परतीच्या पावसातले धुरंधर..

धुरंधर व त्यांच्या दिवंगत कन्येची पुस्तकं आता उपलब्ध आहेत. इतिहास समृद्ध करणाऱ्या या घडामोडी आहेत.

रावबहादुर धुरंधरांच्या चित्रांची मुंबईतली प्रदर्शनं,

अभिजीत ताम्हणे

रावबहादुर धुरंधरांच्या चित्रांची मुंबईतली दोन प्रदर्शनं, त्यांच्या आणि त्या काळच्या चित्रकलेची चर्चा पुन्हा सुरू करण्यासाठी प्रेरक आहेत..

उद्योगपितामह जमशेटजी टाटा यांनी १८९२ साली चित्रकारांसाठी एक बक्षीस प्रायोजित केलं. त्यावेळी ब्रिटिश व काही भारतीय चित्रकारांची एकमेव प्रतिष्ठित संस्था असलेल्या ‘बॉम्बे आर्ट सोसायटी’च्या प्रदर्शनातल्या उल्लेखनीय चित्राला हे टाटांनी प्रायोजित केलेलं ५० रुपयांचं बक्षीस दिलं जाणार होतं. या बक्षिसाच्या पहिल्या वर्षीचे विजेते होते महादेव विश्वनाथ धुरंधर आणि त्यावेळी धुरंधरांचं वय होतं २५ वर्षांचं! धुरंधर एकंदर ७७ वर्ष जगले; म्हणजे किमान ५० वर्ष ते चित्रं काढत राहिले! ‘धुरंधरांनी पाच हजार रंगचित्रं आणि ५० हजार बोधचित्रं (इलस्ट्रेशन्स) केली’ असं सांगितलं जातं. हल्लीचे कलाबाजारवाले आपली धन करण्यासाठी चित्रांचा आकडा फुगवून सांगतही असतील.. म्हणजे मग ‘हेही धुरंधरांचंच’ म्हणून एखादं अन्य चित्रकाराचं चित्रही खपवता येत असेल.. ही शक्यता समजा खरी मानली; तरीसुद्धा धुरंधरांनी पुष्कळ काम केलं होतं, हे खरंच. स्वत:ची ८७ स्केचबुकं आधी धुरंधरांनी आणि पुढे त्यांच्या कन्या, चित्रकर्ती अंबिका धुरंधर यांनी जपली होती. कामाचा इतका अफाट पसारा असल्यानं धुरंधरांच्या निवडक चित्रांचं कोणतंही प्रदर्शन प्रेक्षणीय असणारच, हे नक्की होतं. पण धुरंधरांच्या कामाचा विस्तारानं आढावा घेणारं प्रदर्शन प्रत्यक्ष होण्यासाठी त्यांच्या मृत्यूनंतर ७४ वर्ष जावी लागली! अखेर असं एक प्रदर्शन मुंबईत भरलंय. त्यामुळे ते पाहून प्रत्येक जण ‘छान’, ‘पाहून खूप बरं वाटलं’, ‘दीड तास पाहिलं प्रदर्शन’ अशा प्रतिक्रिया देणारच, यात नवल नाही.

इतक्या वर्षांनी धुरंधर यांची एवढी चित्रं एकत्रितपणे पाहायला मिळताहेत. सांगली, औंध, कोल्हापूर आदी संग्रहालयांत, ‘दिल्ली आर्ट गॅलरी’च्या वातानुकूल गोदामांत आणि ‘स्वराज आर्ट आर्काइव्ह’ या खासगी संग्रहात असणारी बहुतेक चित्रं मुंबईत पहिल्यांदाच दिसत आहेत. प्रदर्शन जिथं भरलंय, ती मुंबईच्या मुख्य चौकातली ( सीएसटी आणि चर्चगेट, दोन्हीकडून जाता येईल असा रीगल सिनेमाचा चौक) ‘नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट’ (एनजीएमए) ही पाच मजली गॅलरी हे केंद्र सरकारनं मुंबईत उघडलेलं महत्त्वाचं कलादालन आहे. या प्रदर्शनात फक्त चित्रंच नव्हे तर धुरंधरांची स्केचबुकं, चित्रकार म्हणून त्यांनी मिळवलेली मेडल्स आणि त्यांच्या स्टुडिओतल्या वस्तूसुद्धा पाहायला मिळतात.. हे सगळं प्रेक्षकांचा आनंद वाढवणारंच आहे!

