डॉ. अद्वैत पाध्ये
बालपणापासून ते उतार वयापर्यंत वाचन ही सकस मनासाठी आवश्यक असलेली बाब… लहान वयापासूनच साहित्य हे मन संस्कारित करण्याचे उत्तम साधन आहे- मग ते मौखिक असो वा लिखित. ज्या वेळेस आपल्याला समज येत जाते आणि आपण वैविध्यपूर्ण साहित्याच्या विश्वात शिरतो तेव्हा साहित्याबरोबर आपले मन अधिक समृद्ध होत जाते.

मानवी मन, समाजमन, भवताल व्यापकपणे कळायला लागते. माणूस म्हणून अधिक सम़ृद्ध होण्यासाठी साहित्य विश्वात मुक्त आणि सजग मुशाफिरीला पर्याय नाही. साहित्य जे देते ते आधुनिक तंत्रज्ञान देईलच असे नाही, त्यामुळे तंत्रज्ञानाच्या जाळ्यात फारसे न अडकता, त्यांचा आयुष्यात विवेकी वापर करून साहित्याला आपलेसे करणे, मानसिकदृष्ट्या स्वत:ला अधिक सक्षम, सजग करणे गरजेचे आहे. समाजमाध्यमांच्या जाळ्यात न अडकता त्याचा विवेकी वापर करून सत्य माहितीसाठी लिखित साहित्य अधिक महत्त्वाची भूमिका बजावते.

बरे, वाचन ही प्रकिया फक्त वाचावे म्हणून अधाशासारखे वाचावे आणि तिथेच सोडून द्यावे असे नाही. तर वाचलेल्या साहित्याचा सांगोपांग विचार करता यायला हवा. त्यातून मानवी नातेसंबंध, भवताल, समाज याविषयी समजून घेता येण्याची विवेक बुद्धी अधिक समृद्ध करता यायला हवी… गाणी, कविता, संगीत यांचा अर्थ समजून घेऊन ते आपल्या जीवनाशी जोडल्यास आपला विवेक जागृत होतो. विविध प्रकारच्या साहित्याच्या वाचनामुळे मनातील विकारांचा नाश आणि भावनांचा विकास होतो. वाचनातून झालेला मेंदूचा विकास मनाचे आरोग्य समृद्ध करते. त्यामुळे मेंदूच्या तल्लखतेसाठी साहित्य वाचन खूप महत्त्वाचे ठरते.