अरुंधती देवस्थळे arundhati.deosthale@gmail.com

अनेक कलाकृती कलासंग्रहालयांतून, शिल्प-उद्यानांतून पाहिल्या जातात. त्यावेळी आवडलेल्या कलाकृतीच्या आधी वा नंतर त्या कलाकाराने केलेलं काम आणि त्यामागचा कलाकार जाणून घ्यायची उत्सुकता वाटते. कधी त्या कलाकाराच्या मनाचा ठाव लागत नाही, तर कधी ते मनात घर करून बसतात आणि जणू काही स्वत:हून आपल्या चित्रांबद्दल किंवा शिल्पांबद्दल बोलल्यासारखे वाटतात. कलेच्या मागची व्यक्ती आणि तिच्या अभिव्यक्तीचा प्रवास जसजसा उलगडत जातो, तितकी ती कलाही अधिक चांगली आकळत जाते. हे विशेषत: अमूर्ततेकडे झुकणाऱ्या कलेविषयी हमखास घडतं. कॉन्स्टंटिन ब्रांकुसीसारख्या (१८७६-१९५७)  विख्यात शिल्पकाराच्या कलाकृतींबद्दल.. त्यांची ‘बर्ड’ मालिका- विशेषत: ‘बर्ड इन द स्पेस’ (१९३१) हे संगमरवर ते ब्रॉन्झपर्यंत प्रवास करत गेलेलं शिल्प किंवा ‘स्लीपिंग म्यूज’ (१९०९-१०) हे अनेक माध्यमं आणि तपशिलांच्या फेरफारांतून गेलेलं कालजयी शिल्प लूव्र, मेट, वॉशिंग्टन आर्ट गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट, टेट किंवा पॉम्पिदू सेंटरसारख्या प्रत्येक कलासंग्रहालयात भेटत राहतं आणि प्रथमदर्शनी उगीचच आवडू शकतं. पण ते नेमकं का आवडलं, हे लक्षात येत नाही. कारण शिल्पाचं नाव वाचल्याशिवाय तो पक्षी पक्ष्यासारखा दिसत नाही, ना ‘प्रिन्सेस’ राजकुमारीसारखी! पण ब्रांकुसीच्या सर्जनशीलतेचा मागोवा घेत जावं तसतसा संदिग्धतेचा एकेक पडदा हटत जातो आणि एका ‘आहा!’ क्षणी स्पष्ट सौंदर्यबोध होतो. ब्रांकुसीबरोबर आपलीही वाटचाल दृश्याच्या दर्शनी रूपापासून एकेक अनावश्यक तपशील गळत जाऊन गाभ्यापर्यंत होत गेल्याचं जाणवतं. खेडुतासारखा रांगडेपणाने जगात वावरणारा, शिल्पांच्या अभिजात परंपरेला शांतपणे शह देणारा ब्रांकुसी त्याच्या समकालीनांना अनाकलनीय, आडमुठा वाटायचा, हे आज खरं तरी वाटतं का?

How to make solkadhi marathi recipe
recipe : चिकन, मटणाच्या जेवणासह हवी थंडगार सोलकढी? मालवणी पद्धतीने कशी बनवायची जाणून घ्या
How to prevent heart attacks
Heart Attack : हृदयविकाराचा धोका कसा टाळायचा? वयाच्या विसाव्या वर्षापासून लावा ‘या’ सवयी, तज्ज्ञ सांगतात…
The price of gold reached the highest level
विश्लेषण: सोन्याला तेजीची झळाळी का?
High class houses out of MHADA lottery Thinking of stopping construction of expensive houses from now on
म्हाडा सोडतीतून उच्च गटातील घरे बाद? यापुढे महागड्या घरांची निर्मिती थांबवण्याचा विचार

