लोकसंस्कृतीचे गाढे अभ्यासक आणि संशोधक डॉ. रा. चिं. ढेरे यांच्या पहिल्या स्मृतिदिनानिमित्ताने (१ जुलै) त्यांचा एक ललितबंध प्रसिद्ध करीत आहोत.

डॉ. ढेरे यांच्या निवडक ललितलेखांचा संग्रह लवकरच पद्मगंधा प्रकाशनातर्फे प्रसिद्ध होत आहे.

परवा मला उरुळी-कांचनहून एक निमंत्रणपत्र आले. त्या पत्राच्या निमंत्रकांच्या नामावळीत ‘केरबा आबाजी कांचन’ असे एक नाव होते. ‘केरबा’ हे नाव वाचून माझ्या परिवारातल्या माणसांना आश्चर्य वाटले. असे विचित्र, किंबहुना तुच्छतादर्शक नाव का ठेवावे, याचे कारण त्यांना कळेना. दत्तोबा, महादबा इत्यादी नावांमध्ये शेवटी ‘बा’ हे आदरार्थी पद असते, त्याप्रमाणे ‘केरबा’ या नावात शेवटी ‘बा’ हे पद आहे. ते काढून टाकले म्हणजे उरतो ‘केर’! ‘केर’ हे काय एखाद्या व्यक्तीला ठेवण्याजोगे नाव आहे? – त्यांचा प्रश्न स्वाभाविक होता.

आज आपण मुलांची नावे केवळ आपल्या आवडीनुसार ठेवतो. त्यामुळे पारंपरिक नामकरणाची भूमिका आपल्या सहज ध्यानी येऊ शकत नाही. ‘केरबा’ हे एका शेतकरी कुटुंबातील नाव आहे. तेव्हा ते अडाणीपणाने ठेवले गेले असेल असे कुणाला वाटेल. परंतु गेल्या शतकाच्या अखेरीस होऊन गेलेले प्रख्यात गणितज्ञ केरूनाना छत्रे यांच्या नावातले मूलरूपही ‘केर’ असेच आहे. केरबा, केरूनाना या नावांप्रमाणेच धोंडिबा, दगडोबा, धोंडाबाई, दगडाबाई, चिंधू ही नावेही महाराष्ट्रात सर्वत्र आढळतात. या नावांमधील बा, बाई ही उत्तरपदे काढून टाकली म्हणजे धोंडा, दगड, चिंधी हे तुच्छवस्तुनिदर्शक शब्द नावांसाठी वापरल्याचे स्पष्ट होते. केरबा आणि केरूनाना ही नावे जशी समाजाच्या ग्रामीण आणि नागर अशा दोन्ही स्तरांत दिसून येतात, त्याचप्रमाणे ग्रामीण समाजस्तरातील ‘धोंडिबा’ हा नागर समाजस्तरात ‘धोंडोपंत’ होऊन येतो. धोंडिबा काय आणि धोंडोपंत काय, दोहोंतही ‘धोंडा’ हे एकच तत्त्व व्यापून राहिले आहे!

आपल्या नामकरणात केर-कचरा, दगड-धोंडे, चिंध्या अशा तुच्छ वस्तूंचा वापर का होत राहावा? आपल्या अपत्याचे नाव सुंदर असावे, उच्चारणाऱ्याला व ऐकणाऱ्याला ते मधुर वाटावे, ते शुभार्थक असावे असेच कुणालाही वाटत असते. असे असूनही ज्या अर्थी अत्यंत तुच्छ वस्तूंची नावे नामकरणासाठी सातत्याने वापरली गेली आहेत, त्या अर्थी अशा प्रकारच्या नामकरणामागे काही गंभीर कारण असले पाहिजे, हे खरेच.

हे गंभीर कारण शोधण्यासाठी नाम आणि व्यक्ती यांच्या संबंधांविषयीची प्राचीनांची- प्राचीन परंपरेतील मनांची- श्रद्धा आपण माहीत करून घेतली पाहिजे. ती श्रद्धा अशी आहे, की नाम आणि व्यक्ती यांमध्ये अभेद आहे; नामात नामधारकाचे प्राणतत्त्व आहे. नाम-रूपांतील या अभेदभावनेपोटीच पूर्वनिर्दिष्ट विपरीत नामकरणे केली जातात. एखाद्या दाम्पत्याची मुले जगत नसली तर कोणत्या तरी अनिष्ट शक्तीच्या अवकृपेचा अथवा क्रूर दृष्टीचा तो परिणाम आहे असे मानले जाते. हा परिणाम टाळण्यासाठी जन्माला आलेल्या अपत्याला दीर्घकाळपर्यंत- ते अपत्य मोठे होईपर्यंत- अनाम राखावयाचे अथवा त्याला केर, दगड, चिंधी, कोंडा यांसारख्या एखाद्या तुच्छ वस्तूच्या नावाने संबोधावयाचे, असा उपाय अवलंबिला जातो. या उपायाचा उपयोग असा मानला जातो, की अपत्याचे नाव ठेवलेच नाही, म्हणजे अनिष्ट शक्तीपासून त्या अपत्याचे अस्तित्व गुप्त राखले जाते, अथवा दुर्लक्षणीय तुच्छ वस्तूच्या नावामुळे अनिष्ट शक्ती त्याच्याकडे लक्ष देत नाही. नाम आणि व्यक्ती यांच्या अभिन्नतेची श्रद्धा येथे स्पष्ट होते.

