. रस्त्यावर भाजी विकणाऱ्या  महिलेनं मांडलेली भाजी, पालिकेची गाडी येऊन विस्कटून टाकते- किंवा मोठमोठे रेडिमिक्स काँक्रीट रोलर येऊन क्राँक्रीट-जंगल आणखीच फोफावण्याची द्वाही फिरवतात, वगैरे. पण ही संकटं चितारताना तुषार चित्रगत अतिशयोक्तीचा आधार घ्यायचा. ही अतिशयोक्तीची रीत, कॉमिक्समधल्या कल्पित गोष्टी ‘साकार’ करणाऱ्यांनी आधीच दाखवलेली आहे- तिचा निराळय़ा हेतूसाठी वापर तुषार करायचा. प्रादेशिकतेशी, शहराच्या सुखदु:खांशी काही संबंधच न उरलेल्या तरुण पिढीला आवडणाऱ्या चित्रभाषेतली ही चित्रं, समस्यांशी तुमचाही संबंध आहे हे सत्य तरुणांच्या गळी उतरवणारी होती. त्याहीपुढला प्रकार म्हणजे व्हीडिओ गेम किंवा मोबाइलवर, गेमिंग कन्सोलवर खेळण्याचे गेम. अशा आभासी खेळांची दृश्यभाषा तुषारनं ‘समाजचित्र’ ठरणाऱ्या कलाकृतींमध्ये वापरली. म्हणजे त्यानं त्यासाठी गेमच तयार केले आणि मुख्य म्हणजे हे गेम मोठय़ा आकारात, सार्वजनिक जागी, सर्व लोकांना खेळण्यासाठी खुले ठेवले! यापैकी वाहतुकीत अडकलेल्या पुणे शहराविषयीचा गेम अनेकांनी अनुभवला असेल.

या सर्व कलाकृतींपेक्षा निराळं- परफॉर्मन्स आर्ट मधलं- कार्य तुषारनं केलं. त्यापैकी एका ‘परफॉर्मन्स’ कृतींची नोंद तर कलेच्या जागतिक इतिहासात व्हायला हवी. ही कृती होती- मुंबई ते शांघाय असा मोटरसायकल प्रवास! तोही ‘नर्मदेवरलं धरण आणि चीनमधलं थ्री गॉर्जेस धरण यांच्यामुळे झालेल्या, आणि अधल्या-मधल्या साऱ्या विस्थापनांकडे लक्ष वेधण्यासाठी’. या प्रवासात अनेक माणसं तुषारला भेटली. आदिवासी, तिबेटी, चिनी.. आणि अन्य वर्णनांनी ओळखली जाणारी, पण सगळी माणसंच. त्यांच्याशी समपातळीवर झालेला संवाद आणि प्रवासात आलेले कसोटीचे क्षण, हे सारं तुषार ‘रायडिंग रोसिनान्ते’ या ब्लॉगवर शब्द आणि फोटोंमधून नोंदवत होता. चीनमध्ये त्याच्यावर र्निबध आले, ब्लॉग थांबवण्यात आला. पण परतल्यानंतर तुषारनं तो पूर्ण केला. चीनच्या शांघाय शहरात २०१० साली होणाऱ्या एका आंतरराष्ट्रीय प्रदर्शनातली ‘कलाकृती’ म्हणून हा प्रवास तुषारनं केला. त्यासाठी त्यानं वापरलेली साइडकारवाली मोटरसायकल, शांघायला प्रदर्शनस्थळी जाऊन त्यानं खिळखिळी केली. तिचे सुटे भाग कल्पकपणे जोडून मांडणशिल्प तयार केलं. दुसरी महत्त्वाची परफॉर्मन्स- कृती २०११ साली मुंबईच्या ‘क्लार्क हाउस’ मध्ये ‘राइट टु डिसेंट’ या प्रदर्शनात त्यानं केली होती. डॉ. बिनायक सेन यांना महिनोन् महिने डांबूनही, डॉ. सेन यांनी नक्षलवादय़ांना मदत केल्याचा आरोप सिद्धच होऊ शकत नसल्यानं ते जामिनावर सुटले, तेव्हा त्यांच्या छळाकडे लक्ष वेधणाऱ्या या प्रदर्शनात आजच्या आघाडीच्या चित्रकारांचाही समावेश होता. पण तुषार, प्रदर्शनाचे आठही दिवस प्रदर्शनस्थळीच (एका प्रसाधनगृहाला जोडून) दोऱ्यांनी तयार केलेल्या कोठडीत बसला, झोपला. जेवणाचं ताट कोठडीखालच्या फटीतून यायचं. दिवसभर, किंवा जागेपणी सर्वकाळ तुषार वहीत काहीतरी लिहीत असायचा. एकच वाक्य लिहून वह्यच्या वह्य भरल्या त्यानं. ते वाक्य होतं : भारतीय न्यायव्यवस्था आणि लोकशाही यांच्यावरला विश्वास मी गमावणार नाही!

