उर्वी जोशी
ए के दिवशी बाबा म्हणाला, ‘‘आपण या सुट्टीत केदारनाथ-बद्रीनाथच्या यात्रेला जाऊ या. मी तेव्हा होते आठ वर्षांची! मी बाबाला विचारलं, ‘‘केदारनाथ- बद्रीनाथ आहे कुठं?’’ त्यावर बाबा म्हणाला, ‘‘ही तीर्थस्थाने उत्तराखंड राज्यात आहेत.’’ मी तेव्हा खूश झाले. कारण मला नवीन ठिकाणं बघायला मिळणार होती. दिल्लीपर्यंत होतं विमान आणि पुढे जायचं होतं वळणावळणाच्या आगगाडीनं! मज्जाच मज्जा! बाबा म्हणाला, ‘‘ केदारनाथ तर खूप उंचावर आहे. तू चालशील ना?’’ मी मोठ्यांदा होऽऽऽ असं म्हटलं. पण तिथं प्रत्यक्ष गेल्यावर दिसला चढाचा लांबचलांब रस्ता. १८ कि.मी. पेक्षाही जास्ती चालावं लागणार होतं. खरं तर तेथे जायला घोडे होते, हेलिकॉप्टर होतं, डोली होती, पाठीवर लोकांना घेऊन जाणारे पिठू होते. पण बाबा म्हणाला, ‘‘आपण चालतच जाउया.’’ मी बरं म्हटलं. बघू तरी किती चालता येतंय. रस्त्याने घोडे चालत होते, काही तर पळत होते. रस्त्याचे रेलिंगही हलत होते आणि घोडे शेजारनं गेले तर असं वाटत होतं की आपण पडू की काय? पण एकीकडे मला घोड्यांची दयाही येत होती. कारण त्या घोड्यांना वाटेत थोडा वेळ पाणीसुद्धा पिऊ देत नव्हते.
मजल दरमजल करत आम्ही पुढे जात होतो. सुरुवातीला रस्ता सपाट होता त्यामुळे खूप सोपं वाटलं, पण जेव्हा चढ सुरू झाला तेव्हा पाय थोडे थोडे दुखायला लागले. मग आम्ही काठ्या घेतल्या. थोडं अंतर चालून गेल्यावर आम्हाला भूक लागली. मग आम्ही एका धाब्यावर थांबलो. तिथं गरम गरम मॅगी खाऊन चहा घेतल्यावर मस्त वाटलं. मग आम्ही पुन्हा चालायला सुरुवात केली. थोडं पुढं गेलो तर मला एक गंमतच दिसली. एका डोंगरावर बर्फाचा पांढरा शुभ्रकडा चमचम करत होता. तो पाहून मी खूप खूश झाले. कारण मला वाटलं, केदारनाथचं मंदिर जवळ आलंय. मग मी एका दादाचं बोलणं ऐकलं. तो म्हणत होता की केदारनाथचं मंदिर या बर्फाच्या कड्या मागे आहे. मी डोक्याला हात लावला अन् काठी घेऊन पुन्हा चालायला लागले. तब्बल १० तासांनी आम्ही बेसकॅंपला पोहोचलो. तिथं आम्ही मुक्काम केला. तिथं प्रचंड थंडी होती. अशी थंडी आजपर्यंत मी अनुभवली नव्हती. आम्ही जेवलो अन् चांगली जाड गोधडी घेऊन झोपलो.
दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही सगळं आवरून नाश्ता करून पुन्हा चालायला लागलो. रस्त्यात एक पिठू भेटला. तो म्हणाला, ‘‘भैय्या, मैं आपको आगे छोड देता हूँ.’’ त्यावर बाबा म्हणाला, ‘‘नहीं भैय्या हम चलकेही जाते हैं.’’ आम्ही मग परत चालायला लागलो. साधारण एक कि. मी. चालून झालं असेल तेव्हढ्यात दूरवर आकाशात मला हेलिकॉप्टर जाताना दिसलं आणि पुढं पाहिलं तर आकाशात केदारनाथ मंदिराचा कळस उन्हात चमचम करत होता. मला इतका आनंद झाला की, मी पुढे पुढे पळायला लागले. १५/२० मिनिटांतच मला केदारनाथचं भव्य मंदिर दिसलं. मंदिराच्या मागे बर्फाचे मोठ्ठे डोंगर दिसत होते. निळंशार आकाश, पांढरीशुभ्र शिखरं आणि त्यांच्या कुशीतलं भव्य शिव मंदिर पाहून आम्ही आश्चर्यचकित झालो.
आमच्याकडे दोन बॅगा व पाठीवरची मोठी सॅक होती म्हणून आम्ही पहिल्यांदा हॉटेलवर गेलो. पाय प्रचंड दुखत होते. मग आम्ही एक झोप काढून फ्रेश झालो व केदारनाथच्या दर्शनासाठी निघालो. केदारनाथचं मंदिर अतिशय भव्य आहे. हे दगडी मंदिर महाभारतकालीन आहे व १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. गाभाऱ्यात शिवलिंगाऐवजी बैलाच्या पाठीच्या आकाराची दगडी शिळा आहे. यामागची गोष्ट काय आहे हे आम्ही इंटरनेटवर शोधली. मग आम्ही दर्शनाच्या रांगेत उभे राहिलो. १५ मिनिटांनी गाभाऱ्यात पोहोचलो. मनोभावे दर्शन घेतलं आणि मग आम्ही हॉटेलवर आलो. आल्यावर नेटवरून केदारनाथची गोष्ट कळली.
वळणावळणाच्या रस्त्याने बद्रीनाथला गेलो. जाताना डोंगर, झाडं दिसत होती. एका डोंगरावर बर्फ होता. परिसर फार छान दिसत होता. दुसऱ्या दिवशी आम्ही बद्रीनाथच्या मंदिरात गेलो. बद्रीनाथचं मंदिर अतिशय विशाल आहे. मंदिराच्या भिंतीवर सुंदर कोरीव काम आहे. तिथल्या पुजाऱ्याकडून आम्हाला बद्रीनाथची गोष्ट कळली.
भगवान विष्णुंचे दर्शन घेऊन आम्ही मंदिरात जरा वेळ बसलो. मग आम्ही मंदिराला प्रदक्षिणा घालून हॉटेलवर परतलो. रात्री जेवण करताना तिथला शेफ आमच्याशी चक्क मराठीत बोलला. त्यानं आमच्यासाठी खास मिरचीचा ठेचा करून ठेवला होता. तो त्यानं आम्हाला जेवणात वाढला तेव्हा आम्ही खूश झालो व त्याच्या आदरातिथ्यानं भारावून गेलो. आम्ही जेवण करून हॉटेलवर आलो व समाधानानं झोपी गेलो. हा परिसर आम्हाला खूप आवडला. हिमालयाची भव्य शिखरं दिसली. हा परिसर मनात घर करून राहिला.
(इयत्ता- पाचवी)
lokrang@expressindia.com