माझे एक स्नेही बबनराव क्षीरसागर हे महाराष्ट्र शासनाच्या ग्रंथालय विभागात अधिकारी आहेत. त्यांच्याशी परवा बोलत असताना संभाषणाच्या ओघात त्यांनी असे सांगितले की, ‘‘माझ्या अगोदरची भावंडे अकाली गेल्यामुळे मी मोठा होईपर्यंत माझे विधिपूर्वक नावच ठेवले गेले नाही. सोयीसाठी जी जी नावे संबोधनार्थ वापरली जात होती, त्यांतलेच एक पुढे रूढ झाले.’’

अनिष्ट शक्तीची क्रूर दृष्टी टाळण्याच्या हेतूने तुच्छ वस्तूचे नाव अपत्याला ठेवण्याच्या प्रवृत्तीचे एक उदाहरण एका मोठय़ा सत्पुरुषाच्या चरित्रामध्ये स्पष्टपणे आढळते. हे सत्पुरुष म्हणजे महानुभाव पंथसंस्थापक चक्रधर स्वामींचे सद्गुरू श्रीगोविंदप्रभू होत. चक्रधरशिष्य म्हाइंभट यांनी रचलेल्या गोविंदप्रभूंच्या चरित्रात प्रारंभीच त्यांच्या जन्माचे वृत्त पुढीलप्रमाणे दिले आहे : ‘‘अनंतनायकु पिता : नेमाइसे माता : गोसावियांचिये मातेसी बहुतें जाले : गुंडो ऐसें नाव ठेविलें :’’ अनंतनायक व नेमाइसा या दाम्पत्याची मुले जगत नव्हती; म्हणून अनेक मुलांच्या अकालमृत्यूनंतर जन्मास आलेल्या अखेरच्या मुलाचे नाव माता-पित्यांनी ‘गुंडो’ असे ठेवले. गुंडो म्हणजे दगड, धोंडा. या तुच्छ वस्तूच्या नामस्वीकारामुळे मुले जन्मत:च अथवा बालवयातच खाऊन टाकणाऱ्या दुष्ट शक्तीची क्रूर दृष्टी टाळता आली, अशी माता-पित्यांची व तत्कालीन समाजाची दृढ श्रद्धा होती. हा गुंडोच पुढे गुंडम राऊळ आणि गोविंदप्रभू या नावांनी प्रख्यात झाला. गोविंद हे गुंडो, गुंडम या नावाचे शोभन संस्कृतीकरण आहे यात मुळीच संशय नाही. एवढय़ा मोठय़ा आदरणीय पुरुषाला ‘गुंडो’ (दगड) म्हणून संबोधावयाला भक्तजनांना अवघड वाटू लागल्यामुळे त्यांनी ‘गुंडो’चे ‘गोविंद’ असे संस्कृतीकरण करून घेतले, हे उघड आहे.

