अवधूत परळकर
ऐतिहासिक कादंबरी हा एक चमत्कारिक प्रकार आहे. ऐतिहासिक कादंबरी वाचायला घेणाऱ्यांना ना धड इतिहास समजत, ना कादंबरी वाचण्याचं समाधान मिळत. ऐतिहासिक कादंबरीकार रंजकता वाढवण्यासाठी काल्पनिक घटना आणि पात्रे त्यात घुसडतात. ऐतिहासिक सत्याचा अशा प्रकारे विपर्यास करणं हे वास्तविक गुन्हेगारी कृत्य. नाटय़पूर्णता वाढवण्यासाठी केलेला हा हस्तक्षेप कालांतरानं इतिहासाचा भाग बनून समाजात रूढ होतो. हे वास्तव लक्षात घेता केवळ इतिहासाचे संदर्भ आहेत म्हणून ‘केला होता अट्टहास’ या कादंबरीला ऐतिहासिक कादंबरी म्हणणं अन्यायाचं ठरेल. हिंदी साहित्यिक शिवदयाल यांच्या ‘एक और दुनिया होती’ या कादंबरीचा हा मराठी अनुवाद. या कादंबरीला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. पण कादंबरीकार सर्जनशीलतेच्या नावाखाली ऐतिहासिक घटना आणि आपण निर्मिलेली पात्रे यांत हेतुत: अंतर राखतो. इतिहास हा नाटकाला नेपथ्य असावं त्याप्रमाणे अस्तित्वात आहे. काळ आहे १९७० ते १९९० या दोन दशकांदरम्यानचा. जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेले संपूर्ण क्रांतीचे दिवस.
जयप्रकाश नारायण यांची चळवळ केवळ सरकार उलथून पाडण्यासाठी नव्हती. छात्र संघर्ष वाहिनीच्या एका मेळाव्यात आपल्याला कोणत्या प्रकारचं परिवर्तन अभिप्रेत आहे हे जयप्रकाश नारायण यांनी स्पष्ट केलं. ते म्हणाले, ‘संपूर्ण क्रांती ही गोष्ट केवळ आंदोलनातून साध्य होणारी नाही. त्यासाठी समाजमानस व समाजरचना या दोन्हींमध्ये मूलभूत परिवर्तन घडवून आणावे लागेल. आणि हे काम तुम्ही तरुण मंडळीच करू शकाल. जमीनदारी, सावकारी नष्ट केली पाहिजे. जात, धर्म आणि भेदांच्या पलीकडे जाऊन एकात्म राष्ट्र निर्माण होणे यालाच मी ‘संपूर्ण क्रांती’ म्हणतो.’

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

समाजपरिवर्तनाचं ध्येय समोर ठेवून वावरणाऱ्या तरुणांच्या मनावर ‘क्रांती’ या शब्दाचं किती गारूड असतं याची कल्पना तरुणवयात ज्यांनी परिवर्तनाच्या लढय़ात थोडाफार सहभाग घेतला आहे त्यांना निश्चितच आहे. परिवर्तनाच्या ध्येयाला वाहून घेण्यासाठी तळमळणारे तरुण त्याकाळी देशभर पसरले होते. सामाजिक परिवर्तनाच्या ध्यासाने पछाडलेल्या तरुणांचा एक लहानसा समूह या कादंबरीचा नायक आहे. त्याच्या प्रथमपुरुषी निवेदनाद्वारे या गटात असलेले समविचारी तरुण सदस्य, त्यांच्या हालचाली, भेटीगाठी, आपसातली संभाषणे यातून ही कादंबरी आकार घेते. प्रेमच्या मित्रांची ओळख वेगवेगळ्या प्रसंगांतल्या त्यांच्या वर्तनातून, प्रतिक्रियात्मक बोलण्यातून आणि हालचालींमधून होत जाते. प्रेमच्या मनातल्या उलटसुलट विचारांनी, भोवतालच्या वातावरणानं मनात उमटणाऱ्या विविध विषयांवरील प्रतिक्रियांनी आणि प्रेमच्या स्वत:च्या मनात सदोदित चालणाऱ्या चिंतनानं कादंबरीचा बराच भाग व्यापलेला आहे. या तरुणांच्या उक्ती आणि कृतीवर जयप्रकाश नारायण यांच्या प्रबोधनाची अदृश्य छाया पडली आहे. देशात बऱ्याच राजकीय घडामोडी घडताहेत. त्याचे पडसाद तरुणांच्या विचार आणि कृतींतून उमटत राहतात. भोवतालच्या राजकारण व समाजकारणावर नायक मनातल्या मनात भाष्य करताना दिसतो. कादंबरी नायकाच्या आत्मकथनातून पुढे सरकत जाते तसतसे समविचारी तरुणांच्या मनातील गुंते स्पष्ट होत जातात. खरं तर हे समविचारी तरुण पूर्णाशाने समविचारी कधीच नसतात. प्रत्येकाच्या घरची पार्श्वभूमी, कौटुंबिक पर्यावरण आणि समस्या भिन्न असतात. परिवर्तनाचं काम कशा पद्धतीने पुढे न्यायचं यावर त्यांच्या चर्चा होतात. पण प्रत्यक्ष कृती करताना नायकासह सर्वाना व्यक्तिगत अडचणींना तोंड द्यावं लागतं. त्यातून ताणतणाव निर्माण होतात.

मराठीतील सर्व लोकरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Life struggle of social reformist youth amy
First published on: 11-09-2022 at 01:11 IST