|| किशोर अर्जुन

वर्तमानपत्रीय लेखांचे अस्तित्व हे तात्कालिक असते असे मानले जाते. पण हा नियम प्रत्येक वेळी लागू होतोच असे नाही. आणि हा अपवाद ‘जहाल आणि जळजळीत’, ‘ओस्सय’ आणि ‘हिरव्या बोलीचे शब्द’ या तीन पुस्तकांतून गोवास्थित ज्येष्ठ पत्रकार राजू नायक हे सप्रमाण दाखवून देतात. गोव्यासारख्या छोटय़ाशा प्रदेशाची स्पंदने टिपत त्यांना संदर्भमूल्य देणारे हे उल्लेखनीय लेखसंग्रह आहेत. गोवा समजून घेण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना ही पुस्तके मार्गदर्शक ठरतील. गेल्या दहा वर्षांमध्ये गोव्यासारख्या छोटय़ाशा राज्यामध्ये झालेले राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक आणि पर्यावरणीय बदल नेमकेपणाने टिपत त्यावर विषयानुरूप आपली विचक्षण टिप्पणी राजू नायक या पुस्तकांतून नोंदवतात. सध्याच्या अस्थिर आणि संमोहन- टोकाच्या राजकीय-सामाजिक परिस्थितीत वाचकांसमोर एकांगी, एककल्ली आणि एकारलेले समाजचित्र उभे करण्यापेक्षा सत्याची जाणीव करून देत लोकमनाला भानावर आणणे हे पत्रकार म्हणून आपले आद्यकर्तव्य असल्याची भावना या संकलनांतून आवर्जून समोर येते.

देश आणि जागतिक पातळीवर घडणाऱ्या विविध क्षेत्रांतील घडामोडींचा गोव्यावर नेमका काय परिणाम होऊ शकतो हे या पुस्तकांत मांडण्यात आले आहे. दिल्लीमध्ये ‘आप’ सत्तेत आल्यानंतर गोव्यातील सामाजिक-राजकीय-जातीय परिस्थिती तपशीलवारपणे मांडत ‘ज्यांना काहीतरी समाजासाठी करून दाखवायची तळमळ आहे, त्यांना राजकारणात आणि लोकशाहीत नवीन अर्थ शोधण्याची ही सुवर्णसंधी आहे!’ अशी टिप्पणी त्यावर वाचायला मिळते. त्याचवेळी राजकीयदृष्टय़ा सतत अस्थिर असलेल्या गोव्याबद्दल ‘अस्थर्य हे छोटय़ा राज्यांसाठी चांगलेच आहे. (कारण त्यामुळे) राष्ट्रीय पक्षांना बहुमत न देता त्यांना धारेवर धरण्याची संधी लोकांना मिळत (असते)’ असे मत लेखकाने एका लेखात व्यक्त केले आहे. परशुरामाने गोव्याची निर्मिती केल्याच्या मिथकापासून ते राज्यात रखडलेल्या अटल ग्राम योजनेपर्यंत सगळ्याबद्दल  सारासारपणे व तितक्याच कठोर शब्दांत मतप्रदर्शत करत लेखकाने राजकारण्यांना, सत्ताधाऱ्यांना आणि जनतेला ‘गोव्याबद्दल तुमचे काय व्हिजन आहे?’ असा रोकडा सवालही  केला आहे.

राजू नायक हे स्वत:ला ‘पर्यावरणवादी पत्रकार’ संबोधतात. हे संबोधन सार्थ आहे का, याचे उत्तर ‘हिरव्या बोलीचे शब्द’ या पुस्तकातील पानापानांत दिसते. ‘गोव्यातील खाणी’ हा इथल्या सगळ्यांचाच जिव्हाळ्याचा प्रश्न. गोवा पोखरणाऱ्या या खाणींमुळे राज्याच्या झालेल्या अपरिमित हानीकडे देशाचे लक्ष वेधत पर्यावरण अभ्यासक क्लॉड अल्वारिस यांच्या गोवा फाऊंडेशनने पुढाकार घेऊन सर्वोच्च न्यायालयाकरवी या खाणी बंद केल्या. राजू नायक यांनीदेखील खाण लॉबीविरोधात आपली लेखणी उगारली. ‘खंदक’ या २०१२ साली प्रकाशित झालेल्या त्यांच्या पुस्तकात हे अधिक दाहकपणे जाणवते. ‘हिरव्या बोलीचे शब्द’मध्ये ‘खाण समस्या’ या प्रकरणातील निवडक आठ लेखांमध्येही तीच तीव्रता आढळते. फुटकळ कवडय़ांसाठी इथला पारंपरिक शेतकरी शेती कसण्यापेक्षा त्याची माती करण्यामध्ये अधिक रस असलेल्या खाण अवंलबितांच्या मेळाव्यामध्ये सामील झाल्यामुळे लेखकाचा होणारा त्रागाही या ठिकाणी दिसतो. त्याचबरोबर खाणबंदीसाठी झटणाऱ्या हजारो कार्यकर्त्यांसोबत खांद्याला खांदा लावून लढणारे चेहरा नसलेले आदिवासीही यात भेटतात.