याच गोविंदप्रभूंचे ‘चिद्धव’ असे आणखी एक संस्कृत नाव महानुभावीय वाङ्मयात वापरलेले आढळते. ‘हृदय भज परेशं स्वामिनं चिद्धवाख्यम’ किंवा ‘नमो चिद्धवा आर्यलीलाविहारा’ अशा प्रकारे अनेक ठिकाणी त्यांचा उल्लेख ‘चिद्धव’ या नावाने केलेला दिसतो. थोडा बारकाईने विचार केला तर आपणास असे दिसून येईल की, ‘गोविंद’ हे जसे मूळच्या ‘गुंडो’ या नावाचे संस्कृतीकरण आहे, त्याचप्रमाणे ‘चिद्धव’ हेही मूळच्या तुच्छ वस्तुनिदर्शक वस्तूच्या देश्य नावाचेच संस्कृतीकरण आहे. ते देश्य नाव आहे- ‘चिंधू’- चिंधी या तुच्छ वस्तूच्या नावावरून ठेवलेले! ‘गुंडो’चे ‘गोविंद’ झाले, तसेच ‘चिंधू’चे ‘चिद्धव.’ आणि एकदा हे संस्कृतीकरण साधले म्हणजे त्याची श्रेष्ठ तात्त्विक स्पष्टीकरणे देणे मुळीच अवघड नाही. ‘चिद्धव’ हा शब्द चित् (माया) आणि धव (पती, नाथ, स्वामी) या दोन पदांपासून बनलेला आहे. चिद्धव म्हणजे मायेचा स्वामी. कृष्णमुनी डिंभ नामक महानुभावीय ग्रंथकाराने ‘ऋद्धिपुरमाहात्म्य’ या ग्रंथात गोविंदप्रभूंच्या ‘चिद्धव’ या नावावर पुढील भाष्य केले आहे..

तरि मायेनें विश्व असे व्यापिलें।

तियेचें पुर देवें अंगिकारिलें।

म्हणौनि नाम स्वीकारलें।

चिद्धव ऐसें ।। ६०५।।

महानुभावपंथीय लोक गोविंदप्रभूंना परमेश्वराचा अवतार मानतात. या श्रद्धेमुळेच कृष्णमुनी म्हणतो की, मायेने घडविलेल्या पुराचा- म्हणजे शरीराचा देवाने अंगीकार केल्यामुळेच त्यांनी ‘चिद्धव’ असे नाव स्वीकारले. हे स्पष्टीकरण म्हणजे मूळ ‘चिंधू’ या नावाच्या संस्कृतीकरणाला श्रद्धानुरूप प्रतिष्ठा देण्याचा प्रयत्न आहे, हे मुद्दाम सांगण्याची जरूरी नाही. वऱ्हाडात जुन्नरदेवाच्या वाटेवर एक चिंध्यादेवी आहे, तिला स्थानिक लोक अपत्यप्राप्तीसाठी चिंध्या वाहतात.

मुले जगत नसली म्हणजे ज्याप्रमाणे नामकरणासाठी तुच्छवस्तुनिदर्शक नामांचा वापर केला जातो, त्याप्रमाणेच नवजात बालकाला देवतेला, नदीला अथवा अन्य (कनिष्ठजातीय) स्त्रीला अर्पण करून, ‘इदं न मम’ (हे माझे नव्हे.. त्या देवतेने, नदीने अथवा अन्य स्त्रीने मला दिलेले आहे) या भावनेने त्याचा पुन्हा स्वीकार केला जातो.

गंगे गोदे यमुने, माझा नोहे,

तुझाच हा बाळ!

रक्षण करिं गे याचें, अर्पण केला

न कापितां नाळ ।।

या प्रार्थनेतील भावना तीच आहे. सुप्रसिद्ध मराठी लेखक गोपीनाथ तळवलकर यांना त्यांच्या मातेने नर्मदेला अर्पण करून, नर्मदेने दिलेला पुत्र म्हणून पुन्हा स्वीकारल्याची हकीकत त्यांनी स्वत:च एका जाहीर भाषणात सांगितली. माझ्या माहितीतील एका मराठा कुटुंबातील व्यक्तीला त्याच्या माता-पित्यांनी जन्मत:च त्याच गावातील एका महार स्त्रीच्या ओटीत घालून पुन्हा स्वीकारले होते. नवजात बालक देवतेला अर्पण करून परत घेण्याची पद्धत तर व्यापक प्रमाणात रूढ असल्याचे आढळते. अशा बालकाचे नाव ठेवताना ‘अमुक देवतेने दिलेला’ अशा अर्थाचे ठेवण्याची प्रथा होती. उदाहरणार्थ, इंद्रदत्त, कुमारदत्त, विशाखदत्त, इत्यादी. ‘मुद्राराक्षस’ या प्रख्यात संस्कृत नाटकाचा कर्ता विशाखदत्त या नावाचा होता, हे आपणास माहीत आहे. विशाख हा स्कंदश्रेणीतला, बालकांच्या जीवितरक्षणाशी संबद्ध असलेला एक देव होय. विशाखनामक देवाने दिलेला पुत्र तो विशाखदत्त होय. मावळ भागात पाले नावाच्या गावी अलीकडेच ब्राह्मी लिपीतील एक प्राचीन शिलालेख माझे मित्र रा. लं. भिडे यांना उपलब्ध झाला आहे. या लेखात ‘इंदरखित’ असे व्यक्तिनाम आले आहे. ‘इंदरखित’ हे ‘इंद्ररक्षित’ या नावाचे प्राकृत रूप आहे. इंद्ररक्षित म्हणजे इंद्राने रक्षिलेला- सांभाळलेला. आपल्या अपत्यावर आपल्या कुलदेवतेची अथवा उपास्य देवतेची सदैव पाखर असावी अशा श्रद्धेने या प्रकारची नावे ठेवली जात असत.

