साहित्य ही आपापल्या खासगी अवकाशात, एकट्यानं अनुभवण्याची चीज आहे, त्याकरता साहित्य संमेलनं हवीत कशाला, असं कुणी म्हणेल. (एक पायरी खाली उतरून, जगायला साहित्याचीच गरज काय आहे, असंही कुणी म्हणू शकेल! पण गरज नसतानाही निर्मिती होणं हे साहित्याचं मूलभूत लक्षण असल्यामुळे आपण त्याकडे दुर्लक्ष करू!) तर – साहित्य संमेलनासारख्या अवकाशांची – पोट भरल्यानंतर सुचणारी का होईना, पण – गरज असते. आपल्या फावल्या वेळात आपण काय वाचतो, का वाचतो हे इतरांना सांगावंसं वाटतं. इतर लोक काय वाचतात, ते जाणून घ्यावंसं वाटतं. त्यातून आपल्याला काही नवं मिळतं का, हे चाचपून बघायचं असतं.
लेखक नावाचा प्राणी ‘दिसतो कसा आननी’ याचं कुतूहल असतं, तसंच लेखकाला त्याच्या लिहिण्याबद्दल काय म्हणायचंय, याबद्दलचंही कुतूहल असतं. या सगळ्या तशा तिय्यमच गरजा म्हणायच्या. पण त्या असतात. शिवाय त्यांचं स्वरूप वैयक्तिक नसून सामाजिक असतं. म्हणजे त्या भागवण्याकरता एकेकटं असून पुरत नाही, माणसांचा समुदायच लागतो. मग या समुदायाला जमण्याकरता आपोआप एक अवकाश असावा लागतो. त्यातूनच चित्रपट महोत्सवापासून ते सोशल मीडियावरच्या साहित्य चर्चेच्या ग्रुपांपर्यंत आणि लायब्रऱ्यांमधल्या शारदोत्सवांपासून साहित्य संमेलनापर्यंत नाना कार्यक्रम-उपक्रम आपापला अवकाश घेऊन जन्माला येतात. तशातलं साहित्य संमेलन. त्याची समाजाला गरज नसती, तर मुळात साहित्य संमेलनं घडलीच नसती. ती घडताहेत, याचा अर्थ त्यांची गरज आहे.

पण मग गरज आहे, ती भागली आणि संपलं, इतकं सोपं हे प्रकरण का नाही? त्यावरून इतकाले वादंग, त्यांतल्या राजकीय भूमिकांवरून- हस्तक्षेपांवरून- आर्थिक मदतींवरून वादावादी आणि अखेर दरवर्षी ‘साहित्य संमेलनं हवीत कशाला?!’ या प्रश्नापर्यंत येऊन पोचणं कशामुळे?

जयपूरचा लिटफेस्ट अनुभवून आल्यानंतर मला याचं उत्तर थोडं थोडं दिसू लागलं.

तसं पाहिलं तर लिटफेस्ट हे साहित्योत्सव (पक्षी : साहित्य संमेलन) याच शब्दाचं इंग्रजीतलं भाषांतर. जरा चुरचुरीत, पण तरी शब्दार्थ तोच. मग लिटफेस्ट इतका आधुनिक, तरुण आणि वाचकाभिमुख वाटतो तो कशामुळे? त्यात साहित्य संमेलनाहून वेगळं काय(-काय?) आहे, असा प्रश्न नकळत मनाशी आला.

आठ-दहा (वा जास्त) कमी-जास्त क्षमतेचे मांडव. त्यात दिवसभर चालणाऱ्या वेगवेगळ्या चर्चा- मुलाखती- भाषणं यांचं आधीपासून झालेलं नियोजन. या सगळ्या कार्यक्रमांना प्रत्येकी साधारण ४५ मिनिटांचा काटेकोर – होय, अगदी मिनिटा-मिनिटानुसार काटेकोर – वेळ. त्या वेळापत्रकाला मान देऊन वागणारे वक्ते आणि सूत्रसंचालक. कार्यक्रमपत्रिका खूप आधीपासून आखलेली आणि येणाऱ्या लोकांना नोंदणीपूर्वी उपलब्ध करून दिलेली. नोंदणी केल्याशिवाय आत यायला मनाई, त्यातूनही नियोजन सुकर होत असावं. शिवाय ठिकठिकाणी मदतनीस, त्या-त्या दिवसाच्या कार्यक्रमांची अद्यायावत राखलेली वेळापत्रकं – कागदी आणि डिजिटल, खाण्यापिण्याची- प्रसाधनाची नेटकी व्यवस्था आणि अर्थात पुस्तक विक्रीची केंद्रं. त्यातही लेखकाची स्वाक्षरी हवी असेल तर त्यासाठी शिस्तशीर व्यवस्था. शिवाय- न लाजता मिळवलेले नि मिरवलेले दमदार प्रायोजक आणि ठिकठिकाणी त्यांनी केलेल्या स्वत:च्या आदबशीर जाहिराती. राजकीय प्रतिनिधी कसोशीनं कमीत कमी राखलेले. साहित्य केंद्रस्थानी असलं तरीही साहित्याखेरीज समाजकारण, समाजमाध्यमं, मनोरंजन या बाबींचा विटाळ न मानणं. या सगळ्याखेरीज चटकन डोळ्यांत भरणारं आणखी एक आणि कदाचित सर्वांत महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे भरपूर तरुण मुलांची उपस्थिती आणि सहभाग.