‘ओपिनियन पोल’मधला विजय आणि त्यानंतरचे ५५५ दिवसांचे ‘राजभास आंदोलन’ आणि ‘कोंकणी मान्यताय दीस’च्या यशानंतरही गोव्यात आजही भाषिक राजकारण नेहमी तापत राहते. यात कधी रोमी आणि देवनागरी कोंकणी (लिपी)चा वाद, त्यातला चर्चचा हस्तक्षेप, त्यामुळे होणारे धार्मिक ध्रुवीकरण, दुसरीकडे मराठी हीसुद्धा राजभाषा व्हावी म्हणून होत असलेली आंदोलने आणि त्याचवेळी भाजप सरकारने इंग्रजी माध्यमातील शाळांना दिलेल्या अनुदानामुळे त्याविरोधात ‘भारतीय भाषांच्या सुरक्षे’साठी सरसावलेला मोठा जनसमुदाय आणि या सगळ्याचे राज्याच्या भाषिक, सामाजिक आणि राजकीय पटलावर होणारे दूरगामी परिणाम ‘ओस्सय’मधील ‘भाषा’ प्रकरणात तपशीलवारपणे येतात. त्याचप्रमाणे उदय भेंब्रे, पद्मश्री सुरेश आमोणकर, रामकृष्ण नायक, जॅक सिकेरा, माथानी साल्ढाना, कुन्य रिव्हार आदी नव्या गोव्याची भाषिक व सांस्कृतिक ओळख असलेल्या म्हालगडय़ांसोबत भाषातज्ज्ञ डॉ. गणेश देवी यांचीही ओळख गोव्याच्या (आणि प्रामुख्याने कोंकणीच्या) पाश्र्वभूमीवर सांस्कृतिक अंगाने सामाजिक-राजकीय प्रश्नांवर निरीक्षणे नोंदवणाऱ्या ‘ओस्सय’मध्ये येते.

या तिन्ही पुस्तकांतील लेखांची वाचकसोय मांडणी वेधक आहे. वैचारिक लेखन वाचताना अपेक्षित असलेला वाचनविसव यात दिसतो. चित्रकार सुभाष अवचट यांनी ‘हिरव्या..’चे केलेले मुखपृष्ठ म्हणजे चिंतनशील लेखच आहे. ‘जहाल आणि..’चे जनार्दन शेटय़े यांनी केलेले मुखपृष्ठ विषयाची अस्वस्थता व्यक्त करते. या पुस्तकांची उपशीर्षकेही मोजक्या शब्दांमध्ये मजकुराची दिशा स्पष्ट करतात. राजकारणाचा वेध घेणारे ‘जहाल आणि जळजळीत’ हे पुस्तक मुखपृष्ठावर नमूद केल्याप्रमाणे ‘नवसहस्रकातील गोमंतकीय राजकारणाची तर्ककठोर मीमांसा’ कुणाचाही मुलाहिजा न राखता करते.नायक यांचा आवडीचा विषय असलेल्या पर्यावरणासंदर्भातील ‘हिरव्या बोलीचे शब्द’ या लेखसंग्रहाचे ‘नश्वर संचिताच्या सजग संवर्धनासाठी एका जागल्याची काळीज-हाक’ हे उपशीर्षक अत्यंत नेमके आहे. त्यांची ही ‘काळीज-हाक’ ही केवळ शब्दांतून येत नाही, तर खोल मनातून येते. आणि लेख वाचल्यानंतर कळते, की ही फक्त हाक नाही, तर लेखकाची आच आहे. ‘गोव्याच्या सांस्कृतिक घुसळणीतून आलेले नवनीत’ असे म्हणत ‘ओस्सय’ या सांस्कृतिक लेखसंग्रहाच्या मुखपृष्ठावर हिंदू, ख्रिश्चन आणि इस्लाम आचार-विचार-पेहरावाचा समुच्चय असलेला बाल येशू आपल्या मात्या-पित्यांसोबत दिसतो. कलेतील देशीवादामुळे राजसत्ता आणि धर्मसत्तेच्या रोषाला बळी पडलेल्या आग्नेल फॉन्सेका या प्रसिद्ध चित्रकाराचे चित्र अशा प्रकारे मुखपृष्ठावर प्रसिद्ध करत लेखक आपली विचारदिशा स्पष्ट करतो.

‘जहाल आणि जळजळीत’, ‘हिरव्या बोलीचे शब्द’, ‘ओस्सय’- राजू नायक, जाग प्रकाशन, मडगाव, गोवा.

  • पृष्ठे : अनुक्रमे- २८६, २६०, ३२८.
  • मूल्य : अनुक्रमे- २००, २००, ३०० रु.