‘लोकपरंपरेचे शिल्पकार’ या डॉ. गणेश चंदनशिवे लिखित पुस्तकात एकोणिस व एकविसाव्या शतकातील महाराष्ट्रातील शाहिरांचा संशोधनपर चरित्रात्मक इतिहास वाचायला मिळतो. हे पुस्तक म्हणजे शाहिरी परंपरेचा महत्त्वाचा दस्तऐवज आहे. लेखकाकडे वडिलोपार्जित तमाशाची परंपरा असल्याने या कलेविषयीचा जिव्हाळा या पुस्तकातून प्रामुख्याने जाणवत राहतो. महाराष्ट्राला प्रतिभासंपन्न शाहिरांची मोठी परंपरा आहे. या शाहिरांना मराठी साहित्यात एक मानाचे स्थान आहे. त्यांनी महाराष्ट्राची संस्कृती, लोकांचे समाजजीवन, त्यांच्या व्यथा मांडल्या. वेळप्रसंगी समाजाचे काम पिळून त्यांना सरळ मार्गाने जाण्याची शिकवण देण्यातही या शाहिरांनी कधी मागेपुढे पाहिले नाही. कधी प्रेमळ शब्दांमध्ये तर कधी कठोर शब्दांत त्यांनी समाजाची चांगलीच कानउघाडणी केली.
या पुस्तकात आपल्याला ‘सुंदरा मनामध्ये भरली’ म्हणणारे शाहीर राम जोशी भेटतात, तसेच ‘नर देहाशी येऊन प्राण्या दुष्ट वासना धरू नको’ असा एक जोरदार फटका देणारे शाहीर अनंत फंदीही भेटतात. तर ‘प्रभाकर कवीची कविता अमृतासमान’ असे आत्मविश्वासाने ओतप्रोत भरलेले शाहीर प्रभाकरही! या अशा प्रतिभावान शाहिरांबरोबरच शाहीर होनाजी बाळा, सगनभाऊ, पठ्ठे बापुराव, अण्णाभाऊ साठे, अमरशेख, फक्कड, यमुनाबाई वाईरकर, काळू-बाळू, विठाबाई नारायणगावकर अशा एकूण २९ शाहिरांचे उल्लेखनीय जीवनचरित्र आणि त्यांचे लेखन आणि त्यांचे विशेष यांविषयी पुस्तकात वाचायला मिळते. हे पुस्तक म्हणजे महाराष्ट्रातील शाहिरी परंपरेचा उत्तम दस्तऐवज आहे.
‘लोकपरंपरेचे शिल्पकार’,
डॉ. गणेश चंदनशिवे, डिंपल पब्लिकेशन,
पाने-१९०, किंमत-३०० रुपये.