आदूबाळ तीन मऱ्हाठी मित्रांनी दिवाळीपूर्व सप्ताहअंतीच्या संध्याकाळी घातलेल्या शाब्दिक धुडगुसाचा हा वृत्तांत. तोही ब्रिटनमध्ये सर्वत्र आढळणाऱ्या ‘रेड लायन पब’च्या एका गप्पाळी शाखेत. भूगोल बदलला, जगण्याच्या साऱ्या संकल्पना बदलल्या तरी जगात कुठेही दिवाळी साजरी करण्याची हौस-परंपरा बदलत नाही. विविध गुणदर्शनाचा, पहाटगाण्यांचा, रस्तेगडप गर्दीचा आणि खाद्रफराळी नव-उत्साहाचा सोस समुद्रापारच्या समाजात रुजत आहे. याचा तपशील खास सणानिमित्ताने लिहिलेल्या आणि संदर्भाच्या देशी गत-कातरिक कात्रीत सापडलेल्या या गोष्टीत सापडू शकेल..

‘‘प्रोफेसर, तुला नाचता येतं का?’’
बाहेरच्या थंडगार हवेतून उबदार पबात शिरल्याने आधीच प्रोफेसराचा जाड चष्मा धुरकटला होता. त्याला मायभूमीशी घट्ट जोडून ठेवणाऱ्या त्याच्या दोन मित्रांच्या आकृत्याच त्याला दिसत होत्या; पण भर लंडनमध्ये असला आचरट प्रश्न त्याला विचारणारं दुसरं कोणी नव्हतं.
बुडत्या ‘मराठमोळय़ा’ संस्कृतीच्या चिन्हांनी ट्रिगर होणाऱ्या वाचकांनी आपला कीबोर्ड सरसावण्याच्या आधीच काही गोष्टी स्पष्ट केल्या पाहिजेत. ब्रिटिश ‘पब’ ही तोकडे कपडे घालून नाचायची जागा नसून संपूर्ण कपडय़ांत ‘गफ्फा’ हाकत बसायची जागा असते. (म्हणजे पाहिजे तर नाचू शकता, पण आसपासचे लोक कटाक्षाने तुमच्याकडे बघायचं टाळतील आणि नंतर तुम्हाला मेल्याहून मेल्यासारखं होईल.) मोठय़ा आवाजात लावलेली गाणी नसतात, पण मोठमोठय़ाने बडबड करणारे लोक असू शकतात. माझ्यावर विश्वास नसेल तर मराठी मध्यमवर्गाचे ग्रामदैवत ‘पुलदे’ आणि ग्रामदेवता ‘मीसुप्र’ यांची याविषयक पुस्तके वाचून खात्री करून घ्यावी.

Clashes Erupt, Between Groups, During Shri Ram Navami Procession, Nagpur Police Lathi Charge, Control Situation, ram navami nagpur clashes, nagpur ram navami, crime story nagpur, clashes ram navami, ram navami clashes,
नागपुरात आक्रित…रामनवमीच्या शोभायात्रेत पोलिसांवर दगडफेक! पोलिसांकडून लाठीचार्ज…
murder of girlfriend, mumbai,
मुंबई : प्रेयसीच्या हत्येप्रकरणी ३० वर्षीय व्यक्तीला अटक
Navi Mumbai, Gudipadwa
कडक उन्हात कडक उत्साह.. उन्हाची पर्वा न करता जोशात उत्साहात निघाली गुढीपाडवा स्वागत शोभायात्रा
mumbai gudi padwa celebration
अयोध्येतील राम मंदिर लोकार्पण, शिवराज्याभिषेकाचे प्रतिबिंब; गुढीपाडव्यानिमित्त स्वागत यात्रांमध्ये तरुणाईचा सहभाग वाढवण्यावर भर


हा तीन मित्रांनी एका संध्याकाळी घातलेल्या शाब्दिक धुडगुसाचा वृत्तांत आहे. हे तिघेही लंडनमध्ये राहतात. म्हणजे लंडनच्या वेगवेगळय़ा उपनगरांत राहतात. भर लंडनमध्ये राहणं हल्ली विजू (मल्ल्या) सोडून कोणाला परवडत नाही. पूर्वी हे सगळे एकाच उपनगरात राहात असत. जवळपासच्या वयाची मुले असणे आणि मराठी असणे या तुटपुंज्या भांडवलावर त्यांची ‘काही तरी’ झाली. या ‘काही तरी’ला आपापल्या मनांत ‘मैत्री’ असं नाव द्यायला त्यांना बरीच वर्ष लागली. तोपर्यंत मुले मोठी झाली होती आणि दरम्यान त्यांनी आणखी दूरदूरच्या वेगळय़ा उपनगरांत घरे घेतली होती. आता ते मध्य-लंडनमधल्या एका पबात महिन्याकाठी एकदा भेटून सुखदु:खाच्या चार गप्पा मारतात आणि तांबूस पेयाचे तीन झोकतात.