म्हणजे धुरंधरांचं प्रदर्शन चांगलं आहे. ते चित्रकलेचं वावडं नसणाऱ्या आणि महाराष्ट्रीय माणसांच्या कर्तृत्वाबद्दल अभिमानी किंवा ‘सकारात्मक’ असणाऱ्या कुणालाही आनंदच देईल असं आहे. धुरंधरांकडे केवळ चित्रकार म्हणूनच नव्हे, तर एक कर्तृत्ववान महाराष्ट्रीय व्यक्ती म्हणूनही पाहता येतं, हे त्यांची कारकीर्द जरी ओझरती पाहिली तरी समजेल. सन १९३० मध्ये ‘जे. जे. स्कूल ऑफ आर्ट’ या संस्थेतलं ‘संचालक’ हे प्रमुखपद धुरंधरांकडे आलं. हे पद यथास्थित सांभाळून आणि इंग्रज सरकारकडून मिळालेल्या ‘रावबहादुर’ (१९२६) या पदवीची शान राखून जानेवारी १९३१ मध्ये ते निवृत्त झाले, पण पुढली कैक वर्ष चित्रकलेच्या क्षेत्रात कार्यरत राहिले. अशा माणसाची चित्रं, त्याच्या जन्माला १५० वर्ष उलटून गेल्यानंतर- १५१ व्या वर्षी पाहायला मिळतात- पाहणाऱ्याला हे प्रदर्शन आनंदही देतं, हे काय कमी आहे?

मग आता यापुढे काही कशाला लिहायला हवं? कलेचा अभ्यास करणारे लोक बसतील धुरंधरांच्या चित्रांबद्दल ‘अधिकचा काथ्याकूट’ करत.. ती चर्चा बाकीच्यांनी कशाला ऐकायची/ वाचायची? याचं उत्तर आहे – ‘धुरंधरांकडे एक वेळ चित्रकार म्हणून नाही पाहिलं तरी चालेल. पण ब्रिटिशकालीन किंवा वसाहतकालीन भारतीय चित्रकलेच्या क्षेत्रातले ते एक प्रतिष्ठित महाराष्ट्रीय होते’ म्हणून तरी त्यांच्याबद्दलची अधिक चर्चा झालीच पाहिजे. ही चर्चा धुरंधरांचा आदर राखणारी असेल वा नसेलही; कारण अखेर चर्चेचा हेतू हा आत्ताच्या महाराष्ट्रीय कर्तृत्वापर्यंत भिडणारा असेल. या प्रदर्शनानं तशी संधी उपलब्ध करून दिली आहे.