यातलं साहित्य संमेलनाहून वेगळं काय आहे, हे तर स्पष्टच आहे. पण ती निव्वळ बाह्य लक्षणं आहेत. ती तशी का आहेत, या प्रश्नाचं उत्तर कळीचं असेल. ते मिळालं, तर इतरही प्रश्न सुटतील.

नियोजन, व्यवस्था, चकचकीतपणा या सगळ्याला पैसे लागतात. एरवी साध्या साध्या व्यवस्थाही होत नाहीत. मान्य. प्रायोजक मिळवले तर ते मिळतीलही. पण या प्रायोजकांनी मराठी साहित्यप्रेमींच्या विश्वात यावं ते कशाकरता? या प्रायोजकांना ज्या गर्दीचं आमिष दाखवावं लागतं, ती गर्दी खेचण्याची क्षमता आजच्या मराठी साहित्याकडे आहे का? जी थोडीफार गर्दी साहित्याकडे आकृष्ट होते, ती पैसे खर्च करू शकणारी आणि इच्छिणारी – थोडक्यात तरुण साहित्यप्रेमी – आहे का? जर ती तशी नसेल, तर प्रायोजक येणार कुठून! मग राजकीय वरदहस्त हवाच. म्हणजे त्यांचा वरचष्माही आलाच. म्हणजे साहित्यानं केंद्रस्थानाची जागा गमावलीच समजायची. तसं व्हायला नको असेल, तर साहित्य वाचू-लिहू इच्छिणारे लोक आणि त्याबद्दल बोलू इच्छिणारे लोक यांनी स्वत:च्या खिशातून पैसे काढावेत. तेही नाही. बरं, मराठी साहित्याला अंगभूत ग्लॅमर आहे का? त्यातून प्रायोजक आकृष्ट होतील. साहित्याला ते नसेल तर मग नाटक-सिनेमातल्या तारकांचं तेज उसनं घेणं भागच आहे. पुन्हा साहित्य गेलंच की मागच्या बाजूला.

हेच सगळं मराठी साहित्य संमेलनांच्या बाबतीत घडताना दिसतं. राजकीय भूमिका वगैरे वादग्रस्त मुद्दे काही काळ बाजूला ठेवले (ते तसे ठेवता येत नाहीत, ठेवू नयेतही, पण निव्वळ युक्तिवादासाठी क्षणभर ते ठेवले, समजा) तरी या मूलभूत त्रुटी तशाच्या तशाच राहतात.

पुस्तकं विकत घेण्याची संधी हा आपल्या समाजातल्या पुस्तक दुकानांच्या अभावावर बोट ठेवणारा एकमात्र विशेष साहित्य संमेलनांकडे उरतो. त्यातून मग संमेलनाच्या ठिकाणी इतक्या लाख रुपयांची पुस्तकं विकली गेली आणि तितक्या लाखांची उलाढाल झाली… अशा बातम्या येतात. मग सगळं थंडावतं.

असं कशामुळे होतं? बहुधा, साहित्य संमेलनाला जनाधार नाही, हे त्याचं खरं दुखणं असतं.

मग साहित्याला मागच्या बाजूला न ठेवता केंद्रस्थानी आणून इतर कलांशी जोडत सुनियोजित सहभाग राखून ‘लिटफेस्ट’चा आराखडा तयार केला, तर या स्वरूपात बदल होऊ शकेल का, याची चाचपणी करायला हवी खरं तर.

मराठी साहित्याचा सांधा आपल्या भाषेतल्या सर्वसाधारण, गरीब-श्रीमंत, शिक्षित-अर्धशिक्षित, नागर-अनागर आणि सर्वांत महत्त्वाचं – आबालवृद्ध वाचकाशी – जोडलेला नाही. तो जोडण्यासाठी ‘लिटफेस्ट’ दुवा ठरत असेल, तर तो कुणाला नको?
meghana.bhuskute@gmail.com