८ मेच्या ‘लोकरंग’मधील गिरीश कुबेर यांचा ‘पर्यावरणाचा विवेक’ हा लेख वाचला. मी एक सनदी यंत्र अभियंता आहे आणि माझ्या अभियांत्रिकी ज्ञानावर आधारित काही मुद्दे येथे मांडू इच्छितो.

भारतातील बहुतेक औष्णिक ऊर्जा प्रकल्प जुन्या तंत्रज्ञानावर आधारित उप-निर्णायक बाष्पक (सब-क्रिटिकल बॉयलर) वापरतात. (ज्यात २२५ किलो/ सेमी^२ पेक्षा कमी दाब असतो.) त्यामुळे त्यांची औष्णिक कार्यक्षमता सुमारे २० ते कमाल ३० टक्के आहे. (बॉयलरची औष्णिक कार्यक्षमता म्हणजे एक किलो कोळसा बॉयलरमध्ये टाकल्यानंतर त्या एक किलो कोळशाच्या जाळण्याने निर्माण होणारी किती ऊर्जा विजेमध्ये रूपांतरित होते, ते.) थोडक्यात, कोळसा जाळल्याने निर्माण होणारी ७० ते ८० टक्के ऊर्जा कोळसाआधारित ऊर्जा प्रकल्पाच्या ठिकाणीच वातावरणात मिसळते. (ही ऊर्जा उच्च तापमानाच्या धुरामधून, बाष्पकातून, हवेत होणाऱ्या उष्णतेच्या उत्सर्जनामधून, गरम राखेतून आणि जनित्र/ टर्बाइनमधून बाहेर पडणारी वाफ आणि पाणी इत्यादीतून वातावरणात सोडली जाते.) या कारणामुळे औष्णिक विद्युत केंद्राजवळील वातावरणीय तापमान हे लगतच्या परिसरातील तापमानापेक्षा २ ते ३ डिग्री सेंटीग्रेड जास्त असते.

Competition among 7 companies under incentive scheme for ACC production
‘एसीसी’ उत्पादनासाठी प्रोत्साहन योजनेअंतर्गत ७ कंपन्यांमध्ये चढाओढ
nestle India shares slip after reports says baby food contain high levels of added sugar
नेस्लेला ८,१३७ कोटी बाजार भांडवलाची झळ; दुग्धजन्य पदार्थांबाबतच्या वृत्ताने भांडवली बाजारात समभागात घसरण
sewage treatment plants for residential complexes from thermax
‘थरमॅक्स’कडून निवासी संकुलांसाठीही सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प; पुनर्वापरामुळे पाण्याची ८० टक्के बचत शक्य
toll plaza
विश्लेषण : भविष्यात टोलनाके बंद होणार? कशी असेल GPS आधारित नवी यंत्रणा?

कमी उष्णतेच्या कार्यक्षमतेचे आणखी एक कारण म्हणजे भारतात बिटुमिनस किंवा सब-बिटुमिनस कोळसा खणून/ उत्पादित केला जातो. हाच कोळसा बॉयलरमध्ये वापरला जातो. ज्यामध्ये राख जास्त असते आणि त्याचे उष्मांक मूल्य कमी असते. (कोळशातील हायड्रोकार्बन जळतो आणि ऊर्जा निर्माण करतो. आणि जर जास्त राख असेल तर परिणामी कमी हायड्रोकार्बन आणि त्यामुळे कमी ऊर्जानिर्मिती होईल. आणि जी काही ऊर्जा निर्माण होईल, तिचा वापर खोलीच्या तापमानापासून ते १००० अंश सेंटीग्रेडच्या उच्च तापमानापर्यंत राख गरम करण्यासाठी केला जातो. ज्याचा व्यावहारिकदृष्टय़ा काही उपयोग होत नाही.) हे सर्व घटक बॉयलरची औष्णिक कार्यक्षमता कमी करतात. भारतात सामान्यत: ११/ ३३ किंवा त्याहून अधिक केव्ही तारांद्वारे विजेचे वहन केले जाते आणि त्यात सुमारे ५% वीज वाया जाते.