दीनानाथ दलालांनी ब. मो. पुरंदरे यांच्या ‘राजा शिवछत्रपती’ या पुस्तकासाठी केलेली शिवाजी महाराजांच्या जीवन-प्रसंगांची चित्रं बऱ्याच जणांना माहीत असतात. पुरंदरे यांचे वैचारिक विरोधकसुद्धा दलालांच्या या चित्रांबद्दल आक्षेप घेत नाहीत. पण दलालांच्या आधी शिवाजी महाराजांच्या जीवनातले प्रसंग धुरंधरांनी रेखाटले-रंगवले होते. प्रदर्शनाच्या तळमजल्यावरच एका खास भिंतीवर मांडलेली ही चित्रं प्रामुख्यानं औंध आणि सांगली संस्थानांकडे होती आणि पुढे सरकारनं या संस्थानांतल्या कलाकृती / कलावस्तूंची जी संग्रहालयं केली त्यांत ती आज आहेत. या चित्रांकडे पाहताना काही गमतीजमतीही जाणवतील. उदाहरणार्थ, आदल्याच भिंतीवर सांगलीच्या संग्रहालयातलं जे ‘महाराष्ट्रीय लग्न’ हे चित्र आहे; त्यातल्या (विसावं शतक आल्यानंतरच्या) स्त्रियांचं नऊवारी नेसणं, त्यांच्या पातळांचे पोत आणि शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक-चित्रात अगदी मागच्या रांगांमध्ये उभ्या असलेल्या स्त्रियांची पातळं या दोन्हीत फारच साम्य आहे! किंवा ‘राज्याभिषेकापूर्वीची शिवाजी महाराजांची मिरवणूक’ या चित्रात महाराजांच्या मागे एक टोलेजंग महाल दिसतो.. राजस्थानी धाटणीचा!  कुठून आला तो? – कदाचित गुजरात-राजस्थानातली छोटा उदेपूरसारखी संस्थांनंही धुरंधरांनी पाहिली होती, तिथून आला असेल.

ऐतिहासिक चित्रांमधल्या तपशिलांविषयीच्या या प्रश्नांना ‘आर्टिस्टिक लिबर्टी’- म्हणजे ‘कलावंताचं स्वातंत्र्य’ असं उत्तर देता येईल. पण मग कलावंताचं हे स्वातंत्र्य धुरंधरांनी अन्यत्र कुठे घेतलं का? याच प्रदर्शनात पहिल्या मजल्यावर ‘औंधचा दसरा’ (चित्र ३) असं एक चित्र आहे. पंतप्रतिनिधी आणि त्यांच्या राज्यातील काही अधिकारी यांच्या हुबेहूब प्रतिमा- अगदी व्यक्तिचित्रंच- या मोठय़ा समूहचित्रात आहेत. दसऱ्याची मिरवणूक औंधात जशी निघायची तसंच्या तसंच हे चित्र आहे. मग शिवरायांच्या चित्रांमध्येच कसं काय ‘कलावंताचं स्वातंत्र्य’? याला उत्तरं दोन. पहिलं म्हणजे, औंध दसरा आणि शिवराज्याभिषेक ही दोन्ही इतिहास-प्रसंगांची चित्रं (इंग्रजीत ‘हिस्टरी पेंटिंग’) असली, तरी शिवकालीन आणि ‘कुणीच प्रत्यक्ष न पाहिलेले’ इतिहास-प्रसंग चितारताना किंचितसं स्वातंत्र्य – तेही बिनमहत्त्वाच्या तपशिलांपुरतं- घेणं ठीक आहे असं धुरंधरांना वाटत असावं. धुरंधरांकडून ही शिव-चित्रं करवून घेणारे त्यावेळचे यजमानदेखील तेवढी मुभा देत असावेत. आणि दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे, धुरंधरांना असलेली सुशोभनाची किंवा ‘एम्बेलिशमेंट’ची आवड अन्य काही चित्रांमधूनही दिसते. तेव्हा ‘कलावंताचं स्वातंत्र्य’ म्हणून त्यांनी हेच करणं- म्हणजे लुगडी छान छान आणि विविध पोतांची, महाल पांढरेशुभ्र आणि टोलेजंग वगैरे दाखवणं- साहजिक आहे.

‘म्हणे सुशोभनाची आवड.. जरा दुसऱ्या मजल्यावरची स्त्रियांची स्केचेस नीट पाहा.. स्त्रीसुलभ लगबग किती आत्मीयतेनं आणि सहजलालित्यानं जिवंत केलीय धुरंधरांनी!’ हा प्रति-मुद्दा अनेक जण मांडू शकतात आणि तो ग्राह्य़च आहे. पण त्यालाही उत्तर आहे. धुरंधरांनी स्केचेस आणि रंगचित्रं – त्यातही, विशेषत: ‘क्लायंट’ किंवा ‘यजमानां’साठी केलेली चित्रं यांत बऱ्याचदा फरक राखला. अगदी कमी वेळा, स्केचमध्ये तपशील भरायचा आहे म्हणून म्हणा किंवा काही अन्य कारणांनी असेल, पण स्वत:कडेच राहणार असलेल्या चित्रांमध्येही त्यांनी जे रंगकाम केलं त्यात साडीचे काठ / पदर, गालिचावरची नक्षी, फर्निचर आदी तपशिलांतून सुशोभनाची प्रेरणा दिसते. ही प्रेरणा धुरंधरांनी जी थेट ‘कमर्शिअल’ कामं केली, त्या उपयोजित चित्रांत तर व्यावसायिक गरज म्हणूनही सुशोभन आहे. हे त्या काळातल्या कलामूल्यांना, कलाव्यवहाराला साजेसंच आहे.