‘‘नाच? म्हणजे कसा?’’ प्रोफेसराने प्रश्न फेकला. ‘‘हल्ली तो संगीतिबगीत प्रकारांत असतो तसा? या ठप्प्याला येत असेल.’’
‘‘आपल्याला गणपती डान्स येतो.’’ ठप्पा नावाने ओळखला जाणारा गुबगुबीत मित्र म्हणाला. ‘‘यडय़ा आमचं निंबाळकर तालीम मंडळ यासाठीच फेमस होतं. कसब्याला शिस्तीत झांज वाजवत चालणारे लोक देमार नाचायला परत यायचे माहितीये.’’
‘‘तसला नाही. ऐक.’’ तिसऱ्या मित्राने आपला मोबाइल काढला. याचं नाव डासा. सिटी ऑफ लंडनमधल्या एका प्रचंड बँकेत हा प्रचंड जबाबदारीच्या डायरेक्टर पदावर होता. म्हणून याचं मित्रांमधलं नाव ‘डायरेक्टर साहेब’ ऊर्फ डासा. दोन्ही मित्रांनी मोबाइलमध्ये डोकं घातलं आणि त्यांना तिथेच सोडून डासा बारच्या दिशेने निघाले.
‘‘धमाका नटखट दिवाळी पार्टी. अल्ल ‘’An all- day shindig including live music, dancing, a fun fair, face painting, henna hand art, and more..’’ ठप्प्याने मोठय़ाने वाचलं. ‘‘हायला भारी दिसतंय हे; पण केटिरग कोणाचं आहे लिहिलं नाहीये.’’
‘‘केटिरग जाऊ दे रे.’’ प्रोफेसर धास्तावला. ‘‘हा डासा आपल्याला दिवाळी पार्टीला घेऊन चालला आहे? आपल्याला? दिवाळी? पार्टीला?’’
‘‘मजा येईल.’’ तीन दांडगे पाइंट सरावाने सांभाळत परतलेल्या डासाने विचारलं. ‘‘आपण तिघे इथे भेटतो, पण सहकुटुंब इतक्या वर्षांत कुठेच गेलो नाही.’’
‘‘पोरं टीनेजर झाली राजा, आता हाती लागतात का आपल्या?’’ प्रोफेसर म्हणाला.
‘‘हा ना. आमच्या गणप्याला झब्ब्यात कोंबायचा तर दोन दिवसांची तयारी लागेल.’’ ठप्पा म्हणाला.
‘‘मुळात त्याच्या आकाराचा झब्बा घ्यायला आधी हॅरोला पळावं लागेल.’’
‘‘कसे रे तुम्ही लोक असे? चला, चांग भलं!’’ पाइंट वर करत डासा म्हणाला. ‘‘डोन्ट कम टू मी विथ प्रॉब्लेम्स. कम टू मी विथ सोल्युशन्स.’’
‘‘ए डासा, हा गॅस तुझ्या बँकेतल्या पोरांना द्यायचा. काय फालतू आग्रह लावला आहेस? तुझ्या ‘डमाकर नुटखुट डिवॉली पार्टी’चं वर्णन सांगू?’’ दोन घोटांनी प्रोफेसरला तरतरी आली होती.
‘‘थांब, मी तुला सांगतो कसं असतं ते. कुठल्या तरी शाळेच्या हॉलमध्ये ही पार्टी असणार. ‘ऑल डे शिंडिग’ म्हणजे ११ वाजता सुरू होणार. दाराशीच इस्कॉनचा स्टॉल; पण लोक आल्या आल्या खायच्या स्टॉलवर तुटून पडणार. एक स्टॉल चाट-पावभाजी-वडापावचा – त्याचं नाव ‘बाँबे स्ट्रीट फूड’. एक जनरल पणजाबी पनीर दलदल. एक इडलीवडय़ाडोशाचा स्टॉल, पण त्याला भयंकर मोठी लाइन. ओव्हरकोट सांभाळत संध्याकाळी बाहेर वाजवलेले फटाके. आत एक स्टेज, त्यावर वि-गु-द-छाप..’’