मूळच्या रोमेनियन ब्रांकुसीची कहाणी अगदी आगळीवेगळी. जन्म कार्पेथियन पर्वतासमोरच्या अप्रगत प्रदेशातील शेतकरी कुटुंबातला. ती एकंदर सात भावंडं. जुजबी शिक्षणानंतर  मजुरीसाठी एका जमीनदाराच्या शेतावर रवानगी झाली. मालकाच्या लक्षात आलं की हा पोरगा लाकडी शिल्पं चांगली करतोय, म्हणून त्याने त्याला जवळपासच्या कलाविद्यालयात घातलं. तिथून तो बुखारेस्ट आणि त्यानंतर बोटीने म्युनिकला आला. म्युनिकहून इकोले द बूझांमध्ये दाखल होण्यासाठी तो पायी चालत पॅरिसला आला असं म्हणतात. सुरुवातीला एका हॉटेलमध्ये भांडी घासून गुजराण केली आणि बरोबरच लूव्र आणि म्यूझी गिमे या दोन्ही कलासंग्रहालयांत जात राहून थोर कलाकारांची कामं पाहत तो स्वत:ला शिकवत राहिला. रोडाँकडेही प्रशिक्षणाची संधी मिळाली; पण तो दोनच महिन्यांत तेथून बाहेर पडला. ‘विशाल वटवृक्षाखाली लहान रोपं मोठी होत नाहीत’ या उक्तीचा त्यालाही प्रत्यय आला असावा. मुख्य म्हणजे रोडाँना वाईट वाटलं नाही. ते ब्रांकुसीच्या कलेला, शैलीला सतत उत्तेजन देत राहिले. ‘देह आणि देहबोली यांची असामान्य जाण त्याच्या कामात दिसते,’ असं ते म्हणत.

स्वत:ला शोधताना पॉल गोगँच्या चित्रांची ‘पॉलिनेशिया’ ही मूळ विषयांपासून शैलीपर्यंत परंपरेशी फारकत घेणारी मालिका ब्रांकुसींच्या पाहण्यात आली आणि त्यांच्या शब्दांत त्यांना ‘रोड टू दमास्कस’ गवसला. त्यांनी शिक्षण-प्रशिक्षणाची वाट सोडली आणि कास्टिंग व मॉडेल्सची पाश्चिमात्य परंपरा बाजूला सारून थेट लाकडात किंवा दगडात काम सुरू केलं. लाकूड, संगमरवर आणि ब्रॉन्झमधल्या  फिगरेटिव्ह शिल्पांचे आकार कमालीचे साधे आणि कमीत कमी दिखाऊ तपशील असलेले करून टाकले. ‘कुठलीही गोष्ट निसर्गात आहे तशी दाखवली तर ते अनुकरण होईल, ती स्वत:ची कलाकृती नसेल. स्वत:ला त्यात नेमकं काय सुंदर दिसतं ते आणि तेवढंच कलाकाराने मांडावं,’ असा ब्रांकुसींचा ठाम दृष्टिकोन बनत गेला. निर्मितीबाबतीतही माध्यम दगड असो वा धातू, त्यांनी प्रत्येक शिल्प स्वहस्ते बनवलं. प्लास्टर किंवा धातूचा साचा बनवायचा तर तोही स्वत:च आणि त्यातून बाहेर येणाऱ्या प्रत्येक पुनरावृत्तीवरही स्वत: पॉलिशिंग वगैरे सोपस्कारांचा अखेरचा हात फिरवायचा.. हा कायम पाळलेला दंडक. कारण प्रत्येक घडत असलेलं शिल्प त्यांच्यासाठी एक नव्याने केलेलं काम होतं. म्हणूनच अनेक आवृत्ती निघालेल्या त्यांच्या प्रत्येक कामात काही ना काही फरक असतोच!