पण मग, स्त्रियांची छोटी चित्रं आणि स्केचेस यांनी भरून गेलेल्या दुसऱ्या मजल्यावरची ती ‘कटकट करणारी कमूताई’.. झिपरी लहानगी मुलगी; तिचं धुरंधरांनी केलेलं रेखाचित्र हे रेखाटनकाराच्या निर्णयमालिकेचा वेग आणि हाताचा जोरकसपणा यांतल्या उत्तम समन्वयाचं उदाहरण आहे. या दुसऱ्या मजल्याला ‘द फीमेल म्यूस’ असं नाव आहे. धुरंधरांच्या स्टुडिओतल्या काही वस्तू मांडलेली खोलीसुद्धा याच मजल्यावर आहे. यापैकी बऱ्याच वस्तू कोल्हापूरच्या ‘दळवीज् आर्ट इन्स्टिटय़ूट’च्या संग्रहात होत्या. ‘आमच्याकडे पॅलेटही आहे धुरंधरांची, पण ती मुंबईच्या प्रदर्शनात नाही,’ असं कोल्हापुरातल्या या संस्थेची धुरा सांभाळणारे अजय दळवी यांनी सांगितलं. ही मोठी रंगधानी किंवा पॅलेट स्टुडिओच्या खोलीत जे बरेच फोटो आहेत, त्यांपैकी एका फोटोत दाराच्या कडीला लटकावलेली दिसते. असो. मुद्दा स्त्रीचित्रांत दिसणाऱ्या वैविध्याचा होता. इथेही, स्वत:साठी केलेल्या रेखाटनांमध्ये मोजक्या रेषा, त्या रेखाटनातला वेग आणि वैचित्र्य वा वैशिष्टय़ंच चटकन टिपून घेण्याची वृत्ती दिसते; मात्र जलरंगांत केलेल्या स्त्रीचित्रांमध्ये तोलूनमापून तपशील आणि बारकावे दिसून येतात. रेखाटनातला वेग म्हणजे रेखाटन करण्याच्या क्रियेतला वेग. तो रेषांतून दिसतोच. पण काही रेखाटनांमध्ये चित्रविषयाची गरज म्हणून स्त्रीच्या आकृतीचा कमीअधिक वेग प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्या-त्या प्रकारच्या रेषांची योजना धुरंधरांनी केली आहे. उदाहरणार्थ, धुरंधरांनी पाठारे प्रभू घरांतल्या जेवणावळीची एकसारख्याच (जलद) वेगात केलेली रेखाटनं इथं पाहता येतात. त्यापैकी ‘तळलेल्या ओवश्या’ या रेखाटनात चुलीशी उकिडवी बसलेली स्त्री आहे. तिच्या बैठकीत स्थैर्य असलं, तरी हात जलद हलणारे आहेत. त्या शेजारच्या ‘सांबारं’ या चित्रातली भरलेलं पातेलं घेऊन चालणारी स्त्री सांभाळूनच चालणार आहे आणि ‘अहो घ्या ना एक..’ या चित्रातली लाडू वाढणारी स्त्री तिच्यापेक्षा वेगवान आहे. स्त्रीच्या आकृतीतून तिच्या हालचालींचा वेग प्रेक्षकाला कळावा यासाठी स्त्रियांच्या साडी-निऱ्यांच्या रेषांचा वापर करण्याची खुबी धुरंधर अनेकदा वापरतात. या दृष्टीनं, साडी नेसून बॅडमिंटन खेळणाऱ्या स्त्रीचं रेखाटन आणि अर्धवट रंगवलेलं ‘रहाट ओढणाऱ्या स्त्रिया’ हे रेखाटन पाहण्यासारखं आहे (गदग इथे १९२३ साली केलेलं हे रेखाटन ‘माझी स्मरणचित्रे’ या अंबिका महादेव धुरंधर लिखित पुस्तकाच्या मुखपृष्ठावरही आहे). ‘डू यू कम लक्ष्मी?’ हे गणपतीसोबतच्या गौरी आणतानाचं चित्र धुरंधरांना ‘बॉम्बे आर्ट सोसायटी’चं १८९५ सालचं सुवर्णपदक मिळवून देणारं ठरलं होतं.