‘‘वि-गु-द?’’ ठप्पा कोडय़ात पडला.
‘‘विविध गुणदर्शन.’’ डासाने मोठ्ठा घोट घेत गलास अर्धा संपवला.
‘‘तर वि-गु-द छाप कार्यक्रम. म्हणजे कोणत्या तरी रँडम गाण्यांवर बसवलेले बॉलीवुडी नाच. कराओकेवर लिंपून बसवलेली गाणी. हाऊशी काकाकूंचं नाटुकलं वगैरे. प्रायोजक छत्रीछाप गहू पीठ.’’ प्रोफेसरच्या आठवणींच्या जखमा भळाभळा वाहात होत्या. ‘‘लहान बाळक्यांना रमवायला फेस पेंटिंग, थोडय़ा मोठय़ा बाळक्यांना रमवायला मेंदी. प्रायोजक पौंडांचे रुपये करणारी नवी कंपनी.’’
‘‘लोकान्ला हशिवणाऱ्या बभ्या किंवा बाळुश्याची स्टॅन्ड अप कॉमेडी..’’ ठप्प्याला ग्रामदैवताच्या लेखनातले रॅण्डम संदर्भ मध्येच आठवत. आज पुन्हा एकदा संस्कृतीशी जुळलेली नाळ चाचपून पाहता आल्याने त्याला धन्य धन्य झालं.
‘‘का? काय चूक आहे त्यात?’’ डासा म्हणाला. ‘‘आमच्या ठाण्यात..’’
‘‘राम मारुती रोड, तलावपाळी, दिवाळी अंकांचे गठ्ठे वगैरे. माहीत आहे.’’ ठप्पा म्हणाला.
‘‘दिवाळी अंकसे याद आया, यंदा काय वाचण्यासारखं आहे रे?’’ प्रोफेसर हुशारत म्हणाला. अजूनही दिवाळी अंकांबद्दल एक हळवा कोपरा प्रोफेसर राखून होता.
‘‘हल्ली सगळं ऑनलाइन मिळतं साहेब. चांगले अंक ऑनलाइनच असतात.’’ ठप्प्याने माहिती पुरवली. ‘‘नाही तर मी एक रद्दीवाला पकडून ठेवला आहे. नंतर तो पाहिजे त्या लेखाबिखांचे स्कॅन पाठवतो.’’
‘‘मलाही पाठवत जा काही चांगलंचुंगलं. नाही तर प्रोफेसरसाहेब, तुमच्याकडून धनतेरशीला एक नेहमीचा ‘अविवेकाची काजळी’वाला मेसेज येतो तेवढंच.’’ डासा म्हणाला.
‘‘अरे, ज्ञानदेवाची वाणी आहे ती. त्यात जितकं घुसशील तितकी मजा येईल. तुला
नाही कळणार. तू आपली हनी रोजची रील्स बघ.’’ मघाशी डासाचा फोन बघताना वरून घुसणारी नोटिफिकेशन्स प्रोफेसरच्या काकदृष्टीतून सुटली नव्हती.
‘‘हनी रोज? हे काय नवीन?’’ ठप्प्याला या जगताची काहीच माहिती नव्हती. उरलेल्या तांबूस पेयाचा नि:पात होईस्तोवर हनी रोजच्या रील्सवर रसग्रहणात्मक परिसंवाद किंवा परिसंवादात्मक रसग्रहण झडलं. काही वेळाने प्रोफेसर बारकडे जाऊन तीन नव्या पाइंट आणि शेंगदाणा पाकिटं घेऊन आला. ब्रिटिश पब ‘पयसे लेलो ज्यूते देदो’ तत्त्वावर चालतात. आधी पैसे टिचवायचे आणि मग गलास ताब्यात घ्यायचे.
‘‘बरं मग काय ठरलं दिवाळीचं?’’ काहीही झालं तरी आपला हेका न सोडणे हे डासाच्या व्यावसायिक यशाचं एक रहस्य होतं. उत्तरादाखल इतर दोघांनी एक दीर्घ घोट घेतला.