ब्रांकुसींच्या नावावर २१५ शिल्पं, अनेक प्रोटोटाइप्स आणि छायाचित्रं जमा आहेत. त्यांच्या कीर्तीचा पाया घालणारं शिल्प होतं ‘ल म्यूज एन्डोर्मी’ (१९०९-१०) म्हणजे निद्रिस्त स्फूर्तिदेवता (६ह्णह्ण  ९.५ह्णह्ण  ७ह्णह्ण). मूळचं दगडातलं.. कुठे गेलं ते माहीत नाही. त्यामध्ये ही स्फूर्तिदेवता उभी होती. त्यानंतर संगमरवर आणि शेवटी प्लास्टरचा साचा बनवून सहा ब्राँझेस आणि शेवटी पॅटिनेटेड ब्रॉन्झ विथ गोल्ड लीफ असा त्याचा प्रवास झाला. संगमरवरातील शिल्प वॉशिंग्टनच्या हॅशरेन म्युझियमच्या शिल्प उद्यानात आहे. कलासमीक्षक मारिल टॅबोर्टनुसार, बॅरोनेस रेनी फ्रेशूं त्यांची मॉडेल होती आणि हे काम दीड  वर्ष चालू होतं. इथे असलेला ‘अंडाकृती चेहरा’ ही ब्रांकुसींची पहचान बनली. भौमितिक रेषेतून उतरलेलं नाक, काही आवृत्तींमध्ये अस्फुट, विशाल डोळ्यांवरील पापण्या आणि त्याला जरा विशोभित जिवणी. तीन वर्षांपूर्वी अखेरचं शिल्प म्हणजे पॅटिनेटेड ब्रॉन्झ विथ गोल्ड लीफ (१०.५ह्णह्ण  लांबीचं) न्यूयॉर्क क्रिस्तीजच्या लिलावात ५७.४ मिलियन्सना विकलं गेलं. याच अमेरिकेत एकेकाळी प्रदर्शनात मांडलेल्या त्यांच्या ‘प्रिन्सेस एक्स’वर अश्लीलतेचा आरोप करून खटले भरले गेले होते. पण दोन वर्षांतच न्यायाधीशांनी कलास्वातंत्र्याची जाण उचलून धरणारा निर्णय देत आरोप निर्थक ठरवला होता.  

‘बर्ड इन स्पेस’ हे त्यांच्या ‘मैस्त्रा’(पक्षी) मालिकेतलं सर्वात महत्त्वाचं शिल्प. एका अर्थी त्यांचं ‘मिशन स्टेटमेंट’! ‘गोल्डन बर्ड’ ते ‘बर्ड इन स्पेस’ ही मालिका (१९२३-४०) ब्राँकुसींच्या कलेचा मूर्ततेकडून अमूर्ततेकडे नेणारा ‘पक्षीप्रवास’ असावा बहुतेक! आधीच्या शिल्पातलं पक्ष्याचं पक्षीपण दाखवणारं शरीर, उंचावलेली चोच जाऊन आता फक्त एका कललेल्या पिसाच्या माध्यमातून अंतराळात झेपावणारा पक्षी सुचवला आहे. वर निमुळत्या होत गेलेल्या पिसाच्या आकारातून गतिमानतेचा आभास उभारलाय. या मालिकेतलं पहिलं शिल्प १९३१च्या आसपास संगमरवरात होतं. पुढे त्याच्या प्रतिकृती घडत गेल्या. त्यांना पक्ष्याच्या  सौंदर्याचं प्रतिरूप निर्माण करायचं नव्हतं. तर पुढच्या दर शिल्पातून उड्डाणप्रक्रियेमागच्या मूलतत्त्वाजवळ ते जाऊ बघत होते, तपशील गळून पडत होते आणि एकेक बहुमुखी सत्य साकार होत होतं. आणि मुख्य म्हणजे त्यांचा हा वेध वेगळ्या संस्कृतींमध्ये काम करणाऱ्या कलाप्रवृत्तीच्या मनांपर्यंत शैलीच्या वैशिष्टय़ांसह पोहोचत होता, हे सांगणारी सदानंद रेगेंची ही सुंदर कविता : ‘ब्रांकुशीचा पक्षी’!

‘आपल्या कानाचे

पडदे ओरबाडीत

तो गेला एका थोटय़ाकडे

नि म्हणाला : आता बस

त्या पियानोवर

पियानोच्या पोटात होता

ब्रांकुशीचा पक्षी

त्याने सूर, सूर सारे

पंखात भरले

नि घेतलं एक

सूर्यस्वी उड्डाण

त्रिमितीच्या बुरुजावरून’             (१९७७)

यानंतर शिल्पाचे तपशील देणं अनावश्यक. पण ते द्यायचे म्हटले तर शिल्प जवळजवळ सहा फुटी उंच आहे. लाकूड, दगड, संगमरवर आणि ब्रॉन्झमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी ते पाहायला मिळतं. ब्राँझच्या गुळगुळीत पृष्ठभागावर टिपिकल ब्रांकुसीचं असणारं अजोड पॉलिश आहे. एकंदरीत हे, की स्वत:चं शिल्पपण विसरायला लावून, अपरिभाषित राहणाऱ्या देखणेपणाची कृती ब्रांकुसींची आध्यात्मिक ‘दिठी’ बनते.