धुरंधरांनी ‘बॉम्बे आर्ट सोसायटी’ची मिळवलेली बक्षिसं हा एक स्वतंत्र विषयच आहे. या संस्थेचा ब्रिटिशकालीन तोरा कायम असताना जे हिंदी चित्रकार यशवंत ठरले, त्यांत धुरंधर होते. त्यांच्या त्या ‘स्टुडिओ’मध्ये एक फ्रेम त्यांना या संस्थेकडून मिळालेल्या सर्व प्रमाणपत्रांची आहे. सन १८९२, ९३, ९४, ९५, ९६, ९८ आणि विसाव्या शतकात १९०१, १९०३, १९०४, १९१२, १५, १६, १७ तसंच १९२२ साली त्यांना कोणती ना कोणती बक्षिसं मिळाली होती. त्यांना त्या काळात वेळोवेळी मिळालेली ही दाद का मिळू शकली होती, याची कारणं इथं प्रदर्शनात समजतात. धुरंधरांची स्केचेस सर्वाना आवडतील, जलरंगावरचं धुरंधरांचं प्रभुत्व सर्वमान्य होईल, मोठय़ा आकाराच्या आणि विषय मांडणाऱ्या रंगचित्रांमधला विषय आणि मांडणी दोन्ही आवडेल. मात्र आजच्या काळाचा चष्मा लावला रे लावला, की मग ‘धुरंधरांच्या चित्रांमधल्या आकृती निदरेष असतील, काटेकोरही असतील, पण अनेक चित्रं कृत्रिम वाटतात. त्यातही जलरंगावरलं प्रभुत्व अधिक आणि तैलचित्रांमध्ये गती कमी असलेले धुरंधर त्या काळी तरी इतके गुणवंत कसे काय ठरले?’ असा उद्धट प्रश्न पडलाच म्हणून समजा! त्या प्रश्नाचं एक उत्तर लालित्याऐवजी यथातथ्यतेला महत्त्व देणाऱ्या त्या काळच्या कलाशिक्षणात आहे. जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्स नावाच्या ‘कलामंदिरा’त धुरंधर ४१ वर्षे रमले होते याचा इथं विचार करावाच लागेल. दुसरं असं की, त्यांच्या चित्रांचे विषय अनेकदा ‘यजमानां’नीच दिलेले असल्याचा उल्लेख ‘कलामंदिरातील एकेचाळीस वर्षे’ या पुस्तकात येतो. पण मग धुरंधरांच्याच आगेमागे शिकलेले पेस्तनजी बोमनजी, ए. एक्स. त्रिन्दाद यांच्या चित्रांत लालित्य दिसतं, ‘जे. जे.’च्या कलाशिक्षणातला काटेकोरपणा मान्य करणारे ल. ना. तासकर यांचीही चित्रं धुरंधरांपेक्षा एकजीव भासतात (या चित्रकारांची चित्रं नमुन्यादाखल या प्रदर्शनातही ठेवलेली आहेत), असं का व्हावं? यातून निघणारं तिसरंच उत्तर म्हणजे- धुरंधरांची जी मोठी रंगचित्रं इथं आहेत ती त्यांची उत्कृष्ट कामं नसावीत. उदाहणार्थ, पालनपूर, बडोदे या संस्थानांसाठी केलेल्या कामांचा उल्लेख धुरंधर आणि अंबिका (अंबूताई) धुरंधर यांच्या पुस्तकांमध्ये येतो, ती इथं नाहीत.

