ज्येष्ठ लेखक प्रा. रमेश देसाई यांच्या निधनाला आज, ९ सप्टेंबर रोजी एक वर्ष झाले. यानिमित्त त्यांच्या कारकीर्दीचा आणि व्यक्तिमत्त्वाचा करून दिलेला परिचय ..
मराठीतील एक मान्यवर लेखक प्रा. रमेश देसाई हे शालेय जीवनात ‘राष्ट्र सेवा दला’शी निगडित होते व तेथेच त्यांना समाजकार्याची दीक्षा मिळाली. महाविद्यालयीन शिक्षणकाळात ‘न्यायमूर्ती रानडे करंडक आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धे’त भाग घेऊन त्यांनी बक्षिसेही मिळवली व तेव्हाच त्यांच्यातील नेतृत्वगुणांची पायाभरणी झाली.
सुरुवातीची दोन वर्षे पुण्याच्या वाडिया कॉलेजमध्ये शिक्षण घेतल्यानंतर रमेश देसाई १९५३ साली मुंबईच्या सिद्धार्थ कॉलेजमध्ये प्रवेश घेऊन भौतिकशास्त्र विषयात पदवीधर झाले व त्यानंतर १९५७ साली त्यांनी ‘अणुभौतिकी’ विषयात पदव्युत्तर पदवी मिळवली. या काळात प्रा. मधू दंडवते हे त्यांचे विद्यागुरू तर होतेच, पण त्यांच्या एकंदर राजकीय व्यक्तिमत्त्वाचाही प्रभाव पडून रमेश देसाई डॉ. राममनोहर लोहिया यांच्याही चळवळीने भारले गेले. इथेच त्यांच्या जीवनात त्यांच्यासमोर दोन वाटा खुल्या झाल्या आणि त्यांची मन:स्थिती द्विधा झाली. १९५०-६० या दशकात भारतात डॉ. होमी भाभा यांच्या नेतृत्वाखाली विज्ञानयुग सुरू झाले व भारतात तुर्भे येथे ‘अप्सरा’ नामक पहिली अणुभट्टी स्थापन झाली. आता शिक्षणाच्या चाकोरीच्या मळवाटेने जाऊन, ‘अणुभौतिकी’ विषयात आपले कर्तृत्व दाखवावे, की भोवतालच्या राजकीय व सामाजिक चळवळींना प्रतिसाद द्यावा, अशी देसाईंच्या मनात चलबिचल सुरू झाली. अखेरीस, त्यांच्या मनाने राजकीय – सामाजिक क्षेत्राच्या बाजूने कौल दिला. एवढेच नव्हे तर, त्यांनी त्या काळात भारताने अण्वस्त्रसज्जतेच्या दिशेने वाटचाल करण्याच्या संबंधात एक टीकालेखही लिहिला. पण काही झाले तरी, उपजीविकेचा प्रश्न भेडसावतच होता. म्हणून १९६३ साली त्यांनी सोफिया कॉलेजमध्ये प्राध्यापकी पेशा पत्करला व अखेरीस १९९३ साली ते सेवानिवृत्त झाले.
मध्यंतरीच्या प्रवासात त्यांनी जीवनाच्या विविध क्षेत्रात स्वच्छंद मुशाफिरी केली. त्यांच्या एका पुस्तकातील मनोगतात ते म्हणतात – ‘भरकटणे’ ही माझी हेतुपूर्वक व जाणीवपूर्वक जोपासलेली जीवनधारणाच असावी. (सैगल-स्वरयुग) याला अनुसरूनच की काय, प्राध्यापकी पेशा चालू असताना, त्यांच्या कर्तृत्वाला अनेक धुमारे फुटले. १९५८ च्या सुमारास जॉर्ज फर्नाडिस इत्यादींच्या जोडीने ते ‘रुग्णालय कामगार संघटने’चे काम पाहू लागले. परंतु राजकीय महत्त्वाकांक्षेची पहिली पायरी म्हणून हे कार्य ठीक असले तरी, अस्सल राजकारणी होणे हा आपला पिंड नव्हे, हे लवकरच त्यांना कळून चुकले व १९६० सालच्या सुमारास त्यांनी हे कार्य थांबवले. त्याच वेळी कॉलेजमधील ‘राष्ट्रीय सेवा योजने’च्या अनुषंगाने कर्जतजवळील डोंगराळ भागातील आदिवासी ठाकर गिरिजन वस्त्यांत जाण्याचे प्रसंग आले. तेथील लोकजीवनाशी ओळख झाली आणि त्या निमित्ताने डोंगराळ भागांत पदभ्रमण करण्याचा छंद जडला.
१९५३ साली मुंबईतील काही प्राध्यापक व तरुण विद्यार्थ्यांनी ‘इंटरकॉलेजिएट हायकर्स’ ही संस्था स्थापन केली. नंतर त्याला मुंबई विद्यापीठाची मान्यता मिळून तिचे University Hikers and Mountaineers या संस्थेत रूपांतर झाले. या काळात त्यांनी दीर्घ काळ सह्य़ाद्रीच्या डोंगररांगा व त्यातील गडकिल्ले यावर चढाई करून १९६० च्या सुमारास कळसूबाई हे सह्य़ाद्रीचे सर्वोच्च शिखर पादाक्रांत केले.