ब्रांकुसींच्या कामात कलेची दैवी देणगी दिसतेच, पण चिकाटी आणि कमावलेल्या मानवी हस्तकौशल्यावरची पकडही स्तिमित करणारी! ‘Create like a god,  command like a king and work like a slave’ हे त्यांचं विधान सुप्रसिद्ध आहेच. ‘मोमा’मध्ये ब्राँकुसींचा सपाट, काळ्यावर पांढऱ्या तुटक रेषा असणारा ‘फिश’ मांडलाय. त्यातून त्यांचा अ‍ॅप्रोच आणखी स्पष्ट होतो. क्यूरेटर पॉलीना पोबाचा म्हणते, ‘हा मासा वागतो माशासारखा.. दिसत कमी असला तरी.’ त्यांना नेमकं हेच तर अभिप्रेत होतं- माशाचं सुळ्कन पाण्यात निसटणं.

ब्रांकुसींच्या मनात रोमेनिअन लोककला जिवंत होत्या. त्यांनी आपल्या घराची सजावट आणि खाणंपिणं रोमेनियनच ठेवलं होतं. ते पॅरिसमध्ये येणाऱ्या देशबांधवांना मदत करत असतं. समकालीनांमध्ये पिकासो व आन्द्रे डेरां यांच्या ‘एक्झॉटिक प्रिमिटिव्हिझम’चा लोककलांशी मिळताजुळता प्रभाव त्यांच्या कामावर दिसतो. विशेषत: अंडाकृती किंवा लंबगोल चेहऱ्यांच्या आकार व ठेवणीवर आणि कामातल्या भौमितिक परिमाणांत. त्यांच्या मित्रगणांत रोमेनियन कवी पाऊल चेलान, मूळचा अमेरिकन कवी एझ्रा पाऊंड, लेखक रुसो आणि फ्रेंच चित्रकार मार्सेल दुशों, मूळचे इटालियन मोदिग्लियानी होते. पण ब्रांकुसींनी पश्चिम युरोपपासून आपलं वेगळेपण निडरपणे सांभाळलं. कलेशी एकनिष्ठता आणि आपल्या हातांवर असलेला पूर्ण विश्वास त्यांच्या जीवनाच्या केंद्रस्थानी  होता.

आयुष्याच्या संध्याकालातला त्यांचा एक फोटो पाहण्यात आला. घरी असावी तशी केश/ वेशभूषा. शिल्पकाराच्या खोलीत असावा तसा. चारी बाजूंना निर्मितीसाठी लागणारं सामान, माती आणि प्लास्टरच्या साच्यांचे काही शाबूत, तर काही तोडून टाकलेले तुकडे, प्रोटोटाइप्स आणि उपयोगाच्या वस्तूंचा दुसऱ्याला पाऊल ठेवायला जागा शोधावा लागणारा पसारा आणि त्याच्या मधोमध पलंग. त्यांनी फ्रेंच नागरिकत्व घेतलं होतं ते फक्त त्यांची वृद्धापकाळात काळजी घेणाऱ्या मूळच्या रोमेनियन जोडप्याला आपलं घरदार देता यावं म्हणून. आपला स्टुडिओ आणि सगळी शिल्पं त्यांनी राष्ट्रीय कलासंग्रहालयाला दान केली होती. हा शिल्पकार काळाच्या पुढे होता. शिल्पांची व्याख्याच बदलणाऱ्या त्यांच्या द्रष्टेपणाबद्दल म्हटलं जातं की : He changed the way future generations would make and view art. उभं आयुष्य फक्त स्वत:शी आणि कलेशी प्रामाणिक राहून नि:संगपणे जगणाऱ्या मिनिमलिस्ट शिल्पकाराला साजेशी श्रद्धांजली!

अनुवाद : संपदा सोवनी