प्रदर्शनाचे नियोजक आणि प्रदर्शन जिथं भरलंय त्या ‘एनजीएमए’च्या मुंबई शाखेच्या सल्लागार समितीचे प्रमुख, चित्रकार सुहास बहुळकर यांनी प्रदर्शनापूर्वी बोलताना धुरंधरांबाबत एक निराळाच मुद्दा मांडला होता – ‘एक चांगला कमर्शिअल आर्टिस्ट म्हणून तरी धुरंधरांकडे पाहा!’ असं ते म्हणाले होते. ‘धुरंधर हे पहिले महाराष्ट्रीय उपयोजित चित्रकार’ असा उल्लेख भारतीय कलेचे ज्येष्ठ अभ्यासक पार्थ मित्तर यांनीही (‘आर्ट अ‍ॅण्ड नॅशनालिझम इन कलोनिअल इंडिया’ या पुस्तकात) केला आहे. ड्रॉइंग आणि पेंटिंगचं- रेखाचित्र आणि रंगचित्रांचं-  छपाईसुलभ रूप शोधण्याचं काम राजा रविवर्मा यांच्यानंतर धुरंधरांनीही केलं. महाभारतातल्या एकाच प्रसंगाची, जवळपास सारख्याच आकाराची दोन चित्रं प्रदर्शनात आहेत. त्यांतून कोणतं चित्र छपाईसाठी केलेलं, हे कळेल. पंढरपूर वारीचं रेल्वेसाठी केलेलं पोस्टर (चित्र २) आणि त्याआधी केलेलं रंगचित्र यांतलाही फरक कळेल. ‘मनोरंजन’ आदी मासिकांची मुखपृष्ठंच नव्हे, तर काडेपेटय़ा किंवा कपडय़ांच्या लेबलांचीही ‘डिझाइन्स’ धुरंधरांनी कशी केली, ते या प्रदर्शनात दिसेल. या अशा कामाचा खास उल्लेख धुरंधरांच्या ‘एकेचाळीस वर्षे’मध्ये नाही, पण म्यूरल (भिंतीवरची कायमस्वरूपी चित्रं) आदी व्यावसायिक कामांच्या पैशांबाबत ते कसे सजग असत, याचे दाखले पुस्तकात अनेक आहेत.

व्यावसायिकतेच्या पलीकडचा सहृदयपणाही धुरंधरांमध्ये होता. तो त्यांच्या पुस्तकात जसा दिसतो, तसाच प्रदर्शनातल्या ‘शेठ पुरुषोत्तम मावजी यांची वैष्णौदेवी सफर’ (चित्र १) यांसारख्या चित्रमालिकेतही दिसतो. मावजी हे धुरंधरांच्या पहिल्या आश्रयदात्यांपैकी. त्यांच्यासह अनेक सहलींत धुरंधर कुटुंबीय असत आणि फोटोऐवजी सहलीची चित्रे काढून घेतली जात. किंवा दिल्लीच्या व्हाइसरॉय हाउसमधल्या (आताचं राष्ट्रपती भवन) भारतीय न्यायविषयक म्यूरलसाठी जगन्नाथराव धुरंधर या अन्य यजमानांकडून धुरंधरांनी विषय समजावून घेतला आणि उत्तम रचनाचित्रे केली. त्या चित्रांच्या प्रतिमाही प्रदर्शनात आहेत. ‘टांग्याच्या धडकेने झालेला अपघात’ आदी चित्रं बहुधा छपाईसाठी असावीत, पण त्यांतूनही विषयमांडणीतली आणि भावदर्शनाची हातोटी दिसून येते. वरच्या गोल दालनात छापील चित्रंही आहेत, पण त्याहून जास्त रेखाटनं आहेत. ही रेखाटनंच प्रदर्शनातून अधिक लक्षात राहतात.