पण निव्वळ पदभ्रमंती करून ते थांबले नाहीत. त्यांच्यातला अभ्यासक इतका जागरूक होता की, या सर्व गडकिल्ल्यांच्या परिसराचे नकाशारेखन करण्यात ते तरबेज झाले. हे सर्व नकाशे इतर हौशी भटक्यांना तर उपयोगी पडलेच, पण शिवाय भावी काळात ग्रंथलेखन करतानाही ते कामी आले.
१९५३ साली हिलरी-तेनसिंग या जोडीने एव्हरेस्टविजय संपादन केला तेव्हाच खरे तर देसाई सरांच्या मनात गिर्यारोहणाच्या छंदाचे बीजारोपण झाले होते. त्यालाच अनुसरून त्यांनी १९५४ साली प्रथम ‘क्लाइंबर्स् क्लब’ व मग पुढे ‘गिरिविहार’ या गिर्यारोहक संस्थेची स्थापना केली. सह्य़कडय़ांवर उभे असताना, हळूहळू (पान ३ वरून) त्यांना हिमशिखरे साद घालू लागली आणि त्यांनी सह्य़ाद्रीकडून हिमालयाकडे आपला मोर्चा वळवला. १९६५-६६ साली त्यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत हिमालयातील ‘हनुमान’ शिखरावर हनुमानउडी घेतली, तर १९६८ साली मिलाम हिमनदीची परिक्रमा केली व १९७० साली बथेरटोली शिखर मोहिमेचे नेतृत्व केले.
पण या सर्व खटाटोपात केवळ विक्रमवीर वा साहसवीर म्हणून गाजण्यात त्यांना रस नव्हता. या पर्वतारोहणाच्या ओघात, त्यांनीच एके ठिकाणी म्हटल्याप्रमाणे त्यांच्या ‘जाणिवेचे क्षितिज’ नित्य विस्तारत गेले. स्थलशोध मोहिमांच्या काळात त्यांनी आसमंताकडे ज्या दोन डोळ्यांनी पाहिले, त्यापैकी एक डोळा होता चिंतनशील अभ्यासकाचा व दुसरा होता आस्वादक्षम रसिकाचा. म्हणूनच त्यांनी या छंदाच्या अनुषंगाने परिसरातील लोकजीवन व निसर्गायण यांचा भौगोलिक, ऐतिहासिक, समाजशास्त्रीय, मानववंशशास्त्रीय व पर्यावरणीय अशा विविध अंगांनी उभा-आडवा छेद आणि वेधही घेतला, वेळोवेळी टिपणे नोंदली, नकाशारेखन केले, छायाचित्रांच्या रूपाने हे सर्व संग्रहित केले आणि अखेरीस सामान्य पण अभ्यासू वाचकांच्या सोयीसाठीं ते ग्रंथबद्धही केले.
दरम्यान, त्यांचे मराठी व इंग्रजी वृत्तपत्रांतून या विषयांवरचे स्फुट लेखन चालू होतेच; तब्बल दहा वर्षे त्यांनी एका इंग्रजी वृत्तपत्रामधून देशविदेशांतील गिर्यारोहण मोहिमांवरील पुस्तकांचे चिकित्सक परीक्षण केले. १९७०-८० च्या दरम्यान ‘युनेस्को’ने आखलेल्या ‘हिमनद्यांच्या अभ्यास-प्रकल्पा’त त्यांचा समावेश झाल्याने त्यांनी त्यामध्ये काही अभ्यासपूर्ण लेख लिहिले.
१९८३ साली ‘ग्रंथाली’ प्रकाशनातर्फे त्यांचे ‘वाघ आणि माणूस’ हे आगळेवेगळे पुस्तक प्रसिद्ध झाले. सद्यकाळात आपण आज ‘वाघ बचाव’ मोहिमेविषयी रोज वृत्तपत्रांतून वाचत आहोत; पण ८०-९० या दशकांत प्रा. रमेश देसाई यांनी आपल्याला वाघाचे व त्या निमित्ताने वनसंपदेचे महत्त्व पटवून दिले होते हे विशेष.
१९८५ साली महाराष्ट्र राज्याच्या रौप्य महोत्सवाच्या निमित्ताने दिल्लीच्या ‘महाराष्ट्र परिचय केंद्रा’ने परप्रांतीय व परदेशी पर्यटकांना महाराष्ट्राच्या विविध सांस्कृतिक वैशिष्टय़ांचा परिचय करून देण्यासाठी १५ इंग्रजी पुस्तिका प्रसिद्ध करण्याची योजना आखली. त्या वेळी ‘महाराष्ट्रातील दुर्गस्थापत्य’ या विषयावर लिखाण करण्यासंबंधी प्रा. रमेश देसाई यांना विचारणा झाली. त्यांनी होकार दिला, मात्र छोटय़ा पुस्तिकेपेक्षा काहीशा मोठय़ा आकाराच्या पुस्तकाचा त्यांनी आग्रह धरला व तो सरकारी पातळीवर मान्यही झाला. त्यातूनच १९८७ साली देसाईसरांचा Shivaji -the Last Great Fort Architect हा व्यासंगपूर्ण ग्रंथ साकारला.