‘‘हे बघ भाऊ – नाच वगैरे सोडून बोल.’’ प्रोफेसरने निर्वाणीचा सूर लावला.
‘‘अरे, दिवाळी पार्टी एक वेळ नको; पण काही तरी नेहमीपेक्षा वेगळं तर करशील की नाही दिवाळी आहे म्हणून?’’ डासा म्हणाला.
‘‘हो, करू ना. आम्ही काय जनावरं आहोत का?’’ प्रोफेसर म्हणाला. ‘‘पण असं बघ, इतकी वर्ष या देशात राहून गोऱ्यांचा वाण नाही तर किमान गुण तरी लागणार ना?’’
‘‘म्हणजे?’’
‘‘म्हणजे- आपला इथला पहिला ख्रिसमस आठव. रस्ते ओस, दुकानं बंद, टय़ूब बस बंद. रेस्टॉरंटमध्ये जावं तर अगोदर बुकिंग केल्याशिवाय घेणार नाही म्हणतात. वर्षांतला सर्वात मोठा सण आणि काहीच चहलपहल नाही? आपल्या ‘एमजी’ रोडवर किती गजबज असते. जसे रुळत गेलो तसं लक्षात आलं की इथे पद्धत वेगळी आहे. गजबज, बडबड, धावपळ असेल तर ती आपापल्या घरांत. आपल्या कुटुंबासोबत, सुहृदांसोबत आनंदात वेळ घालवायचा हा खरा मुद्दा. बाहेर बोंबलत कशाला फिरायला पाहिजे?’’ प्रोफेसर म्हणाला.
‘‘काही गोष्टी खासगी असतात, पण त्या जगाला दाखवायच्या नसतात.’’ डासा मान डोलावत म्हणाला.
‘‘उदाहरणार्थ, आराध्या बच्चनचं कपाळ..’’ ठप्पा अजूनही रील्समध्ये गुंगला होता.
‘‘तू गप रंव रे. तुझा काय कार्यक्रम सांग की.’’ प्रोफेसरने डासाला ढोसलं.
‘‘आमचा दिवाळी कार्यक्रम? पहिली गोष्ट म्हणजे सुट्टी घेणार नाही. म्हणजे घेताच येणार नाही. अखंड इंग्लंड, स्कॉटलंड, वेल्स आणि नॉर्दर्न आयर्लंड – च्यानल आयलंड्ससहित – सव्वा महिन्यात ख्रिसमसच्या सुट्टीवर जाईल. त्याआधीचा हा महिना कामाचा आहे बाबा! तर उरतात शनिवार-रविवार. त्यात या मेल्यांनी भारताच्या मॅचेस त्या दिवसांत ठेवून अजून गोंधळ केलाय. त्यामुळे आता मिळेल तो दिवस पकडून सहकुटुंब दिवाळी खरेदी. कपडे आणि फटाके. आमच्या गावातला पंजाबी दुकानदार महाग विकतो. हॅरो-साऊथॉल-हाऊन्स्लो हा आपला बम्र्युडा ट्रँगल.’’
‘‘साऊथॉल? जहां लोगों के घरों के बाहर कच्छे सूखते हैं?’’ ठप्प्याला डायलॉग आठवला.
‘‘तनुजा त्रिवेदी!’’ डासा वैतागत म्हणाला. ‘‘ग्लास संपला का? अजून एक आण.’’
‘‘तर खरेदी केली की तिथेच एखाद्या गुजराती खानावळीत थाळी जेवणार.’’ डासा रंगात आला होता. ‘‘दिवाळीच्या दिवशी पोचेल या बेताने भारतातून पार्सल मागवलं आहे. अभ्यंगस्नान करून त्यातले लाडू, चिवडे खाणार. दुपारी त्या आपल्या ‘त्या’, ‘ह्या’ गायकाच्या शास्त्रोक्त संगीताच्या कार्यक्रमाला जाणार.’’
‘‘झब्बाबिब्बा टाकून काय?’’ प्रोफेसरने विचारलं.
‘‘एकदम चकाचक. शेवटी आपली संस्कृती पोरांपर्यंत पोचली पाहिजे रे. आपण नाही केलं तर हे कोण करणार?’’
‘‘डासा,’’ प्रोफेसर एकदम गंभीर झाला.