धुरंधरांच्या ‘शैली’ची पाच अंगोपांगं हे प्रदर्शन आपल्याला दाखवतं. पण ती शैली नेमकी कशी? हे जाणून घ्यायचं असेल, तर अंबिका धुरंधर लिखित ‘माझी स्मरणचित्रे’ला, संपादक म्हणून दीपक घारे यांनी लिहिलेल्या प्रस्तावनेपर्यंत जायला हवं. ‘‘पिक्चरस्क’ ही अठराव्या शतकातील साहित्य व दृश्यकलेतील एक महत्त्वाची चळवळ होती.. दृश्यकलेत ती मुख्यत: निसर्गचित्रे आणि जनजीवनाचे चित्रण या रूपात आली.. तीच परंपरा पुढे जे. जे.त किप्लिंग आणि ग्रिफिथ्स, धुरंधर यांच्यापर्यंत येऊन पोचते,’ असं घारे म्हणतात, त्यात किती तथ्य आहे हे प्रदर्शनातून पटतं!

धुरंधरांचंच आणखीही एक प्रदर्शन सध्या मुंबईत भरलं आहे. दोनपैकी किमान एखादं तरी प्रदर्शन अन्य कुठल्या महानगरातही भरू शकेल अशी आशा आहे. धुरंधर व त्यांच्या दिवंगत कन्येची पुस्तकं आता उपलब्ध आहेत. इतिहास समृद्ध करणाऱ्या या घडामोडी आहेत. तो इतिहास कोणता? तर, ‘बॉम्बे स्कूल’ नावाचं शिवार समृद्ध करून गेलेल्या कैक पावसाळय़ांचा हा इतिहास आहे. तो पावसाळा आता सरतो आहे.. ‘बॉम्बे स्कूल’ टिकवायचं, तर ते असं इतिहास जपूनच टिकवावं लागणार आहे. म्हणजे धुरंधरांचं हे प्रदर्शनही ‘परतीच्या पावसा’तलं आहे. हा परतीचा पाऊस अंगावर घ्यावा आणि त्यातून होणारे बोध प्रत्येकानं ‘आज’च्या जमिनीत जिरवून घ्यावेत, यासाठी हे लिखाण.

धुरंधर यांच्या छापील चित्रांवर भर देणारं आणखी एक प्रदर्शन भायखळ्याच्या राणीबागेतल्या ‘भाऊ दाजी लाड संग्रहालया’त भरलं आहे. मुंबई महापालिकेच्या या संग्रहालयाचं संधारक-पद ‘जे जे स्कूल’च्या प्रमुखांनीच सांभाळण्याचा नियम ब्रिटिशकाळात होता. तेव्हा काही काळ याच संग्रहालयाचं काम धुरंधरांनीही पाहिलं होतं. धुरंधरांनी ज्या आठ पुस्तकांसाठी चित्रं केली, त्यांपैकी ‘विमेन ऑफ इंडिया’ आणि ‘पीपल ऑफ इंडिया’तली बहुतेक चित्रं इथं मोठय़ा आकारात आहेत. शिवाय, ‘चांगला मुलगा- द्वाड मुलगा’ ही संस्कारचित्रमाला, फ्रेंच कॉमेडी म्हणावी अशी एक दहा चित्रांची मालिका, ‘डेक्कन नर्सरी टेल्स’मधली काही चित्रं आणि मुंबईतल्या कष्टकऱ्यांची पोस्टकरड इथं एक ऑक्टोबपर्यंत पाहता येतील. सोबतचं ‘पेपर ज्वेल्स’ हे पोस्टकार्ड-संग्रहाचं प्रदर्शनही आवर्जून पाहावं असं आहे.

abhijit.tamhane@expressindia.com

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Two exhibitions of rao bahadur dhurandhar in mumbai

ताज्या बातम्या