‘वर्ल्ड सोशल फोरम’ साठी तुषारनं संघटनकार्य केलं, त्यातून मुंबईच्या दोन लोकलगाडय़ांच्या सर्व डब्यांवर बाहेरच्या बाजूनं चित्रकारांची चित्रं असावीत, ही कल्पना प्रत्यक्षात आली. गोरेगावात २००४ साली झालेल्या या स्वयंसेवी संस्थांच्या जागतिक मेळय़ात भरलेलं मोठ्ठं कलाप्रदर्शन तुषारनं नियोजित केलं. मग पोतरे अलेग्रे शहरात किंवा दक्षिण आफ्रिकेत पुढल्या काही वर्षांत झालेल्या ‘वर्ल्ड सोशल फोरम’नं त्याच्यावरच या संघटनकार्याची जबाबदारी दिली. पण हे त्याचं कौतुक नव्हे. पुण्यात असो की पोतरे अलेग्रेत, मुंबईत असो की जोहान्सबर्गमध्ये, तुषार माणसं जोडत होताच. ‘समविचारी कलावंत’ अशी वेगळी श्रेणी मानून तेवढय़ाच गोतावळय़ात न रमता, समोरचा माणूस आणि आपण कशाकशाबद्दल ‘समविचारी’ आहोत, हे ओळखून तुषार लोकांना कामाला लावे. कामं होतानाच, समोरच्यालाही आपण काहीतरी ‘दिलंय’, ‘गमावलंय’ अशी खंत वाटत नसे.

ही सकारात्मक सामाजिकता जपणारा तुषार, एकापाठोपाठ झालेल्या तीन-चार खुनांनी हलून गेला होता. त्यातूनच, २०१७ च्या अखेरीस मुंबईत भरलेल्या ज्या प्रचंड मोठय़ा प्रदर्शनात (७० कलावंत) तुषारचा सहभाग होता, तिथली उद्घाटन-पार्टी ऐन रंगात आलेली असताना त्यानं प्रस्ताव प्रदर्शन-नियोजकांकडे प्रस्ताव  मांडला : ‘आपण सारेजण आत्ता, इथं, गौरी लंकेशच्या हत्येचा प्रतिकात्मक निषेध करू या’. हा प्रस्ताव नाकारला जाताना तुषार काहीसा दुखावून, काहीसा सात्विक संतापानं चर्चा सुरू ठेवत होता, आशेनं. ‘तुझी कलाकृती म्हणून तू जर आधीच प्रस्ताव दिला असतास, तर चाललं असतं. पण आता अशी ऐनवेळची कृती-कला इथं नको’ अशा उत्तरामुळे आशा विझली. तुषारनं झटक्यात निर्णय घेतला की, ‘ठरलेली’ आणि मांडलेली आपली कलाकृतीसुद्धा या प्रदर्शनातून हटवायची. ती भिंत पुढे रिकामीच राहिली!

हा वाद झाला तेव्हा मी समोर नव्हतो. पण त्यापूर्वी त्याच संध्याकाळी ती कलाकृती पाहिली होती. त्याहीपेक्षा, ‘रिकामी भिंत’ हीच तुषारची खरी कलाकृती आहे, असं या प्रदर्शनाला पुन्हा गेलो तेव्हा वाटलं होतं. ती खूणगाठ आजही कायम आहे. पण आता तुषारची भिंत रिकामीच राहणार, याची खंतही आहे.

तुषारनं गेल्या पाच वर्षांत ‘शिव नाडर युनिव्हर्सिटी’तला सहयोगी प्राध्यापक म्हणून आणि त्याआधीही, अनेक होतकरू – विचारी आणि ‘शार्प’ मुलामुलींना चित्रकलेच्या उच्चशिक्षणासाठी आर्थिक मदत केली होती किंवा मिळवून दिली होती. हे त्याचं काम मात्र, त्याच्या नावानं पुढेही चालत राहिलं पाहिजे, असं वारंवार वाटत राहील.

abhijit.tamhane@expressindian.com

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Tushar joges empty wall

ताज्या बातम्या