‘अयोध्या’या माधव भांडारी यांनी लिहिलेल्या पुस्तकात अयोध्येविषयी जुने-नवे संदर्भ घेत आयोध्या नगरीचा पट उलगडला आहे. रामजन्मभूमीच्या प्रश्नाच्या पार्श्वभूमीवर लेखकाने कधीही पराभूत न झालेल्या अयोध्या नगरीचा मागोवा घेतला आहे.
वैदिक, पौराणिक काळात अयोध्या कशी होती याचे विवेचन सुरुवातीलाच येते. अयोध्येचे आध्यात्मिक महत्त्व, जैन, बौद्ध धर्मातील रामायणाचे संदर्भ लेखकाने दिले आहेत. अयोध्या नगरी ही साधू, संन्यासी आणि बैराग्यांची नगरी कशी आहे हे सांगताना तिथले मठ, आखाडे, गढी यांचे संदर्भ लेखक देतो. तसेच रामकथेचा भारतात, जगात कसा प्रसार होत गेला, अयोध्येचे ऐतिहासिक महत्त्व, आयोध्येतील शिलालेख, इस्लाम आक्रमणादरम्यानची अयोध्या, ब्रिटिश राजवटीतील अयोध्या, आयोध्या व महाराष्ट्र, शीख, राजपूत यांचा परस्परसंबंधही लेखकाने विशद केला आहे.
अयोध्येविषयी युरोपियन प्रवाशांनी मांडलेली निरीक्षणे, मुस्लीम ग्रंथकारांनी अयोध्या, रामजन्मभूमीविषयी काय लिहून ठेवले आहे, याचा संक्षिप्त आढावा लेखकाने घेतला आहे.
रामजन्मभूमीचा न्यायालयीन लढा, घटनाक्रम, इतिहासतज्ज्ञांच्या साक्षी… अशा अनेक मुद्द्यांना लेखक स्पर्श करतो.
‘अयोध्या’, माधव भांडारी, नंदिनी पब्लिशिंग हाऊस, पाने-४२२, किंमत-६०० रुपये.
फुलांविषयी…
अनेकदा एखाद्या बागेतली फुलं आपल्या कोमेजल्या मनाला प्रसन्न करतात. बाल्कनीतून डोकावणारं एखादं फूल आपल्या चेहऱ्यावर हास्य फुलवतं. निसर्गाची आवड असणाऱ्या जे. डी. पराडकर यांचं ‘ऋतुरंग’ हे पुस्तक म्हणजे आपल्या अवतीभोवती असलेल्या सुंदर फुलांविषयीची अभ्यासपूर्ण माहिती. मुखपृष्ठापासूनच देखणं असलेलं हे पुस्तक उत्तम माहिती आणि फुलांच्या सुंदर छायाचित्रांनी सजलं आहे.
विविध ऋतूंमध्ये फुलणाऱ्या फुलांविषयी लालित्यपूर्ण भाषेत शास्त्रीय माहिती दिली आहे. या पुस्तकातील अनेक फुलं आपल्याला माहीत नाहीत. काहींची नावेही गमतीशीर आहेत. यातील अनेक फुलांचा औषधी गुणधर्म वाचकाला अचंबित करून जातो. या पुस्तकामुळे वाचकालाही फुलांचे वेड लागते. कातळावरच्या फुलांविषयी खूपच नवीन माहिती मिळते. त्याचबरोबर सुरंगी, मधुमालती, निवडुंग, तिळाची फुलं, करवंदीची फुलं याविषयी छान माहिती मिळते.
‘ऋतुरंग’, जे. डी. पराडकर, चपराक प्रकाशन, पाने-१२०, किंमत-३०० रुपये.