सामान्यत: आपल्याकडे वीज वितरण प्रणाली खूप खराब आहे आणि वितरण तोटा १५ ते ७०% इतका आहे. आपण ३०% च्या सरासरी वितरण तोटय़ाचा विचार करू या. (महावितरण सरासरी सुमारे ३०% वितरण तोटा मानते.) मग भिन्नदिक प्रवाहातून (एसी पॉवर सप्लाय) एकदिक प्रवाहामध्ये (डीसी पॉवर सप्लाय) रूपांतरित करण्यात सुमारे ५% वीज वाया जाते.

सुमारे १०% वीज ही वीजघट/ विजेऱ्या थंड होण्यासाठी वापरतात. (चार्जिग आणि डिस्चार्ज करताना विजेऱ्या गरम होतात. त्या थंड करणे आवश्यक असते; अन्यथा त्यांचा स्फोट होऊ शकतो.)

सरासरी बॅटरीची कार्यक्षमता सुमारे ८०% असते. इलेक्ट्रिक वाहनांमध्ये वापरल्या जाणाऱ्या कुंचलाविरहित एकदिक प्रवाही चलित्राची (ब्रशलेस डायरेक्ट करंट मोटर्स) सरासरी कार्यक्षमता ९५ % असते. जर आपण वरील सर्व घटकांचा विचार केला तर अंतिमत: ही कार्यक्षमता कमी असेल..

= ३०% X ९५% X ७०% X ९५% X ९०% X  ८०% X ९५%  = १२.९६%

याचा अर्थ असा की, जेव्हा तुम्ही एक किलो कोळसा जाळता तेव्हा त्या कोळशाच्या ऊर्जेपैकी फक्त १२६.९ ग्रॅम ऊर्जा इलेक्ट्रिक वाहन चालवण्यासाठी वापरली जाते.

आता BS VI डिझेल वाहनांचा विचार करू या. BS VI डिझेल इंजिनची सरासरी थर्मल कार्यक्षमता ४०% आहे- जी मोटारमधून मिळणाऱ्या ऊर्जेच्या बरोबरीची असते. म्हणून जेव्हा आपण एक किलो/ एक लीटर डिझेल जाळतो तेव्हा त्या डिझेलमधील ४०० ग्राम / ४०० मिलीलिटर डिझेलची ऊर्जा तुमचे वाहन चालविण्यासाठी वापरली जाते.

जेव्हा तुम्ही वरील दोन्हींची तुलना करता तेव्हा तुमच्या लक्षात येईल की, इलेक्ट्रिक वाहनापेक्षा BS VI डिझेल इंजिन वापरणे पर्यावरणाच्या दृष्टीने अधिक सुरक्षित आहे.

वरील तुलनेत मी लिथियम आयन विजेऱ्या (बॅटऱ्या) बनवण्यासाठी वापरण्यात येणारे धातू, त्यामुळे होणारे प्रदूषण इत्यादींचा विचार केलेला नाही. किंवा सौरघटाच्या बाबतीत २० वर्षांच्या आयुष्यानंतर त्याचा सध्याच्या तंत्रज्ञानाचा वापर करून पुनर्वापर करता येणार नाही. (भविष्यात शास्त्रज्ञ त्यांचा पुनर्वापर करण्याचे मार्ग आणि साधने शोधू शकतील.) हवेवर चालणाऱ्या जनित्राच्या पात्याचे (विंड टर्बाइन ब्लेड) उपयुक्त आयुष्य २० ते २५ वर्षांचे असते. ते संपल्यानंतर त्या पात्यांचा सहजासहजी पुनर्वापर करता येत नाही.

थोडक्यात, जीवाश्म इंधन आणि त्यांचा वापर करून चालणारी वाहने विजेवर चालणाऱ्या वाहनांमध्ये वापरल्या जाणाऱ्या नवीन तंत्रज्ञानापेक्षा कमी प्रदूषणकारी आहेत. म्हणून भारतात आपण या इलेक्ट्रिक वाहनांचा वापर करण्यापासून परावृत्त केले पाहिजे. कारण त्यांचा वापर करून आपण अधिक प्रदूषण करत आहोत. (या वाहनांचा वापर केल्यामुळे वापरकर्त्यांच्या शहरांऐवजी वीजनिर्मिती प्रकल्पांच्या शहरांत प्रदूषण होत आहे.) आपल्या भावी पिढय़ांवर याचा अनिष्ट परिणाम होऊ शकतो. –

चंद्रशेखर जोशी wc.s.joshi@hotmail.com