‘‘तुझी संस्कृती तू पोरांवर लादतो आहेस असं नाही ना? त्यांच्या- इंग्लंडमध्ये जन्मलेल्या वाढलेल्या पोरांच्या – संस्कृतीत कदाचित ख्रिसमसला भेट देणं असेल. सणाचा संबंध धर्माशी असतोच असं नाही.’’
डासा उसळून यावर उत्तर देणार तितक्यात ठप्पा तीन नव्या पाइंट घेऊन हजर झाला.
‘‘दिवाळी पार्टीच्या वादावर माझ्याकडे एक तोडगा आहे.’’ पाइंट टेबलावर आपटत ठप्पा म्हणाला. रील्स आणि पाइंटच्या भानगडीत मधली चर्चा ठप्प्याच्या कानावरच पडली नव्हती. ‘‘अमरीश पुरी चौकात आज Diwali on the Square कार्यक्रम आहे. जाता जाता तिथे डोकावून येऊ. तसंही आपल्याला चेरिंग क्रॉस स्टेशनकडेच जायचंय..’’
तिघे बाहेर पडले आणि कबुतरांना खाऊ घालणाऱ्या अमरीश पुरीने सुप्रसिद्ध केलेल्या ठिकाणाकडे चालू पडले. फार वाजले नव्हते तरी अंधार लौकर पडला होता. हवेत नोव्हेंबरचा गारठा होता. वेगवेगळय़ा रंगांच्या, चेहरेपट्टय़ांच्या, आकारांच्या मानवप्राण्यांची गर्दी नेहमीप्रमाणे होती. दुरूनच बॉलीवूड गाण्यांचे ठेके ऐकू यायला लागले. नॅशनल गॅलरीच्या बाजूने प्रवेश दिसत होता, तिकडे तिघे वळले आणि थबकले. या भागात कोणती ना कोणती निदर्शनं नेहमी चालू असतात. विविध युद्धग्रस्त देशांचे झेंडे घेतलेला एक जथा त्यांच्यासमोरून गेला. ‘Ceasefire now!’ एकाच्या हातातल्या बोर्डावर लिहिलं होतं. ‘Allow humanitarian aid.’
एकाएकी तिघांना गाण्यांचा ठणठणाट नको झाला. गेल्या काही दिवसांत इच्छा असता-नसताना पाहिलेली चित्रं तिघांच्याही डोळय़ांसमोरून तरळून गेली. सगळय़ाच झुंडी टाळत ते पलीकडच्या सेंट मार्टिन चर्चच्या पायऱ्यांवर टेकले.
‘‘काय काय घडत असतं जगात!’’ ठप्पा मनाशी बोलल्यासारखं बोलला.
‘‘पण काही म्हणा,’’ डासा सांगू लागला. ‘‘मी परवा यूटय़ूबवर पाहिलं..’’
पण प्रोफेसरने समोर बोट केल्यावर त्याचे शब्द विरले. ‘abies canlt harm anyone.’ लिहिलेला बोर्ड घेऊन समोरच्या फुटपाथवरून एक बाई जात होती. युद्धांमुळे बालपण करपत चाललेल्या अनोळखी बाळांचे चेहेरे त्या तिघांमधल्या बापांना अस्वस्थ करून गेले.
‘‘जगात. देशात. महाराष्ट्रात.’’ प्रोफेसरही मनाशी बोलला. ‘‘पण आपली दिवाळी आनंदात पार पडली पाहिजे, नाय का. शॉपिंग, फटाके, पार्टी, पहाट, पार्सल, फराळ, तेल, उटणं. आपल्याला काय फरक पडतो.’’
‘‘असं कसं राव. पडतो की. तुझ्याच मेसेजमध्ये लिहिलेलं असतं की – अविवेकाची काजळी फिटेल. विवेकदीप उजळेल.’’ डासा म्हणाला.
‘‘हा दिवा लावण्यासाठी सण साजरे करायचे असतात. कोणत्याही संस्कृतीतले.’’ परतवलेला फटका झेलत प्रोफेसर हसला.
‘‘वाचतोस वाटतं सगळे मेसेजेस! मन लावून.’’
‘‘हनी रोज पण, ज्ञानदेव पण.’’ कोटाची चेन गळय़ापर्यंत ओढत डासा हसला. ‘‘चला, निघू या. दिवाळीच्या शुभेच्छा..’’
टय़ूबच्या तोंडाशी तिघेही पांगले, मध्य लंडनच्या जनसागरात मिसळून गेले.
adityapanse@gmail.com