कुलदेवता अथवा उपास्य देवता यांच्या नावांवरून नावे ठेवण्याची प्रथा परवा-परवापर्यंत अत्यंत व्यापक प्रमाणात रूढ होती. आजही ती काही प्रमाणात टिकून आहे. आपल्या देवतेच्या नावापुढे ‘दास, शरण’ अशा प्रकारची भक्तिसूचक पदे वापरून ज्याप्रमाणो देवतानामांचा नामकरणासाठी वापर होई, त्याचप्रमाणे नुसती देवतानामेही वापरली जात असत. अंबिकादत्त, गंगादत्त, शिवदत्त, कालिकाशरण, सियारामशरण, मैथिलीशरण, अंबादास, रेणुकादास इत्यादी नावे भक्तिसूचक पदांसह आहेत; तर कृष्ण, गोविंद, विष्णू, शंकर, पार्वती, रमा इत्यादी नावे केवळ देवतानिदर्शक आहेत. महाराष्ट्रापुरता विचार करावयाचा तर महाराष्ट्रातील प्रख्यात लोकदेवतांच्या नावांचा वापर व्यक्तिनामांसाठी मोठय़ा प्रमाणात झालेला आढळतो. खंडेराय, खंडोजी, मैराळ, हैबती (हयपती), महिपती, मेघनाथ, मैलार, मल्हारी इत्यादी खंडोबाची नावे, केदारजी, ज्योत्याजी, जोतिबा, रवळ, रवळोबा इत्यादी जोतिबाची नावे; विठोबा, विठाबाई, पांडुरंग इत्यादी विठ्ठलाची नावे वारंवार वापरली गेली आहेत.

नामकरणासाठी वापरल्या गेलेल्या देवतानामांचा विचार करता आणखी एक असा विशेष आढळतो की, पुरुष अपत्यासाठीही देवीनामे वापरली गेली आहेत. उदाहरणार्थ : शिवाजी, बनाजी, एकोजी, तुकोजी, भवानराव, यमाजी इत्यादी. या पुरुषनामांत शिवाई, बनशंकरी, एकवीरा, तुकाई, भवानी, यमाई ही देवीनामे आहेत, हे उघड आहे. देवीनामापुढे ‘जी’ हे पुरुषनिदर्शक पद ठेवून पुढे अपत्याचे नाव साधले आहे, इतकेच. गेल्या शतकात भवानी विश्वनाथ कानविंदे हे प्रसिद्ध पत्रकार होऊन गेले. त्यांच्या नावापुढे असे कुठलेही पुरुषत्वनिदर्शक पद लावलेले नाही. पैठणचे एकनाथ, देहूचे तुकाराम आणि खेडचे चंडीराम या प्रख्यात साधूंच्या नावात एकवीरा, तुकाई आणि चंडी (सप्तशृंगीची देवी) या त्यांच्या घराण्यातील देवींची नावे आहेत. देवतांप्रमाणेच क्षेत्रे आणि तीर्थे (नद्या) यांच्या नावांचा उपयोग काशी, मथुरा, द्वारका, गंगा, कावेरी, यमुना, गोदावरी, काशीनाथ, द्वारकानाथ या प्रकारच्या नावांवरून स्पष्ट होतो. क्षेत्रांना व तीर्थाना देवतांइतकेच पावित्र्य आपल्या परंपरेत दिले गेले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘नावात काय आहे?’ असा प्रश्न विचारणाऱ्याला आता आपण असे उत्तर देऊ शकतो की, नावात संस्कृतीचा इतिहास संचित झालेला आहे. त्या, त्या काळात प्रचलित असलेल्या व्यक्तिनामांचा आपण अभ्यास केला तर आपणास त्या, त्या काळातील समाजाच्या श्रद्धाकंेद्रांचा व उपासनाप्रणालींचा बोध स्पष्टपणे घडतो व वंशसातत्याच्या आकांक्षेमुळे अपत्यप्राप्तीसाठी आणि अपत्यरक्षणासाठी स्वाभाविकपणे धडपडणाऱ्या मानवाचे मन ज्या अनेक माध्यमांतून प्रकटले आहे, त्यांतले एक प्रमुख माध्यम आहे अपत्याचे नामकरण.