दुर्गस्थापत्यशास्त्राचा जागतिक-भारतीय-महाराष्ट्र-सह्य़ाद्री अशा क्रमपातळ्यांवर संक्षिप्त आढावा आणि त्या पाश्र्वभूमीवर युगकर्त्यां व युगद्रष्टय़ा शिवाजी महाराजांच्या दुर्गकर्तृत्वाचा आलेख अशी या ग्रंथाची मांडणी आहे. गो. नी. दांडेकरांनी काढलेली उत्कृष्ट छायाचित्रे, काही चित्रकारांनी केलेली रेखाचित्रे व मुख्यत: प्रा. रमेश देसाई यांचे सूक्ष्म व रेखीव नकाशे यांनी सजलेल्या या ग्रंथातील देसाईसरांचे संशोधनपर इंग्रजी लेखन पाहून वाचक अक्षरश: अवाक होतो. निसर्गाने महाराष्ट्राला बहाल केलेल्या भौगोलिक प्रदेशाचा कल्पक उपयोग करून शिवाजी महाराजांनी महाराष्ट्राचा इतिहासच कसा बदलून टाकला, हे देसाईसरांनी अगदी नेमकेपणाने त्यात विशद केले आहे.
गिर्यारोहण अभ्यासाचे सर्वोच्च शिखर त्यांनी २००९ साली गाठले. ‘राजहंस प्रकाशन’ने प्रसिद्ध केलेला त्यांचा हिमालयावरील ‘तिसरा ध्रुव- हिमालय सर्वागदर्शन’ हा सर्वागसुंदर ग्रंथ म्हणजे त्यांच्या आयुष्यभराच्या अभ्यास-संचिताची फलश्रुती होय.
शिस्तप्रिय व आखीवरेखीव वाटणाऱ्या अभ्यासक रमेश देसाईंच्या अंत:करणात मात्र संगीताचा एक सुरेल झरा वाहत होता. प्रा. रमेश देसाई यांनी फक्त कानसेनगिरीच्या जोरावर १९९९ साली ‘सैगलस्वरयुग’ (मॅजेस्टिक प्रकाशन) हे विलक्षण पुस्तक जन्माला घातलं. त्यात त्यांनी केवळ ऐकीव व वाचीव माहितीच्या आधारावर सैगलच्या युगप्रवर्तक सांगीतिक कारकीर्दीचा ज्या ताकदीने आढावा घेतला आहे आणि जितक्या कुशलतेने त्याचे विश्लेषण व मूल्यांकन केले आहे ते वाचून रसिक वाचक थक्क होतो.
‘राष्ट्र सेवा दला’ने केलेल्या संस्कारांमुळे देसाई सरांनी सामाजिक बांधीलकीही जपली होती. त्यामुळेच वेळोवेळी, सांगलीतील ‘बळीराजा धरण चळवळ,’ ‘पश्चिम घाट बचाव आंदोलन,’ ‘गोवा मुक्तिसंग्राम,’ ‘कृष्णा परिक्रमा’ इत्यादी चळवळीत त्यांनी सक्रिय सहभाग घेतला.
इंग्रजी, संस्कृत, हिंदी, मराठी या सर्व भाषांवर प्रभुत्व आणि विविध शास्त्रांचा सखोल अभ्यास असलेल्या या प्रज्ञावंत व्यक्तीच्या दोन पुस्तकांना (‘वाघ आणि माणूस’ व ‘तिसरा ध्रुव’) राज्य पुरस्कार मिळाले, आयुष्याच्या उत्तरार्धात ‘गिरिमित्र संमेलना’तर्फे त्यांना ‘जीवनगौरव पुरस्कार’ने संन्मानित करण्यात आले.
गतवर्षी म्हणजे २०११ सालच्या पूर्वार्धात त्यांच्या सुविद्य पत्नीचे अकाली निधन झाले आणि तो आघात पुरता पचवण्याच्या आधीच ९ सप्टेंबर २०११ रोजी वयाच्या ७९ व्या वर्षी सरांचे अल्पशा आजाराने आकस्मिक निधन झाले. सर्वच इष्टमित्र, सहकारी व शिष्यपरिवार यांच्या हृदयाला चटका लावून ते गेले.
मोजक्याच ग्रंथसंपदेच्या रूपाने जगापुढे आलेली त्यांची बुद्धिमत्ता व विद्वत्ता म्हणजे हिमनगाचे पृष्ठभागावर दिसणारे निव्वळ टोकच होते. त्या खालचा अप्रकाशित हिमनग खरं तर अलक्षितच राहिला. आयुष्यभर विद्याव्यासंग हा एकमेव ध्रुवतारा डोळ्यांसमोर ठेवून त्यांनी वाटचाल केली आणि अखेरीस ते स्वत:च अढळ ध्रुवपदी जाऊन बसले.